-महावीर सांगलीकर
जयसिंग आणि वीरसिंग हे दोघं गब्बरपंताचा अड्डा असलेल्या शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी पिंपरी-चिंचवड वरून बसनं मनपाला येतात. तिथंनं शनिवारवाड्याला कसं जायचं याचा विचार करत असतानाच एक रिक्षावाली त्यांना हाक मारते….
रिक्षावाली: अहो साहेब, कुठं जायचं आहे? डेक्कन, टिळक रोड, कोथरूड....
जयसिंग: आमाला शनिवारवाड्यावर जायचं हाय.
रिक्षावाली: बसा… बसा
वीरसिंग: (डोळे मिचकावत) किती घेणार?
रिक्षावाली: अहो साहेब, मी रिक्षावाली आहे
वीरसिंग: तसं नाय, रिक्षाचं भाडं किती घेणार आसं इचारलं
रिक्षावाली: मग तसं बोला ना… काय होईल ते मीटर प्रमाणे घेईन
जयसिंग: (वीरसिंगला): ए चल बस लवकर
(जयसिंग आणि वीरसिंग रिक्षात बसतात. रिक्षावाली पण रिक्षात बसते आणि रिक्षा स्टार्ट करते आणि पुणे स्टेशनच्या दिशेने नेते)
रिक्षावाली: माझं नाव वासंती आहे
वीरसिंग: पुण्यात असली जुनाट नाव अजून असत्यात?
वासंती: अहो काय सांगायचं, माझं नाव ठेवलं त्यावेळी मी खूप लहान होते, बोलता येत नव्हतं नाहीतर मी या नावाला त्याचवेळी विरोध केला असता.
वीर सिंग: आताही नाव आडनावासकट बदलत येतंय की
वासंती: ते कसं काय?
वीरसिंग: लग्न केलं की नवरा नाव-आडनाव दोन्ही बदलून टाकतो
वासंती: (लाजत) आता माझ्याशी कोण लग्न करणार? माझ्या रंगामुळं मला कोणी पसंतच करत नाही.
वीरसिंग: पण तुझा रंग असा कसा झाला?
वासंती: अहो काय सांगायचं … माझं आडनाव गोरे आहे, पण झालं उलटंच. माझ्या आईचं माहेरचं आडनाव काळे आहे. आई काळे-गोरे अशी दोन्ही आडनावे लावते, पण मी आईच्या माहेरच्या आडनावावर गेले.
वीरसिंग: गोरेपण की क्रीम लावून बघायची की मग….
वासंती: बघितली, कांही उपयोग नाही झाला. ....... तुमचा मित्र कांहीच बोलत नाही, ते का बरें …?
जयसिंग: तू अशी नाकात का बोलतीस? बामन हायेस का काय?
वासंती: बामन नाही ब्राह्मण आहे मी … ती पण चांगली कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण…. पण रंगामुळे सगळे मला देशस्थ समजतात.
जयसिंग: तरीच.... आमच्याकडं सर्दी झाली तरच असं नाकात बोलत्यात
(तेवढ्यात जयसिंगला रस्त्यावर खड्डा दिसतो)
जयसिंग: (ओरडत): खड्डा …… खड्डा
वासंती: घाबरू नका साहेब… पुण्यातला खड्डा अन खड्डा मला माहीत आहे
(रिक्षा पुणे स्टेशन जवळ आली आहे. वासंती रिक्षा स्वारगेटच्या रस्त्यानं न्यायला लागते. )
वासंती: साहेब, माझं नाव-आडनाव दोन्ही सांगितलं, पण अजून तुम्ही तुमची नावं नाही सांगितलीत
जयसिंग: विचारल्याशिवाय कसं सांगणार?
वासंती: बरं विचारते. तुमची नावं काय हो?
जयसिंग: माझं नाव जयसिंग आणि याचं वीरसिंग
वासंती: तुम्ही राजपूत दिसताय?
वीरसिंग: नाय नाय. आम्ही मर्द मराठे आहोत.
वासंती: आणि आडनावं काय?
वीरसिंग: मी चव्हाण आणि हा पवार
वासंती: मग तुमचं पटतं कसं काय? हे हे हे ……….
(रिक्षा स्वारगेट वरून सारस बागेकडे येते)
वासंती: साहेब इथं गणपती आहे, बाग पण आहे, जायचं का दर्शनाला?
वीरसिंग: (जयसिंगकडे बघत) जायचं का?
जयसिंग: नको, आधी लगीन शनिवारवाड्याचं
(एवढ्यात रिक्षा बंद पडते. वासंती ती पुन्हा सुरु करायचा प्रयत्न करते, पण ती सुरू होत नाही )
वासंती: अहो आता रिक्षा ढकलायला लागेल.
(वीरसिंग एकटाच रिक्षातून उतरतो आणि एका हाताच्या पंजाने रिक्षा हलकेच ढकलतो. रिक्षा लगेच सुरू होते. वीरसिंग रिक्षात बसतो )
वासंती: कमाल आहे, तुमच्या हातात खूप ताकत दिसते…
वीरसिंग: ये हात नही हमारी पार्टी का पंजा है …… हाहाहाहा
वासंती: पण रिक्षा बंद पडली नव्हतीच मुळी. मी तसे नाटक केले, तुम्हाला कामाला लावायला
वीरसिंग: असं काय? थांब, तुझ्याकडं मागनं बघतो……
वासंती: मग आता काय पुढनं बघत आहात काय?
जयसिंग: मागनं बघतो म्हणजे नंतर बघतो असं त्याला म्हणायचं हाय
(शेवटी एकदाची रिक्षा शनिवारवाड्याजवळ येते. वीरसिंग आणि जयसिंग रिक्षातून उतरतात)
वीरसिंग: किती झाले?
वासंती: (मीटर मधील आकडा बघून आणि हिशेब करून) साहेब, फक्त 209 रुपये झाले
(वीरसिंग तिला 100च्या दोन नोटा आणि 10ची एक नोट देतो. वासंती त्याला दहाची नोट परत द्यायला लागते)
वीरसिंग: दहा रुपये सूट का?
वासंती: नाही. वरचे नऊ रुपये सुट्टे द्या.
वीरसिंग: (दहाची नोट नाकारत ) असू दे एक रुपया तुझ्याकडंच
वासंती: नको. मी मीटर पेक्षा एक पैसाही जास्त घेत नाही.
जयसिंग: आमाला काय खुळं समजतीस व्हय? या पुलाच्या पलीकडं आमी तुझ्या रिक्षात बसलो आणि तू फिरवून फिरवून आमाला इथं आणलंस. दहा रुपये पण भाडं होत नाही
(वासंतीचा चेहरा उतरतो)
जयसिंग: या वीरसिंगला एखादी पोरगी रिक्षातनं फिरवायची होती म्हणून आमीच तुला येडं बनवलं. त्याला तू लई आवडलीस.
वासंती: (लाजत, वीरसिंगला) मग घरी पोहे खायला कधी येणार?
वीरसिंग: घरी कशाला? इथंच कुठं तरी हॉटेलात खाऊया की पोहे
वासंती: नाही हो, इथले हॉटेलवाले एका प्लेट मध्ये दोघांना खाऊ देत नाहीत. हेहेहेहे……. तुम्हाला कसं कळत नाही हो? घरी पोहे खायला या म्हणजे माझ्या मावशीला भेटायला या.
वीरसिंग: पण तुझ्या मावशीला कशाला भेटायचं?
(वासंती कपाळाला हात लावते )
पुणेरी शोले शॉट नंबर १६
हिटलरची गुप्त भारतभेट
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा