Advt.

Advt.

Tuesday, July 7, 2015

शिवानीचं लग्न: भाग 1

शिवानी द ग्रेट या कथेचा 8वा भाग

शिवानीच्या वयाचं हे 28वं वर्ष चालू होतं. खरं तर या काळात हे फार जास्त वय नव्हतं. पण आतापर्यंत तिच्या बहुतेक सगळ्या समवयस्क मैत्रीणींची लग्नं होऊन गेली होती. तिचा मोटीव्हेटर मामा कधी कधी तिच्याकडे तिच्या लग्नाचा विषय काढत असे. हा विषय काढला की बहुतेक वेळा शिवानी जाम भडकत असे. तिला हा विषय फारसा आवडत नसे.

पण कधीतरी ती स्वत:हून या विषयावर बोलत असे. तिच्यासाठी कशा प्रकारचा जोडीदार पाहिजे हे ती मनमोकळेपणाने सांगत असे. जोडीदाराविषयी तिच्या अपेक्षा आणि कल्पना भन्नाट होत्या. ब-याच मुलींच्या या बाबतीतल्या कल्पना अवास्तवच असतात. शिवानी हुशार आणि विचारी असली तरी तीही या गोष्टीला अपवाद नव्हती.

खूप श्रीमंत, उंच, तगडा, हॅण्डसम, बंगले-गाडीवाला, आई-वडिलांपासून वेगळा रहाणारा, पुण्या-मुंबईचाच, तिला तिचे काम स्वतंत्रपणे करून देणारा, तिला टाईम आणि स्पेस देणारा या जोडीदाराविषयी शिवानीच्या बेसिक अपेक्षा. शिवाय ट्रेडीशनल पद्दतीने मुलगा शोधण्यास तिचा विरोध. तो मुलगा सिनेमातल्या किंवा कथेतल्याप्रमाणे अनपेक्षितपणे आयुष्यात यावा, त्याच्याशी प्रेम जमावं आणि मग लग्न व्हावं यावर ती ठाम होती.

कोणत्याही बाबतीत कसलीही तडजोड करण्याची करण्याची तिची अजिबात तयारी नव्हती.

‘शिवानी’, एकदा मामा तिला म्हणाला, ‘तुझ्या अपेक्षांमध्ये गैर कांही नाही. माणसाच्या अपेक्षा प्रत्येक बाबतीत मोठ्याच पाहिजेत. उलट छोट्या अपेक्षा ठेवणे ही चुकीची गोष्ट आहे. पण तू ज्या अपेक्षा ठेवतेस, जी स्वप्ने रंगवतेस, ती प्रत्यक्षात येण्याची कितपत शक्यता आहे? मी असं नाही म्हणत की तू घाईघाईत मिळेल त्या मुलाशी लग्न करावेस. तसं तर अजिबात करू नकोस. तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगाच तुला मिळावा ही माझीही इच्छा आहे. पण....’
‘पण काय?’ शिवानीने तिचे डोळे मोठे करत, भुवया ताणत विचारलं.
‘म्हणजे मी जरा स्पष्टच बोलतो... राग मानू नकोस... मला सांग, तुला ज्या प्रकारचा मुलगा पाहिजे आहे, तसा एखादा मुलगा स्वत:हून तुझ्याकडे चालत येईल हे कसं शक्य आहे? आणि समजा आला तरी त्यानं तुला बायको म्हणून पसंत का करावे?’

तिनं मामाकडे रागानं पाहिलं.

‘नीट विचार कर. सांग,  तुझ्यात असं काय आहे की तुला कुणी आयुष्याचा जोडीदार म्हणून पसंत करावं? म्हणजे तू खूप सुंदर आहेस, आकर्षक आहेस, हुशार आहेस हे ठीक आहे. पण केवळ तेवढ्यासाठी कुणी एखाद्या मुलीला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडत नसतं. तुला ज्या प्रकारचा मुलगा पाहिजे आहे, तशा मुलांचा माइंड सेट वेगळा असतो. त्यांचं विश्व वेगळे असतं. ही मुले फॅमिली ओरिएंटेड असतात. त्यांना नुसती बायको नव्हे तर आपल्या आई-वडिलांसाठी एक सून पाहिजे असते. आपल्या इथे दोन व्यक्तिंच्यामध्ये लग्न होत नसतं शिवानी! ते दोन कुटुंबांच्यामध्ये होत असतं! आणि काय गं, समजा असा एखादा मुलगा तुझ्याकडे चालूनही येईल, पण त्यासाठी तुझं अस्तित्व त्याला कळायला तर हवं... तुझी तर एखाद्या मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवायचीही तयारी नाही आणि एखाद्या वधूवर मेळाव्यात भाग घ्यायलाही तू नको म्हणतेस, मग लोकांना कसं कळणार तू लग्नाची आहेस म्हणून?’

‘पण मामा, तिथं तर सगळा गाळ असतो... ज्यांची लग्नं होत नाहीत ते तिथं नाव नोंदवतात’
‘हा तुझा मोठा गैरसमज आहे शिवानी. पूर्वी पटकन लग्नं होत, कारण फारशा अपेक्षा नसत. पण आता काळ बदलला आहे. मुलांच्या आणि मुलींच्याही अपेक्षा खूप वाढल्या आहेत. वधूवर मेळाव्यात, मॅरेज ब्युरोमध्ये, इंटरनेटवरील मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर अनेक मुलामुलींनी नावे नोंदवलेली असतात, त्यामुळे तिथं भरपूर चोईस असतो. आताच्या काळात आपल्या इथे उच्च शिक्षितांची बहुतेक लग्नं याच पद्धतीनं होत असतात....’
‘बरोबर’
‘ट्रेडीशनल पध्दतीनं मुलगा पहायला तुझा विरोध असण्याचं खरं कारण वेगळंच असावं.. फिअर ऑफ रिजेक्शन... नकार मिळेल अशी भीती तुला वाटत असावी... उघडपणे किंवा तुझ्या सुप्त मनात... आणि नकार म्हणजे अपमान असं तुला वाटतं’   
यावर शिवानीने ‘हो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे’ असं म्हणत मान हलवली.
‘खरं म्हणजे कोणी तुला नाकारलं तर त्यात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. तू देखील अनेकांना नाकारणारच आहेस... तुला पसंत पडेल असा मुलगा मिळेपर्यंत. नकार देण्याचा अधिकार जसा तुला आहे तसा तुला पहायला येणा-या मुलांनाही आहे.
‘होय’
‘मग नोंदवायचं का तुझे नाव?’
‘मामा, खरं सांगू?’
‘काय?’
‘आता माझ्या लग्नाच्या बाबतीत मी इनडिफरन्ट झाले आहे. माझं लग्न झालं काय आणि न झालं काय, मला कांहीच फरक पडत नाही. मला आता इच्छाच उरली नाही लग्नाची’
‘शिवानी! हा तुझा आणखीन एक ब्लॉक! तुझ्या इच्छा पूर्ण होण्यात तुझं मन एक मोठा अडसर ठरलं आहे. तू कधी कधी खूप निगेटिव्ह बोलत असतेस. तू तुझ्या मनात अनेक ब्लॉक्स उभे करून ठेवले आहेत. त्यामुळं तुला तुझं चांगलं भविष्य दिसतच नाही. कसले गं तुझे विचार? असे विचार करत असशील तर खरंच तुझं लग्न होणार नाही’
‘काय फरक पडतो नाही झालं तर?’ ती म्हणाली.

त्यानं कपाळाला हात लावला. मग म्हणाला, ‘शिवानी, तुझं लग्न होणार आहे. लवकरच. तुला पाहिजे तशा मुलाशी. पण आधी तुझ्या मनातले उरले सुरले सगळे निगेटिव्ह विचार काढून टाक. तुला तुझ्या मनातले ब्लॉक्स काढून टाकायलाच पाहिजेत’
‘ते कसे काढणार?’
त्यानं क्षणभर विचार केला. मग म्हणाला, “आजवर मी तुझ्या डोक्यावर अनेकदा माझा हात ठेवला. आहे. तुझ्या मनात पॉझीटीव्ह विचार सोडले आहेत. अनेक बाबतीत तू आता पूर्वीपेक्षा खूपच पॉझीटीव्ह झाली आहेस. पण तू तुझ्या लग्नाच्या बाबतीत अजूनही पॉझीटीव्ह झालेली नाहीस. त्यामुळं आज मला एक विशेष प्रयोग करून तुला पूर्ण पॉझीटीव्ह बनवावं लागेल’
‘कसला प्रयोग?’
‘आज मी तुझ्या मनातले सगळे उरले सुरले निगेटिव्ह विचार काढून घेणार आहे. तुझ्याच तोंडून पॉझिटिव्ह विचार वदवून घेणार आहे’
‘ते कसं?’ तिनं विचारलं.
‘मला तसं करता येतं’

ती कांही बोलली नाही.

कांही सेकंदाने तो म्हणाला, ‘एक काम कर... डोळे झाकून घे. मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाहीत आणि मी जे सांगतो ते मनात साठवून ठेवायचं’

शिवानीने तिचे डोळे झाकून घेतले. त्यानं तिच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला. मग बोलायला सुरवात केली...
‘शिवानी, मी काय म्हणतो ते नीट लक्ष देऊन ऐक. मी जे विचारेन त्याची खरी खरी उत्तरे दे. मनात दुसरे कसले विचार येऊ देऊ नकोस’
‘हो, देईन’
‘रेडी?’
‘रेडी’
‘शिवानी, तुला वाटतंय ना, तुझं लग्न लवकर व्हावं असं?’
‘हो’
‘कधीपर्यंत व्हायला पाहिजे असं वाटतंय?’
‘एक वर्षाच्या आत’
‘ठीक आहे, होईल. आता मला सांग, तुला नवरा कसा पाहिजे?’
‘चारचौघात उठून दिसणारा, मला शोभणारा, वेल सेटल्ड, समंजस’
‘चल, मिळाला असं समज. आता सांग, तशा मुलाला तू कशी शोधणार?’
‘मी तर शोधेनच, पण तुम्ही शोधाल. माझे आई-वडील, नातेवाईक शोधतील.. तुमच्या पद्धतीने’
‘ठीक आहे. आम्ही शोधू. आमच्या पद्धतीने’
‘चालेल’
‘याचा अर्थ तू आम्ही सांगू त्याच मुलाशी तू लग्न करायचे आहे असा नाही’
‘अर्थातच. मला आवडलेल्या मुलाशीच मी लग्न करेन’
‘आता मी तुला महत्वाचा प्रश्न विचारतो.... आपण श्रीमंतांच्याबद्दल, पैशांच्याबद्दल निगेटिव्ह दृष्टीकोन ठेवला तर काय होते?’
‘आपल्याकडे येणारा पैशांचा प्रवाह थांबतो’
‘मग एखाद्या मुलीने पुरुषांच्याबद्दल निगेटिव्ह दृष्टीकोन ठेवला तर काय होईल?’
‘तिचे लग्न होणार नाही...’
‘मग तू काय करायला हवं?’
‘सरसकट सगळेच पुरुष वाईट नसतात हे मला पटलं आहे. त्यामुळं इथून पुढे मी पुरुषांच्याबद्दल पॉझिटिव्ह दृष्टीकोन ठेवेन. मी त्यांचा द्वेष करणार नाही’
‘गुड गर्ल…..’
‘Thank You’
‘आणि तुझ्या ड्रेस कोडचं काय?’
‘मी माझा ड्रेस कोड बदलेन. लोकांना खटकतील असे कपडे मी इथून पुढे घालणार नाही’
‘गुड गर्ल….. आणि सोशल मेडिया?’
‘इथून पुढे मी फेसबुक आणि इतर ठिकाणी लोकांना खटकेल असे स्टेटस टाकणार नाही, उगीचच कॉमेंट्स देत बसणार नाही, इतरांच्या चुकीच्या स्टेटसला लाईक करणार नाही...’
‘आणि?’
‘चुकीच्या मित्रांना अनफ्रेंड करून टाकेन’
‘आईशी भांडणं... त्याचं काय?’
‘मी आईशी भांडणं कमी केलं आहे. इथून पुढं मी तिच्याशी अजिबात भांडणार नाही’
‘दुसरं कुणी तुझ्याशी भांडलं तर?’
‘मी स्वत:हून कुणाशी भांडणार नाही. पण कुणी माझ्याशी भांडण केले तरीही मी उलट त्याच्याशी भांडणार नाही. मी विचार करेन... या व्यक्तिचा आपल्याला फायदा होतो की तोटा? फायदा होत असेल तर या व्यक्तिला मी सांभाळून घेईन. तोटा होत असेल तर न भांडता त्या व्यक्तिशी हळूहळू संबध कमी करेन’
‘बरोबर... पण फायदा आणि थोडा तोटा दोन्ही होत असेल तर?’

ती कांही सेकंद थांबली आणि म्हणाली, ‘अशा व्यक्तीच्या बाबतीत आपण भांडणाला निमित्त होणार नाही याची मी काळजी घेईन. त्या व्यक्तीचा स्वत:च्या भल्यासाठी फायदा करून घेईन. त्याच्याशी संवाद बंद करणार नाही’
’छान... आता आणखी एक महत्वाची गोष्ट..
‘काय?’
‘कधी कधी तू निराश होतेस.. तुला डिप्रेशन येतं’
‘मला डिप्रेशन आलं तरी मी स्वत:चं नुकसान करून घेणार नाही. No More Self Destruction. मी स्वत:ला शापित मुलगी मानणार नाही. खरं म्हणजे माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नाही असं मला आता वाटू लागलं आहे’
‘छान.... तू तुझे विचार असेच ठेवलेस तर तुझं लग्न लवकरच होईल... तुला पाहिजे तशा मुलाशी. तू रोज असा विचार करत जा की तुला पाहिजे तसा मुलगा लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे, त्याच्याशी तुझं लग्न होणार आहे आणि तू एक आदर्श कौटुंबिक जीवन जगणार आहेस’
‘हो, करेन’
‘आता मी न्यूमरॉलॉजीकडे वळतो. तू अशीच पॉझिटीव्ह राहिलीस, तर या वर्षाच्या डिसेंबरपासून पुढच्या वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत कधीही तुझं लग्न होऊन जाईल’
‘खरंच?’
‘हो खरंच. ....पण...’
‘पण काय ते मला माहीत आहे. माझे अंक माझ्या जीवनात अडथळे आणणारे आहेत. संबधात ताणतणाव निर्माण करणारे आहेत. म्हणून मला माझ्या जोडीदाराशी फार जपून वागायला हवं. मी स्वतंत्र वृत्तीची असले तरी मी त्याला भरपूर वेळ देईन. त्याच्यावर खूप प्रेम करेन. त्याला कधी दुखावणार नाही. कुटुंब आणि करीअर, दोन्ही गोष्टी मी सांभाळीन. करीअर करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही’
’मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचं होतं..... उघड डोळे आता’ त्यानं तिच्या डोक्यावरचा हात काढत म्हंटलं.

तिनं हळुहळू तिचे डोळे उघडले.

‘आता काउंट डाऊन सुरू... जास्तीत जास्त सप्टेंबर 2016.. लिहून ठेव तुझ्या डायरीत’

या कथेचे या आधीचे भाग:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा