Advt.

Advt.

बुधवार, २२ जुलै, २०१५

एक न-प्रेमकथा

-महावीर सांगलीकर

एक तरुण मुलगी अपॉइंटमेंट न घेताच एकेदिवशी माझा पत्ता शोधत शोधत माझ्याकडे आली. कांहीतरी सिरिअस केस होती म्हणून मी ती लगेच घेतली.

‘सर’, ती म्हणाली, ‘माझं एका मुलावर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण या लग्नाला माझ्या घरच्यांचा विरोध आहे. मी काय करू?’

मी तिला दोघांच्या जन्मतारखा विचारल्या. त्या बघताच मी तिला म्हणालो,
‘तू या मुलाचा नाद सोडून दे. याचं तुझं पटणार नाही. याच्याशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस’

ती हिरमुसली. म्हणाली, ‘पण त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे....तो माझ्याशिवाय जगू शकत नाही.  मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तो मला सुखी ठेवेल’
‘हे बघ, तुमच्या जन्मतारखा एकमेकांना अजिबात अनुकूल नाहीत. तू त्याच्याशी लग्न केलेस तरी ते फार काळ टिकणार नाही. हे मी अंकशास्त्राप्रमाणे सांगतोय.  मला सांग, तू काय करतेस?’
‘मी बारावीत शिकत आहे’
‘आणि तो मुलगा?’
‘तो रिक्षा चालवतो’
‘तुझे आई-बाबा काय करतात?’
‘बाबा महापलिकेत ऑफिसर आहेत. आई गृहिणी आहे’
‘भाऊ? बहीण?’
‘भाऊ नाही. मोठी बहीण आहे. ती लग्न होऊन अमेरिकेत सेटल झाली आहे’
‘तिचा नवरा काय करतो?’
‘तो आय.टी. इंजिनीअर आहे’
‘तू पुढं काय करणार आहेस?’
‘कांही नाही. लग्न करून संसार करणार’

‘ठीक आहे. आता तू त्या मुलाशी लग्न करणं वास्तवतेच्या नजरेनं बघ... आई-वडलांचा विरोध डावलून तू हे लग्न केलंस तर उद्या काय काय होऊ शकतं याची तू कल्पना केली आहेस का? तुझी, तुझ्या आई वडिलांची समाजात नाचक्की होईल. उद्या तुझं तुझ्या नवऱ्याशी बिनसले तर तुला माहेरचे दरवाजे कायमचे किंवा अनेक वर्षे बंद होऊ शकतात.... तुझ्या बहिणीनं अमेरिकेत असलेल्या मुलाशी लग्न केलं आणि तू इकडे कसल्या मुलाशी लग्न करायचे स्वप्न बघतेस? हे बघ, मुलींनी नेहमी आपल्यापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ मुलाशी लग्न करायला पाहिजे. शहाण्या मुली तेच करतात’
‘सर, तुम्ही पण जात-पात मानता?’
‘नाही, इथं जातीचा प्रश्न नाही. मला तुझी जात माहीत नाही आणि त्या मुलाचीही. मी तर केवळ तुम्हा दोघांच्या जन्मतारखेवरूनच सांगितलं की हे लग्न टिकणार नाही. आंतरजातीय लग्नाला माझा विरोध नाही. उलट आंतरजातीय, आंतरभाषिक, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय लग्न करणा-यांची पुढची पिढी जिनिअस निपजते. म्हणून माझं मत हे आहे की आपल्याच जातीत लग्न करणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण इथे एक अट आहे...  असे लग्न एकाच क्लासमध्ये झाले पाहिजे. मुलीच्या आणि मुलाच्या सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक दर्जात टोकाचा फरक नाही पाहिजे. तुझ्या केसमध्ये असा टोकाचा फरक आहे’

ती विचार करत म्हणाली, ‘पण सर, माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.’
‘तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही. ते केवळ आकर्षण आहे. असे आकर्षण जास्त काळ टिकत नसतं. अशा गोष्टीला महत्व देण्यापेक्षा दूर दृष्टी ठेवून आपल्या भविष्याचा विचार केला पाहिजे.  बाय द वे, हे तुझं कितवं प्रेम आहे?’

माझ्या या प्रश्नाने तिला धक्का बसला. ती कावरी बावरी झाली. माझी नजर चुकवत म्हणाली, ‘तिसरं’
‘पहिल्या दोन मुलांच्या बाबतीत देखील तुला त्या-त्या वेळी आपण याच्याशिवाय जगू शकत नाही असे वाटले असेल ना? हे बघ, तुझं लग्न झाल्यावरसुद्धा तुला आणखी दुसरा कोणीतरी आवडू शकतो. त्यापेक्षा तू आत्ताच सावध हो. तशी तू कुशाग्र बुद्धीची आहेस. भरपूर शिक. मग एक परफेक्ट मुलगा निवड. त्यात तुझं हित आहे.
+++

आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.

पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
++++

पुढच्या कांही दिवसात एक वेगळीच गोष्ट घडली. तिचे आई-वडील तिला घरी घेऊन गेले. तिच्या वडिलांनी तिच्या नव-याला भरपूर पैसे देऊन ‘म्युच्युअल डायव्हर्स’साठी त्याला तयार केले. आता ते आपल्या मुलीसाठी एखादं चांगलं स्थळ शोधायच्या तयारीला लागलेत.

हेही वाचा:      
गौरीचं लग्न
शिवानीचं लग्न: भाग 1 
सुदीपच्या लग्नाचा प्लॅन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा