Advt.

Advt.

बुधवार, २३ जुलै, २०१४

ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह

-महावीर सांगलीकर



ठाकूर दशरथप्रसाद हे युपी मधलं एक बडं प्रस्थ होतं. ते एक मोठे जमीनदार होते. राजकारणातही त्यांचं मोठं वजन होतं.

त्यांच्या तरुणपणी त्यांचं लग्न झालं. पण त्यांना मूळ-बाळ कांही होईना. मग त्यांनी दुसरं लग्न केलं. दुस-या बायको पासूनही त्यांना मूळ-बाळ होईना. मग त्यांनी तिसरं लग्न केलं. तिलाही मूळ-बाळ होईना.  

मग ठाकूर दशरथप्रसाद आपल्या तिन्ही बायकांना घेऊन या विषयातील एका जाणकार उर्फ तज्ञ डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी त्या सगळ्यांची तपासणी केली. त्यांना कुणातच कांही दोष आढळला नाही, त्यामुळे त्यांनी या चौघांना निर्दोष जाहीर केलं. ठाकूरसाहेबांना सांगितलं, प्रयत्न करत रहा, कधी ना कधी फळ मिळेलच.

आणखी दोन वर्षे झाली, पण ठाकूर साहेबांना कांही मुलबाळ होईना.

मग ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपला खानदानी जालीम उपाय अमलात आणण्याचं ठरवलं. ते आपल्या तीनही बायकांना, म्हणजे कुसुम, सुमन आणि कलावती यांना घेऊन वैष्णोदेवीला गेले. ठाकूर साहेबांनी देवीला नवस केला, ‘मला मुले होऊ देत, मी त्या सगळ्यांच्या नावापुढे ‘प्रसाद’ हा शब्द लावेन’ मग त्यांनी आणि त्यांच्या तिन्ही बायकांनी देवीचा प्रसाद खाल्ला, आणि गावी परत आले.

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ठाकूर दशरथ यांच्या नावापुढे प्रसाद हा शब्द का आहे ते. चाणाक्ष नसलेल्या वाचकांसाठी: कारण दशरथप्रसाद यांच्या वडिलांनाही मूळ-बाळ होत नव्हते, म्हणून ते वैष्णोदेवीला गेले होते आणि तेथे नवस करून देवीचा प्रसाद खाल्ला होता वगैरे वगैरे... असो.

वैष्णोदेवीला जाऊन आल्यावर वर्षाभरातच ठाकूर दशरथप्रसाद यांना त्यांच्या तीन बायकांपासून चार मुले झाली. कांही वाचकांना असा प्रश्न पडेल की असे कसे काय? तर सर्वात धाकट्या बायकोला म्हणजे कलावतीला जुळे झाले. हे सयामी जुळे होतं, एकेमेकांना चिकटलेले होतं. डॉक्टरांनी मोठे प्रयत्न करून, जोर लावून त्या दोघांना वेगवेगळे केलं.

देवीला केलेल्या नवसानुसार, घराण्याच्या ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या उक्तीला जागत ठाकूर दशरथप्रसाद यांनी आपल्या मुलांची नावे रामप्रसाद, लखनप्रसाद, भरतप्रसाद आणि शत्रुघ्नप्रसाद अशी ठेवली. ही सगळी मुले हळू हळू मोठी झाली, शाळेला जाऊ लागली. पुढे कॉलेजलाही जाऊ लागली. सगळे जण ग्रॅज्यूएट झाले.

हे चारी भाऊ स्वभावाने फार वेगवेगळे होते. रामप्रसाद हा फार शांत स्वभावाचा, कमी बोलणारा, एकवचनी होता. तो इतका सज्जन होता की लोक त्याला देवच समजत. याउलट लखनप्रसाद हा जरा तापट, अविचारी होता. पण तो नेहमी रामप्रसादच्या आज्ञेत रहायचा. भरतप्रसादचा नेमका स्वभाव काय आहे हे कोणालाच कळत नसे. तो थोडा रिझर्वड मनाचाव वाटे. पण त्याचे रामप्रसादवर खूप प्रेम होते. सगळ्यात धाकटा शत्रुघ्नप्रसाद भारदस्त आणि जरबी आवाजाचा होता, त्याने नुसते ‘खामोश.....’ असे म्हंटले की लोक आणि म्हशी देखील चिडीचूप होत असत. केवळ तेवढ्या भांडवलावर, अभिनय करता येत नसतानाही पुढे त्याला बॉलीवूडमध्ये व्हिलनचे काम मिळाले. त्याच भांडवलावर भांडवलदारांच्या एका पक्षाने त्याला आपल्या पक्षात घेतले आणि खासदारही केले. विशेष म्हणजे त्याच्याही पुढच्या काळात त्याच्या मुलीलाही हिंदी सिनेमात हिरोईनचे काम मिळाले. आकाराने ती हुबेहूब शत्रुघ्नप्रसादसारखी सारखी दिसत असे. पण नंतर तिने डायेटिंग करून आपलं आकार कमी करून घेतला. असो. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन.

 
पुढे रामप्रसाद एमबीए करण्यासाठी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये दाखल झाला. तिथ पहिल्या वर्षाच्या दुस-याच दिवशी त्याची सीता जनकसिंह नावाच्या बिहारी मुलीशी ओळख झाली. तिची स्टोरी वेगळीच होती. तिचे वडील जनकसिंह हे एक मोठे शेतकरी आणि शेतक-यांचे नेते होते, शिवाय ते कुर्मी समाजाचे होते. त्यामुळे बिहारच्या राजकारणात त्यांचे खूप वजन होते. एकदा ते शेतात गेले असताना तेथे त्यांना एक मोठी लाकडी पेटी दिसली. त्यांनी ती पेटी उघडून बघितली तर तिच्यात एक लहान बाळ होते. ती म्हणजेच सीता. म्हणजेच ती सीता जनक सिंहाची खरी उर्फ जिनेटिक उर्फ बायालॉजीकल मुलगी नव्हती किंवा मानलेली मुलगीही नव्हती, तर सापडलेली मुलगी होती. सीता शेतक-याची मुलगी असूनही गोरीपान आणि खूप सुंदर होती याचे कारण आता (पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या) लक्षात आलेच असेल. असो, पण त्याने काय फरक पडतो? शेवटी मुलगी ती मुलगी. जनक सिंहानी तिला आपली एकुलती एक मुलगी म्हणून वाढवलं.

नंतर रामप्रसाद आणि सीता या दोघांची चांगलीच गट्टी जमली. पुढे दोघेही एमबीए झाले. तोपर्यंत सीतेच्या वडिलांनी तिच्यासाठी चांगलीचांगली स्थळे पाहून ठेवली होती, पण तिने रामप्रसादच्याच गळ्यात माळ घालायचे ठरवले होते. तिनं तिच्या वडिलांना तसं सांगितलं, तर रामप्रसादनं त्याच्या वडिलांना. 

ठाकूर दशरथप्रसाद आणि जनकसिंह कुर्मी यांचीही या लग्नाला फुल्ल परवानगी होती. रामप्रसाद आणि सीता यांचे वाजत-गाजत लग्न झाले. त्याच हॉलमध्ये लखनप्रसादचेही लग्न उरकून घेण्यात आले. त्यानं उर्मिला नावाची एक मुलगी पसंत केली होती.

पण या दोन्ही लग्नांना भरतप्रसादच्या आईचा, म्हणजे कलावतीचा कडक विरोध होता. तिची इच्छा त्या दोघांनी तिच्या माहेरच्या नात्यातल्या मुलींशी लग्ने करावीत अशी होती.

पुढे कलावती सीता आणि उर्मिला यांचा सारखा छळ करू लागली. रामप्रसाद आणि लखनप्रसाद यांना आपआपल्या बायकांना घेऊन घरातनं निघून जाण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर आणू लागली, त्यामुळे ठाकूर दशरथप्रसाद यांचे ब्लड प्रेशर वाढले. नंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यात ते वारले.

रामप्रसादने सीतेला घेऊन कायमचे घराबाहेर पडायचे ठरवले. लखनप्रसादही त्या घरात वैतागला होता, म्हणून त्यानेही रामप्रसादबरोबर जायचे ठरवले होते. पण उर्मिलेचे सीतेशी पटत नसल्याने (कारण त्या दोघी जावा-जावा होत्या) तिने मात्र घर सोडायला नकार दिला.

ते तिघे घर सोडून चालले तेंव्हा भरतप्रसाद म्हणाला, ‘दादा, तुला जायचे असले तर जा, पण तुझे शूज तेवढे मला देवून जा, आठवण म्हणून’

रामप्रसादाने लगेच त्याला आपले नवे कोरे इम्पोर्टेड शूज उदार मनाने देऊन टाकले आणि दुसरे जुने कानपुरी शूज घालून तो बाहेर पडला. त्याच्या मागोमाग लखनप्रसाद आणि सीता हेही बाहेर पडले.

रामप्रसाद, लखनप्रसाद आणि सीता सरळ पुण्याला आले. आधी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले. मग जॉब शोधू लागले आणि रहाण्यासाठी फ्लॅटही शोधायला लागले. हे लोक परप्रांतीय असल्याने आणि त्यावेळी पुण्यात परप्रांतीयांच्या विरोधात चळवळ चालू असल्याने त्यांना फ्लॅट मिळायला खूप अडचणी आल्या. लोक परप्रांतीयांना, विशेषत: यूपी-बिहारवाल्यांना भाड्याने घर देत नसत. तसेच हे तिघे शाकाहारी असल्याने मांसाहारी लोकही त्यांना आपल्या सोसायटीत घर देत नसत.  मग त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गाने  जायचे ठरवले. त्यासाठी ते पुणे कॅम्पात गेले आणि महात्मा गांधी रोडवरून फिरू लागले. तिथे त्यांना ‘सोराबजी अॅन्ड दोराबजी इस्टेट एजन्सी’ अशी एक पाटी दिसली. तिथं चौकशी केल्यावर त्यांना लगेच एका पॉश एरियात तीन बेडरूमचा एक चांगला फ्लॅट कमी भाड्यात मिळाला. (इथे पुन्हा चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ते तिघेजण होते म्हणून त्यांनी तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला.) 

लवकरच तिघांनाही चांगले जॉब देखील मिळाले. रामप्रसादाला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून, लखनप्रसादला असिस्टंट मॅनेजर म्हणून आणि सीतेला एका इंग्रजी दैनिकात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.

एकदा ते दोघे भाऊ एका बस स्टॉपवर बसची वाट बघत उभे असताना एक सुंदर तरुणी तेथे आली. बस स्टॉपवर दुसरे कोणीच नव्हते. रामप्रसाद तिचे निरीक्षण करू लागला. ती रंगाने काळीसावळी आणि खूप सुंदर होती. तिने तिच्या केसांना सरसोच्या तेलाऐवजी खोबरेल तेल लावलेलं होते, त्यामुळे सहन न होणारा विचित्र असा वास येत होता. तिची नखे खूपच लांबडी होती आणि ती नेल कलरने रंगवली होती. दहा बोटांना दहा वेगवेगळे रंग लावलेले होते. 

‘हॅलो, आय एम शार्प नक्खानी’ ती त्याला म्हणाली.
‘हे असले कसले विचित्र नाव?’ रामप्रसादने नवलाने विचारले.
‘अॅक्चुअली माझं नाव शूर्प नखा आहे, पण एका न्यूमरॉलॉजिस्टनं मला सांगितलं की नावात बदल कर म्हणजे तुझं  लवकर लग्न होईल. तिनं मला शार्प नक्खानी हे नाव सुचवलं. या नावामुळे माझी बुद्धीही माझ्या नखांसारखीच शार्प होईल असं पण  म्हणाली. एवढं सांगण्यासाठी तिनं माझ्याकडनं चक्क दहा हजार रुपये घेतले’
‘एवढ्या सल्ल्यासाठी एवढी फी? आर यू टॉकिंग अबाउट श्वेता?’
‘यस, श्वेता सहानी’
‘त्यापेक्षा तू महावीर सांगलीकरांच्याकडे जायला पाहिजे होतस. रास्त फीत तुला चांगला सल्ला मिळाला असता. शिवाय सावळ्या मुलींना भरपूर कन्शेशन देतात ते फीमध्ये’
‘गेले होते, पण ते फार बिझी असतात. त्यांच्या ऑफिस समोर सावळ्या मुलींची रांगच लागलेली असते. त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही लवकर. मला तर फार घाई आहे, म्हणून तर मी श्वेता सहानीकडे गेले’

मग ती राम प्रसादला म्हणाली,
‘आर यू मॅरीड?’
‘याह,’ राम प्रसाद म्हणाला, ‘बट माय ब्रदर इज जस्ट सेपरेटेड’ त्याने लखनप्रसादकडे बोट दाखवले. शार्प नक्खानी लगेच लखनप्रसादजवळ गेली आणि आपल्या नखाने त्याच्या दंडावर पोक करत म्हणजे टोचत म्हणाली, ‘वुड यू लाईक टू मॅरी वुईथ मी?’

या प्रश्नाचा नाही, पण नखाने टोचण्याचा लखनप्रसादला राग आला. त्याला नखे वाढलेले लोक, विशेषत: स्त्रिया अजिबात आवडत नसत आणि तो स्वत:चीही नखे सारखी म्हणजे दिवसातून तीन-चार वेळा तरी कट करत असे. त्यामुळे त्याच्याकडे नेहमी नेल कटर असे. त्याने रागाच्या भरात शार्प नक्खानीची नखे आपल्या जवळच्या नेल कटरने कट करून टाकली. ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, ‘केवढ्या कष्टाने मी माझी नखे वाढवली होती.... गिनीज बुकमध्ये माझे नाव येण्यासाठी. यू फूल, थांब आता मी माझ्या दादालाच तुझं आणि तुझ्या दादाचं नाव जाऊन सांगते.... मे आय नो युअर नेम्स प्लीज?’
‘सांग सांग... मी नाही घाबरत. घे लिहून ... आय एम लखनप्रसाद अॅन्ड माय दादा इज रामप्रसाद’

आपल्या छोट्या पर्समधनं तिनं एक मोठी डायरी काढली आणि रडत रडतच तिने त्या दोघांची नावे लिहून घेतली. मग रडत-ओरडतच निघून गेली.

त्यावेळी इंडिया–पाकिस्तानची कबड्डीची मॅच चालू असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता, त्यामुळे भर रस्त्यात बस स्टॉपवर ही घटना घडूनही कोणाच्या लक्षात आली नाही.


+++

त्या तिघांना शनिवारी-रविवारी सुट्टी असे. एके रविवारी सकाळी एक फेरीवाला त्यांच्या बिल्डींग जवळून ‘पैठणी घ्या पैठणी, पैठणी लेव पैठणी’ असा मराठी-हिंदीत ओरडत गेला. सीतेला पैठणी हा प्रकार फार आवडत असे, दिसली पैठणी की घे विकत असा प्रकार ती करत असे. तिने रामप्रसादला त्या फेरीवाल्याला घेऊन यायला सांगितले. रामप्रसाद लगेच बाहेर निघाला, तेंव्हा लखन प्रसाद म्हणाला, ‘दादा नको जाऊस, या फेरीवाल्यांच्या पैठण्या डुप्लिकेट असतात’ पण भावाचे ऐकायचे का बायकोचे असा प्रश्न येतो तेंव्हा नवरे बायकोचेच ऐकायचे असते. त्या प्रथेनुसार रामप्रसाद फेरीवाल्याला आणायला गेला.

थोड्या वेळाने सीता लखनप्रसादला म्हणाली, ‘भाऊजी, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन थोडी कोथिंबीर आणि खोबरे घेऊन या’

आज खमंग पोहे खायला मिळणार या आनंदात लखनप्रसाद भाजी मार्केटकडे चालला. जाताना म्हणाला, ‘वहिनी, डोअरबेल वाजली तरी आयबॉलमधनं बघून बाहेर कोण आलंय याची खात्री करून घ्या, मगच दार उघडा. महाराष्ट्र म्हणजे कांही तुमचा बिहार नाही. त्यात हे पुणं आहे. इथं कधी कोण घरात घुसेल ते सांगता येत नाही. इथला क्राईम रेटही जास्त आहे. दिवसाढवळ्या मोठमोठ्या लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारतात इथले लोक’

ते ऐकून सीता हसत म्हणाली, ‘मी यूपीवाल्यांना घाबरत नाही तर पुण्याच्या लोकांना कशाला घाबरेल? एक बिहारी सब पे भारी...’

‘माहिती आहे,’ लखनप्रसाद तोंड वेंगाडत म्हणाला, ‘चाळीस किलो पण वजन नाही, आणि म्हणे सब पे भारी. बी सिरिअस, सावध रहा जरा’

लखनप्रसाद दाराबाहेर गेला आणि त्याने जोराने दार ओढून ते बंद केले.

लखनप्रसाद गेल्यावर थोड्या वेळाने टिंग- टॉन्ग..टिंग-टॉन्ग अशी डोअर बेल वाजली. सीतेला वाटले की रामप्रसाद फेरीवाल्याला घेऊन आला. म्हणून तिने आयबॉलमध्ये न बघताच घाईघाईत दार उघडले. बाहेर एक उग्र दिसणारा साधू उभा होता. ‘भिक्षा दे माय’ तो त्याच्या करड्या आवाजात म्हणाला. सीता घाबरून आत पळू लागली, पण त्या साधूने तिचा हात धरून तिला ओढले आणि उचलून आपल्या खांद्यावर ठेवले. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्दही फुटेना. तो साधू तिला घेऊन बिल्डींगच्या बाहेर आला. तिथं नो पार्किंग एरियात त्याची कार उभी होती. त्याने सीतेला कारमध्ये कोंबले. बिल्डींगच्या वॉचमनला कांहीतरी गडबड ऐकू आली आणि तो दिवसाढवळ्या झोपेतून खाडकन जागा झाला. तो कारकडे धावला आणि त्याने त्या साधूला कारमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्या साधूने वॉचमनला एका ठोशातच लोळवले. मग तो साधू कार घेवून भरधाव वेगाने निघून गेला.

थोड्या वेळाने रामप्रसाद परत आला, त्याने आपल्या फ्लॅटची बेल वाजवली. पण दार उघडले गेले नाही. एवढ्यात लखनप्रसाद पण आला. दादाच्या बेलला सीता दार उघडत नाही, मग निदान आपण बेल वाजवली तर सीता दार उघडेल या आशेने लखनप्रसादनेही बेल वाजवून बघितली. पण आतून कांहीच उत्तर नाही. त्यामुळे त्या दोघांनी दार तोडायचे ठरले, तेवढ्यात बिल्डींगचा वॉचमन आला. त्याने एका साधूने सीतेला कारमधून पळवले आणि ती कार विमानतळाच्या दिशेने गेली असे सांगितले.

‘तू त्या साधूला आत का सोडलेस?’ रामप्रसादाने वॉचमनला जाब विचारला.
‘माझी नजर चुकवून तो आत शिरला’, वॉचमन आपली नजर झुकवत म्हणाला, ‘मला त्यावेळी जरा डुलकी लागली होती’ 

रामप्रसादाने त्याला त्या साधूचे वर्णन करायला सांगितले. वॉचमन म्हणाला, ‘तो आसाराम बापूसारखा दिसत होता, पण त्याची दाढी काळी होती आणि डोळे रामदेव बाबासारखे होते’

हे ऐकल्यावर लगेच ते दोघे भाऊ एका मोटर सायकलवरून वेगाने विमानतळाच्या दिशेने गेले. ते तिथे पोहोचले तेंव्हा एका छोट्या प्रायव्हेट विमानात बसून एक साधू आणि एक महिला हैद्राबादला गेल्याची माहीती त्यांना मिळाली. मग त्यांनीही हैदराबादला जायचे ठरवले. तिकीट वगैरे काढण्यात बराच वेळ गेला.

दोघे भाऊ हैदराबादला पोहोचले. तेथे त्यांनी आधी एक पोलीस स्टेशन गाठले. तिथल्या वरिष्ठ अधिका-यास सगळा प्रकार सांगितला. सगळं  ऐकून घेतल्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘अहो काय सांगायचे तुम्हाला... आमच्याकडे माणसंच नाहीत तपास करायला. आमची निम्मी माणसं नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात गुंतली आहेत आणि निम्मी राजकारण्यांच्या संरक्षणात. मलाही रोज पार्ट्यांना जायचं असल्याने वेळ मिळत नाही. तुम्ही असं करा, माझा एक डिटेक्टिव्ह मित्र आहे, त्याला भेटा.. तो शोधून काढेल तुमच्या बायकोला’

मग त्या अधिका-याने टेबलच्या ड्रॉवरमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि रामप्रसादला दिलं. रामप्रसादाने ते कार्ड बघितले. त्यावर लिहिले होते,

व्ही. हणमंत राव
इंटरनॅशनल प्राइव्हेट डिटेक्टिव्ह
स्पेशालिस्ट इन किडनॅपिंग केसेस
चार मिनार, हैद्राबाद  
फोन: G0G H0H WXYZ

चाणाक्ष रामप्रसादने ओळखलं की हा डिटेक्टिव्ह सुपर जिनिअस दिसतोय. म्हणूनच त्याने आपला फोन नंबर असा सांकेतिक भाषेत दिला आहे, जेणेकरून तो केवळ सेन्स ऑफ सिक्रेसी असणा-या आणि हुशार लोकांनाच कळावा. रामप्रसादने लगेच त्या नंबरला फोन करून हनुमंत राव ऑफिसमध्ये असल्याची खात्री करून घेतली आणि ते दोघे भाऊ लगेच पोलीस स्टेशनाच्या बाहेर आले आणि रिक्षा करून हणमंत रावाच्या ऑफिसकडे  निघाले.



-पुढे चालू

या कथेचे पुढचे भाग:
डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव 
मिशन असोका गार्डन  
कोलंबो टू चेन्नई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा