Advt.

Advt.

सोमवार, १८ जुलै, २०१६

सोनालीची डायरी


-महावीर सांगलीकर 


सोनाली माझी बालमैत्रीण. बालमैत्रीण म्हणजे मी लहान होतो तेंव्हापासूनची मैत्रीण नव्हे, तर ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे म्हणून.... माझ्या दृष्टीनं माझी बालमैत्रीणच. म्हणजे मी तिच्या वयाचा होतो त्यावेळी तिचा जन्म झाला असावा. असो.

माझी तिच्याशी ओळख मी एकदा नवोदय विद्यालयात कांही कामासाठी गेलो होतो त्यावेळी झाली. तिथं गेल्यावर मी प्यूनकडं माझं कार्ड दिलं आणि म्हणालो, प्रिन्सिपॉल मॅडमना भेटायचं आहे. तो लगेच मॅडमच्या केबिनमध्ये गेला. मिनिटाभरातच बाहेर आला आणि म्हणाला, तुम्हाला बोलावलंय आत.

मॅडमना भेटून मी माझं काम सांगितलं. त्या म्हणाल्या, तुम्ही पाटील मॅडमना भेटा. त्या तुमचं काम करू शकतात. स्टाफरूममध्ये असतील आता.
त्यांनी बेल वाजवून प्यूनला बोलावून घेतलं. त्याला  म्हणाल्या, यांची पाटील मॅडमशी गाठ घालून दे.

प्यून मला स्टाफ रूमकडे घेऊन गेला. स्टाफरुमच्या बाहेरूनच तो म्हणाला, पाटील मॅडम, तुमच्याकडं कुणीतरी आलं आहे.
पाटील मॅडम पटकन बाहेर आल्या.
मला बघताच म्हणाल्या, ‘सर तुम्ही? माझ्याकडं? तुम्ही माझ्याकडं कसं काय?’
‘तुम्ही मला ओळखता?’ मी आश्चर्यानं म्हणालो.
‘सर मी तुमची फॅन आहे. तुमच्या कथा वाचते मी नेहमी. तुमचा फोटो पाहिलाय मी नेटवर... पण तुम्ही माझ्याकडं कसं काय?’
‘प्रिन्सिपॉल मॅडमनी पाठवलंय मला तुमच्याकडं. पाटील मॅडम, माझं एक काम होतं महत्वाचं  तुमच्याकडं.’
‘अहो सर,  मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्ही मला अहो जाहो करू नका. आणि मला पाटील मॅडम म्हणू नका. माझं नाव सोनाली आहे’
‘ठीक आहे. काम असं होतं की मी एक हिंदी पुस्तक लिहिलं आहे. माझी हिंदी चांगलीच आहे, पण माझं व्याकरणाशी वावडं आहे. म्हंटलं हिंदी शिकवणाऱ्या कुणातरी हुशार शिक्षिकेकडनं तपासून घ्यावं. आता मराठी शाळेत हिंदी शिकवणाऱ्या शिक्षिकेकडून ते तपासून घेण्यापेक्षा हिंदी मेडियमच्या शाळेतील शिक्षिका त्या कामासाठी जास्त योग्य, म्हणून मी नवोदय विद्यालयात यायचं ठरवलं. मग प्रिन्सिपॉल मॅडमनी तुमचं... सॉरी तुझं नाव सुचवलं’

ही सोनाली दिसायला सुंदर, डोळ्यात तेज असणारी, आकर्षक होती.

पुढं तिनं मी पुस्तकासाठी लिहिलेला मजकूर ठरलेल्या वेळेच्या खूपच आधी तपासून दिला. त्यावेळी ती म्हणाली, ‘सर तुमचं हिंदी फारंच चांगलं आहे. व्याकरणाच्या थोड्या चुका आहेत, त्या मी दुरुस्त केल्या आहेत. पण मला एक शंका येतेय सर. तुमचं माझ्याकडं हे खरं काम नव्हतं..... खरं ना?’
‘ओळखलंस...? छान’  
‘म्हणजे तुम्हाला माझी ओळख करून घ्यायची होती. इट्स माय प्लीजर. पण का?’
‘बिकॉज यु हॅव अ ग्रेट फ्यूचर... आणि अशी एखादी व्यक्ति आढळली की मला तिच्याशी ओळख करून घ्यायला आवडते. मी तुझ्या हिंदी कथा वाचल्या आहेत. खरं म्हणजे मी तुझ्या कथांचा फॅन झालो आहे. मी सहसा दुसऱ्यांच्या कथा वाचत नाही. पण तुझ्या बहुतेक सगळ्या कथा मी वाचून काढल्यात.’
हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वहावू लागला. ‘थॅंक यू सर... तुम्ही मला मोठा बहुमान देताय. खूप बरं वाटलं ऐकून. .....पण सर मग तुम्ही आधी प्रिन्सिपॉल मॅडमना भेटला, त्यांनी माझं नाव सुचवलं हे कसं काय? त्यांनी जर दुसऱ्या एखाद्या शिक्षिकेचं नाव सुचवलं असतं तर?
‘त्यांनी  दुसऱ्या कुणाचं नाव कशाला सुचवलं असतं? या कामासाठी तूच अगदी योग्य आहेस हे त्यांनाही माहीत आहे आणि मलाही. त्यामुळं त्या तुझंच नाव सुचवणार हे मला माहीत होतं. म्हणून मी थ्रू प्रॉपर चॅनल तुझ्यापर्यंत पोहोचलो. शिवाय मी आणखी एक ट्रिक वापरली’
‘ट्रिक? कसली ट्रिक?’
‘मी मॅडमना म्हणालो, ‘शक्यतो हिंदीमध्ये स्वत: लिखाण करत असणारी शिक्षिका असावी’
‘ओह... भारीच आहे  ट्रिक’

पुढं माझी सोनालीशी चांगलीच मैत्री जमली.
एकदा मी तिला म्हणालो, ‘तू डायरी लिहितेस ना?
‘नाही सर. पण लिहायचा विचार आहे’
‘मग तो विचार प्रत्यक्षात आण. या एक जानेवारीपासून तू डायरी लिहायला सुरवात कर’, असं म्हणत मी  माझी ब्रीफकेस उघडली आणि तिच्यातून येणाऱ्या नवीन वर्षाची डायरी बाहेर काढली. ती तिला देत म्हणालो, ‘ही घे! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुझ्या आयुष्यात कांही महत्वाच्या घटना घडायला सुरवात होणार आहे. न्यू इअर विल बी अ थ्रिलिंग इअर फॉर यू. सगळ्या महत्वाच्या आणि रुटीन घटना देखील नोंद करून ठेव. आणि नुसत्याच कोरड्या नोंदी नकोत. डायरी लिहितानाही तुझ्या भाव-भावना व्यक्त व्हायला पाहिजेत. जास्त कांही लिहायचं असेल तर उरलेलं वेगळ्या वहीत लिही. अर्थात हे कांही मी तुला सांगायला नको... कसं लिहायचं ते. बेस्ट विशेश आणि बेस्ट लक’

+++

सोनालीनं डायरी लिहायला सुरवात केली, त्या घटनेला दोन वर्षं होऊन गेलीत. या दोन वर्षात तिच्या आयुष्यात जे कांही घडलंय ते मला माहीतच आहे. पण हे सगळं मला तारीखवार पाहिजे होतं. म्हणून परवा तिला म्हणालो, तुझ्या डायऱ्या वाचायच्या आहेत मला. कधी देतेस?’
‘देते लगेच...’ असं म्हणत तिनं मला दोन डायऱ्या आणून दिल्या.
त्या घेऊन मी घरी आलो.
थोडा मोकळा वेळ मिळाला तेंव्हा पहिली डायरी वाचायला घेतली.

1 जानेवारी 
सकाळी 10 वाजता.
सरांनी मला आजपासून डायरी लिहायची प्रेरणा दिलीय.  ते म्हणाले होते, ‘नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुझ्या आयुष्यात कांही महत्वाच्या घटना घडायला सुरवात होणार आहे. न्यू इअर विल बी अ थ्रिलिंग इअर फॉर यू’
म्हणजे आज कांहीतरी महत्वाचं घडणार आहे? घडावं. कांहीतरी वेगळं आणि चांगलं.

संध्याकाळी 6 वाजता
आईचा फोन आला. आधी तिनं नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, माझी चौकशी केली. नंतर  ती म्हणाली, ‘सोनू, शनिवारी गावी ये. रविवारी तुझ्यासाठी एक सरप्राईझ आहे’
‘सरप्राईझ? कसलं  सरप्राईझ?’ मी विचारलं.
‘अगं सोनू, सरप्राईझ आहे ना ते? आधी कसं सांगणार तुला?... चल बाय’ असं म्हणत तिनं फोन कात केला.

रात्री 9 वाजता
नमिताचा फोन आला.
‘सोनाली, कॉंग्रॅट्स’
‘कॉंग्रॅट्स? ते कशाबद्दल?’
‘तुला माहीत नाही?’
‘नाही....’
‘अगं तुला प्रेमचंद पुरस्कार मिळालाय हिंदी परिषदेचा...’
‘काय?????’ मी विश्वास न बसून ओरडले. .. ‘तू चेष्टा तर नाही करत ना माझी?’
‘ए...’ ती म्हणाली, ‘आत्ताच टी.व्ही.वर बातम्यात सांगितलं. नेटवर चेक करून बघ’
मी लगेच माझा लॅपटॉप चालू केला. न्यूजसर्चमध्ये माझं नाव टाकलं तर ती बातमी अनेक ठिकाणी दिसली.
अच्छा... सर म्हणाले ते खरं व्हायला लागलंय तर..

2 जानेवारी 
आज सकाळपासून मला खूप फोन आले. मित्र-मैत्रिणींचे, नातेवाईकांचे आणि सरांचा देखील. माझं अभिनंदन करण्यासाठी. सर तर भलतेच खूष होते. अनोळखी लोकांचेदेखील फोन आले. पत्रकारांचे पण.
दुपारी शाळेत माझा सत्कार झाला. एका टी.व्ही. चॅनलचे लोकपण आले होते. माझी मुलाखत घेतली थोडक्यात.

3 जानेवारी 
सकाळी 7 वाजता गावी जाण्यासाठी निघाले.
साडे नऊ वाजता गावी पोहोचले.
आईला विचारलं, आई काय सरप्राईझ आहे उद्या?
आई म्हणाली, उद्या तुला बघायला एक आर्मी ऑफिसर येणार आहे.
मी दचकले. एकतर मला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं, आणि केलं तरी ते आर्मीवाल्याशी करायचं नव्हतं.
पण माझे बाबा ex Army Officer आहेत. त्यांची इच्छा आहे की मी एखाद्या Army Officer शी लग्न करावं.
काय करावं बरं आता?

दुपारी 12 वाजता
मी गच्चीवर गेले आणि जबलपूरला माझ्या वहिनीला फोन केला. ती वहिनीपेक्षा माझी मैत्रीणच जास्त आहे. मी तिला माझा प्रॉब्लेम सांगितला.
ती म्हणाली, ‘आने दो... फिर पहली नजर क्या कहती है यह दिल से सोचो. अगर वह लड़का तुम्हे पसंत आये तो फिर सवाल ही नहीं उठता. अगर नापसंत है तो फिर दिमाग से काम लो’.

4 जानेवारी 
आज तो आर्मी ऑफिसर आणि त्याची आई आमच्या घरी मला पहायाला आले होते.
तो मला पहाताक्षणीच आवडला नाही, म्हणून मी त्याच्या प्रश्नाला खोचक उत्तरे  दिली आणि त्याला खोचक प्रश्न विचारले.
त्यानं मला पहिला प्रश्न विचारला, ‘तुझं नाव काय?’
मी लहान मुली सांगतात तसं सांगितलं: सोनाली साहेबराव पाटील, मुक्काम पोस्ट तालुका भोर, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र.
मग मी त्याला विचारलं, ‘आता तुझं नाव सांग’
माझ्या या उत्तरानं आणि त्याला एकेरी ‘तुझं’ असं म्हणाल्यानं सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
मग त्यानं पुढचे सगळे प्रश्न मला ‘तुम्ही’ असं म्हणत विचारले.
त्याच्या आईनं विचारलं, ‘तुला स्वयंपाक करता येतो का?’
‘नाही’ माझं खोटं उत्तर.
बाकीच्या प्रश्नांची उत्तरेही अशीच कांहीतरी. मी मुद्दाम नापास होण्यासाठी. त्या दोघांना कळलंही नाही की प्रत्यक्षात मी त्याला नापास केलं आहे.
ते लोक पसंती/नापसंती नंतर कळवतो म्हणून निघून गेले. त्याच्या आईनं माझी कुंडलीही घेतली. उपयोगी पडेल तिला नापसंतीचं कारण सांगायला.
माझ्या आई-बाबांनी माझ्याशी बोलणं बंद केलंय. उद्या सकाळी करतील सुरू पुन्हा बोलायला.

5 जानेवारी 
आज मी परत पुण्याला आले.
दुपारी शाळेत गेले.
संध्याकाळी आईचा फोन आला, त्या आर्मी ऑफिसरनं मला पसंत केलंय म्हणून.
हे मात्र फारच झालं!
आता मी काय करू?
कांहीतरी शक्कल लढवायलाच हवी मला.
दुसऱ्या मुली नाहीत का जगात? त्याला मीच कशाला हवी आहे?
आता पहातेच मी त्याच्याकडं.
असेल तो सैन्यात ऑफिसर, पण मीही पाटलाची ते पण आर्मी ऑफिसर पाटलाची पोर आहे.
हमसे पंगा नहीं लेने का..

मी सरांना फोन लावला. त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणाले, ‘तुला नाही ना करायचं त्याच्याशी लग्न? ठीक आहे. नाही होणार.’

++++

मी ती डायरी मिटली. पुढच्या घटना मला आठवू लागल्या. सोनालीला बघायला आलेला तो आर्मी ऑफिसर....  पुढच्या आठवडा भरातच त्याला सैन्यातनं बडतर्फ करण्यात आलं. त्यानं बॉर्डरवर झालेल्या एका खोट्या चकमकीत भाग घेतला होता. सोनालीच्या वडिलांना ही बातमी कळताच ते हादरले. आता सोनालीचा लग्न त्या मुलाशी लाऊन देण्याचा प्रश्नच नव्हता.


(पुढे चालू)

हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा