Advt.

Advt.

Tuesday, June 24, 2014

एका बदल्याची गोष्ट

-महावीर सांगलीकर


मिलिंदला अनेक लोकांनी सांगितले होते की त्या मकरंदच्या खापरपणजोबांनी तुझ्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती. पण तुझा खापरपणजोबा दुबळा असल्याने त्यावेळी गप्प बसला. ही गोष्ट सारखी-सारखी ऐकून मिलिंद मकरंदचा आणि मकरंद नावाच्या सगळ्या लोकांचा द्वेष करू लागला.

एकदा मिलिंद आणि मकरंद (मूळ मकरंद, ज्याच्या खापरपणजोबांने  मिलिंदच्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती तो ) आमने सामने आले. सुडाने पेटलेल्या मिलिंदने मकरंदच्या थोबाडीत ठेवून दिली.

"का मारलीस? मी काय बिघडवले तुझे?" मकरंद रडवेला होवून गाल चोळत म्हणाला.
"तुझ्या खापरपणजोबाणे माझ्या खापरपणजोबांच्या थोबाडीत मारली होती," मिलिंद म्हणाला, " तुझ्या थोबाडीत मारून मी त्याचा बदला घेतला. आता मी मकरंद नावाच्या सगळ्यांच्या थोबाडीत मारून मी पुन्हा बदला घेणार आहे. इथून पुढे बदला घेणे हेच माझे जीवन कार्य असणार आहे"

हे बदला  प्रकरण घडत असताना  एक एलियन ते बघत होता. हा एलियन पृथ्वीपासून 12 प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'तुकुतुकू' या ग्रहावरून 'महाराष्ट्रातील जातीकलह आणि त्याचे तुकुतुकू ग्रहावरील रानटी लोकांच्या टोळीकलहाचे तुलनात्मक अध्ययन'  या विषयावर अभ्यास करण्यासाठी आला होता. वरील घटना घडताच त्याने लगेच आपल्या टाईम  मशीनला उलटी किक मारली आणि तो मिलिंदच्या खापरपणजोबाच्या काळात पोहोचला.

तेथे त्याला एक पैलवान एका वयस्क माणसाच्या थोबाडीत सारखा-सारखा मारत होता असे दृश्य दिसले. एलियनने दुरूनच त्या दोघांच्या मेंदूची नोंद करून घेतली. त्या दोघांची सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, जिनेटिक  वगैरे माहिती एलियनच्या मेंदूत साठवली गेली.

त्यानंतर तो एलियन  पुन्हा वर्तमान काळात आला. त्यावेळी त्याला मिलिंद एका पैलवान टाईप तरुणाशी गप्पा मारत असल्याचे दिसले. त्या एलियनने त्या दोघांच्याही मेंदूची दुरूनच नोंद करून घेतली. त्याला मिळालेली माहिती त्याने वर मिळालेल्या माहितीशी ताडून बघितली तेंव्हा असे दिसले की आत्ताच्या पैलवान पोराच्या खापरपणजोबाने मिलिंदच्या खापर खापरपणजोबाच्या थोबाडीत मारली होती, त्या घटनेशी मकरंदच्या खापरपणजोबाचा कांहीच संबंध नव्हता. एलियनने ही गोष्ट मिलिंदला सांगायचे ठरवले. तो मानवी रुपात प्रकट होवून मिलिंद जवळ गेला. तोपर्यंत तो पैलवानटाईप पोरगा निघून गेला होता.

"अरे, तू मिलिंद ना? थोड्या वेळापूर्वी त्या मकरंदच्या थोबाडीत मारणारा?"
हे ऐकून मिलिंद दचकला. त्याला वाटले मकरंदने या माणसाला आपल्याला जाब विचारायला पाठवले की काय? एलियनने हे ओळखले होतेच. तो म्हणाला, "घाबरू नकोस, मी तुला एवढेच सांगायला आलो की तुझ्या खापरपणजोबाच्या थोबाडीत मकरंदच्या खापरपणजोबाने नव्हे, तर आत्ता जो मित्र तुझ्याबरोबर होता ना, त्याच्या खापरपणजोबाने मारली होती. पण तू तर मकरंदला दोष देत आहेस"

"हो माहीत आहे मला" , मिलिंद म्हणाला, "पण मकरंदच्या थोबाडीत मारणे मला जास्त सोयीचे आहे.  तो प्रतिकार करत नाही. त्या पैलवान मित्राच्या थोबाडीत मारायला गेलो तर तो मला उलटी थोबाडीत मारील"

इथल्या लोकांची मानसिकता आपल्या ग्रहावरील रानटी लोकांसारखीच आहे असे त्या एलियनला वाटू लागले. पण त्यासाठी त्याला आणखी अनेक लोकांचा सर्व्हे करायची गरज होती. बघूया पुढे त्याला आणखी कसले कसले नमुने भेटतात ते.....

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा