-महावीर सांगलीकर
शिवानी द ग्रेट या कथेचा 6वा भाग
शिवानीला गुडबाय करून तिचा मोटिव्हेटर थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनवर पोहोचला. समोर लोकल उभीच होती. त्या लोकलने 25 मिनिटातच तो चिंचवडला आला. घरी जायचे आणि झोपायचे असा त्याचा विचार होता. इतक्यात त्याचा मोबाईल फोन खणखणला. शिवानीचाच फोन.
तिला गुडबाय वगैरे म्हटलं असलं तरी त्याला पक्कं माहीत होत की हे गुडबाय कधीच होऊ शकत नाही. किमान तिचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत तरी. एकदा का ती व्यवस्थित सेटल झाली की आपण तिच्यापासून कठोर मनानं दूर जाण्याचा प्रयत्न अवश्य करू. तसं करायलाच लागेल.
त्याला आठवलं, मागे ती व्हाट्स अॅपवर चॅट करताना म्हणाली होती,
‘मामा, असं कुणात जास्त गुंतून जाणं बरोबर नाही. माणसं टिकत नसतात. कुणी निघून गेलं की डिप्रेशन येतं मग’
‘हे बघ, माझं न्यूमरॉलॉजिकल रीडिंग सांगतय की आपली मैत्री अतूट असणार आहे. फेविकॉल से भी मजबूत. आपली सारखी भांडणे होतील. त्याचा आपल्याला खूप त्रासही होईल. पण आपली भांडणे आपले संबंध तुटेपर्यंत कधीच होणार नाहीत. आपलं प्रत्येक भांडण फारतर दीड-दोन तास टिकेल. आपल्या भांडणातून प्रत्येक वेळी कांही तरी खूप चांगलं घडणार आहे. आतापर्यंत तसंच झालय. तरीपण मला कधी कधी भीती वाटत असते... तू माझ्यापासून दूर चालली आहेस असं उगीचच वाटत रहात. पण माझा न्यूमरॉलॉजीवर पूर्ण विश्वास आहे. 4-8 relations never dies ’
‘पण उद्या माझं लग्न होईल. मग तुम्ही काय कराल?’
‘रडेन... बाप आपल्या मुलीचे लग्न झाल्यावर रडतो तसा.... आनंदाने ... एका मोठ्या जबाबदारीतून मी मुक्त झालो म्हणून.... आणि तू मला सोडून चाललीस म्हणून दु:खाने’ त्याच्या डोळ्यात आसवे आली.
‘तुम्ही म्हणालात की 4-8 relations never dies. मग तुम्ही कशाला उगीच काळजी करता?’
त्यानं पटकन तिचा फोन उचलला.
‘बोलं शिवानी’
‘मामा, तुम्ही मला स्पिरिच्युअल टच देऊन तुमच्या इच्छा माझ्या मनात सोडल्या. तुमच्या इच्छा काय आहेत ते तुम्ही सांगितले नाही, पण मी तुमच्या सगळ्या इच्छा रिसीव्ह केल्या’
‘माहीत आहे मला. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. काय आहेत माझ्या इच्छा?’
‘तुम्ही डोळे झाकून मनातल्या मनात म्हणालात, ’समंजस शिवानी, तिनं सरळ मार्गाने मिळवलेला प्रचंड पैसा, संपत्ती, बंगला, गाड्या, समंजस नवरा, एक मुलगी आणि एक मुलगा.... तिचं एक छोटंसं सुखी आणि संपन्न कुटुंब. ती सर्वांशी मायेनं वागतेय... लोकांशी मायेनं वागतेय. पुढे ती स्पिरिचुअल झालीय... मदर तेरेसा सारखी’
तिचं हे बोलणं ऐकून तो आश्चर्याने उडालाच. त्याने मनातल्या मनात जे शब्द उच्चारले होते, ज्या इच्छा व्यक्त केल्या होत्या ते शब्द आणि त्या इच्छा शिवानीने जशाच्या तशा उच्चारल्या होत्या. अगदी त्याच क्रमाने. शिवानी इज अ ग्रेट रिसिव्हर.
मग ती म्हणाली, ‘मामा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण तुमच्या इच्छा माझ्याच इच्छा आहेत. पण त्यासाठी सगळ्यात आधी मला माझं ऑफीस पाहिजे’
‘होईल, तुझं ऑफीस होईल. लवकरच. तू ऑफीसचं व्हिज्युअलायझेशन करत जा रोज रात्री झोपताना. तू तुझ्या ऑफीसमध्ये बसली आहेस, तुझ्याकडे क्लाएंट्स येऊन बसले आहेत, तुला भरपूर कामं मिळत आहेत हे सगळं तुझ्या डोळ्यापुढ तरंगलं पाहिजे बघ रोज’
‘हो... आजपासूनच व्हिज्युअलाइझ करते’
‘रात्री झोपायच्या आधी करत जा, त्याचा तुला जास्त फायदा होईल’
‘हो’
दोन दिवसांनी त्याला सकाळी सकाळी शिवानीचा फोन आला. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, ‘मामा..... माझ्या पोटात खूप दुखतंय. मला भीती वाटतीय... मामा...’
‘शिवानी रडू नकोस... डॉक्टरकडे जा’
‘गेले होते.... पेप्टिक अल्सर असण्याची शक्यता आहे म्हणे. डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितलीय.... मी सोनोग्राफी करायला चाललेय... पण मला भीती वाटतेय’ अस म्हणून ती जोरात रडायला लागली.
‘शांत हो शिवानी. तुला कांही झालेलं नाही आहे. तुझा आजार मानसिक आहे. बघ तू, तुझा रिपोर्ट नॉर्मल येईल. माझ्या शब्दांवर विश्वास आहे ना तुझा?’
‘हो’ ती शांत होत म्हणाली, ‘जाते मी. संध्याकाळी फोन करेन’
संध्याकाळी तिचा फोन आला. ती आनंदाने, उत्साहाने म्हणाली, ‘मामा, मला कांहीच झालेलं नाही’
‘मी तुला तेच सांगतो होतो शिवानी. तू उगीचच टेन्शन घेत असतेस बघ’
+++
एके दिवशी रात्रीच्या वेळी मोटीव्हेटर आपल्या बिल्डींग समोर रस्त्यालगत फोनवर बोलत उभा होता. बोलणे संपून त्याने फोन ठेवला एवढ्यात त्याच्यासमोर एक कार येऊन थांबली. ती कार त्याच्या एका खास बालमित्राची होती. त्याच्या मित्राने कारच्या दरवाजाची काच खाली घेतली आणि तो म्हणाला,
‘काय म्हणते तुझी न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस?’
‘बरी चाललीय’ मोटीव्हेटर म्हणाला.
‘पुण्यात ऑफीस घे एखादं.... तिथं तुला जास्त स्कोप आहे’
‘खरंय,’ तो म्हणाला, ‘पण पुण्यात ऑफीस घेणे सध्या तरी शक्य नाही’
‘तुला घ्यायचं आहे का सांग... मिळून जाईल’
‘डिपॉझिट, भाडं परवडायला पाहिजे बाबा...’
‘एक काम कर... मनोज भाऊंना जाऊन भेट... तुझं काम होवून जाईल’
खरं म्हणजे त्याला ऑफीसची गरज नव्हती. त्याचं काम ऑफीस शिवायही चालतच असे. एका ठिकाणी बसून रहाणंही त्याला जमणं शक्य नव्हतं. पण पुण्यात ऑफीस असलं तर त्याचं स्टेटस वाढणार होतं. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे शिवानीची स्वप्नं लवकर पूर्ण करायची असतील तर ऑफीस पाहिजेच. तिच्या यशात त्याचं यश होतं. अॅग्रीमेंटमध्ये दोघांची नाव यायला पाहिजेत, म्हणजे त्याचा फायदा दोघांनाही होईल.. अॅज पर न्यूमरॉलॉजी.
दुस-याच दिवशी सकाळी सकाळी तो मनोज भाऊंच्या चिंचवड मधल्या ऑफिसवर गेला. प्रशस्त, चकचकीत ऑफिस. आत एक मोठी केबिन. केबिनमध्ये मनोज भाऊ फोनवर बोलत होते.
ते दोघे एकमेकांना ओळखत होतेच. मोटीव्हेटरने त्यांना यायचे कारण सांगितले,
‘पुण्यात तुमचं एक ऑफीस आहे असे प्रकाश सेठ म्हणत होते. ते मिळेल का मला भाड्याने?’
‘खर सांगू?’ मनोज भाऊ म्हणाले, ‘ते माझं पहिलं ऑफीस. त्या ऑफीसशी माझ्या भावना जुळलेल्या आहेत. ते ऑफीस सोडून अनेक वर्षे झाली पण आजपर्यंत मी कुणालाच ते दिलं नाही. मी ते विकणारही नाही’
मोटीव्हेटर मनातनं थोडा खट्टू झाला, तेवढ्यात मनोज भाऊ म्हणाले, ‘पण तुमचं आमचं रिलेशन वेगळं आहे. माझी मिसेस तुम्हाला भाऊ मानते. मी तुम्हाला ते ऑफीस दिलं अस समजा’
‘थॅंक यू.... एक सांगायचं होतं.. हे ऑफीस मी माझ्या भाचीसाठी घेतोय. ती टॅक्स कन्सल्टंट आहे. मला तिला स्टॅण्ड करायचं आहे ....’
‘नो प्रॉब्लेम.... अॅग्रीमेंट तुम्हा दोघांच्या नावावर करू’
आपल्याला पाहिजे तेच पुढून येतं... हेल्दी विश अल्वेज वर्क्स... मोटीव्हेटर मनात म्हणाला.
‘डिपॉझिट आणि भाडं किती द्यायचं?’
‘ते आपण नंतर बोलू. आधी तुम्ही ते ऑफीस बघून तर घ्या..’ असं म्हणत मनोज भाऊंनी एका कागदावर त्या ऑफिसचा पत्ता लिहून दिला. ‘मी वॉचमनला फोन करून सांगून ठेवतो. तुम्ही ऑफीस बघा. तुम्हाला आवडेल ते’
‘ठीक आहे, बघतो... चलू मी?’ असे म्हणत मोटीव्हेटर उठायला लागला.
‘पण आधी मला ते ऑफीस कसं मिळालं ते तर ऐका, बसा’ असे म्हणत मनोज भाऊ सांगू लागले,
‘पंधरा वर्षांच्या अगोदरची गोष्ट आहे ही. त्यावेळी माझ्याकडे चहा प्यायलाही पैसे नसत. माझी ही
परिस्थिति माझ्या एका बिल्डर मित्राला माहीत होती. त्याला माझी चेष्टा करायची लहर आली. त्याने मला निरोप पाठवला, मला जर तू आजच्या आज पन्नास हजार रुपये आणून दिलेस तर मी तुला पुण्याच्या बालेकिल्ल्यात अडीचशे स्क्वेअर फुटांचे ऑफीस देईन... फक्त सव्वा लाखाला. बाकीचे पैसे तू नंतर दे...’
‘मग?’ मोटीव्हेटरने विचारलं.
‘हे मला शक्य नव्हतं... पण मी बिल्डरला हो नाही कांहीच कळवले नाही. त्यानंतर थोड्याच वेळात रस्त्यात मला माझा एक मित्र भेटला. मला बघून तो म्हणाला, अरे मनोज, माझ्याकडे पन्नास हजार रुपये आहेत. मला ते व्याजाने द्यायचे आहेत. एखादी पार्टी असली तर सांग’
‘छान...’
‘मी म्हणालो, मलाच दे ते पैसे. मित्र म्हणाला, तुला नाही देणार.. तू परत कसे करणार? मग मी त्याला बिल्डरची घटना सांगितली. माझा मित्र म्हणाला, चल आपण बिल्डरकडे जाऊ. आम्ही दोघे बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो. मी मित्राने दिलेले पन्नास हजार रुपयांचे बंडल बिल्डरच्या टेबलावर ठेवले. बिल्डर माझ्याकडे बघतच राहिला... मग म्हणाला, ‘असं कुठं सव्वा लाखात ऑफीस मिळतं का? त्या ऑफीसची किंमत 5 लाख रुपये आहे. मी तुझी चेष्टा करण्यासाठी पन्नास हजारांची गोष्ट केली होती’
‘अरे बापरे... मग पुढ काय झालं?’ मोटीव्हेटरने आश्चर्याने विचारलं.
‘मी बिल्डरला म्हणालो, ठीक आहे, पण आता हे पन्नास हजार रुपये तुमच्याकडेच राहू देत. तुमच्या शब्दाला कांही किंमत असेल, तुम्हाला तुमचा शब्द पाळायचा असेल, तर मला ते ऑफीस ठरल्याप्रमाणे देऊन टाका. आज रात्रभर विचार करा. नसेल द्यायचं तर उद्या मला माझे पैसे परत द्या... असं म्हणून मी व माझा मित्र तिथनं परत आलो. दुस-या दिवशी बिल्डरने मला ऑफीस देऊन टाकलं’
‘छान. ही आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे’
‘ऑफीस ताब्यात घेतल्यावर मला तिथं बसायला खुर्ची देखील नव्हती. तिथल्या वॉचमननं मला कुठून तरी एक जुनी पत्र्याची खुर्ची आणून दिली. त्या जुन्या खुर्चीवर बसून मी माझा व्यवसाय सुरू केला. आज मी जो कांही आहे तो त्या ऑफीस मुळच आहे... तुम्ही घ्या ते ऑफीस... मग सहा महिन्यात तुम्ही कुठल्या कुठ जाताय ते बघा..’
मनोज भाऊंचा निरोप घेऊन तो घरी आला. मग त्यानं शिवानीला फोन लावला, ‘शिवानी, ग्रेट न्यूज... ऑफीस मिळतंय आपल्याला... आज संध्याकाळी जाऊया का बघायला?’
‘आज नको, उद्या बघू’
‘ओके’
दुस-या दिवशी त्याने शिवानीला आठवण करण्यासाठी फोन केला, ‘शिवानी.. आज संध्याकाळी आपल्याला ऑफीस बघायला जायचय’
‘मी कशाला यायला पाहिजे?’ ती कडवट स्वरात म्हणाली, ‘तुमचं ऑफीस आहे. तुम्हीच बघा... खूप कामं पडली आहेत माझी’
तिचं हे असलं बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला. तिला चांगलंच सुनवावं असं त्याच्या मनात आलं, पण स्वत:ला सांभाळत तो म्हणाला, ‘शिवानी, ते ऑफीस माझं नाही. ते तुझं ऑफीस आहे. तुला जर तुझी स्वप्नं पूर्ण करायची असतील तर तू ही संधी सोडू नकोस. असली संधी तुला परत कधीच मिळू शकणार नाही. बाकी तुझी मर्जी..’ असे म्हणून त्यानं फोन कट केला.
तासाभरानं तिचा फोन आला, ‘मामा, आपण जाऊया ते ऑफीस बघायला. तुम्ही या’
शिवानीचा फोन येणारच याची त्याला पक्की खात्री होती, त्यामुळं तो तयारीतच होता. संध्याकाळी दोघांनी ऑफीस बघितले. तळमजल्यावर खाली आणि वर असे दोन स्वतंत्र ऑफिसेस होते. दोन्ही ऑफीसमध्ये टेबल, रोटेटिंग चेअर, पंखे, क्लाएंट्सना बसायला खुर्च्या होत्या. म्हणजे कांहीच जादा खर्च करायची गरज नव्हती. वरच्या ऑफिसमध्ये एका कोप-यात एक जुनी पत्र्याची खुर्ची होती. तीच ती खुर्ची, जिच्यावर बसून मनोज भाउंनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मोटीव्हेटरने ती खुर्ची उघडली आणि त्यावर तो थोडा वेळ बसून राहिला. मग तिथनं उठत शिवानीला म्हणाला, शिवानी तू बस आता या खुर्चीत थोडा वेळ. मग तीही त्या ‘जादूच्या’ खुर्चीत थोडा वेळ बसून राहिली.
नंतर ती म्हणाली, ‘मामा, मी खालच्या ऑफीसमध्ये बसत जाईन. तुमचे ऑफीस वरती...’
‘चालेल. जसं तुला पाहिजे तसंच होईल सगळं. पण एक गम्मत होईल. माझ्याकडे येणा-यांना वाटेल की तू म्हणजे माझी रिशेप्शनिस्ट आहेस’ तो हसत म्हणाला.
‘वाटू दे..’
‘चेष्टा केली.. हे दोन्ही ऑफिस तुझ्यासाठीच आहेत. मी फारसा कांही इकडं येणार नाही. कधी एखाद्या क्लाएंटला इथं भेटायचं असेल किंवा तुझं कांही काम असलं तरच मी इकडं येईन’
‘पण मामा, भाडं किती? डिपॉझिट किती?’
‘ते उद्या सांगणार आहेत मनोज भाऊ. तू सांग मला, आपण जास्तीत जास्त किती देऊ शकतो?’
शिवानीने तिच्या मनातले आकडे सांगितले. ते नेमके त्याच्या मनात जेवढे होते तेवढेच निघाले. ग्रेट माइंड रीडर्स.
‘हे बघ शिवानी, आपल्याला परवडेल असंच डिपॉझिट आणि भाडं ठरेल. तू काळजी करू नकोस. जे कांही ठरेल ते आपण निम्मे निम्मे भरायचे’
‘हो’
+++
‘मनोजभाऊ, ऑफीस पसंत आहे. आता आपण व्यवहारच बोलू... डिपॉझिट किती द्यायचं? आणि भाडं किती द्यायचं?’
‘तुम्हीच बोला... तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे’
+++
एकदा मोटीव्हेटर तिला म्हणाला, ‘शिवानी, तू माझ्याकडे हट्ट धरत जा.... तुला काय पाहिजे ते मागत जा. तुझे हट्ट पुरवण्यात मला जेवढा आनंद होईल तेवढा कशातच होणार नाही’
‘मामा, मला पैशांची चिंता आहे. मला पैसे हवेत’
तो सावध झाला. लगेच म्हणाला, ‘हे बघ शिवानी, गेल्या दोन महिन्यात तू भरपूर पैसे कमावले आहेत. आताही कमावत आहेस. तुला आणखी कशाला पैसे पाहिजेत?’
‘मामा मला खूप खर्च आहेत. होस्टेलचे पुढच्या सहा महिन्याचे भाडं भरून टाकलं. जिमचे पैसे भरायचे आहेत. आता ऑफीसचं डिपॉझिट... भाडं... मी आईकडून एक पैसाही घ्यायचा नाही असं ठरवलंय... मला काळजी लागली आहे’
‘शिवानी, या बाबतीत मी तुला मदत करणार नाही. त्याला कारण आहे. तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुझे पैसे तूच उभे करायला पाहिजेत. ऑफिसच्या बाबतीत आपली 50-50 पार्टनरशीप आहे. डिपॉझिट आणि भाड्याचे निम्मे पैसे तूच भरायला पाहिजेत. समजा जर तुझे पैसे मी भरले तर तू ऑफीस आणि तुझ्या कामाच्या बाबतीत एवढी सिरिअस रहाणार नाहीस. म्हणून कांहीही कर, तू तुझे पैसे स्वत:च उभे कर. आपल्याला ऑफीस अजून एक महिन्याने ताब्यात घ्यायचं आहे. भरपूर वेळ आहे तुला पैसे उभे करायला’
‘पण मामा, समजा मी जर पैसे उभे करू शकले नाही तर?’
‘तू असं निगेटिव्ह बोलू नकोस यार... यू आर अ वॉरीअर.... नेव्हर अटर सच वर्डस अगेन. तू पैसे उभे करणार आहेस. अगदी सहजपणे. तू ऑफिसचे व्हिज्युअलायझेशन केलंस आणि ऑफीस मिळालं. सहजासहजी. आता तू पैशांचं व्हिज्युअलायझेशन कर... बघ पैसे कसे तुझ्याकडं धावत येतात’
‘हो’
‘सगळं कसं व्यवस्थित होणार आहे. तुला पाहिजे तसं.... आणि मला पाहिजे तसं. तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नकोस. लेट द मनी फ्लो टू यू विदाउट मच इफोर्टस... तुला टेक्निक माहीतच आहे मी सांगितलेलं...ठीक आहे?’
‘हो... माझे पैसे उभे रहातील. सहज... आणि झटपट. तुम्ही सांगा मला, माझे पैसे कधीपर्यंत देऊ तुमच्याकडे?’
‘आवडलं तुझं हे कॉन्फिडंट बोलणं... यू आर रिअली ग्रेट शिवानी’
(पुढे चालू)
या कथेचे आधीचे भाग:
पुढचा भाग:
शिवानीचं लग्न: भाग 1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा