Advt.

Advt.

Monday, July 21, 2014

सुदीपच्या लग्नाचा प्लॅन

-महावीर सांगलीकर


सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न करणार नाही’ असं तो नेहमी म्हणत असे. कारण काय तर त्याच्या आई-बापाची सतत होणारी विनाकारण भांडणे त्यानं लहानपणापासून बघितली होती. पुढं त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यावर कांही दिवसांनीच त्या भावाची आणि त्याच्या बायकोची छोट्या कारणावरून मोठी भांडणे झाली. भावाची बायको माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. असले प्रकार शेजारी-पाजारीही बरेच घडले होते. सुदीपचे अनेक विवाहित मित्रही त्याला आपापली बायको कशी भांडखोर आहे हे सतत सांगत असत. इतकंच नाही तर सुदीपचा बॉसदेखील बायकोला घाबरून असे, ती भांडते म्हणून. त्यामुळे विषाची परीक्षा घ्यायची कशाला? असं सुदीपचे स्पष्ट मत होते.

त्याला भांडणं हा प्रकार अजिबात आवडत नसे, आणि लग्न हे भांडण्यासाठीच करतात असा त्याचा रास्त समज झाला होता.

एके दिवशी कुणी एक मध्यस्थ सुदीपसाठी स्थळ घेऊन आला. त्याच्या आई-वडिलांना भेटला. सुदीपच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी आणखीन एक प्रयत्न करायचं ठरवलं.

संध्याकाळी सुदीप ऑफिसमधनं परत आल्यावर त्याच्या आईनं त्याला नवीन स्थळाबद्दल सांगितलं. तो आईवर उचकलाच. म्हणाला, “तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं कांही सुचत नाही का? परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी घर सोडून निघून जाईन.... सांगून ठेवतो”
“जा म्हणे. पण आधी त्या पोरीला बघून घे. या रविवारी आपण तिच्या घरी तिला बघायला जायचं आहे” आई म्हणाली.

मुलगी पहायला जाणे हा प्रकार तर त्याला अजिबात आवडायचा नाही. तो आईवर परत खेकसला, “मुलगी म्हणजे काय सिनेमा आहे का बघायला जायला?”
पण त्याच्या आईचं टुमणं सुरूच राहिले. मग त्यानं ओरडून सांगितलं, ‘परत जर माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी जीव देईन’. तो तसं कांही करणार नाही हे आईला माहीत होते, त्यामुळे ती शांतपणे म्हणाली, “दे म्हणे, पण आधी त्या पोरीला बघून घे. ती शांत स्वभावाची आहे, तुझ्याशी भांडणार नाही अजिबात”
“पण तू तिच्याशी भांडशील ना, त्याचं काय? एका सुनेला पळवून लावलंस, आता आणखी एका पोरीचं वाटोळं  करायचं आहे का तुला? दादाचं वाटोळ केलंस आता माझंही वाटोळं करायचं आहे का तुला?”
त्याचं हे बोलणं त्याच्या आईला फारच लागलं. “रहा असाच बिन लग्नाचा” असं रागानं म्हणत ती स्वयपाकघरात निघून गेली.

एक आठवडा झाला. सुदीप संध्याकाळी ऑफिसवरनं घरी आला तर घरात कोणी पाहुणे आले होते. दोन मुली आणि एक वयस्क जोडपे. हे कोण असावेत याचा तो अंदाज बांधत होता, तेवढ्यात त्याची आई म्हणाली, “अरे हे पाहुणे कोण आहेत माहीत आहे का?”
त्यानं ‘नाही’ अशी मान हलवली.
“हे तुझ्या दीदीच्या सासरवरून आलेत. तुझ्या भाऊजींच्या जवळच्या नात्यातले आहेत. सहज पुणे फिरायला आलेत”
तसा तो मनातनं घाबरलाच होता, एखादेवेळी हे लोक आपल्याला पहायला वगैरे आलेत की काय या कल्पनेनं. पण हे दीदीच्या सासरकडचे पाहुणे आहेत आणि पुणे फिरायला आलेत हे ऐकून त्याला हायसं वाटलं. त्यानं त्या सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. त्या मुलींची नावं सुनिता आणि अनिता अशी होती.

दुस-या दिवशी तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी परत आला तेंव्हा सुनिता घरी होती, पण तिचे आईवडील आणि अनिता त्याला दिसले नाहीत. त्यानं आईला विचारलं, तर ती म्हणाली, “ते पुणे पहायला गेलेत आणि तसंच पुढं त्यांच्या गावी जाणार आहेत”
“आणि सुनिता नाही गेली?” त्यानं विचारलं.
“नाही. ती आता आपल्याकडं थांबणार आहे थोडे दिवस. जॉब शोधायचा आहे तिला पुण्यात”

कुणाला जॉब पाहिजे असला तर सुदीपच्या अंगात उत्साह संचारत असे. त्यानं लगेच तिची चौकशी करायला सुरवात केली. शिक्षण, अनुभव वगैरे. म्हणजे एक प्रकारे तिचा इंटरव्ह्यूच घेतला. ती बरीच शिकलेली होती आणि थोडासा अनुभव होता तिला. शिवाय ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न अडखळता पटापट देत  होती. “तुला उद्याच जॉब मिळेल आमच्याकडे” तो म्हणाला, “उद्या माझ्याबरोबर चल आमच्या कंपनीत”. तो इतक्या आत्मविश्वासाने  “तुला उद्याच जॉब मिळेल” म्हणण्याचं कारण म्हणजे तो त्याच्या कंपनीत एचआर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होता आणि तिथं सुनिताला योग्य अशी नोकरी उपलब्ध आहे हे त्याला माहीत होतं. शिवाय सुनिता सहज सिलेक्ट होईल याचीही त्याला खात्री होती.
दुस-या दिवशी ती सुदीपबरोबर त्याच्या कंपनीत गेली, त्याच्या कारमध्ये  बसून.

सुदीपनं तिची एचआर मॅनेजरशी गाठ घालून दिली. सुनितानं अगदी आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. ती फारच हुशार दिसली. कंपनीनं तिला जॉब द्यायचे ठरवले. महिन्याला चाळीस हजार रुपये पगाराची ऑफर दिली. पण तिनं तिथं काम करायला नकार दिला. एवढ्या कमी पगारात काम करणं शक्य नाही असं तिनं सांगितलं. तिला पगाराची अपेक्षा विचारल्यावर तिनं असा आकडा सांगितला की इंटरव्ह्यू घेणारे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. ती पटकन उठली आणि निघून गेली. सुदीपच्या घरचा पत्ता तिला माहीतच होता. ती सरळ घरी गेली.

संध्याकाळी सुदीप घरी गेला तेंव्हा जरा रागातच होता. अशी चांगली ऑफर असताना सुनितानं ती संधी सोडली हे त्याला आवडलं नव्हतं.

तो तिला म्हणाला, “तुला नोकरीचा फारसा अनुभव नाही मग तू एवढ्या मोठ्या पगाराची अपेक्षा का केलीस?”
“कारण मला जॉब मिळवण्याची घाई नाही’ ती शांतपणे आणि हसत म्हणाली, ‘पुण्यात इतक्या कंपन्या आहेत, तुमच्याच कंपनीतच जॉब करायला पाहिजे असं कुठं आहे? मला पाहिजे तसा जॉब मिळेलच दुसरीकडं कुठं तरी”

पण ती जॉब शोधायला जातच नसे. घरीच सुदीपच्या आईला स्वयपाकात, बाकीच्या कामात मदत करत असे. मग  मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स असल्या विषयाची पुस्तके वाचत असे. सारखा कांहीतरी विचार पण करत असे. तिचं आणि सुदीपच्या आईचे बरंच सूत जमलं होतं.

तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं रूप सर्वच त्याला आवडलं होतं. सुनिता जवळपास नसताना एकदा तो आईला लाजत लाजत आणि लाडीगोडी लावत  म्हणाला, “आई, सुनिता मला आवडली आहे. खूप छान मुलगी आहे. तिला विचार ना, माझ्याशी लग्न करेल का म्हणून.. तुझ्याशी पण तिचं चांगलं पटतं”
“अरे,” आई म्हणाली,’ “तिचं लग्न आधीच ठरलंय..”
हे ऐकून त्याचा चेहरा सर्रकन उतरला.
“आणि तू तर लग्न करायचं नाही असं म्हणतोस ना?”
त्यानं मान खाली घातली.
“काळजी करू नकोस,”  आई म्हणाली, “आपण दुसरी मुलगी बघू तुझ्यासाठी”
“नाही... नको.. अजिबात नको...” तो म्हणाला.

दुस-या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेंव्हा सुनिता त्याला दिसली नाही.
त्यानं आईला विचारले, “सुनिता कुठं दिसत नाही ती?”
“ती गेली तिच्या गावी” आई म्हणाली.
“का? आणि अशी अचानक? मला न सांगता?” तो नाराज होत म्हणाला.
“तुला कशाला सांगायला पाहिजे? मला सांगून गेली ती” आई त्याच्या चेहऱ्याकडं बघत खोचकपणे म्हणाली.
सुदीप केविलवाणं हसला.
आई म्हणाली, “खूपच आवडलेली दिसते तुला ती? तुला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे का?”
“पण तिचं लग्न ठरलंय असे तूच म्हणालीस ना?”
“ते बघता येईल काय करायचं ते ... मला सांग तुला तिच्याशी लग्न करायचं आहे का?”
“हो” तो लाजत लाजत म्हणाला.
“मग ऐक नीट. हीच ती मुलगी, जिचं स्थळ तुझ्यासाठी आलं होतं. पण तू तिला पहायला जायला देखील तयार नव्हतास. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन आखला. ती आपल्या घरी येऊन राहिली. ती तुला पसंत पडणार याची आम्हाला खात्रीच होती”
“पण मग तर तिनं आमच्या कंपनीतला जॉब का नाकारला?”
“कारण तिला आधीचाच चांगला जॉब आहे. तुझ्याएवढाच पगार आहे तिला.... खास रजा काढून प्लॅनमध्ये भाग घेतला तिनं”
“कुठं जॉब करते ती?”
“पुण्यातच”
“मग आता पुढं काय?”
“पुढं काय? तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. येईलच थोड्या वेळात ती”
“येईलच? ती गावी गेली ना?”
“ती पण एक थापच होती” आई हसत हसत म्हणाली.
“चांगला प्लॅन होता”
“तिनंच आखला होता....”
“आं....” त्याला आश्चर्य वाटलं.
“अरे, पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली बरं का..”
“कोणती गोष्ट?”
“सुनिता थोडी भांडखोर आहे”
“चालेल.... नाहीतरी तुला पाहिजेच ना कुणीतरी भांडायला!”

हेही वाचा:
शिवानीचं लग्न: भाग 1 
एक न-प्रेमकथा
गौरीचं लग्न


No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा