-महावीर सांगलीकर
शिवानी द ग्रेट या कथेचा पुढचा भाग
‘त्या दिवशी मला भयानक टेन्शन आलं होतं. रडून रडून उशी अक्षरश: ओली झाली होती. अचानक तुमचा फोन आला. किती बरं वाटलं मला. मी माझ्या आई-वडिलांना देखील सांगू शकत नाही अशा गोष्टी फक्त तुम्हालाच सांगू शकते. ज्याच्याकडे मन मोकळं करता येईल असे माझ्यासाठी फक्त तुम्हीच आहात. यू आर माय सेव्हिअर’ शिवानी म्हणाली.
‘मी नेमकं त्याचवेळी कसा काय बर फोन केला असेल?’
‘त्याचंच मला आश्चर्य वाटतं’
‘त्यात कसलं आश्चर्य? त्या दुखाच्या भरात तुला माझी तीव्रतेनं आठवण झाली आणि तुझ्या मनातून निघालेल्या लहरी माझ्यापर्यंत पोहोचल्या. इट्स टेलेपथी, नथिंग एल्स’
त्याची नजर शिवानीच्या डोळ्यांकडे गेली. आधी त्याला ते गडद तपकिरी वाटले होते, पण नीट निरखून बघताच त्याला त्यात लाल-गुलाबी रंगाची झाक दिसली.
‘पहिल्यापासून तुझ्या डोळ्यांचा रंग असाच आहे?’ त्याने विचारलं.
‘नाही, लहानपणी ते काळसर होते’ ती म्हणाली.
‘अच्छा... रडून रडून आसवांमुळे ओरिजिनल रंग धुवून निघाला असेल कदाचित’ तो म्हणाला.
ती गोड हसली.
‘अशा रंगाचे डोळे मी पहिल्यांदाच पहातोय. त्याचा अर्थ काय हे मला आत्ताच सांगता येणार नाही. कोणत्या पुस्तकातही त्याचा अर्थ सापडणार नाही. मलाच त्याचा शोध घ्यावा लागेल’
मग त्यानं विचारलं, ‘शिवानी, तुझ्या चेह-याबद्दल तुला काय माहीत आहे?’
‘म्हणजे?’ तिनं न समजून विचारलं.
‘म्हणजे तू रोज आरशात बघतेस ना? तुझ्या कांही लक्षात आलंय का?’ तो म्हणाला.
‘नाही’
‘तू सुंदर आहेस हे तुला माहीत आहे का?’
त्याच्या या शब्दांनी ती सुखावली.
ही पोरगी साधीभोळी वाटतेय, पण महाचलाख आहे. पण आपल्यापुढं इतकी गरीब गाय होऊन का बसली आहे?
‘हे तुझे दाखवायचे दात आहेत ना?’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तू आत्ता माझ्यापुढे जशी शांत, गरीब, करुणामय भासतेस, तशी तू प्रत्यक्षात नाही आहेस’
यावर ती कांही बोलली नाही.
त्याचं लक्ष तिच्या त्वचेकडे गेलं. आधी चेह-याच्या, मग गळ्याच्या आणि मग हाताच्या. नितळ गव्हाळ त्वचा. कुठे सुरकुती नाही, कुठे डिफेक्ट नाही. तिच्या मनगटावर एक डाग होता. भाजल्याचा.
नंबर 8 पर्सन. कॅन हार्म ऑदर्स ऑर देमसेल्व्हज. तिलाच विचारू.
‘हा कसला डाग आहे? कुणीतरी चटका दिलेला दिसतोय तुला’
‘मीच... मीच माझा हात गरम इस्त्रीवर धरून ठेवला होता’
तो नाराज होत म्हणाला, ‘तसं का केलंस?’
‘माझी मलाच शिक्षा म्हणून’
‘धिस इज टू मच. तुझा जन्म स्वत:ला शिक्षा करण्यासाठी नाही तर गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी झाला आहे. यू आर जस्ट अ क्रेझी गर्ल’
मग विषय बदलत तो म्हणाला, ‘समज, तुला अनुरूप असे दोन तरूण आहेत. त्यांच्यापैकी एकजण तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडायचा आहे. दोघांचे वय सारखं आहे. उंची सारखी आहे. शिक्षण सारखे आहे. दोघेही हुशार आणि महत्वाकांक्षी आहेत. स्वभाव सारखा आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी देखील सारखी आहे. दोघेही हॅण्डसम आहेत. पण एक छोटासा फरक आहे...’
‘कोणता?’ तिने नजरेनेच विचारले.
‘दोघांच्यापैकी एकजण गोरा आहे, तर दुसरा सावळा आहे’
‘मी त्या सावळ्या तरुणाला निवडेन’
ती हेच उत्तर देणार हे त्याला माहीत होतं.
पण तिच्या या उत्तरामागचं तिचं लॉजिक काय होतं?
‘कारण?’ त्यानं विचारलं.
‘कारण त्या सावळ्या तरुणाला नाही म्हंटलं तरी थोडा इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स असणारच. निदान माझ्यापुढे तरी. मी जर त्याच्याशी लग्न केलं तर तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही’.
‘आणि समजा त्याला तसा कॉम्प्लेक्स नसला तर?’
‘तर मग मी तो तयार करेन’
‘स्मार्ट गर्ल’
तो स्वत:च्या विचारात गुंग झाला. त्यानं इतर अनेक मुलींनाही हाच प्रश्न विचारला होता. त्यातील अनेक मुलींनी सावळ्या मुलाला पसंत केले होते, आणि त्यांच्यापैकी ब-याच जणींचं लॉजिकही शिवानी सारखंच होतं.
अशाच प्रकारचा प्रश्न तो मुलांनाही विचारायचा. ‘दोन मुली आहेत, त्यातली एक उजळ आहे, दुसरी सावळी आहे.... वगैरे’ बहुतेक मुलं उजळ मुलीला पसंत करायचे. कांहीजण सावळ्या मुलीलाही पसंत करायचे. सावळ्या मुलीला पसंत करणा-यां बहुतेक मुलं स्वत:ला पुरोगामी वगैरे समजत. त्यांच्या मनात आपण फारच मोठं समाजकार्य करतोय असा भाव असावा. उजळ मुलीला पसंत करणा-यांचं लॉजिक म्हणजे सावळ्या आणि उजळ मुलीत उजळ मुलगी सुंदर असते अस त्यांचं वाटणं.
मुली या मुलांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल आणि मॅच्युअर असतात. म्हणून तर कित्येक सुंदर तरुणींचे नवरे वेल सेटलड पण दिसायला सो-सोच असतात हे त्यानं कैकदा ऑबझर्व केलं होतं.
‘माझं लग्न कधी होणार?’ शिवानीच्या या प्रश्नानं तो भानावर आला.
‘होईल लवकरच’ तो म्हणाला, ‘तुला पुढच्या वर्षीच तशी संधी मिळणार आहे. पण तू घाई कशाला करतेस? आधी तू तुझ्या करीअरकडं लक्ष दे. नाव कमव. पैसे कमव. तुझं वय सव्वीस वर्षे आहे. अजून दोन-तीन वर्षे ओन्ली करीअर, नो शादी. लग्नाचा विचार पण मनात आणू नकोस’
‘तरीपण सांगा ना, कसा असेल माझा नवरा?’ तिचा पुढचा प्रश्न.
‘तुला कसा पाहिजे?’ त्यानं विचारलं.
‘तुमच्या सुपरनॅचरल गर्ल्समधल्या कॅप्टन विजयसारखा’ तिनं लगेच उत्तर दिलं.
‘मिळेल... तसाच मिळेल’, तो म्हणाला, ‘पण त्यासाठी तुला रोज तुझ्या या स्वप्नाचं व्हिज्युअलायझेशन करावं लागेल.. सतत’
‘करेन’
‘अल्वेज थिंक बिग... देन इव्हन स्काय विल नॉट बी अ लिमिट फॉर यू’
‘तुम्ही किती छान बोलता. एवढ सगळं तुम्हाला सुचतं कसं हो?’.
‘बिकॉज इट्स माय प्रोफेशन. आय एम नॉट जस्ट अ न्यूमरॉलॉजिस्ट ऑरor फेस रीडर, बट अल्सो अ मोटीव्हेटर. क्लाएंटला मोटीव्हेट करण्यासाठी मला हे आपोआपच सुचतं’
‘पण मग तुम्ही खोटंही बोलत असाल, क्लाएंटला दिलासा देण्यासाठी..?’
‘नाही, अजिबात नाही. खोटं बोलण्यात माझाही तोटा आहे आणि क्लाएंटचाही. मग खोटं कशाला बोला... पण मी एक गोष्ट करतो. कांही गोष्टी सांगायचं टाळतो..’
‘कोणत्या?’
‘ज्या घटना घडणार आहेत हे स्पष्ट दिसतंय आहे, पण त्या जर सांगितल्या तर क्लाएंटला मानसिक धक्का बसेल, किंवा तो बेचैन होईल अशा गोष्टी’
‘पण मग क्लाएंटला धोक्याची सूचना कशी मिळणार?’
‘घटना जर टळणारच नसेल, तर पूर्वसूचना देऊन काय उपयोग? आणि टळणार असेल तर पूर्वसूचना देण्याचे कारणच उरत नाही’
तिनं मध्येच विचारलं, ‘आपण अजून कॉफी घ्यायची का?’
‘घेऊ, पण मला एक सांग, तुला कॉफी का आवडते?’
‘आवडते. का ते माहीत नाही’
‘मला वाटतं कॉफीत दूध जास्त असत, म्हणून तुला ती आवडत असावी. नागीन दूध पिते...’ तो मिश्किलपणे हसत म्हणाला.
मग त्यानं विचारलं, ‘तू मला इतक्या महागड्या हॉटेलमध्ये का आणलंस?’
‘मी जेंव्हा कॉलेजला होते तेंव्हा वर्गातली श्रीमंत पोरं या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला येत. मला ते शक्य नव्हतं. मी त्याचवेळी ठरवलं, आपण पैसे मिळवायला सुरवात केली की फक्त याच हॉटेलमध्ये कॉफी प्यायची’
‘तुम जिद्दी हो.... तू तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणार आहेस’
एवढ्यात शेजारच्या टेबलावर बसलेला तरुण उठला आणि निघून गेला.
ती म्हणाली, ‘कसला भयानक सेंट लावला होता त्यानं...’
खर म्हणजे त्याचं नाक तीक्ष्ण होतं, अगदी बारीक-सारीक वासही त्याला येत असत, पण त्याला कसल्याही सेंटचा वास आला नव्हता. स्त्रियांचे सेन्सेस तीक्ष्ण असतात हे त्याला माहीत होत, पण एवढे तीक्ष्ण? त्याला जरा नवलच वाटलं.
‘बरं, ते जाउंदे. तुझ्या गळ्यावर जे दोन मोठे तीळ आहेत, त्याचा अर्थ माहीत आहे तुला?’ तो म्हणाला.
तिने आपल्या डोळ्यांनीच विचारले, ‘काय?’
‘मुळात आपल्या शरीरावर जे तीळ जन्मल्यापासून असतात, ते आपल्या गेल्या जन्मातल्या घटनांच्या खुणा असतात. तुझ्या गळ्यावरचे हे दोन तीळ म्हणजे गेल्या जन्मात एखाद्या नागाने तिथे चावा घेतला असावा. ख-या नागाने किंवा माणसातल्या नागाने. नक्की काय घडले होते हे तुला जेंव्हा तुझा पूर्वजन्म आठवेल तेंव्हा कळू शकेल. कदाचित गेल्या जन्मी तू एखादी नागीन असावीस.... असो. तुझ्या चेह-याच मी एकंदर जे रीडिंग केलं आत्तापर्यंत, त्यावरनं मला स्पष्ट दिसतंय की तुझं लग्न एखाद्या श्रीमंत आणि सुखवस्तू तरुणाशी होणार आहे. पण त्यासाठी तुला थोडी वाट बघावी लागेल. उगीचच लग्नाची घाई करू नकोस आत्ताच’
‘पण मग कधी?’
‘ते पुढच्या वर्षी घडू शकतं, किंवा मग तुझ्या वयाच्या 30व्या वर्षी घडू शकतं. तोपर्यंत मघाशी मी सांगितलं तसं ओन्ली करीअर... निघूया आता?’
‘निघूया. माझं होस्टेल पण बंद व्हायची वेळ झालीय. तुमची फी किती द्यायची?’ ती तिची पर्स उघडत म्हणाली.
‘तू क्लाएंट आहेस का माझी? आठव मघाशी तू काय म्हणालीस ते.... आय एम युवर सेव्हीअर.
सेव्हिअरनं फी घेणे बरोबर ठरत नाही. आणि मला पैसे मिळतीलच भरपूर.. तुझ्याकडनं नाही, पण तुझ्यामुळे..’
‘ते कसं काय?’
‘त्यामागं एक न्यूमरॉलॉजिकल कारण आहे. मी जर आठ किंवा एक नंबरच्या संपर्कात राहिलो तर माझ्यावर पैशांचा धो-धो पाउस पडतो.. चलुया...’
दोघे हॉटेलच्या बाहेर आले. त्याच लक्ष तिच्या मोपेडकडं गेल. पांढरा रंग.. आणि नंबर? 895. त्याला त्याचं आश्चर्य वाटलं नाही.
पुढे चालू.....
शिवानी आणि मोटीव्हेटर
या कथेचा पहिला भाग:
शिवानी द ग्रेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा