Advt.

Advt.

Tuesday, April 26, 2016

द ओल्ड मॅन

-महावीर सांगलीकर एके दिवशी एक खूपच वयस्क गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांच वय 90 वर्षं तरी असावं. त्यांची पांढरी दाढी छातीपर्यंत वाढली होती. भुवयांचे पांढरे केस डोळ्यांवर आले होते.  त्यांचे कान मोठे, प्रश्नचिन्हासारखा कर्व्ह असणारे आणि थोडे बाहेर आलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं. हे नक्कीच कोणीतरी आध्यात्मिक महापुरुष असावेत. माझ्याकडं का बरं आले असावेत?

मी त्यांना समोरच्या खुर्चीत बसवलं आणि म्हणालो, ‘बोला आजोबा, मी तुमची काय सेवा करू?’
ते म्हणाले, ‘एक सल्ला घ्यायचा होता.... मला कोणतं करीअर चांगलं राहील हे विचारायचं होतं’

आधी मला हसू आलं. या वयात देखील करीअर करण्याची इच्छा? पण मी लगेच सावध झालो. यांचं माझ्याकडं यायचं हे कारण नक्कीच नव्हतं. तरीही मी त्यांना म्हणालो, ‘आजोबा, तुमची जन्मतारीख सांगा’
‘थांब, आधी मी तुझी फी देतो’ असं म्हणत त्यांनी माझ्यापुढं टेबलावर एक पाकीट ठेवलं. मग म्हणाले, ‘माझी जन्म तारीख 11 नोव्हेंबर 1820 आहे’
‘आं....’ मी आश्चर्यानं म्हणालो, ‘तुमचा जन्म 1820 साली झाला? ... वाटत नाही... मला वाटलं तुम्ही 1925 च्या आसपास जन्मला असाल’
‘नाही... माझा जन्म 1820 सालीच झाला... मला चांगलं आठवतंय’
‘ठीक आहे,’ असं म्हणून मी मनातल्या मनात त्या तारखेची गणिते मांडू लागलो.

11.11.1820. अरे बाप रे! या 1820 मधल्या अंकाची बेरीजसुद्धा 11 येते. 11.11.11. जन्मतारखेत 3 वेळा मास्टर नंबर 11! शिवाय पूर्ण बेरीज 33! आणखी एक मास्टर नंबर. ही कोणीतरी फार मोठी ‘स्पिरिच्युअल’ व्यक्ति दिसते. चेहऱ्यावरनं तर आपण आधीच ते ओळखलंय, त्यांची जन्मतारीख देखील ते कन्फर्म करतेय. आता 2016 चालू आहे. 196 वर्षं वय? ते हिमालयात अनेक शतकं जगणारे साधू असतात त्यांच्यापैकी दिसतंय कुणीतरी. नक्कीच.

11.11.1820 ला जन्मलेल्या दोन महान व्यक्ति मला आठवल्या. एक सेंट विल्यम म्हणून होते केरळातले. दुसरे होते स्वामी सागरानंद बेळगावकडचे. मागं आपण त्यांच्याबद्दल वाचलं होतं की ते अजून जिवंत आहेत, पण आपला त्या काळात असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता.

मी त्यांना म्हणालो, ‘आजोबा, ते स्वामी सागरानंद म्हणून होते, त्यांची जन्मतारीख देखील 11.11.1820 हीच होती’
‘बाळा, मीच तो स्वामी सागरानंद’ ते म्हणाले.

माझा अंदाज खरं ठरला होता. तसा मी कुणा साधूच्या पाया-बिया पडत नाही, पण ही केस वेगळी होती. मी पटकन उठलो आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला.  उठून उभा राहिलो तर ते स्वामीजी गायब झाले होते. मी पटकन ऑफीसच्या बाहेर येऊन इकडं-तिकडं शोधलं तर ते कुठंच दिसले नाहीत.
भास?

परत ऑफीसमध्ये आलो. टेबलावर ते पाकीट होतं. म्हणजे स्वामीजी आपल्याकडं खरंच आले होते, तो भास नव्हता. पण मग सल्ला न घेता फी देऊन ते का बरं निघून गेले?

मी ते पाकीट उचललं आणि उघडलं. त्यात 1 रुपयाच्या अकरा नोटा होत्या. एकदम करकरीत पण 19 व्या शतकातल्या! त्या नोटा फारच दुर्मिळ असाव्यात. आता त्यांची किंमत फारच जास्त असणार पण आपण त्या विकायच्या नाहीत. कितीही मोठी किंमत आली तरी.

तरीपण त्या नोटांची आजची किंमत काय आहे ते बघण्याचा मोह मला आवरला नाही. मी नेटवर सर्च केलं आणि उडालोच! त्या नोटा म्हणजे इंग्रज सरकारने 1861 साली पहिल्यांदाच काढलेल्या नोटांपैकी होत्या. त्या विशिष्ट नोटा जगात फक्त कांही म्युझियममध्ये आणि अतिश्रीमंत संग्राहकांच्याकडेच आहेत.  लंडन मधल्या एका अब्जाधीशाने असली एक नोट एका लिलावात दहा  हजार पौंडांना घेतली होती.

दहा हजार पौंड? म्हणजे सुमारे नऊ लाख सत्तर हजार रुपये! म्हणजे आपल्याकडल्या या 11 नोटांची किंमत कमीत कमी एक कोटी रुपये तरी आहे...   हे टेन्शनचंच काम आहे. उगीच कुणाला कळलं तर नसती आफत यायची! या नोटा माझ्याकडं कुठनं आल्या याची सरकार देखील चौकशी करेल. नको रे बाबा. नको ही झंझट. नाहीतरी आपल्याला फुकटच्या पैशांचा मोह नाहीच.

मनात आलं, हे सगळं स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं!

एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी झोपेतून जागा झालो.  हेही वाचा:

न जन्मलेली बाळं
वॉचब्लॉक
व्हर्च्युअल डॉटर
ब्लड रिलेशन्स

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा