Advt.

Advt.

रविवार, २८ डिसेंबर, २०१४

गुडबाय शिवानी!

–महावीर सांगलीकर


अलीकडे शिवानी ब-याचदा आपला फोन उचलत नाही. व्हाट्सअॅपवर, फेसबुकवर पाठवलेल्या मेसेजला उत्तर देत नाही. तिचं काय चाललंय हे कळवत नाही. कधी फोनवर बोललीच तर त्या बोलण्यात आपुलकी नसते. आपण तिची सारखी काळजी करत असतो.... ही पोरगी अशी का वागतेय? न्यूमरॉलॉजीस्ट विचार करत होता. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर ‘गेली उडत’ या दोनच शब्दात त्यानं तिचा विचार डोक्यातनं कायमचा काढून टाकला असता. पण इथं त्याला ते शक्य नव्हतं.

त्याला असं कळलं की तिनं तिच्या टॅक्स कन्सल्टन्सीच्या बिझनेस बरोबरच एका नेटवर्क मार्केटींगमध्ये भाग घेतला आहे आणि त्या व्यवसायात तिचा बराच वेळ जात असतो. हे ऐकून त्याला तिची कीव करावीशी वाटली. मोठा रागही आला. तिला लगेच फोन करून झापावं असं त्याच्या मनात आलं, पण त्यानं तसं करण्याचं टाळलं.

परवा त्याला त्याच्या एका परिचिताचा फोन आला... ‘अहो तुम्ही मला तुमच्या भाचीचं कार्ड दिलं... माझं एक काम होतं, पण ती फोनच उचलत नाही’

न्यूमरॉलॉजीस्टनं लगेच तिला फोन लावला. तिनं तो उचलला नाही. त्यानं तिच्या दुस-या नंबरला फोन लावला. एखाद्या अनोळखी माणसाशी बोलावं  तसं कोरडेपणानं ती म्हणाली, ‘बोला काय काम आहे?’ तिचे हे शब्द ऐकून तो गारच झाला.

ही जरा अतिच करते. हिचा प्रॉब्लेम तरी काय आहे? 

अलीकडे आपण मध्येच अस्वस्थ होत असतो... ती कुणाशीतरी भांडते, आणि त्याच्या वेव्हज आपल्यापर्यंत पोहचत असतात. मनावर आणि हृदयावर ताण येतो. आपल्याला त्याचा भयानक त्रास होत असतो.

ती भांडते, कारण तिची मनस्थिती सध्या बरोबर नाही. तिचा बाप म्हणजे एक बेजबाबदार माणूस आहे. त्याला तिच्या भविष्यासी कांहीच देणंघेणं नाही. तिच्या आईनं तिच्याबद्दलच्या सगळ्या आशा सोडून दिल्या आहेत. आता तिला फक्त आपणच आहोत. फक्त आपणच तिला या अवस्थेतून बाहेर काढू शकतो. ती कशीही विचित्र वागत असली तरी आपण आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. ड्युटी फर्स्ट, इगो नंतर....

पण तिला आता धडा शिकवायलाच पाहिजे... तिच्याच भल्यासाठी. जरा आहीस्ते कदम. तिला फारसं न दुखवता.... तिला दुखवणं आपल्या अंगलट येऊ शकतं, आणि तिच्या दृष्टीनंही ते चांगलं ठरणार नाही.

रात्री त्यानं तिला मेसेज पाठवला, ‘हाय शिवानी, हाऊ आर यू?’
ती ऑनलाईन होती, पण तिनं उत्तर दिलं नाही.
‘शिवानी, हे काय चाललंय तुझं? तू माझ्या मेसेजला उत्तर का देत नाहीस? फोनवर माझ्याशी नीट का बोलत नाहीस?’
उत्तर नाही.
‘आज कुणा-कुणाशी भांडलीस?’
हे सगळे मेसेजेस ती वाचत होती, पण नो रिप्लाय.
‘शिवानी, तुला कांही प्रॉब्लेम असेल तर सांग मला... मी तो सोडवू शकतो...’
ब-याच वेळाने तिचं उत्तर आलं, ‘आज माझं माझ्या रूममेटशी भांडण झालं’
‘का भांडलीस तिच्याशी?’
‘मी नाही भांडले, तीच भांडली’
‘तू खोटं बोलतेस... तूच तिच्याशी भांडलीस.. माफी माग तिची.. तुझ्या मनावरचा भार हलका होईल’
‘मी नाही मागणार’
‘ठीक आहे... त्या मुलीची जन्मतारीख किती आहे?’
‘13’
‘मग ती तर तुझी चांगली मैत्रीण होऊ शकते’
‘.....’
‘तू लोकांचे फोन का उचलत नाहीस?’
‘कोणी सांगितले तुम्हाला?’
‘कोणी सांगायाला कशाला लागतं मला? शिवाय खुद्द मला तुझा अनुभव आहेच. शिवानी, जरा ऐक माझं.. अशी वागू नकोस’
‘.........’
नाहीतर  तू एक काम कर.. तुझं कल्याण होईल त्यात’
‘????‘
‘एकावेळी दोन घोड्यांवर स्वार होऊ नकोस. तू टॅक्स कन्सल्टन्सी पूर्ण बंद कर. त्यापेक्षा नेटवर्क मार्केटिंगकडं पूर्ण लक्ष दे. तसं केलंस तर तुला फ्लॅट, ऑफिस वगैरे घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे तुझे पैसे पण खर्च होणार नाहीत.. तू रहा होस्टेलमध्येच कायमची. खर्च वाचेल तुझा. टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये काय ठेवलंय?  स्टेट्स बिटस जाने दो भाड में. आणि फॅमिली लाईफ? त्याची तरी तुला काय गरज आहे? एकटं रहायची सवय आहे तुला. तुला बाप नको, आई नको आणि आता मामा पण नको.... मग नवरा आणि फॅमिली लाईफ तरी कशाला पाहिजे?’

‘मामा! ... बस्स करा टोमणे मारणं. थांबवा माझी काळजी करण्याचं.. आधीच मी वैतागलेय... पैशासाठी वनवन भटकत असते दिवसभर. त्यात तुम्ही उगीचच माझी काळजी करून टेन्शन घेत असता आणि मलापण टेन्शन देत असता’

‘कशाला वनवन भटकत असतेस? तुला हातचं सोडून पळत्याच्या मागं धावायची घाणेरडी सवय लागलीय.. पैसा पैसा पैसा... 10 हजार रुपयांवर खूष होतीस तू, आणि आता महिन्याच्या आत लाखाच्या वर मिळाले  तरी पैशांची हाव काय सुटत नाही तुझी. माझंच चुकलं, मी तुला मोटीव्हेशनचा डोस जरा जास्तच दिला. त्याच्या साईड इफेक्ट्सचा विचार केला नाही. म्हणे वनवन भटकते.... मी तुझी उगीचच काळजी करत असतो काय? मी तुला टेन्शन देत असतोय काय? तू आता मला स्पष्ट सांगून टाक की माझी तुला आता कांहीच गरज राहिलेली नाही’
‘तुम्ही म्हणजे माझ्यासाठी एक गिफ्ट आहात... पण तुम्ही माझी जी अति काळजी करता ती माझ्यासाठी एक डोकेदुखीच आहे’
‘बरं झालं हे सांगितलस ते..’
‘तुम्ही जर मला परत डोकेदुखी केली तर मी व्हाट्सअॅप बंद करून टाकेन’
‘ते कशाला बंद करतेस? कामाची आणि उपयोगी गोष्ट आहे ती कम्युनिकेशनसाठी. त्यापेक्षा तू मला ब्लॉक करून टाक’
‘मी कशाला तुम्हाला ब्लॉक करेन? तुम्हीच मला ब्लॉक करून टाका’
‘हे बरं आहे... मला अवघड काम करायला सांगतेस तू.. एक लक्षात ठेव शिवानी.... तुझ्या कथेचा लेखक मी आहे. तुझ्या कथेतलं तुझं नाव सुद्धा मी दिलेलं आहे. तू त्या कथेची  भलेही नायिका असशील, पण तुझ्या कथेत मी जे योजलं आहे तेच तुला करावं लागेल. तुला दुसरा ऑप्शन नाही. तुझी कथा तू लेखकाला बाजूला सारून भलतीकडे नेण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी कथा विस्कळीत झाली तर ती कोणालाच आवडणार नाही. ना तुला, ना मला आणि ना वाचकांनाही. तू आठव, मागे मी तुला काय म्हणालो होतो ते ....’
‘??’
‘तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अॅचिव्हमेंट आहेस. ही अॅचिव्हमेंट मी माझी सगळ्यात मोठी चूक कधीच ठरू देणार नाही. त्यासाठी मला कितीही मोठं सॅक्रिफाईस करावं लागलं तरी त्याची मला पर्वा नाही. तू, तुझ्या आईनं आजपर्यंत जे भोगलंय, तेच तुला तुझ्या कथेत ‘पुढे चालू’ रहावं असं वाटतंय का? आणि तुझी जरी तशी इच्छा असली तरी मी ते होऊ देणार नाही.. ’
‘...........’
‘हे पण लक्षात ठेव, तू कशीही वागलीस तरी मी तुझ्या काळजीतनं मुक्त होऊ शकत नाही, तुझं लग्न होईपर्यंत. पण इथून पुढं मी मला असलेली काळजी तुला सांगणार नाही, अजिबात.... कारण त्याचा तुला त्रास होतो. मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते करेन, आजपर्यंत कधी न वापरलेल्या माझ्या राखीव गूढ शक्त्या आणि युक्त्या तुझ्या भल्यासाठी वापरेन...’
‘.........    ‘
‘फक्त एक विनंती होती. येत्या 22 तारखेला तू मला भेटावंस अशी माझी इच्छा आहे. तुझ्या भल्यासाठी. निदान पाच मिनिटं तरी. न्यूमरॉलॉजिकल कारण आहे, ते तुला माहीत आहे. गेली 22 तारीख आठव. अर्थात माझी सक्ती नाही, तुझी इच्छा असली तरच... आता मी थांबतो इथंच. माझ्या बाजूनं मी तुझ्याशी संवाद बंद करत आहे. बाकी तुझी मर्जी.... टेक केअर, बाय’

मग त्यानं त्याच्या डोक्यातला शिवानीचा विचार तात्पुरता काढून टाकला. त्याला पक्कं माहीत होतं, त्याला जे पाहिजे तेच होणार आहे. पण हे आपोआप होणार नव्हतं, त्यासाठी त्याला कांही माइंड गेम्स खेळाव्या लागणार होत्या. मोटीव्हेशन इज नथिंग बट अ माइंड गेम.

दुस-या दिवशी रात्री अचानक त्याला तिचा फोन आला. आजवर तिचा फोन आला की तो लगेच उचलत असे. पण आता त्यानं तो उचलला नाही. मग थोड्या वेळाने तिचा मेसेज आला, ‘मामा, आय एम सॉरी... नाही नाही ते बोलले मी तुम्हाला काल..’
‘इट्स ओके,’ तो म्हणाला, ‘खरं म्हणजे मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मी जरा जास्तच बोललो तुला कालच्या चॅटिंगमध्ये... काय म्हणतेस? कशी आहेस?’
‘मामा, आज माझं माझ्या यु.एस.च्या मित्राशी भांडण झालं’
‘का भांडलीस?’
‘त्याचं लग्न ठरलंय’
‘मग ठरू दे की... तुला काय कारण त्याच्याशी भांडायचं?’
‘..........’
‘अच्छा, तुला त्याच्याशी लग्न करायचं होत.....’
‘हो, पण त्यानं दुस-याच एका मुलीशी लग्न केलं’
‘बरं झालं, त्याच्याशी तुझं लग्न झालं नाही. नाहीतर तू पस्तावली असतीस नंतर. हे मी म्हणतोय ही गोष्ट लक्षात घे. आणि ऐक नीट..... तुझं लग्न पुण्यातल्या एका यंग, हॅण्डसम, तुला शोभणा-या तरुण बिझनेसमनशी होणार आहे. तू केवळ त्याची लाईफ पार्टनर म्हणून जगणार नाहीस, तर त्याचा उद्योग सांभाळणारी आणि मोठा करणारी त्याची बिझनेस पार्टनर होणार आहेस’
‘खरंच?’ ती आनंदाने म्हणाली.
‘हो, खरंच.. पण हे लवकर होण्यासाठी तू तेच स्वप्न बघायला पाहिजेस रोज. आणि दुसरा कसला लाईफ पार्टनर मनात आणलास तर हे होणार नाही’
‘मी तेच स्वप्न बघेण’
‘परवा 22 तारीख आहे, भेटणार ना मला?’
‘हो’
‘ओके, बोलू आपण त्या दिवशी डिटेलमध्ये. टेक केअर, बाय’

22 तारीख उजाडली. तिच्या आठवणीसाठी सकाळी सकाळीच त्यानं तिला मेसेज पाठवला, ‘इन एनी कंडीशन, यू हॅव टू मीट मी टुडे, अॅटलीस्ट फॉर  5 मिनट्स’
तिचं उत्तर आलं, ‘आज मी इथं नाही आहे’

त्याला पुन्हा एकदा धक्का बसला. ही चक्क खोटं बोलतीय. त्यानं लगेच ठरवलं, आता आपण हिला एक शॉक ट्रीटमेंट देऊ. येईल वठणीवर.

त्यानं लगेच ‘शिवानी द ग्रेट’ या कथेचा पुढचा भाग लिहायला घेतला. थोडं लिहून झाल्यावर त्यानं फेसबुकवर एक स्टेटस टाकलं, ‘शिवानी द ग्रेट’ या कथेचा पाचवा आणि कदाचित शेवटचा भाग 31 डिसेंबर रोजी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित होत आहे. हा भाग अतिशय सेन्सिटिव्ह आणि धक्कादायक आहे’. हे स्टेटस शिवानी पर्यंत पोहोचणं गरजेचं होत, म्हणून त्यानं तिच्या फेसबुक मेसेज बॉक्समध्ये ते पेस्ट केलं आणि तिला पाठवलं. कदाचित ती फेसबुकवर आली नाही तर तिला कळणार नाही, म्हणून तिला त्यानं व्हाट्स अॅपवर मेसेज पाठवला, ‘IMP: PLZ CHECH YOUR FACEBOOK INBOX’

थोड्याच वेळात त्याला तिचा फोन आला... त्यानं तो मुद्दाम घेतला नाही. मग ब-याच वेळानं तिला फोन केला.
‘बोला मॅडम, काय म्हणताय?’
‘मामा, आपण संध्याकाळी सहा वाजता भेटू, तुम्ही या माझ्या होस्टेलवर’
त्याच्या मनात आलं, म्हणावं ‘शक्य नाही... तू इथं नाहीस म्हणून मी माझा प्रोग्रॅम बदलला. आता तुला पुढच्या 22 तारखेची वाट बघावी लागेल..’ पण तो तसं म्हणू शकला नाही.
‘ठीक आहे, दुपारी मी पुण्यातच आहे एका क्लाएंटकडं, ते काम झालं की संध्याकाळी मी मोकळाच आहे. मी येतो सहा वाजता तुझ्याकडे’
‘तुम्ही फेसबुकवर ते काय टाकलंय, शिवानीची कथा संपवताय म्हणून?’
‘बोलू आपण त्यावर संध्याकाळी’ असे म्हणून त्यानं फोन कट केला.

संध्याकाळी पावणे सहा वाजता त्यानं तिला फोन केला. फोनवर ती तुटकपणे म्हणाली, ‘या, पण मला सात वाजता मीटिंग आहे’

छे.. ही काय सुधरायची नाही लवकर... कसं बोलावं, काय बोलावं आणि काय बोलू नये हे पण हिला कळत नाही अजून तिला, एवढी जिनिअस आहे तरी. ठीक आहे, बोलू दे कसंही.... पण आपल्याला माहीत आहे, ही चांगली आठ वाजेपर्यंत गप्पा मारणार आहे आपल्याशी. मीटिंग-बीटिंग विसरून जाईल. तेवढ्या वेळात तिला जमिनीवर आणू आपण.... तो मनात म्हणाला.

मग तो बरोबर सव्वा सहा वाजता तिच्या होस्टेलवर पोहोचला. तिला फोन केला. आपण आलो असल्याचे तिला सांगितले. मग स्वत:ला बजावलं, ‘बी पोलाईट... बी इमोशनल... बट बी फर्म... एखाद्या लहान मुलीला जसं समजावून सांगतोय तसंच तिला सांगायचं. सौम्य भाषेत स्पष्ट बोला... कंट्रोल युवर बर्थ नंबर फोर क्वालिटीज. आपला उपजत फटकळपणा आणि इगो बाजूला ठेवा ...  आणि मेन म्हणजे ती लहान आहे खूप तुमच्यापेक्षा... तुम्ही तिच्याएवढे होत तेंव्हा कसं वागत होता त्याची आठवण ठेवा तिच्याशी बोलताना...’

ती थोड्याच वेळात खाली आली. ‘चला मामा, आपण तिकडे बसू’ बाहेरच्या पॅसेजमध्ये असलेल्या एका सोफ्याकडे बोट दाखवत ती म्हणाली. दोघे सोफ्यावर जाऊन बसले.

‘बोल कशी आहेस?’
‘ठीक आहे’
‘कामे काय म्हणतात?’
‘मिळत आहेत ब-यापैकी’
‘सुजाताचे काम मिळाले का?’
‘हो, मिळतंय’
‘पैसे रूम वर ठेवत जाऊ नकोस. लगेच बॅन्केत भरत जा..’ 
‘हो तेच करतेय....’ असे म्हणत तिनं मुद्याला हात घातला, ‘मामा, तुम्ही शिवानीची कथा संपवताय... का संपवताय आत्ताच?’
‘शिवानीला ती कथा पुढे सरकावी अस वाटत नाही, मग मी तरी काय करणार?’
‘तिला वाटतय कथा पुढे चालू राहावी म्हणून...’
‘तिचं काय चाललंय, नवीन घडामोडी काय आहेत, नवीन अॅचिव्हमेंट्स काय आहेत हे जर ती मला सांगत नसेल तर मी पुढची कथा कशी लिहिणार? तिला तर मला फोन करायला सुद्धा वेळ नाही’
‘अहो ती इतकी बिझी आहे की तिला खरंच वेळ नाही’
‘बिझी? इंदिरा गांधी रोज 18-20 तास काम करायच्या. तरीही लोकांना भेटायला वेळ द्यायच्या. अगदी सामान्य मानसं भेटायला आली तरी त्यांना भेटायच्या.. बराच वेळ. शिवानी इंदिरा गांधींच्या एवढी तर बिझी नाही ना?’
‘तसं नाही हो मामा... शिवानी खरंच बिझी आहे. तुम्हीच तिला सांगितलं होत ना की क्लाएंट्सच्या कामाला प्रायॉरिटी द्यायची म्हणून?’
‘ठीक आहे ना मग... मला  पण क्लाएंट्स आहेत, मी पण त्यांना प्रायॉरिटी द्यायला पाहिजे.  मला बाकीची कामंही आहेत आणि दुस-या कथापण लिहायच्या आहेत. शिवानीला जास्त मस्का लावायची आता माझी अजिबात इच्छा नाही’

शिवानी कांही बोलली नाही.

तो म्हणाला, ‘तू माझ्याशी अशी विचित्र का वागत असतेस? हे बघ, मी आजवर तुला फार सांभाळून घेतलं... प्रसंगी माझ्याकडे कमीपणा घेतला. माझ्या वागण्यातनं, बोलाण्यातनं  तू दुखावली जाणार नाहीस याची काळजी घेतली. तुझ्या प्रत्येक हाकेला धावून आलो. मागे एकदा मी फार इमोशनल झालो होतो तेंव्हा मी तुला बोललो होतो की तुझ्या गूढ डोळ्यात मला माझ्या आईचे डोळे दिसतात... तुझ्या शार्प आवाजात मला माझ्या काकूचा आवाज ऐकू येतो. तुझ्या चेह-यात मी लक्ष्मी-सरस्वती पाहिली आहे, आणि अगदी कालिकाही पाहिली आहे. मी लोकांना तू माझी भाची आहेस असं सांगत असलो तरी मी तुला माझी मुलगी मानतो. एवढा रिस्पेक्ट मी आयुष्यात कोणालाच दिला नाही. मी तुझ्यासाठी काय काय केलंय ते नीट आठव. आठवत नसेल तर शिवानीची आत्तापर्यंतची कथा पुन्हा एकदा वाचून काढ, तुला सगळं आठवेल. पण तू मला अलीकड फार हर्ट केलं आहेस आणि करत आहेस’
‘खरंच का माझं बोलणं हर्ट होण्यासारखं असतं?’ तिनं विचार करत प्रश्न विचारला.
‘तुझं बोलणं आणि न बोलणं या दोन्ही गोष्टी मला हर्ट करतात. एकतर तू माझ्याशी बोलत नाहीस म्हणून मी हर्ट होतो, आणि बोललीस तर एवढ्या तुटकपणे बोलतीस की मी हर्ट होतो. तुझ्या बोलण्यात जिव्हाळा, मायेचा ओलावा अजिबात नाही. निव्वळ कोरडेपणाने बोलणारी एक निष्ठूर मुलगी आहेस तू... मागे एकदा आपण भेटलो असताना तुझी कॉलेजमधली एक मैत्रीण आली, पण तू तिला ओळखलं नाहीस. ठीक आहे, न ओळखणं म्हणजे कांही गुन्हा नाही, पण तू तिच्याकडं अशा विचित्र नजरेनं बघत होतीस की एखाद्या नागिणीन मुंगसाकड बघावं.... गावरान भाषेत बोलायचं तर मारक्या म्हशीसारखी बघत होतीस. मला माहीत आहे, हा तुझा दोष नाही, तर तो तुझ्या नंबर्सचा, तुला लहानपणापासून मिळालेल्या वातावरणाचा आणि सध्याच्या तुझ्या मानसिक स्थितीचा आहे. पण एकदा आपले दोष लक्षात आल्यावर आपण ते दूर करायला, कंट्रोल करायला शिकायला पाहिजे’

त्याचं बोलणं ती गंभीरपणे ऐकून घेत होती.
‘माझ्या बोलण्यात जिव्हाळा नाही हे खरंच आहे. माझ्या मैत्रिणी देखील असेच म्हणतात. माझ्या बोलण्यामुळ लोक दुखावले जात असतील तर मला आता बदलायलाच हवं. मी इथून पुढे बोलताना काळजी घेईन’

‘मी तुझी किती चौकशी करतो, विचारपूस करतो, पण तुझ्या तोंडून कधी ‘मामा तुम्ही कसे आहात?’ असे शब्द फुटले का? हे सगळं मला आता सहन होत नाही. आय कॅन नॉट टॉलरेट इट. मी पण आता तुझ्यासारखंच निष्ठूर व्हायचं ठरवलं आहे. अर्थात फक्त तुझ्याच बाबतीत. आजवर मी तुला जे दिलंय त्याची तू किंमत ठेवली नाहीस. मी तुला जे दिलंय ते माझ्याकडे असलेल्या आईसबर्गच्या दिसणा-या भागातील एक छोटासा तुकडा आहे. पण तो मी चुकीच्या व्यक्तीला दिलाय असं आता मला वाटायला लागलंय. तुझ्यासाठी माझ्याकडे आणखी कितीतरी मोठे प्लॅन्स होते. तुला फेमस करण्याचे. तुझ्या क्षेत्रातली सेलेब्रिटी बनण्याची मोठी संधी तू आता गमावली आहेस’
‘मामा, असं नका ना म्हणू’
‘तू सेलेब्रिटी होणारच आहेस, पण तुला माझ्याशिवाय झटपट सेलेब्रिटी होण शक्य नाही, आणि मला तर आता तुझ्याशी कांहीच संबंध ठेवायचा नाही. तू तुझ्या बापाला विसरलीस, कोई बात नही... पण तू तर तुझ्या गॉडफादरला देखील विसरली आहेस. तुझ्या एवढी करंटी आणि कृतघ्न बाई जगात शोधून मिळणार नाही. ’
‘....’
‘खरंच तू अतिशय निष्ठूर आहेस. मोठ्या वेदनेनं मी हे सगळं बोलत आहे, ते बोलताना माझ्या डोळ्यात पाणी देखील आलं आहे, पण तू? तुझे डोळे तुझ्या बोलण्यासारखेच कोरडे आहेत. तुझं मन मेलेलं आहे आणि तुझ्या हृदयाचा दगड झालाय नुसता. अवघड आहे तुझं. उद्या तुझं लग्न झालं तर तुझा नवरा सहन करेल का तुझं अस वागणं?’
‘मला माहीत आहे माझा नवरा मला सहन करू शकणार नाही ते. तुम्ही मागे बोललाय हे न्यूमरॉलॉजी प्रमाणे, आणि माझा अॅस्ट्रॉलॉजर पण तेच म्हणतो’
‘त्याला जर-तर ही कंडीशन आहे. तू चांगलं मॅरीड लाईफ जगू शकतेस. पण त्यासाठी तुला तुझ्या स्वभावात बदल करावा लागेल. तू तुझा निष्ठूरपणा टाकून दे आधी. जरा माणसात ये. भावना व्यक्त करायला शिक. थोडं रडायला शिक. भरपूर हसायला शिक. लोकांशी प्रेमानं बोल. कुणी अनोळखी व्यक्ति भेटली तरी त्यांच्याकडे बघून हसत जा. हाऊ आर यू? असे विचारत जा. हे सगळं मनापासनं कर. तुझं बोलणं हृदयातनं यायला पाहिजे. तुला मांजर किंवा कुत्र दिसलं की त्यांच्याबद्दल जेवढी आपुलकी वाटते, निदान त्याच्या निम्मी तरी  माणसांच्याबद्दल वाटू दे. मग बघ सगळं कसं भलं होतंय ते’

‘मी आता बदलणारच. माझ्या बोलण्यातनं, वागण्यातनं चुकीचा संदेश जात असेल तर ते बरोबर नाही. मी बदलेन. आपण आता पुर्वीसारखं टचमध्ये राहू. म्हणजे मी लवकर बदलेन’

‘सॉरी... ती वेळ आता निघून गेलीय. तुला देण्यासाठी माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही. मी देखील फार बिझी झालोय तुझ्यासारखाच. मला देखील माझे क्लाएंट्स आहेत, आणि तू माझी क्लाएंट नाही आहेस, मागेच बोललोय मी तुला. पण मी तुझ्यासारखी माणुसकी सोडली नाही. तुझ्याबद्दल माझ्या मनात आजही तेवढेच प्रेम आहे जेवढे आधी होते. म्हणून तर मी एवढा अपमान सहन करून आज तुला भेटायला आलो आहे, तुझ्या आयुष्यातली आजची तारीख चुकू नये म्हणून. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. याचा अर्थ मी तुला सोडून चाललोय असा घेऊ नकोस प्लीज. मी कितीही निष्ठूर झालो असलो तरी मला तुझ्या भल्याची चिंता आहेच. जाण्यापूर्वी मला तुला एक हिलिंग टच द्यायचा आहे. तुझा उजवा हात पुढे कर...’

तिनं तिचा उजवा हात पुढे केला. त्यानं तो सोफ्यावर पालथा ठेवायला सांगितला. त्याच्या उजव्या हाताचे इंडेक्स फिंगर तिच्या इंडेक्स फिंगरच्या टोकावर ठेवले आणि डोळे झाकून घेतले. कांही क्षण तिच्या सोनेरी भविष्याचं व्हिज्युअलायझेशन केलं... समंजस शिवानी, तिनं सरळ मार्गाने मिळवलेला प्रचंड पैसा, संपत्ती, बंगला, गाड्या, समंजस नवरा, एक मुलगी आणि एक मुलगा.... तिचं एक छोटंसं सुखी आणि संपन्न कुटुंब. ती सर्वांशी मायेनं वागतेय... लोकांशी मायेनं वागतेय. पुढे ती स्पिरिचुअल झालीय... मदर तेरेसा सारखी..  मग त्यानं ते सगळं स्वप्न तिच्या शरीरात सोडून दिलं आणि डोळे उघडले.

‘हे काय केलं तुम्ही?’ तिनं कुतूहलानं विचारलं.
‘हे मी तुझं प्रोग्रामिंग केलं. तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. हा टच मी कुणाला देत नाही. अगदी लाखच काय दहा लाख रुपये दिले तरी माझा हा हीलिंग टच कुणाला मिळणार नाही. बट यू आर स्टील अ व्हेरी स्पेशल पर्सन फॉर मी. या हीलिंग टचचे इफेक्ट्स तुला लवकरच जाणवायला लागतील. शहाण्यासारखी वागशील तू इथून पुढे... चल, आता निघतो मी...’
‘मामा मी तुम्हाला सोडायला येते, चौकापर्यंत’
‘अगं पण किती वाजले?’ असं म्हणत त्याने घड्याळात बघितले. आठ वाजून गेले होते. तो मिश्किलपणे म्हणाला, ‘तुला जायचं होत ना मिटींगला 7 वाजता?’
‘जाते थोड्या वेळाने’
‘कसली जातेस? मी फेस रीडर देखील आहे हे विसरलीस वाटत?’
ते दोघे बोलत बोलत चौकापर्यंत आले. तिथंही बराच वेळ बोलत उभे राहिले. त्यानं विचारलं, ‘तुझ्या वाढदिवसाला आपण लॉटरीची तिकीटं काढली होती चार, एक प्रयोग म्हणून. लागली का?’
‘नाही मामा, पण निकालाच्या दिवशी मला खूप मोठं काम मिळालं आणि पैसेही मिळाले’
‘म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झाला म्हणायचा. पण एक लक्षात ठेव, या लॉटरी वगैरे गोष्टी आपल्याला फारशा लाभदायक नसतात. त्यापेक्षा आपण आपल्या बौद्धिक कष्टाने भरपूर पैसे मिळवू शकतो. आपण ‘स्मार्ट हार्ड वर्कर्स’ आहोत हे नेहमी लक्षात ठेव’

मग ती म्हणाली, ‘मामा आय एम रिअली सॉरी. इथं मला कोणी नाही आहे तुमच्याशिवाय. इथंच नाही तर कुठंच मला कोणी नाही माझी काळजी घेणारं. तुम्ही म्हणाला होता, मला मधेच सोडून जाणार नाही म्हणून... प्लीज माझी साथ सोडू नका...’
‘मी कुठं तुझी साथ सोडलीय? मी मनानं आहेच तुझ्याबरोबर. मी जे काय बोललोय त्यावर चिंतन कर. आजपर्यंत जे सांगितलंय ते अमलात आण. आता मला तुझ्यापासनं दूर जायलाच पाहिजे. प्लीज मला जाऊ दे. तुझ्या लग्नाला वगैरे बोलावलेस तर कदाचित येईन मी. टेक केअर, गुड बाय....’ असे म्हणत झप झप पावले टाकत तो निघून गेला.


(शिवानीची कथा इथेच थांबवत आहे –महावीर सांगलीकर)

या कथेचे आधीचे भाग: 
शिवानी द ग्रेट
शिवानी द ग्रेट: भाग 2
शिवानी आणि मोटीव्हेटर
मिशन शिवानी

हेही वाचा:  
पत्रमैत्रीण 
अंजलीना ब्यांडची कथा 
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा