Advt.

Advt.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

दोन प्रवासी

-महावीर सांगलीकर 

थंडीचे दिवस, रात्रीची वेळ. घाटाच्या अलिकडच्या गावात एस. टी. स्टॅण्डवर बस थांबली. ड्रायव्हर, कंडक्टर खाली उतरले. कांही प्रवासी खाली उतरले, कांही बसमध्येच थांबले. उतरलेल्यांनी स्टॅण्डवरच्या कॅंटीनमध्ये चहा घेतला. कांहीजण टॉयलेटला गेले.

दहा मिनिटं झाली. ड्रायव्हर, कंडक्टर बसमध्ये जाऊन बसले. प्रवासीही बसकडं पळाले. बस सुरू झाली. दोन प्रवासी खालीच राहिले होते. ते ‘थांबा-थांबा’ असं ओरडत बसच्या मागं धावले. पण बस कांही थांबली नाही.

त्या दोघांनी ड्रायव्हर-कंडक्टरला शिव्या हासडल्या. आता त्यांना सारी रात्र स्टॅण्डवर काढावी लागणार होती.

सकाळ झाली. त्यांनी दुसरी बस पकडली. पंधरा मिनिटातच ती घाटाजवळ पोहोचली.  वळणदार धावत घाटावर चढू लागली. एवढ्यात पाठीमागनं दोन अॅंब्युलन्स कर्कश सायरन वाजवत आल्या आणि पुढं निघून गेल्या. ड्रायव्हरनं ओळखलं, पुढ अॅक्सिडेंट झालेला दिसतोय. एवढ्यात पोलिसांची एक गाडी वेगात पुढं गेली. तिच्या मागोमाग आणखी दोन अॅंब्युलन्स आल्या. ड्रायव्हरला अंदाज आला, मोठा अॅक्सिडेंट झालेला दिसतोय. समोरनं येणाऱ्या एका मोटरसायकलवाल्याला त्यानं विचारलं, काय झालं? त्यानं सांगितलं, रात्री एक एस. टी. बस दरीत कोसळली.

ट्रॅफिक जाम झालं म्हणून प्रवासी खाली उतरले. ते दोन प्रवासीही उतरले. अॅक्सिडेंटची बातमी त्यांनाही समजली. त्यांना शंका आली, ती बस म्हणजे रात्रीची आपली चुकलेली बस तर नाही ना? दोघं झपाझप पावलं टाकत अॅक्सिडेंटच्या ठिकाणी पोहोचले. बघतात तर काय, ती तीच बस होती. दोघांच्या हृदयाचे ठोके चुकले. बरेच प्रवासी मेले होते, बाकीचे गंभीर जखमी झाले होते. दोघं बराचं वेळ तिथं थांबले.

हळुहळू ट्रॅफिक सुरळीत झालं. दोघं लगबगीनं त्यांची बस थांबली होती तिकडं आले. पण तोपर्यंत त्यांची बस निघून गेली होती!


हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा