Advt.

Advt.

Friday, December 12, 2014

मिशन शिवानी

-महावीर सांगलीकर


(शिवानी द ग्रेट या कथेचा चौथा भाग)

‘शिवानी, आता तुला कामाला लागायचं आहे. आजपासून तुझी ओळख कुणालाच नुसती ‘शिवानी’ अशी करून द्यायची नाही, तर ‘टॅक्स कन्सल्टंट शिवानी पाटील’ अशी करून द्यायची. तू टॅक्स कन्सल्टंट आहेस हे जिथं तिथं माहीत व्हायला पाहिजे. फेसबुकवर तुझी ओळख केवळ टॅक्स कन्सल्टंट अशीच व्हायला पाहिजे. कळलं ना?’
‘हो, कळलं’
‘तुला सगळं झटपट कळतं, माहीत आहे मला. लाग आता कामाला. एक ब्लॉग तयार कर. टॅक्सबद्दल लेख लिहित जा तिथं. मग ते फेसबुक, व्हाट्स अॅप, जी प्लस, लिन्कड इन आणि जिथं जिथं शेअर करता येतील तिथं तिथं शेअर कर. कधी करणार?’
‘लगेच.... आत्ता लगेच एक लेख लिहिते आणि शेअर करते’
‘गुड गर्ल. बोलू आपण नंतर’ असे म्हणून त्यानं फोन कट केला.

इतक्यात त्याला त्याचा मित्र आणि संगीतकार हर्षित अभिराज याचा फोन आला. येत्या रविवारी त्याच्या गाण्यांचा एक प्रोग्रॅम होता. तो म्हणाला, ‘तू यायचंय’
‘मी येईन, माझ्या सोबत माझी एक भाची पण येईल’, तो हर्षितला म्हणाला.
‘तीच का ती, मागे माझ्या सांगलीच्या कार्यक्रमात आली होती ती? की चिंचवडच्या कार्यक्रमात आली होती ती?’
‘ही त्यांच्यापैकी नाही. ही वेगळीच आहे’
‘अरे तुला भाच्या आहेत तरी किती?’
‘अॅक्च्युअली या सगळ्या भाच्या-पुतण्या म्हणजे माझ्या क्लाएंट्स आहेत. मला एकही खरी भाची नाही. पण या सगळ्या भाच्या मला माझ्या फॅमिली मेम्बर्ससारख्याच आहेत’
‘ओह....’
‘आणि यावेळी येणार आहे ती भाची तर मला माझ्या मुलीसारखी आहे. मी तिच्याकडं क्लाएंट म्हणून कधीच बघितलं नाही’
‘छान. काय नाव तिचे?’
‘टॅक्स कन्सल्टंट शिवानी पाटील’
‘पाटील... छान... ती टॅक्स कन्सल्टंट आहे....?’
‘होय’
‘बरं झालं. माझं एक काम होतं’

मग न्यूमरॉलॉजीस्टनं शिवानीला व्हाट्स अॅपवर मेसेjज पाठवून तिला रविवारच्या कार्यक्रमाची माहिती दिली.

रविवारी तो आणि शिवानी हर्षितच्या  कार्यक्रमाला गेले. प्रचंड गर्दी. पण एकदम मागच्या रांगेत दोन खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. शिवानी म्हणाली, ‘आपण तिथं बसू’
‘नको’, तो म्हणाला, तुझी जागा शेवटच्या रांगेत नाही, पहिल्या रांगेत आहे’. मग लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, ‘चला मॅडम पुढे’
तो पुढं चालला आणि ती त्याच्या मागोमाग चालू लागली. पुढं येऊन बघतात तर पहिल्या रांगेत बसायला जागा नव्हती, आणि दुस-या रांगेत दोन खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. पण तिथं बसण्याऐवजी पहिल्या रांगेत बसलेल्या एका तरुणास शिवानीची ओळख करून देत तो म्हणाला, ’टॅक्स कन्सल्टंट शिवानी पाटील.... हर्षित अभिराज यांच्या नातेवाईक आहेत’
तो तरुण आणि त्याच्या शेजारचा तरुण चटकन जागेवरून उठले आणि दुस-या रांगेत जाऊन बसले.  शिवानी आणि तो पहिल्या रांगेत बसले.

कार्यक्रम सुरू झाला. एकापेक्षा एक सुंदर गाणी. विविधतेनं नटलेली. खरं म्हणजे त्यानं हर्षितची  गाणी अनेकदा ऐकली होती, त्यांचा आस्वाद घेतला होता, पण आज ती गाणी त्याला आणखीनच गोड वाटली. शिवानीदेखील  हर्षितचे प्रत्येक गाणे लक्षपूर्वक ऐकत होती, त्यावर ठेका धरत होती.
तेवढ्यात हर्षितचे लोकप्रिय झालेले ‘जागोजागी भेटत असते माझी मुलगी’ हे गाणे सुरू झाले. हे गाणे ऐकताना त्याच्या डोळ्यात कधी नव्हे ते पाणी आले.
तो शिवानीला म्हणाला, ‘हे गाणं  आज माझं  आहे, तुझ्यासाठी’ 
कार्यक्रम संपल्यावर दोघेही स्टेजवर गेले. त्यानं हर्षित आणि शिवानीची ओळख करून दिली. त्यावेळी तिथं आलेल्या एका सेलेब्रिटी फोटोग्राफरने तिचे पटापट फोटो काढले. शिवानी म्हणजे कोणीतरी सेलेब्रिटी असावी असे त्याला वाटले असावे. नक्कीच.

एवढ्यात त्याचा मित्र संदीप स्टेजवर आला.
‘बरं झालं संदीप तू आलास’ असे म्हणत त्यानं त्याची शिवानीशी ओळख करून दिली, ‘हा फेमस आर्टिस्ट आहे. बिझनेस कार्डसमधला एक्स्पर्ट. तुझं बिझनेस कार्ड आता बनवायलाच पाहिजे. ते आपण याच्याकडनं बनवून घेऊया’
तिनं त्याला ‘उद्या मामाकडे कार्डचा मजकूर पाठवते’ असं सांगितलं.
मग हर्षितचा निरोप घेऊन दोघे बाहेर पडले.

‘मामा, चला मी येते, मला स्वयपाक करून जेवायचं आहे’ ती म्हणाली.
‘आज स्वयापाकाला सुट्टी दे. आज आपण जेवायला कुठंतरी जाऊ’
‘अहो नको’
‘नको बिको कांही नको. जायचंच’
‘कुठं?’
‘बघू... टिळक रोडला मिळेल एखादं चांगलं हॉटेल’
ते दोघे टिळक रोडला आले. त्याला एक चांगलं आणि नावाजलेले हॉटेल दिसलं. ‘तो म्हणाला, ‘चल इथं जाऊ’
‘इथं? नको. मला नाही आवडत हे हॉटेल’
‘ओके, चल समोर एक हॉटेल आहे, तिथं जाऊ’
रस्ता ओलांडून ते दोघे एका हॉटेलात शिरले. त्यानं काउंटरवर थाळीची किंमत विचारली. ती त्याच्या आवाक्यातली होती. तो कुपन घेण्यासाठी खिशातून आपले पाकीट काढू लागला, तेवढ्यात शिवानी त्याला म्हणाली, ‘अहो मामा, एक मिनिट जरा बाहेर चला’.
तो लगेच तिच्या मागोमाग बाहेर पडला. बाहेर आल्यावर ती म्हणाली, ’मामा तुम्ही मला कुठेही काय जेवण देता? चला आपण गिरीजामध्ये जाऊ’ 
आधी त्याच्या छातीत धस्स झाले. पण तो लगेच सावरला. म्हणाला, ‘मग आधीच नाही का सांगायचं, गिरीजा तर गिरीजा... गिरीजातलं जेवण मलाही फार आवडते.... दुसरं कोणी देत असेल तर’
‘बिल तुम्ही द्यायचं आहे’ तिनं आठवण करून दिली.
‘मीच देणार आहे, काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर मी राहीन कांही दिवस तिथं वेटर म्हणून’
‘मग नको.... मी होस्टेलवर जाऊन जेवते. तुम्ही पण घरी जाऊन जेवा’
त्यानं कपाळाला हात लावला. हिला चेष्टा, विनोद कांही कळत नाहीत असं दिसतंय, तो मनात म्हणाला.
त्याला पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, पण त्याच्या कंजूष स्वभावामुळे पैसे खर्च करणे त्याच्या जीवावर येई. तो खिशात फारसे पैसे ठेवत नसे. एखादा रुपया जरी जादा खर्च झाला तरी त्याला स्वत:चा राग येत असे. गिरीजामध्ये तो अनेकदा जेवला होता, पण स्वत:च्या पैशानं नव्हे तर दुस-यांच्या. त्यानं बिल भरण्याचा प्रसंग त्याच्यावर कधीच आला नव्हता. पण आज त्याचं पाकीट ब-यापैकी हेल्दी होतं.  त्यानं ठरवलं, आजपासून, या क्षणापासून कंजूषी बंद.
‘अगं गम्मत केली तुझी. आहेत माझ्याकडे भरपूर पैसे. चल जाऊ गिरीजामध्ये’
तिथनं जवळच असलेल्या गिरीजा हॉटेलमध्ये ते आले.
‘तुला काय मागवायचं ते मागव. मला फक्त फ्लॉवरची भाजी आवडत नाही, ती सोडून कायपण मागव’
तिनं मेनू कार्ड हातात घेतलं आणि ते वाचू लागली. थोड्या वेळाने तिनं वेटरला ऑर्डर दिली.

जेवताना ती म्हणाली, ‘मामा, मी हर्षितची नातेवाईक आहे असं सांगायची तुमची आयडीया भारी होती... तुम्ही पण कधी कधी खोटं बोलता..’
‘खोटं? मी कुठ  खोटं बोललो का? तू खरंच हर्षितची नातेवाईक आहेस’
‘ते कसं काय?’
‘हे बघ, हर्षित माझा नातेवाईक आहे आणि तू माझी भाची आहेस, मग तू पण त्याची नातेवाईक झालीसच की’
‘असं होय...’
‘आणि दुसरं म्हणजे जगातले सगळे लोक एकमेकांचे नातेवाईकच असतात... लांबून का होईना. पण हर्षित तुझा आणखी एक प्रकारे नातेवाईक आहे. त्याची जन्मतारीख 22 आहे. तुला सगळ्यात जास्त लाभदायक असणारी तारीख. म्हणजे न्यूमरॉलॉजीकली तुला तो माझ्याएवढाच जवळचा आहे. पुढे तुम्हा दोघांची चांगलीच गट्टी जमणार आहे, बघ तू...’
‘आय सी.... आणि मामा...’
‘काय...?’
‘मी माझ्या वाढदिवसाला तुम्हाला जेवण देणार आहे... हॉटेल सुकांतामध्ये’
‘देशील, नक्कीच. इट विल बी माय प्लेजर’
जेवण झाल्यावर जेवणाचं बिल आलं. एवढं बिल भरण्याचा त्याचा पहिलाच प्रसंग होता. पण त्याला त्याचं कांहीच वाईट वाटले नाही. उलट ते भरताना तो अतिशय आनंदी झाला होता.
+++

दुस-या दिवशी तिनं त्याला व्हिजिटिंग कार्डचा मजकूर पाठवून दिला. त्यानं तिच्या नंबरला अनुरूप अशा रंगसंगतीचे डिझाईन बनवायला संदीपला सांगितले. संदीपनं त्याच दिवशी त्याला 10-12 सॅम्पल्स पाठवले. त्यातलं एक शिवानीला पसंत पडलं. लगेच त्या डिझाईनची 1000 कार्ड प्रिंट करायला संदीपला सांगण्यात आलं.

‘शिवानी, उद्या आपल्याला चंदननगरला जायचं आहे’  त्यानं फोनवर तिला सांगितलं.
‘कशाला?’
‘तुला चंदुकाका सराफ माहीत आहेत ना?’
‘होय, ते आमचे गाववाले आहेत’
‘त्यांची एक शाखा चंदननगरला सुरू होत आहे. मला आमंत्रण आहे कार्यक्रमाचं. तू पण यायचं आहे माझ्याबरोबर’ 
‘हो, येईन’

दुस-या दिवशी अकरा वाजण्याच्या सुमारास ते दोघं चंदननगरला गेले. दुकानाबाहेर आणि दुकानात प्रचंड गर्दी. त्या दोघांना बघताच फोटोग्राफरनं त्यांचे फोटो घ्यायला सुरवात केली. जणू कांही कोणीतरी सेलेब्रिटीच आलेत. सेलेब्रिटीच्या थाटातच ते दोघे दुकानाच्या आत गेले. आतमध्ये चंदुकाका सराफ या फर्मचे मालक शहा साहेब होते. त्यांनी दोघांचे जोरदार स्वागत केले.

न्यूमरॉलॉजीस्टनं शिवानी आणि शहा साहेब यांची ओळख करून दिली. ‘ही शिवानी, माझी भाची. तुमची गाववाली आहे’. शहा साहेबांना आणखीनच आनंद झाला. त्यांनी तिथं असलेल्या फोटोग्राफरला सांगितलं, ‘आमचे फोटो घ्या हो ...’
न्यूमरॉलॉजीस्टनं शहा साहेबांना सांगितलं, ‘ही टॅक्स कन्सल्टंट आहे’
‘तू एकदा आमच्या कार्पोरेट ऑफीसला येऊन जा’, शहा साहेब तिला म्हणाले, ‘मी आमची कांही कामे तुला देईन’.
नंतर तिघेपण बाहेर आले.
शहा साहेब तिला म्हणाले, ‘तुझ्या लग्नात आमच्याकडनंच दागिने घ्यायचेस तू ’
‘हो, घेईन’ ती लाजत म्हणाली.
‘कधी आहे लग्न?’ त्यांनी विचारलं.
‘हिचं लग्न पुढच्या वर्षी मे महिन्याच्या आत होईल’ न्यूमरॉलॉजीस्ट म्हणाला.
‘तू म्हणतोस तर होईलच. तुझे अंदाज कधी खोटे ठरतात का?’, शहा साहेब म्हणाले.

हे शहा साहेब म्हणजे चेह-यावर प्रचंड तेज असणारे एक आध्यात्मिक व्यक्ति होते. आपल्या यशाचा अजिबात गर्व नाही. सौम्य, आपुलकीचे बोलणे.  शिवानीला माणसे ओळखता येत. तिनं ‘जय जिनेन्द्र’ म्हणत  त्यांना वाकून नमस्कार केला. मग शहा साहेबांचा निरोप घेऊन ते दोघे तिथनं बाहेर पडले.

जय जिनेन्द्र.... न्यूमरॉलॉजीस्टनं तिला त्या दोन शब्दांची जादू सांगितली होती. ‘जेंव्हा पण तू एखाद्या जैन व्यक्तीला भेटायला जाशील, तेंव्हा तिला 'जय जिनेन्द्र' म्हणत जा. या दोन शब्दात फार मोठी ताकत आहे. तू ज्या कामासाठी त्या व्यक्तिकडे गेली आहेस तिथं तुझं काम सहज होऊन जाईल. हा एक ओपन पासवर्ड आहे, तो तू वापरलास की प्रचंड आध्यात्मिक आणि आर्थिक ताकत असणारे जैन लोक तुला आपली फॅमिली मेंबर म्हणून वागवतील’.

‘मामा. मला भूक लागली आहे...’ ती कळवळून तोंड वाकडं करत म्हणाली. 
‘मला पण. चल आपण कांहीतरी खाऊन घेऊ’
त्यांनी एक चांगलं हॉटेल शोधून काढलं आणि जरा खाऊन घेतलं.

‘चल, आपण आता माझ्या एका संपादक मित्राकडं जाऊ. मी त्याच्याशी बोललोय. तुझे टॅक्सविषयक लेख त्याच्या मासिकात येऊ शकतात. त्या मासिकात तुझे लेख आल्यावर तू टॅक्स कन्सल्टंट म्हणून खूप फेमस होशील, विशेषत: व्यापा-यांच्यात’

मग ते मार्केट यार्डात ‘जैन जागृति’ या मासिकाच्या ऑफिसमध्ये गेले. न्यूमरॉलॉजीस्टनं  शिवानीची संपादक संजय चोरडियांशी ओळख करून दिली. संजयजींनी तिच्याशी थोडावेळ गप्पा मारल्या. तिचं नॉलेज बघून तिला टॅक्सविषयक 12 लेख लिहायला सांगितले. येत्या जानेवारीपासून दर महिन्यासाठी एक लेख. वर्षभर. तिने लगेच होकार दिला.

तिथनं ते दोघे सदाशिव पेठेत आले. तिथं एक टॅक्स कन्सल्टंट न्यूमरॉलॉजीस्टचा जवळचा मित्र होता. न्यूमरॉलॉजीस्टनं त्या दोघांची ओळख करून दिली. तो टॅक्स कन्सल्टंट शिवानीला म्हणाला, ‘माझ्याकडची जादाची कामे मी तुला देत जाईन... शेअरिंग बेसिस वर’

एवढ्यात न्यूमरॉलॉजीस्टला संदीपचा फोन आला,’साहेब, शिवानीची कार्डं तयार आहेत, मी आत्ता नारायण पेठेत आहे, तुम्ही कुठं आहात?’
‘मी सदाशिव पेठेत. भेटूया लगेच’
‘मामा, पण आज माझ्याकडे पैसे कमी आहेत. बाकीचे पैसे तुम्ही द्या संदीपला’ शिवानी म्हणाली.
‘मी नाही देणार, तूच देशील. आत्ता जेवढे देता येतील तेवढे दे, बाकीचे तू मिळवल्यानंतर दे. संदीप इज अ को-ऑपरेटिव्ह गाय’

मग शिवानी आणि न्यूमरॉलॉजीस्टनं संदीपकडनं शिवानीची कार्डं घेतली. 1000 कार्डं. तिनं त्यातल्या 100 कार्डांचा बॉक्स न्यूमरॉलॉजीस्टला दिला.
‘तू महत्वाच्या लोकांना भेटलीस की त्यांना तुझं  कार्ड देत जा’ त्यानं तिला सूचना केली.
संदीपला त्याच्या कामाचे निम्मे पैसे देत म्हणाली, ‘बाकीचे पैसे पुढच्या महिन्यात किंवा आधीच देईन’
नंतर त्यानं ती कार्डं त्याच्या ओळखीच्या अनेक मोठमोठ्या लोकांना दिली. बिल्डर्स, मोठे दुकानदार, ऑफिसर्स, मित्र, नातेवाईक... अगदी योग्य त्या ठिकाणी. तिच्या कार्डाबरोबर तो त्याचेही कार्ड देत असे.
त्यानं तिला ‘रोज तू असं व्हिज्युअलायझेशन करत जा की तुझ्याकडे क्लाएंट्स कामे घेऊन येतात आणि पैसे देऊन जातात असे’ अशी सूचना केली. मनी फ्लो सुरू करण्याच्या अनेक ट्रिक्स तिला सांगितल्या.

‘आज आपली किती काम झाली, नाही? किती मोठमोठ्या लोकांना भेटलो आपण’ ती म्हणाली.
‘आज तारीख किती आहे?’
‘22’
‘22 तारीख, मी आणि तू जेंव्हा जेंव्हा एकत्र असू, तेंव्हा तेंव्हा तुला मोठमोठ्या संध्यांचे दरवाजे खुले होणार आहेत’

या घटनेला चार दिवस झाले, पण तिला एकही क्लाएंट मिळाला नाही. दोन-तीन फोन आले, पण पुढं कांही प्रगती झाली नाही. तिचा धीर खचू लागला.
‘मामा... कसं होणार माझं ? एक पैसा देखील मिळाला नाही अजूनपर्यंत. असंच चाललं तर मी संदीपचे पैसे कसे देणार? आणि तुम्हाला माझ्या वाढदिवसाचे जेवण कसे देणार? माझ्या वाढदिवसाला आता फक्त बारा दिवस राहिले आहेत’
‘हिम्मत ना हार मेरी भांजी.... तुझ्या वाढदिवसाला तू मला जेवण देशील. तू मिळवलेल्या पैशातनं. तेही ठरल्याप्रमाणे हॉटेल सुकांतामध्येच. संदीपचे पैसेही तू ठरलेल्या वेळेच्या आधीच देशील’
‘तसं झालं तर बरं होईल, पण मला नाही वाटत तसं होईल म्हणून’
‘तसंच होणार आहे. नेव्हर थिंक निगेटिव्ह. आणि आजवर मी म्हणालो ते कधी खोटं झालंय का?’
न्यूमरॉलॉजीस्टच्या बोलण्यानं तिला थोडा धीर मिळाला.
‘शिवानी, एक गोष्ट लक्षात ठेव... पैशाची अडचण आहे, म्हणून उगीचच क्लाएंटच्या मागं लागू नको. तुला गरज आहे असं कधीही वाटू द्यायचं नाही. कमी पैसे घेऊन काम करायचं नाही. तुझी फी जरा जास्तच सांगत जा. आणि तुझ्याकड कांही काम नसलं तरी तू खूप बिझी आहेस असंच लोकांना दिसलं पाहिजे..’   
दुस-याच दिवशी एका मोठ्या उद्योजकानं तिला भेटायला बोलावलं. त्याला त्याच्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन करायचं होत. मीटिंग झाली. तिला ते काम मिळाण्याची शक्यता होती.

त्यानंतर  आठवडाभरातच  न्यूमरॉलॉजीस्टच्या एका मित्राची एक प्रॉब्लेमॅटिक केस तिच्याकडं आली. त्यानं तिला अॅडव्हान्स म्हणून मोठी रक्कम देऊ केली. ती म्हणाली, ‘आत्ता पैसे देण्याची गरज नाही, नंतर बघू.  त्यावेळी न्यूमरॉलॉजीस्ट देखील तिथं  हजर होता. तो तिला म्हणाला, ‘घेऊन टाक पैसे. तुला नको असतील तर ते मला दे, मी माझ्याकडे ठेवतो’

तिनं ते पैसे घेतले आणि आपल्या हातातच धरून बसली. तो मित्र गेल्यावर ती न्यूमरॉलॉजीस्टला म्हणाली, ‘मामा... एवढे पैसे... माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही, मी स्वप्नात तर नाही ना?’
‘ही तर केवळ सुरवात आहे. पुढं बघच काय-काय  होतंय ते. आणि तुला हे स्वप्न वाटत असेल तर स्वत:ला चिमटा घेऊन बघ. थांब, स्वत:चा स्वत:ला नीट चिमटा घेता येत नाही, मीच घेतो तुझा चिमटा’ असे म्हणत त्याने तिच्या हाताकडे आपली बोटं नेण्याचे नाटक केले. शिवानी घाबरण्याचे नाटक करत म्हणाली, ‘नको sss मामा....’ 

आणखी तीन दिवसांनी तिचा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी ती न्यूमरॉलॉजीस्टला घेऊन ट्रस्ट रजिस्ट्रेशनच्या ऑफीसमध्ये गेली. एका कामाच्या बाबतीत तिच्या एका मित्राचा सल्ला घ्यायला. त्यानं तिला सांगितलं, ‘हे मोठं काम आहे. तुला जास्तीत जास्त हजार रुपये खर्च येईल, पण तू त्या पार्टीला तुझी फी 35 हजार रुपये सांगितली पाहिजेस. काम मोठं आहे, पार्टी पण मोठी आहे, तिला कसं पटवायचं हे तू बघ’.

त्यादिवशी दुपारी  उशीरा शिवानी आणि न्यूमरॉलॉजीस्ट हॉटेल सुकांतामध्ये जेवायला गेले. तिनं जेवणाची ऑर्डर दिली.
‘इथं आपण राजस्थानमध्ये असल्यासारखं वाटतं,  नाही?’ ती म्हणाली.

जेवताना गप्पा मारताना तो तिला म्हणाला, ‘किती पैसे मिळाले आजपर्यंत तुला?’
‘गेल्या आठ दिवसात माझ्याकडे 25 हजार रुपये कॅश जमा झालेले आहेत, मामा’
’25 हजार रुपये? आठ दिवसात?’, तो आनंदून म्हणाला, ‘छान... तू प्रमाणापेक्षा जरा जास्तच मोटिव्हेट झालेली दिसतेस. या गतीनं तुला महिन्याला लाखभर मिळायला हरकत नाही. ठीक आहे, आता पुढे काय विचार आहे?’ 
‘आता मी होस्टेल सोडणार आणि कोथरूडला रहायला जाणार लवकरात लवकर. सहा महिन्यांच्या आत. भाड्याच्या फ्लॅटमध्ये. माझं घर आणि ऑफिस तिथंच असेल’
‘जाशील. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. वेळेच्या आधी. तुला आता एखाद्या असिस्टंटची गरज पडेल. मी करेन तुझ्याकडे काम असिस्टंट म्हणून’ तो तिच्या  डोळ्याशी डोळे भिडवत म्हणाला.
‘तुम्हाला काय गरज आहे दुस-या कोणाकडे काम करायची?’
‘तू दुसरी कोणीतरी नाही आहेस, आणि मला तुझ्याकडं काम करायचं आहे ते तुला केवळ मदत व्हावी म्हणून नाही, तर तुझ्यावर वॉच ठेवण्यासाठी आणि तू भरकटू नयेस म्हणून’
‘मी कशाला भरकटेन? मी नाही भरकटणार....’
‘जास्त पैसे यायला लागले की भले-भले भरकटू शकतात. विशेषत: एकटे रहाणारे’
ती विचारात गढली.

तो म्हणाला, ‘हे बघ तुला भरपूर कामं मिळणार आहेत, त्यातनं तुला भरपूर पैसे मिळणार आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं पाउल कधीही वाकडं नाही पडायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुझ्या हातून क्लाएंट नाराज होईल अशी एकही गोष्ट घडता कामा नये. सगळ्यांची कामे तू वेळच्या वेळी पूरी करायला पाहिजेस. तुझे क्लाएंट्स हेच तुझी जाहीरात करणारे लोक असणार आहेत, तीही फुकट जाहिरात करणारे. तेंव्हा त्यांना कधी दुखवू नकोस’ 
‘बरोबर’
‘येणारा पैसा उधळू नकोस, पण कंजूषीही करू नकोस. मिळवलेल्या पैशांचा चांगला उपभोग देखील घेतला पाहिजे. भरपूर पैसा मिळवला पाहिजेच, पण जर त्याचा उपभोग घेतला नाही तर त्याची किंमत झिरो आहे. पैसा मिळव, त्यातला कांही भाग कंपलसरी बचत कर, आणि बराचसा भाग स्वत:साठी, घरच्यांसाठी खर्च कर. गावी जाशील तेंव्हा आई वडिलांसाठी कांहीतरी भेट वस्तू घेऊन जात जा, योग्य त्या मित्र-मैत्रिणींना वेळ प्रसंगी, त्यांना अडीअडचणीला मदत कर. दर वेळी. येणारे पैसे बॅन्केत सुरक्षित ठेवत जा.  महत्वाचं म्हणजे अयोग्य लोकांना एक पैशाचीही मदत करू नकोस आणि निगेटिव्ह लोकांच्यापासून दूरच रहात जा. अधनं मधनं थोड डोनेशन देत जा... देवळाला नको, तर अनाथ आश्रमाला, अपंगांच्या संस्थेला वगैरे’
‘हो’
‘आणखी एक म्हणजे तुझा चेहरा अनेकदा उदास, कन्फ्यूजड आणि चिंताग्रस्त दिसतो. त्यामुळे लोक तुला बघून बिचकू शकतात. तू नेहमी कॉन्फिडंट, हसतमुख आणि आनंदी दिसली पाहिजेस’

तिनं तिचा चेहरा लगेच टूथपेस्टच्या जाहिरातीतील मॉडेलसारखा केला.
तो म्हणाला, ‘आता बघ तू किती सुंदर दिसतेस. तू नेहमी अशीच सुंदर, प्रसन्न आणि टेन्शन फ्री दिसली पाहिजेस’

‘मामा, तुम्ही खरंच येणार आहात माझ्याकडे कामाला?’
‘छे... मी गम्मत केली तुझी. तुझ्यावर वॉच ठेवायला मला तुझ्याकडं यायची गरज नाही. मी कुठेही असलो तरी माझा तुझ्यावर वॉच असतोच. सतत जागता पहारा. पण हां, तुझं कांही महत्वाचं काम असेल आणि तू बोलावलंस तरच मी जरूर येईन...ओके?’
‘चालेल’

इतक्यात वेटरने बिल आणून दिले. तिने नेमके पैसे त्याला दिले. वेटर पैसे घेऊन काउंटरकडं गेला.
न्यूमरॉलॉजीस्ट म्हणाला, 'तू त्याला टिप दे... त्यानं आपल्याला चांगली सर्व्हिस दिली. प्रेमान बोलला. ते त्याचं काम असलं तरी निदान आनंदाच्या दिवशी तरी आपण छोट्या-छोट्या गोष्टींतून लोकांना खूष केलं पाहिजे. त्याचे आपल्याला पॉझीटीव्ह रिझल्ट्स मिळतात'
'किती देऊ?'
'जेवढी तुझी इच्छा असेल तेवढी'
त्यानं वेटरला बोलावलं. तिनं त्याला ब-यापैकी टिप दिली.


‘या हॉटेलचे मालक माझे चांगले मित्र आहेत. त्यांना आपण भेटूया जाता जाता’ तो म्हणाला.
पण आज ते लवकर निघून गेले होते. त्यानं मॅनेजरला त्याचं आणि शिवानीच कार्ड दिलं. म्हणाला. ‘विजयजीं माझे मित्र आहेत, त्यांना द्या ही कार्डं’

‘आता आपली आजची शेवटची दोन कामं राहिली आहेत....’ तो म्हणाला.
‘कोणती?
‘पहिलं काम म्हणजे आपल्याला लॉटरीची तिकिटं घ्यायची आहेत. दुसरं म्हणजे मी तुला तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट द्यायची आहे. खरं म्हणजे मी तुला जे कांही मोटीव्हेट केलं आहे, त्याच्यापेक्षा मोठी गिफ्ट मी तुला देऊ शकत नाही. तरी सुद्धा तुला जे कांही मागायचं आहे ते माग’
‘मला कॉफीचा मग पाहिजे’
‘अरे.... मागून मागून काय मागितलंस?’
‘नाही, मला कॉफीचा मगच पाहिजे’
‘ओके, आलं लक्षात. रोज कॉफी पिताना तो मग बघून तुला माझी आठवण येईल. तुला सुरक्षित वाटेल... आपला मामा आहे आपल्या बरोबर. आपल्याला कसलाही धोका नाही... चल, कुठनं घ्यायचा मग,  मग ?’
‘तुळशी बागेत मिळतात स्वस्तात मस्त’ 

दोघं आधी एका लॉटरी तिकिटाच्या दुकानात गेले. त्यानं तिला महाराष्ट्र राज्य लॉटरीची चार तिकिटं निवडायला सांगितली. चार वेगवेगळ्या सिरीजची. तिनं निवडलेली चार तिकिटं त्यानं आपल्याकडं घेतली. प्रत्येक तिकिट 50 रुपयाचं. एकूण दोनशे रुपये झाले. तो म्हणाला, ‘या प्रयोगात आपला फिफ्टी-फिफ्टी सहभाग असायला पाहिजे, प्रयोग यशस्वी होण्यासाठी. तू मला शंभर रुपये दे’
तिनं त्याला 100 रुपये दिले. मग तिच्याकडे सगळी तिकिटं देत तो म्हणाला, ‘ही तिकिटं तुझ्याकडंच ठेव. लागली लॉटरी तर मला तू बक्षीसातले निम्मे पैसे द्यायचे’
‘निम्मे पैसे तुम्हाला द्यायचे? मला वाटलं ही तिकिटं तुमच्याकडनं मला गिफ्ट म्हणून आहेत’, ती हसत म्हणाली.
‘काळजी करू नकोस, मी ते पैसे तुलाच परत देणार आहे, लगेच. पण अल्वेज बी  लॉयल विथ मी फॉर युअर ओन बेनेफिट्स, बिकॉज आय एम युवर सेव्हिअर’
‘पण हा प्रयोग काय आहे?’
‘हा मनी अॅट्रॅक्शनचा न्यूमरॉलॉजीकल प्रयोग आहे. मी तुला आताच त्यामागचं रहस्य सांगणार नाही, नंतर सांगेन. पण मी जे सांगेन ते दुस-या कोणाला सांगायचं नाही. धिस सिक्रेट इज ओन्ली फॉर राईट अॅण्ड स्पेशल पीपल’
 
मग ते तुळशीबागेत गेले आणि एका दुकानातून तिला आवडलेला मग तिनं घेतला. त्यानं त्याचे पैसे दिले.

मग तो तिला म्हणाला, ‘आजपासून आपलं सारखं सारखं भेटणं बंद. फोन पण कांही महत्वाचं काम असेल तरच करायचा. आता तू तुझ्या कामावर फोकस कर. चल, बाय... टाटा..... मी आता दुसरी शिवानी शोधतो..’
‘तुम्हाला नाही मिळणार दुसरी शिवानी...’ ती म्हणाली.
‘आय नो. मी सहज गम्मत म्हणून म्हणालो. 4-8 कधी कायमचे दूर जात नाहीत. ठरवले तरी. आणि तू तर स्पेशल केस आहेस. हे जे कांही अनबिलीव्हेबल घडलंय, तेही इतक्या झटपट, त्यामागं एक वेगळच रहस्य आहे.  त्याचा कांहीसा उलगडा मला झाला आहे. योग्य वेळी मी तुला ते सांगेनच. सध्या बाय बाय....’

(पुढे चालू)या कथेचे आधीचे तीन भाग:
शिवानी द ग्रेट
शिवानी द ग्रेट: भाग 2
शिवानी आणि मोटीव्हेटर  
पुढचा भाग:
गुडबाय शिवानी!
हेही वाचा:  
पत्रमैत्रीण 
अंजलीना ब्यांडची कथा 
ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा