Advt.

Advt.

शुक्रवार, १० जून, २०१६

बी माय व्हॅलेंटाईन

-महावीर सांगलीकर 

14 फेब्रुवारी 2010. तिनं यायचं नक्की कबूल केलं होतं. तो तिची वाट बघत एका कॉफी हाऊसमध्ये बसला होता. त्यानं तिच्यासाठी गुलाबी डच रोझ आणि एक ग्रीटिंग कार्ड आणलं होतं. बराच वेळ झाला, पण ती यायची कांही लक्षणं दिसेनात. मग त्यानं तिला फोन लावला. तिनं तो कट केला. त्याला वाटलं, ती जवळपास आली असावी, म्हणून तिनं तो कट केला असावा. एवढ्यात तिचा मेसेज आला, ‘Sorry, I can’t come. Bye’
त्याला तिचा राग आला. त्यानं तिला पुन्हा फोन लावला, तर तो स्वीच ऑफ लागत होता.

तो खट्टू झाला. आता इथं बसण्यात कांही अर्थ नाही हे ओळखून तो त्याच्या टेबलावरून उठणार एवढ्यात पलीकडच्या टेबलावर बसलेली मुलगी त्याच्याकडे आली आणि म्हणाली, ‘मे आय सीट हिअर?’
‘येस, व्हाय नॉट?’ असं म्हणत त्यानं तिला त्याच्या समोरच्या खुर्चीत बसण्याचा इशारा केला.
‘मघापासून बघतेय,’ ती तरुणी म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या मैत्रीणीची आतुरतेनं वाट बघत आहात. पण तिनं यायचं कॅन्सल केलय वाटतं. बरोबर?’
‘हो, पण हे तुम्ही कसं ओळखलंत?’
‘तुमच्या बॉडी लॅन्ग्वेजवरनं... पण ते जाऊ दे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय वाटत असेल ते मला कळतं. माझा सुद्धा सेम प्रॉब्लेम झालेला आहे’
‘म्हणजे?’
‘म्हणजे माझा बॉय फ्रेंड येणार होता आज मला भेटायला. पण तो आला नाही. एवढा महत्वाचा दिवस असून देखील आणि आधी ठरवून देखील. तो येणार नाही बहुतेक’
‘इफ यू डोन्ट माइंड.....’ त्यानं अर्धवट वाक्य उच्चारलं.
‘काय?’
त्यानं त्याच्यासमोर असलेलं डच रोझ उचललं आणि तिच्यासमोर धरत म्हणाला, ‘बी माय व्हॅलेंटाईन’
तिचा चेहर गंभीर झाला. ती म्हणाली, ‘आपण दोघं एकमेकांना अजून ओळखत नाही. पण ते महत्वाचं नाही. समजा तुमची गर्ल फ्रेंड अचानक आली तर?’
‘ती नाही येणार. पण समजा आली तरी मी तिच्याकडं बघणारसुद्धा नाही. मग तर झालं?’
‘पण समजा माझा बॉय फ्रेंड अचानक आला तर?’
‘मग तू ठरवायचं आहेस काय करायचं आहेत ते’ असं म्हणत त्यानं तिला कांही क्षण विचार करण्याची संधी दिली आणि मग ते फुल तिच्यापुढं धरलं.
‘घ्या मॅडम. आता व्हा माझ्या व्हॅलेंटाईन’  
तिनं लाजत लाजत ते फुल घेतलं आणि म्हणाली, ‘यू आर वेलकम’
मग तो आणि ती रोज भेटू लागले. प्रेमाच्या गोष्टी करू लागले. नुसतंच प्रेम करण्यात कांही अर्थ नाही हे कांही दिवसांनी त्यांच्या लक्षात आल्यावर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. दोघांनी आपापल्या घरी सांगितलं. दोघांच्याही घरच्यांनी आधी प्रचंड विरोध केला. पण हे दोघं ठाम राहिल्यानं घरच्यांना माघार घ्यावी लागली.
लग्न लागलं.

Marriage is the end of love असं कुणी म्हंटलं आहे की नाही मला माहीत नाही, पण लव्ह मॅरेज करणाऱ्या इतर अनेक जोडप्यांच्या बाबतीत होतं तसं यांचंही झालं. ती त्याच्यावर पहिल्यासारखंच प्रेम करत असली तरी त्याचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं. तो तिच्याकडं दुर्लक्ष करू लागला. सुरवातीला तो ऑफीस सुटल्यावर घरी लगेच यायचा, बऱ्याचदा ऑफीस सुटायच्या आधीच घरी पोहोचायचं, कधीकधी ऑफिसला दांड्या मारून दिवसभर तिला वेळ द्यायचा. पण आता उलटच झालं. तो घरी उशीरा यायला लागला. सुट्टीच्या दिवशीही त्याला ऑफीसचं काम निघू लागलं. तिच्या लक्षात आलं, हा बाहेर कुणात तरी गुंतलाय. याला नेहमी कुणाचा तरी फोन येतो, हा तो फोन कट करतो आणि लगबगीनं बाहेर पडतो आणि तासाभरानं परत येतो. हिनं त्याच्यावर वॉच ठेवला. तिला दिसलं की तो बाहेर जाऊन कुणाला तरी लगेच फोन लावत असतो आणि बोलत असतो. बॉडी लॅन्ग्वेजवरनं तिच्या लगेच लक्षात आलं की ते प्रेमाचं बोलणं असतं.

एकदा तो झोपला असताना रात्री उशीरा तिनं त्याचा स्मार्ट फोन चेक केला. त्याला ‘ऑफिस’ या नावानं सेव्ह केलेल्या नंबरवरनं अनेक मिस कॉल होते आणि त्यानं त्या नंबरला बरेच फोन लावले होते. ऑफिसला रात्रीच्या वेळी फोन आणि तास-तासभर बोलणं? तिनं तो नंबर नोट डाऊन करून घेतला.

दुसऱ्या दिवशी दुपारी तिनं तिच्या एका मैत्रिणीच्या मोबाईल फोनवरून त्या नंबरला फोन लावला.
‘हॅलो, हा देसाई साहेबांचा  नंबर आहे ना?”
“सॉरी, रॉंग नंबर” तिकडून एका तरुणीचा आवाज आला.
‘सॉरी... पण तुम्ही कोण बोलताय’
‘मी सोनल’
‘अगं सोनल तू?’
‘येस.... तुम्ही मला ओळखत? तुम्ही कोण?’
‘अगं मी तुझ्या बॉय फ्रेंडची बायको आहे.... नेहा’
क्षणभर पलिकडनं आवाज आला नाही.
ती म्हणाली, ‘हे बघ सोनल, तुझ्या बॉयफ्रेंडचं... सुहासचं  लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगाही आहे. उगीच त्याच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नकोस. तुला दुसरं कुणी मिळालं नाही का?’
‘सॉरी, सुहासनं मला सांगितलं होतं की तो अजून अनमॅरीड आहे. तुम्ही सांगितलंत ते बरं झालं’
तिकडून फोन कट झाला.
त्या दिवशी सुहासला सोनलचा  मिस कॉलच आला नाही.  त्यानं तिला फोन लावला तर तिनं तो  कट केला. सुहास सारखा फोन करू लागला म्हणून तिनं तो स्वीच ऑफ करून टाकला. नंतर त्याला तिचा मेसेज आला, ‘Never Call me again. You are a cheater. I know you are a married guy’
गेली उडत... असं म्हणत त्यानं दुसरी एक मैत्रीण शोधली.

आपला नवरा कांही सुधारणार नाही हे लक्षात आल्यावर नेहानं त्याला धडा शिकवायचा ठरवलं.
सुहास ऑफीसवरनं रात्री आठ वाजता घरी आला. बेल वाजवली. बराच वेळ दार उघडलं गेलं नाही, तेंव्हा त्यानं आपल्याकडच्या किल्लीनं दार उघडलं. नेहा  घरात नव्हती. ती यावेळी कुठं गेली असावी? त्यानं तिला फोन लावला. तो स्वीच ऑफ होता. तो थोडासा घाबरला.
त्यानं शेजारी-पाजारी चौकशी केली. कुणालाच ती कुठं गेली, कधी गेली माहीत नव्हतं.
त्याला रात्रभर झोप आली नाही.




दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं तिला परत फोन लावला तर तो स्वीच ऑफ होता. त्यानं पोलीस कम्प्लेंट करायची ठरवली. एका मित्राला घेऊन त्यानं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी जुजबी माहिती घेतली आणि दोन दिवस तिची वाट बघायला सांगितली. तो म्हणाला, ती अशी न सांगता कुठं  जात नाही. गंभीर मामला आहे. पण पोलिसांनी कांही दाद दिली नाही.
दोघं पोलीस स्टेशनाच्या बाहेर आले.
‘चल, आपण कमीशनर ऑफीसला जाऊ. तिथंच तक्रार करू’ मित्र म्हणाला.
ते कमीशनर ऑफीसजवळ पोहचले तेवढ्यात त्याला whats app वर एक मेसेज आला.
“I am no more interested in living with you. Don’t contact me, don call again and don’t try to meet me. I have deleted you from my heart. Your only chance to meet me is in the court, for divorce"

तो हादरला. ती असं कांही करेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं.
त्याला वाटलं, तिचा राग शांत झाल्यावर ती आपला फोन घेईल. आपल्यावर दबाव आणण्यासाठी ती अशी वागत असावी.
पण आठवड्याभरातच त्याला तिच्या वकीलाकडनं नोटीस आली... डायव्हर्सची.
त्याच्या पायाखालची वाळू घसरली.
त्यानं तिला फोन लावला. तिनं तो घेतलाच नाही.
असं बरेच दिवस चाललं.
मग त्यानं सरळ तिला जाऊन भेटायचं ठरवलं. तो तिच्या माहेरी तिच्या घरी गेला, तर ती तिथं नव्हती. ती कुठं असते हे सांगायला तिच्या घरच्यांनी नकार दिला. तो परत आला.
मग त्यानं तिला whats app वर एक मेसेज पाठवला. पुन्हा अशी चूक करणार नाही, तुझ्याशी चांगलं वागेन, घरी वेळेवर येईन, तुला वेळ देईन, तू म्हणशील ते ऐकेन वगैरे वगैरे.
तिकडून उत्तर आलं नाही.
त्यानं तिच्याशी संपर्क साधायचा अनेकदा प्रयत्न केला, पण तिनं कांही त्याला दाद दिली नाही.

+++

14 फेब्रुवारी 2015. व्हॅलेंटाईन डे. आज नेहा  अन सुहास तो फॅमिली कोर्टात हजर आहेत. त्यांच्या डायव्हर्सच्या केससाठी. जज मॅडमनी आधी नेहाला  विचारलं, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? ती हो म्हणाली. मग मॅडमनी सुहासला  विचारलं, तुझं काय? तो म्हणाला, ‘माझी हिच्याबरोबर संसार करायची तयारी आहे.  डायव्हर्स तिला पाहिजे, पण मला नकोय’
‘ठीक आहे,’ मॅडम म्हणाल्या, ‘मी तुम्हाला आणखी दोन महिन्या नंतरची तारीख देते. तोपर्यंत तुमच्यात समेट होतोय का ते पहा’.  मग लगेच त्यांनी पुढची केस सुनावणीसाठी घेतली.

नेहा लगेच बाहेर पडली. जवळच्या कॉफी हाऊसमध्ये गेली. तिनं एका कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. ती कॉफीची वाट बघतेय, तेवढ्यात सुहासही तिथं आला. त्याला बघून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो म्हणाला, मी बसू का इथं?’ ती म्हणाली, ‘नको, माझा मित्र येणार आहे आत्ता.... आणि बाजूला  आहेत ना टेबलं मोकळी? बस तिकडं... नाहीतर तू इथं थांबूच नकोस. मला माझ्या मित्राबरोबर बघून तुला वाईट वाटेल. जा तू इथनं’
त्याचं तोंड पडलं. तो हॉटेलच्या बाहेर आला. त्याला वाटलं, तिला कोण भेटायला येतंय ते बाहेरूनच बघावं. पण त्यानं आपला विचार बदलला. तो तिथनं निघून गेला. इकडं-तिकडं भटकत राहिला.

रात्री उशीरा तो घरी परत आला. त्यानं आपल्या फ्लॅटचं दार उघडलं.  तो आश्चर्यानं बघतच राहिला. त्याची बायको घरात होती. त्याला बघतच तिनं त्याचं हसून स्वागत केलं. मग अचानक त्याच्या पुढं गुलाबाचं फुल धरत म्हणाली, ‘हप्पी व्हॅलेंटाईन्स डे!’
त्याला आनंद झाला. पण तो न दाखवता तो तिला म्हणाला, ‘तुझा बॉय फ्रेंड भेटला नाही वाटतं?’
‘मला बॉय फ्रेंड वगैरे कुणी नाही आहे. टू बी फ्रॅंक, ते एक नाटक होतं....’
‘सॉरी डार्लिंग, मी परत तसं चुकीचं वागणार नाही.’
‘आय होप सो....’ नेहा हसत म्हणाली.

हेही वाचा:





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा