Advt.

Advt.

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

मिशन असोका गार्डन

 -महावीर सांगलीकर



 डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव या कथेचा पुढचा भाग

हणमंत राव आणि बी. भीषन्ना असोका गार्डनवरून सिटी बस पकडून हॉटेल लंकावर आले. तेवढ्यात हणमंत रावास रामप्रसादचा फोन आला. रामप्रसाद आणि लखनप्रसाद तासाभरात चेन्नई-कोलंबो फ्लाईटने निघणार होते. हनमंत रावाने लगेच हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून त्यांच्यासाठी शेजारचा सूट बुक करायला सांगितला.

हणमंत रावाने टीपॉय वरचा रिमोट कंट्रोल हातात घेतला आणि टी.व्ही. चालू केला. एका चॅनेलवर हिंदी बातम्या चालू होत्या. कांही विशेष बातमी दिसली नाही म्हणून त्याने एक स्पोर्ट्स चॅनेल लावले, तर तिथे इंडिया-श्रीलंका यांच्यामधली जुनी क्रिकेट मॅच चालू होती. त्याला क्रिकेट अजिबात आवडत नसे, म्हणून त्याने ते चॅनेल लगेच बदलले. पुढच्या  चॅनेलवर सी.आय.डी. या हिंदी मालिकेचा सिंहलीमध्ये डब केलेला भाग लागला होता. त्यातली ए.सी.पी. प्रद्युम्न, दया, अभिजीत वगैरे पात्रे सिंहलीत बोलताना बघून हणमंत रावास मजा वाटली. पण त्याने तेही चॅनेल बदलले. आणखी एका चॅनेलवर क्राईम न्यूज लागल्या होत्या. श्रीलंकेत किडनॅपिंग केसेस फारच वाढल्या होत्या आणि सरकारने या गोष्टीला आळाला घालावा अशी मागणी रावन्ना-2 या प्रतिष्ठिताने केली आहे अशी ती बातमी होती. त्यानंतर रावन्ना-2ची 4-5 मिनिटांची मुलाखतही झाली. त्यात तो म्हणाला, श्रीलंकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर झाला आहे. ही मुलाखत बघून हणमंत राव आणि बी. भीषन्ना हसू लागले.

हनमंत रावाने परत चॅनेल बदलले, तर तेथे रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेचा सिंहलीत डब केलेला एक एपिसोड लागला होता. त्यात मारुती सीतेला अशोकवनात जावून भेटतो ही कथा होती.

सुमारे दोन तासाने रामप्रसाद आणि लखनप्रसाद आले. हनमंत रावाने त्यांची ओळख बी. भीषन्नाशी करून दिली. रामप्रसादने नेहमीच्या स्टाईलीत विचारले,

‘यह भीषन्ना तो मेरी समज में आया, लेकिन यह ‘बी’ क्या है?’
‘बी का मतलब भाई,’ बी. भीषन्ना म्हणाला, ‘मैं रावन्ना-2 का ‘भाई’ हूं ना, इसलिये मेरे नाम के आगे मैं बी लगाता हूं’

बी. भीषन्ना हा रावन्ना-2 चा भाऊ आहे हे ऐकून रामप्रसादला आश्चर्य वाटले, त्यामुळे लखनप्रसादलाही आश्चर्य वाटले. रामप्रसाद म्हणाला, ‘मेरी तो कुछ समज में नहीं आ रहा है. रावन्ना-2 ने मेरी बीबी को किडनॅप किया, आप रावन्ना के भाई हैं, हणमंत राव इस केस की छान बीन कर रहे हैं, तो आप हनमंत राव के साथ कैसे?’

हणमंत रावाने बी. भीषन्ना त्याचा एजंट असल्याचे व तो प्रोफेशनल असल्याने केसच्या बाबतीत नातीगोती वगैरे कांही मानत नसल्याचे सांगितले.

रामप्रसाद बी. भीषन्नाला म्हणाला, ‘आप इतने प्रोफेशनल है कि आपकी बहन का अपमान करने वालों की भी मदद करते हैं?’

‘मेरी बहन? कौन मेरी बहन?’  बी. भीषन्ना म्हणाला, ‘मेरी कोई बहन नहीं है’

‘रावन्ना आपका भाई है, तो उसकी बहन आपकी भी बहन हो गयी ना? शार्प नक्खानी...’

‘अरे, वह काय की उसकी बहन... वह रावन्ना की फेसबुक फ्रेंड है. उसने रावन्ना को भैय्या क्या बोल दिया, तो रावन्ना ने उसे सचमुच की मुंहबोली बहन बना दिया... ’

‘अच्छा, ऐसी बात है... ठीक है. और एक बात पुछना चाहता हूं. हमारे इंडिया में एक डेंजर आदमी है, वह हमेशा तरह तरह की जानकारी मंगवाता रहता है, कभी कभार आंदोलन भी करता है. उसका नाम भी आण्णा है. वह भी आपका भाई है क्या? या रिश्तेदार?’

‘नहीं... मैं ने सुना है उनके बारे में. लेकिन उनका मुझसे कोई रिश्ता नही है’, बी. भीषन्ना म्हणाला.  

त्याच्या या स्पष्टीकरणामुळे रामप्रसादचे समाधान झाले.

मग रामप्रसाद आणि लखन प्रसाद त्या हॉटेल मधल्या दुस-या सूटमध्ये मुक्कामाला गेले, तर हनमंत राव आणि बी. भीषन्ना यांनी हनमंत रावाच्या सूटमध्ये मुक्काम केला.

दुस-या दिवशी सकाळी नाश्ता करून सगळेजण बसने असोका गार्डनला पोहोचले. बी. भीषन्नाने त्या तिघांना गार्डनमध्ये सोडले आणि तो निघून गेला. तेवढ्यात समोरून रावन्ना-2 आला. हणमंत रावाने त्या दोघा बंधूंना तो माणूस म्हणजे रावन्ना-2 असल्याचे सांगितले. रावन्ना-2ला बघून लखनप्रसादचा राग अनावर झाला. तो रावन्ना-2 च्या अंगावर धाऊन गेला. रावन्ना-2ने लखनप्रसादला एकच ठोसा लगावला. लखनप्रसाद बेशुद्ध पडला. रावन्ना गार्डन बाहेर निघून गेला.

लखनप्रसादला असे सारखे बेशुद्ध पडायची सवय होती. त्याला जागे करण्यासाठी एक विशिष्ट आयुर्वेदिक औषध लागत असे. रामप्रसादने त्या औषधाचे नाव चिठीवर लिहून ती चिट्ठी हणमंत रावाकडे दिली आणि मेडिकल स्टोअर्समधून ते औषध आणायला सांगितले. औषध फ्रीज मधलेच आणायला सांगितले.

हणमंत राव मेडिकल दुकान शोधायला गेला पण जवळपास ते कुठे नव्हतेच. बरीच शोधाशोध केल्यावर एक दुकान सापडले, पण ते बंद होते. रस्त्यावरही शुकशुकाट होता. हनुमंत रावाने सरळ त्या दुकानाचे कुलूप हाताने ओढले, ते निघाले. मग त्याने ते शटर वर ढकलले. तो दुकानाच्या  आत गेला. रामप्रसादने दिलेली चिट्ठी काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला तर तो आरपार गेला. कोणीतरी खिसा मारला होता. आता काय करायचे याचा हनुमंत रावाने लगेच निर्णय घेतला. ते औषध फ्रीजमध्ये असते हे त्याच्या लक्षात होते.  तिथं एक मध्यम आकाराचा फ्रीझ होता. त्याने तो फ्रीज सरळ दुकानाबाहेर काढला, दुकानाचे शटर लावले, फ्रीझ खांद्यावर टाकला, आणि तो धावतच असोका गार्डनकडे निघाला. तेथे पोहोचला तर लखन प्रसाद रामप्रसादशी गप्पा मारत उभा होता.

हनमंत रावाचे एवढे सगळे श्रम वायाच गेले.

त्या तिघांनी आता तिथनं निघायचे ठरवले.

असोका गार्डनच्या बाहेर आल्यावर हनमंत रावाने बी. भीषन्नाला फोन लावला. त्याला काय काय झाले याची कल्पना दिली. मग हे तिघेजण हॉटेलवर परत आले. थोड्या वेळात बी. भीषन्ना पण तिथं आला. चौघांनी बसून ‘प्लॅन बी’ वर विचार केला, आणि दुस-या दिवशी पुन्हा असोका गार्डनवर जाऊन सीतेची सुटका करायचे ठरवले. रामप्रसादने लखनप्रसादला सख्त ताकीत दिली, ‘मुझे पुछे बगैर कुछ गडबड मत करना’. 

***

दुस-या दिवशी ते तिघे बी. भीषन्नासह असोका गार्डनला आले. त्यांनी गार्डनमध्ये प्रवेश केला. तेवढ्यात गेटवर पोलिसांची एक गाडी आली. तिच्यातून दहा बारा पोलीस उतरले  आणि आत  आले. या चौघांना कळेना की पोलीस का आले? रावन्नाने आपल्या विरोधात तक्रार-बिक्रार केली की काय?

पण त्या पोलिसांनी या लोकांच्याकडे बघितले देखील नाही. ते सरळ समोरच्या महालाकडे गेले. एवढ्यात गेटवर पोलिसांची आणखी एक गाडी आली. त्यातून दहा-बारा लेडीज पोलीस बाहेर आल्या. त्यांच्यासोबत गळ्यात स्टेथॅस्कोप आणि हातात फर्स्ट एड बॉक्स असणारी एक डॉक्टरही होती.

त्या चौघांना पुन्हा एकदा कांही कळेना.

एवढ्यात त्या सगळ्याजणी गेटमधून आत आल्या. लगबगीने महालाकडे गेल्या.

रामप्रसादला टेन्शन आले. इतक्यात सायरन वाजवत एक जीप गेटवर येऊन थांबली. त्यातून एक तरूण महिला पोलीस ऑफिसर बाहेर पडली आणि गेटमधनं आत आली. तिच्या पाठोपाठ आलेल्या दुस-या तरुणीला पाहून रामप्रसादला धक्का बसला. ती सीता होती. कांहीच न कळण्याची ही त्या चौघांची तिसरी वेळ होती.

रामप्रसाद धावतच सीतेकडे गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. सीता त्याला प्रेमाने म्हणाली, ‘अरे पागल, रो क्यों रहे हो? मैं ठीक हूं. आय एम सेफ.... रो मत मेरे राजा...’

मग तिने त्याच्या डोळ्यातले पाणी आपल्या नाजूक बोटांनी पुसले.

सीतेने त्या महिला पोलीस ऑफिसरची रामप्रसादशी ओळख करून दिली. ती असिस्टंट सुपरीटेन्डेन्ट ऑफ पोलीस विजया जयसिंहा होती. एएसपी विजया.   

‘चला आपण सगळे त्या महालाकडे जाऊ’ एएसपी विजया म्हणाली.

रामप्रसादने सीतेला विचारलं, ‘बात क्या है? इतनी पुलिस क्यों आई है?  तुम पुलिस के साथ क्या कर रही हो?’

‘जान जाओगे...चलो उधर’ असे म्हणत सीता महालाच्या दिशेने चालू लागली. रामप्रसाद, लखनप्रसाद, हनुमंत राव आणि बी. भीषन्ना सीतेच्या मागोमाग चालू लागले.

तिकडे महालामध्ये पोलिसांची सर्च मोहीम चालू होती. त्यांना महालातल्या वेगवेगळ्या भागात अनेक मुली सापडल्या. त्या रावन्ना-2 याने जगातील वेगवेगळ्या देशांमधून किडनॅप करून आणलेल्या होत्या. पोलिसांनी आपली सुटका केली याचा त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्याकडून नंतर कळले की त्या सगळ्या मुलींमध्ये एक कॉमन गोष्ट होती, ती म्हणजे त्यांच्या नव-याने अथवा भावाने रावन्ना-2 ची बहिण शार्प नक्खानी हिची छेड काढली होती किंवा तिचा अपमान केला होता. रावन्ना-2ने हे केवळ ‘बदले की भावना से’ केलं होतं. पण त्याने या मुलींना कसलाही त्रास दिला नव्हता, किंबहुना तो एकाही मुलीला नंतर भेटलाही नव्हता. पण त्याने सर्वांची उत्तम बडदास्त ठेवण्याची व्यवस्था केली होती.

रावन्ना-2 अधनं-मधनं असोका गार्डनमध्ये यायचा ते केवळ आराम करायला किंवा फिरायला.

एएसपी विजया जयसिंहा त्या सगळ्या पोलिसांची बॉस होती. तरुण, तडफदार, करारी. तिच्या हाती आलेल्या केसमधनं कोणी सुटला असं कधी होत नसे. तिचा दरारा एवढा होता की श्रीलंकेतले मोठमोठे गुंड, माफिया तिला घाबरायचे, इतकेच नाही तर पोलीस देखील घाबरायचे.

तिला बघताच सगळे पोलीस अटेन्शनमध्ये उभे राहिले. तिने परिस्थितीची माहिती घेतली. मग ती सीतेला म्हणाली, ‘कहां है रावन्ना?’

सीतेने कॉन्फरन्स रूमकडे बोट दाखवले. रूमला बाहेरून कुलूप होते. एएसपी विजयाने रूमच्या दरवाजाकडे बोट दाखवत एका इन्स्पेक्टरला सिंहली भाषेत ए.सी.पी. प्रद्युम्न स्टाईलमध्ये हुकूम केला, ‘ऑफिसर, दरवाजा तोड दो’. तेवढ्यात सीतेने तिच्याकडे त्या कुलुपाची चावी असल्याचे सांगितले, आणि ती एएसपी विजयाकडे दिली.

एएसपी विजयाने कुलूप उघडून कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश केला. तिच्या मागोमाग सीता, रामप्रसाद, डॉक्टर  आणि निवडक पोलीस आत गेले. आत एका खुर्चीवर रावन्ना-2 ‘बिचारा’ होऊन  बसला होता. त्याचे हातपाय खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते. त्याचे तोंड चिकटपट्टी लावून सील करण्यात आले होते. एएसपी विजयाने पोलीसांना खूण केली. लगेच दोन पोलिसांनी रावन्ना-2 चे हातपाय सोडवले, त्याच्या तोंडावरची चिकटपट्टी काढून टाकली. 

रावन्ना-2ला धाप लागली होती. त्याला बोलताही येत नव्हते. त्याने खुणेनेच पाणी प्यायला मागितले. लगेच एका पोलिसाने आपल्याकडची मिनरल वाटरची बाटली त्याला दिली.

डॉक्टर बाईंनी रावन्ना-2ची तपासणी केली. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वगैरे. ‘एव्हरी थिंग इज नॉर्मल अॅन्ड
ओके. बट ही इज सफरींग फ्रॉम मेंटल शॉक’ तिने एएसपी विजयाला सांगितले.

रावन्ना-2ला अटक करण्यात आली. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस एका गाडीतून त्याला घेवून कोलंबो पोलीसच्या हेड क्वार्टरकडे गेले. असोका गार्डन सील करण्यात आले. बाकीचे पोलीस दुस-या गाडीतून निघून गेले. एएसपी विजयाच्या जीपमधून सीता, रामप्रसाद आणि बाकीची मंडळी पोलीस हेड क्वार्टरला आले. तिथं त्या सगळ्यांचा जवाब घेण्यात आला. त्यात बराच वेळ गेला.

रात्री उशीरा ते सगळेजण हॉटेल लंकावर आले. आल्याआल्या हणमंत रावाने टी.व्ही.चालू केला आणि न्यूज चॅनेल बघायला सुरवात केली. सगळीकडे रावन्ना-2च्या अटकेची बातमी होती. सगळेजण बातम्या बघू लागले. रावन्नाने किडनॅप केलेल्या कांही मुलींच्या मुलाखतीही दाखवण्यात आल्या. अर्थात त्यांची नावे सांगण्यात आली नाहीत आणि चेहरेही दाखवण्यात आले नाहीत. पण सगळ्याच न्यूज चॅनेलवर सीतेचा गौरव होत होता. तिच्यामुळेच रावन्ना-2चा पर्दाफाश झाला असे खुद्द पोलीस कमिशनरने सांगितले.

सीता लखनप्रसादकडे बघत म्हणाली, ‘मैंने कहा था ना, एक बिहारी सब पे भारी’
लखनप्रसाद म्हणाला, ‘ठीक ही कहा था.... कॉंन्ग्रॅट्स’
पण रामप्रसादला आपल्या बायकोचा हा पराक्रम आवडला नसावा असे त्याच्या चेह-या वरून दिसत होते.

सीतेचा श्रीलंकेतला प्रवेश आणि वास्तव्य  बेकायदेशीर होते, पण त्यात तिचा कांही दोष नव्हता. दुस-या दिवशी श्रीलंका सरकारच्या विदेश मंत्रालयाने आणि कोलंबोतील भारतीय दूतावासाने तिला भारतात पाठवण्यासाठी सगळ्या औपाचारिक बाबी पूर्ण करून तिच्याकडे आवश्यक त्या परवानग्या आणि कागदपत्रे दिली. तिचे कोलंबो-चेन्नई आणि चेन्नई-पुणे असे एअर इंडिया+ इंडियन एअर लाईन्सचे तिकीटही एम्बेसीने बुक करून दिले.  तिला श्रीलंका फिरायचे असेल तर त्यासाठीही श्रीलंका सरकारने परवानगी दिली, चक्क एक आठवड्यासाठी.

आता एवढे दूरवर आलोच आहोत तर सगळ्यांनी कोलंबो आणि आसपासचे टुरिस्ट पॉइंट्स बघून घ्यायचे ठरवले. बी. भीषन्ना आणि हनुमंत रावास तिथं बघण्यासारखं काय काय आहे हे माहीत होतंच. ते सगळेजण म्हणजे सीता, राम प्रसाद, लखन प्रसाद, हणमंत राव आणि बी. भीषन्ना दोन दिवस कोलंबो आणि पुढचे तीन दिवस इतर ठिकाणी फिरले.

मग श्रीलंका सोडण्याचा दिवस उजाडला. बी. भीषन्ना त्या चौघांना सोडायला कोलंबो एअरपोर्टवर आला. नेहमीप्रमाणे एअर इंडियाचे विमान लेट होते. भरपूर वेळ होता म्हणून सीतेने एअरपोर्टवर थोडे शॉपिंग करायचे ठरवले.

विमान चार तास उशीरा सुटणार होते. तोपर्यंत सीतेने दोन साड्या पसंत केल्या. मग चेंज रूममध्ये जाऊन त्यातली एक साडी तिने नेसली. शॉपच्या बाहेर आल्यावर शेजारच्या शॉपमध्ये तिला एक छान रेडिओ दिसला. तिला गाणी ऐकायला आवडायचे म्हणून तिने तो घ्यायचा ठरवले, पण लखन प्रसाद म्हणाला, ‘मत लेओ भाभी, वह चायना मेड है. उसपर सिर्फ चायना के रेडियो स्टेशन सुनाई देंगे’
‘फिर तो मैं जरूर लुंगी, मुझे चायनीज आती है, बहोत दिन से चायनीज गाने सुने नहीं मैंने’ असे म्हणत सीतेने तो रेडिओ खरेदी करायचे पक्के केले.

टेस्ट म्हणून तो रेडिओ चालू करून बघितला तर त्यावर वेगळ्याच भाषेतली स्टेशने लागत होती. दुकानदाराला ही कोणती भाषा आहे असे विचारल्यावर त्याने ‘सिंहली’ असे उत्तर दिले. सीतेला सिंहली येत नव्हते म्हणून तिने तो रेडिओ घ्यायचा बेत रद्द केला.

एवढ्यात एअर इंडियाच्या चेन्नईला जाणा-या विमानाच्या प्रवाशांसाठी विमानात जाऊन बसण्याची अनाउन्समेंट झाली.

मग बी. भीषन्नाचा निरोप घेऊन सगळेजण विमानात जाऊन बसले आणि थोड्याच वेळात विमानाने चेन्नईच्या  दिशेने उड्डाण केले.

पुढे चालू ....


या कथेचे आधीचे भाग:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा