-महावीर सांगलीकर
शिवानी द ग्रेट या कथेचा सातवा भाग
शिवानीनं पुढच्या 4-5 दिवसातच ऑफीसच्या डिपॉझिट आणि पहिल्या महिन्याच्या भाड्याचा तिचा हिस्सा मोटीव्हेटरकडे देऊन टाकला. थोड्याच दिवसात ऑफीस ताब्यात मिळालं. ऑफीस ताब्यात आल्यावर शिवानी पहिल्यांदाच तिच्या खुर्चीत बसली त्यावेळी ती खूपच कॉन्फिडंट वाटत होती.
खुर्चीत बसल्यावर तिचं पहिलं वाक्य होतं,
‘मामा, या ऑफीसमधनं आपण पुढच्या कांही महिन्यात लाखो रुपये कमावणार आहोत’
तिचं ते वाक्य ऐकून त्याला खूपच समाधान वाटलं आणि तिचा अभिमानही वाटला.
ऑफीसच्या उदघाटनाचा दिवस त्यानं आधीच ठरवून ठेवला होता. शिवानीच्या जन्मतारखेला योग्य. उदघाटनाच्या आदल्या रात्री रात्रभर धो-धो पाउस पडायला लागला. अवेळी, मार्च महिन्यात. मोटीव्हेटरने शिवानीला फोन करून सांगितलं, ‘तू म्हणतेस ते खरं ठरणार बघ... आपल्यावर पैशांचा धो-धो पाउस पडणार आहे आता’.
उदघाटनाच्या दिवशी दिवसभर पाऊस चालूच होता. हे एक चांगलं लक्षण होतं.
थोड्याच दिवसात शिवानीकडे क्लाएंट्स येऊ लागले. क्लाएंट्स आले की त्यांच्याबरोबर चर्चा करायची, इतर वेळी केसेसचा अभ्यास करायचा असा तिचा दिनक्रम चालू झाला.
20 मार्च 2015. शिवानी एक केसच्या कामासाठी तिच्या गावी गेली होती. 21 मार्चला गुढी पाडवा. जाताना तिनं मोटीव्हेटरला सांगितलं होतं, ‘मी गुढी पाडव्याला गावीच राहीन... 22 तारखेला संध्याकाळपर्यंत पुण्याला परत येईन..तुम्ही मला जेवण द्यायचय तुमच्या वाढदिवसाचं’
‘हो, जरा लवकर ये..’ तो म्हणाला.
गुढी पाडव्याला तिनं तिच्या ऑफीसमध्ये पाहिजे असं त्याला मनोमन वाटलं. पण त्यानं ते तिला बोलून दाखवलं नाही.
20 मार्चला संध्याकाळी त्यानं आपल्या घरी एकांतात बसून, डोळे झाकून मनोमन तीव्र इच्छा व्यक्त केली, ‘शिवानी, उद्या तू तुझ्या ऑफीसमध्ये पाहिजेस’. एवढ्यात त्याचा फोन खणखणला.. शिवानीचा फोन... त्यानं तो उचलला तर त्याला तिकडून शिवानी आणि तिच्या आईचे भांडण चाललेलं ऐकू येऊ लागले. शिवानी रडवेल्या स्वरात भांडत होती तर तिची आई तिला टोमणे मारत होती. शिवानीनं मोटीव्हेटरला पुढची चक्क 15 मिनिटं ते भांडण ऐकवलं, नंतर फोन कट करून टाकला.
शिवानीची आणि तिच्या आईची नेहमी भांडणं होत असतात हे शिवानीनं त्याला कैकदा सांगितलं होत. एक-दोन वेळा तो तिला गमतीनं म्हणाला होता, ‘तू सगळ्यांशीच भांडत असतेस... माझ्याशी सुद्धा...... मग आईशी देखील तूच भांडत असशील’
तिला थोड्या वेळानं फोन करून समजाऊन सांगू असा विचार तो करत होता तेवढ्यात व्हाट्स अपवर तिचा मेसेज आला,
‘मामा, तुम्हाला आता कळलं ना, मी भांडत नसते, आईच माझ्याशी भांडत असते.. पण तुम्ही मलाच ब्लेम करत असता... तुझ्या आईवडिलांची कांही चूक नसावी म्हणून ... तुझ्यासारखी मुलगी असल्यावर ते बिचारे काय करणार असं तुम्ही मला दोन वेळा म्हणालात’
‘सॉरी शिवानी, मी ते चेष्टेनं म्हणालो होतो.. पण मी असं म्हणायला नको होतं...’
‘तुम्ही मला परत असं चेष्टेत देखील म्हणू नका’
‘नाही म्हणणार’
‘आणि तुम्हाला अजून असं वाटत की मी लग्न करायला नाही पाहिजे... माझं लग्नच होऊ नये असं वाटतं तुम्हाला’
‘नाही शिवानी... माझ्यावर असे आरोप करू नकोस प्लीज. मी तुला मागेच म्हणालो की सुरवातीला मला वाटायचं की तुझं लग्न तू व्यवस्थित सेटल झाल्यावर व्हावं. पण आता तसं वाटत नाही. कधी एकदा तुझं लग्न होतंय आणि मी तुझ्या काळजीतनं मुक्त होतोय असं झालय मला....’
‘या जगात माझं कुणीच नाही...’
आता काय म्हणायचं या पोरीला? हिला कुणीच आपलं वाटत नाही, अगदी आई-बाप सुद्धा.
‘शिवानी, असं म्हणू नकोस... तू एकटी नाही आहेस या जगात. इथं किमान पाच लोक आहेत जे तुझे आहेत. हक्काचे.. एक म्हणजे तू स्वत:.. तू तुझी नाहीस का? तुझी आई.. तुझे वडील.. ते तुझा राग करत असले म्हणून काय झालं? आणि मी तुझा कोणीच नाही आहे का? तू तसं समजत असलीस तर ते तुझं दुर्भाग्य आहे. याशिवाय आणखी एक व्यक्ति आहे. खास तुझी. तुझ्या स्वप्नातला आयडियल जोडीदार. तो कुठं आहे ते मला माहीत नाही. लवकरच तो स्वत:हून तुझ्याकडे येईल असं वाटतं मला’
यावर शिवानी कांही बोलली नाही. विषय बदलत ती म्हणाली, ‘मामा, मी उद्या सकाळी इथनं लवकर निघतेय. उद्या मला ऑफीसमध्ये बसायचं. तुम्ही पण या’.
‘जशी तुझी आज्ञा..’
गुढी पाडव्याला शिवानीनं ऑफीसमध्ये असायला पाहिजे ही त्याची इच्छा अशा विचित्र प्रकारे पूर्ण झाली. एकीकडे आनंद तर दुसरीकडे ती आईशी भांडून घरून निघून येतेय याचे दु:ख. आता ही भांडणं मिटवायचं काम पण आपल्यालाच करावं लागेल, तो मनात म्हणाला.
‘येताना महालक्ष्मीच्या फोटोसाठी हार आणि पूजेचं साहित्य घेऊन या. मला पूजा करायचीय’
‘ओ.के.’ तो म्हणाला.
दुस-या दिवशी ती ऑफीसमध्ये आली. कॉन्फिडंट पण थोडीशी उदास.
‘शिवानी, पूजा करताना तुझं मन कसं प्रसन्न पाहिजे...’ तो म्हणाला.
त्याच्या केवळ एवढ्या वाक्यानं तिची उदासी पळून गेली. तिनं मोठ्या उत्साहानं महालक्ष्मीच्या फोटोला हार घातला. पूजा केली. बराच वेळ.
पूजा झाल्यावर ती तिच्या खुर्चीत बसली. तो तिच्या समोर बसला. एवढ्यात तिला एक फोन आला.
‘आईचा फोन’, ती म्हणाली, ‘मी घेणार नाही तो... नाहीतर परत भांडण होईल माझं तिच्याशी’
‘फोन घे शिवानी... ऐक माझं’
तिनं फोन घेतला. आईला म्हणाली, ‘तू माझ्याशी सारखं भांडत असतेस. कारण नसताना. आजपासून तुझा माझा अजिबात कांही संबंध नाही. मी दत्तक गेलेय असं समज’ असं म्हणून तिनं फोन कट केला.
‘कुणाला दत्तक गेलीस तू?’ मोटीव्हेटरने विचारलं.
‘तुम्हालाच की... आणि कुणाला?’ तिनं हसत उत्तर दिलं.
आज हिचं ब्रेन वॉश करायलाच पाहिजे.
‘शिवानी, मला तुझी 15 मिनिटं पाहिजेत. माझं बोलणं तू शांतपणे ऐकणार का? आत्ता ऐकायचा मूड नसेल तर नंतर बोलेन मी...’
‘बोला मामा, मी ऐकेन आत्ताच..’
‘मग मोबाईल सायलेंट मोडवर ठेव मी बोलत असताना. व्हाट्स अपवर वगैरे कांही बघायचं नाही मी बोलताना.. तुझं पूर्ण लक्ष माझ्याकडं पाहिजे. कबूल?’
‘हो’ असं म्हणत तिनं मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला.
मग तो बोलू लागला..
‘काल संध्याकाळी मी ट्रान्समध्ये जाऊन अशी विश केली की तू आज तुझ्या ऑफीसमध्ये पाहिजेस. थोड्याच वेळात मला तुझा फोन आला ज्यावर तुझं तुझ्या आईशी सुरू असलेलं भांडण तू मला ऐकवलंस. मग तिच्यावर रागावून तू आज इकडं निघून आलीस. हे असं व्हायला नको पाहिजे होतं शिवानी. म्हणजे तू आज ऑफिसमध्ये आलीस ते चांगलच झालं, पण तू अशा प्रकारे घरातनं निघून आलीस हे कांही बरं झालं नाही....’
‘मामा, म्हणजे तुम्ही माझं लाईफ कंट्रोल करत आहात. विश करून. तुम्ही असं का करत आहात?’
‘तुझ्याच भल्यासाठी.. त्यात माझा कसलाच स्वार्थ नाही. तुझी आणि तुझ्या आईची भांडणं व्हावीत अशी इच्छा तर मी कधीच केली नाही, करणार नाही’
‘माझ्या नशिबात असेल ते होईल. तुम्ही का उगीच इंटरफेअर करत आहात माझ्या आयुष्यात?’
‘मी इंटरफेअर नाही करत. फक्त हेल्दी विश करतोय. मी डायरेक्ट सांगितलेल्या कांही गोष्टी तुला पटत नाहीत, किंवा पटणार नाहीत असं ज्यावेळी मला वाटतं, अशावेळी हेल्दी विश करणं हेच माझ्या हातात रहातं. माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतोय की माझ्या सगळ्या हेल्दी विश ख-याच ठरल्यात आणि त्यात तुझा मोठा फायदाच झालाय’
यावर ती कांही बोलली नाही.
‘शिवानी ऐक माझं, माझी विनंती आहे तुला. तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर मी तुझे अनेक प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. तुझं डिप्रेशन मी कायमचं घालवू शकतो. तुझे सगळे अडथळे दूर करू शकतो. आठव... चार महिन्यापूर्वी तू कुठं होतीस आणि आज कुठं आहेस. एवढं सहज यश कुणाला मिळत नसतं. तू माझ्या अनेक गोष्टी ऐकल्यास आणि तुझ्या अंगभूत गुणांचा वापर केलास म्हणून हे शक्य झालं. आता आणखी थोडं ऐक.. मग बघ तुझी उरले सुरले प्रॉब्लेम्स कसे चुटकीसारखे सुटतात ते...’
‘मी काय करायला पाहिजे आता मामा?’
‘आता माझं पहिलं टारगेट आहे तुझी तुझ्या आईशी होणारी भांडणं मिटवणं. एक लक्षात घे, तुझी आई तुझ्यावर चिडते कारण तिला तुझी काळजी वाटते. लक्षात ठेव तुझी आई ही तुझी सगळ्यात जवळची व्यक्ति आहे. तू तिच्या जीवाचा तुकडा आहेस. आज रात्री आईला फोन कर. तिच्याशी प्रेमानं बोल. तिच्या तब्येतीची चौकशी कर. जेवलीस का विचार. काय जेवलीस ते पण विचार’
‘हो, विचारेन’
‘तिला रोज फोन करत जा. तिच्या फोनची वाट बघू नकोस, तुझा फोन गेला पाहिजे बघ नेहमी. आणि तिला कधीच तोडून बोलत जाऊ नकोस, प्रेमानं बोलत जा’
‘हो’
‘तू आता गावी परत कधी जाणार आहेस?’
‘आठवडाभराने’
‘जाताना आई-वडिलांसाठी कांहीतरी भेटवस्तू घेऊन जा. हे हे मी तुला मागे पण सांगितलं होतं. आता तू मिळवती झालेली आहेस. घरी तिला तिच्या कामात मदत कर आणि येताना आई-बाबा दोघांच्याही पाया पडून आशीर्वाद घे मगच घरातनं बाहेर पड. तुझ्या या छोट्याश्या कृतीनं बघ कसं तुझ्या घरातलं वातावरण बदलतं ते’
कांही दिवसांनी शिवानी पुन्हा एकदा गावी गेली. ती तिकडे जाण्याआधी मोटीव्हेटरने शिवानीला पुन्हा एकदा काय करायचं ते समजावून सांगितलं. शिवानी गावी जाण्यासाठी निघाल्यावर थोड्या वेळानं त्यानं शिवानीच्या आईला फोन करून सांगितलं, ‘आई, शिवानी आली की तिच्याशी प्रेमानं बोला. तिचे लाड करा. तिला तिच्या मनासारखं वागू द्या. मी तिला बरंच कांही समजावून सागितलं आहे. आता ती तुमच्याशी भांडणार नाही याची मला खात्री आहे. पण तरीही यावेळी जर ती भांडली तरी तुम्ही तिच्यावर अजिबात रागावू नका. तिच्यावर रागवायचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. तिचं पुढं कसं होईल याची अजिबात काळजी करू नका. तुम्हाला आवडेल असंच होणार आहे सगळं’
शिवानी गावी गेल्यावर दुस-याच दिवशी सकाळी तिनं मोटीव्हेटरला फोन केला, ‘मामा, माझी आई माझ्यावर जाम खूष आहे. तुम्ही म्हणालात तसं मी वागत आहे. थॅन्क यू मामा’
‘परत येताना काय करायचं ते लक्षात आहे ना तुझ्या शिवानी?’
‘हो’, शिवानी म्हणाली, ‘मी इथनं निघताना आई-बाबांच्या पाया पडून निघेन...’
‘गुड गर्ल’, तो म्हणाला, ‘आल्यावर सांग मला डिटेलमध्ये काय काय झालं ते...’
दुस-या दिवशी शिवानी पुण्याला यायला निघाल्यावर तासाभराने त्याने तिच्या आईला फोन केला.
‘काय आई, काय म्हणते शिवानी?’
‘यावेळी ती खूपच शहाण्यासारखी वागली. थॅन्क यू’
पुढे चालू: शिवानीचं लग्न: भाग 1
या कथेचे आधीचे भाग:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा