-महावीर सांगलीकर
2002 च्या एप्रिल पासून 2012पर्यंत मी एक अतिशय निगेटिव्ह माणूस होतो. माझ्या आयुष्यातली तब्बल दहा वर्षे मी मूर्खांच्या नादी लागून वाया घालवली होती. नको त्या लोकांच्या आणि संघटनांच्या नादी लागलो होतो. मी माझी सगळी क्रिएटीव्हिटी चुकीच्या गोष्टींसाठी आणि चुकीच्या लोकांसाठी वापरत होतो.
2013 मध्ये हळूहळू मी स्वत:ला यातून बाहेर काढायचे ठरवले. तोपर्यंत मी जे लिहीत होतो, अगदी त्याच्या उलटे विचार माझ्या लिखाणात येऊ लागले. आधी मी ज्यांच्या नादी लागलो होतो ते लोक मला आता प्रतिगामी समजू लागले. मी त्या सगळ्यांना पुरून उरलो. मी माझ्या फेसबुक अकाउंटवरनं अक्षरश: हजारो विद्रोही, आंबेडकरवादी, ब्रिगेडी, हिंदुत्ववादी, हिंदूधर्म विरोधी, अनिसवाले, व्यक्तिपूजक यांना चक्क हाकलून लावले. त्यांच्यापैकी ज्यांचे फोन नंबर्स माझ्या फोनबुकमध्ये होते, तेदेखील मी डिलीट करून टाकले. त्यातले जे लोक मला प्रत्यक्ष भेटायचे त्यांना मी माझे दरवाजे बंद करून टाकले. घरातली विद्रोही, तथाकथित पुरोगामी पुस्तक रद्दीत घातली.
पुढे 1 जानेवारी 2014 हा दिवस उजाडला. त्यादिवशी मला विनोद तेजवानी हा माझा जुना मित्र भेटला. त्यानं ‘सध्या काय करतोस?’ असं विचारलं. खरं म्हणजे अभिमानानं सांगता येईल अस मी कांहीच करत नव्हतो. मी थाप मारली, ‘मी न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस करतोय’. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्यानं लगेच त्याची आणि त्याच्या मुलाची जन्मतारीख मला दिली आणि रिपोर्ट बनवायला सांगितला. अशा रीतीनं माझी न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस या वर्षाच्या पहिल्या दिवशी योगायोगाने सुरू झाली.
न्यूमरॉलॉजीचा माझा सखोल अभ्यास होताच. पण माझ्यावर वर उल्लेख केलेल्या लोकांचा प्रभाव असल्यानं आत्तापर्यंत मी त्याची प्रॅक्टिस करण्याचे नेहमीच टाळलं होतं. पण आता मी त्या प्रभावातून मुक्त झालो होतो, त्यामुळे न्यूमरॉलॉजीकडं पूर्ण लक्ष द्यायचं ठरवलं.
माझं विद्रोही प्रकारचे लिखाण बंद झालेच होते, पण मी आता विद्रोही लोकांच्या विरोधात लिहायचा उद्योग देखील बंद करायचे ठरवलं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच सगळ्यात चांगली होती. मग मी माझं लक्ष न्यूमरॉलॉजी बरोबरच क्रिएटीव्ह लिखाणाकडेही द्यायचं ठरवलं. माझ्यामध्ये कथालेखनाचे अंग फार पूर्वीपासूनच होतं, कोणे एके काळी मी इंग्रजी कथाही लिहिल्या होत्या. 2014मध्ये मी मराठी कथा लिहायला सुरवात केली. त्या फुकट्या प्रकाशकांना देण्याऐवजी वाचकांना फुकट देण्यासाठी महाकथा हा ब्लॉग सुरू केला.
अगदी थोड्याच काळात माझ्या कथा अतिशय लोकप्रिय होऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे मी वाचकांना वेगळ्या विश्वात नेऊ लागलो. वाचकांना खिळवून ठेवणारी मांडणी, त्या कथांमध्ये पात्रांचे असणारे हाय टॅलेंट, मानवी बुद्धिमत्तेची कमाल, पात्रांना असणारी जबाबदारीची जाणीव, कथांमध्ये अचानक येणारी वळणे, वाचकांचे चुकणारे अंदाज, अगदी व्हिलनलादेखील दिलेला रिस्पेक्ट, आगळे-वेगळे तत्वज्ञान, रहस्य, अनोखे संघर्ष, स्त्रीशक्तीची चुणूक, इतिहासापासून धर्म-विज्ञानापर्यंत हाताळले गेलेले वेगवेगळे विषय, गूढ विषयांचा परिचय, टिपिकल विनोदांच्या पलीकडले विनोद, सहज ओघवती भाषा, मराठी-हिंदी-इंग्रजी या भाषांचा मुक्त वापर या सगळ्या गोष्टी वाचकांना भुरळ पाडू लागल्या. वाचकांमधून मला अनेक नवीन आणि पॉझीटीव्ह मित्र मैत्रिणी मिळाल्या.
.... आणि या वर्षीच्या जून महिन्यात अचानक एक मुलगी माझ्या जीवनात आली. माझी एक कथा तिनं फेसबुकवर लाईक केली, मग ती माझी फेसबुक फ्रेंड झाली. त्यानंतर केवळ आश्चर्यकारक घटना घडल्या. या सगळ्या घटना मी माझ्या ‘शिवानी द ग्रेट’ या कथेमध्ये मांडल्या आहेत. या घटनांमधून मला मी एक महान मोटीव्हेटर आहे याची जाणीव झाली. याचं कन्फर्मेशन मला 28 ऑक्टोबरच्या पहाटे मिळालं. मी कोण आहे, कशासाठी आहे याची मला अचानक जाणीव झाली. त्यादिवशी ज्ञानपंचमी होती.
मग भराभर माझ्यामध्ये बदल होऊ लागले. माझ्या अंगातील सुप्त शक्ती जागृत होऊ लागल्या. 15 नोव्हेंबर रोजी मी यशस्वीरीत्या टेलेपॅथिक मेसेज पाठवला आणि त्याचे उत्तरही मिळवले. ( शिवानी गायब आणि माझा टेलेपथीचा प्रयोग ). 22 डिसेंबरला ‘हिलिंग टच’ आणि ‘विश ट्रान्सफर’चा यशस्वी आणि एकत्रित प्रयोग केला.
हे सगळं स्वप्न तर नाही ना? असं कधी-कधी वाटतं. पण हे स्वप्न नाही.
2014, तुला सलाम... मी कोण आहे याची तू मला जाणीव करून दिली आहे. तू माझ्या सुप्त शक्त्या जागृत केल्या आहेत. तू मला नवी दुनिया, नवे मित्र दिले आहेत.. तू मला नवा जन्म दिला आहे. तू मला महान बनवलं आहेस.
धन्यवाद.... धन्यवाद....
हेही वाचा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा