Advt.

Advt.

Monday, June 9, 2014

मुंबईवारीची पूर्वतयारी

-महावीर सांगलीकर


हे पोलीस प्रकरण जरा गंभीरच होतं. गुरुवारी जाऊ मुंबईला. आजच रिझर्वेशन करून ठेवायला पाहिजे. आपल्याकड फक्त चार दिवस आहेत. एक वकील शोधायला पाहिजे. आणखीही कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे.

 कोणाला भेटावं बरे? अनेक लोकांची नावे डोळ्यासमोर तरंगायला लागली.....
 मी टेलेफोन बूथवर जाऊन लगेच एक फोन लावला...

‘पी. आय. कदम बोलतोय...’
‘मी महावीर....’
‘बोल महावीरा... आज कशी काय आठवण झाली माझी....’
‘संकट... संकट काळात मला तुझीच आठवण होते....’
‘काय लफडं केलंस...?’
‘लफडं नाही.... वेगळीच भानगड आहे.  सांगतो.. पण मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे... आता कुठं आहेस तू?’
‘एक मर्डर झालाय, तिकडे आहे. यायला उशीर होईल..’
‘मग कधी भेटू?’
‘रात्री घरी ये... जेवायला’
‘ठीक आहे... जरा लवकरच येतो... सात वाजता... म्हणजे बोलता येईल भरपूर... बरंच कांही सांगायचं आहे तुला..’
‘सातला नको... आठला ये... मी बरोबर आठला घरी हजर होईन...’
‘ओके, येतो...’

दुपारी मी मुंबई पोलिसांच्या मेलला उत्तर दिले. गुरवारी दुपार पर्यंत येत आहे  म्हणून.

दिनकर कदम ... माझा कॉलेजमधला मित्र. पुढे पोलिस इन्सपेक्टर झाला. गेली दोन वर्षे पुण्यातच होता. गेल्या वर्षी एक दोनदा त्याच्या घरी जाऊन भेटून आलो होतो. आज पुन्हा जाणे झाले.

रात्री आठ वाजता मी त्याच्या घरी गेलो तेंव्हा तो अजून यायचा होता. वहिनींनी मस्तपैकी चहा केला. चहा घेतला, नंतर एक मासिक वाचत बसलो...

तेवढ्यात दिनकर आला.
मी विचारलं, ‘कुणाचा मर्डर झाला?’
‘एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचा...’
‘मग आता खूनी कधी सापडणार?’
‘पकडलं पण तिला..’
‘तिला? म्हणजे खूनी महिला होती?’
‘होय.. त्याची मैत्रीणच होती ती. त्यानं तिच्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून तिनं त्याचा चक्क खून केला’
‘कमाल आहे.. स्त्रीनं पुरुषाचा खून करणं म्हणजे जरा अवघडच आहे’
‘त्यात काय अवघड... या बायका इरेला पेटल्या तर टोकाला जाऊ शकतात एकदम. सरळ गोळ्या घातल्या त्याच्या डोक्यात त्या बयेनं’
‘कमाल आहे... मग तिथंच बसली असेल रडत... तुझं खूनी शोधायचं काम सोपं झालं असेल’
‘छ्या छ्या.... ती चालली होती पळून.... मोबाईल फोनचं लोकेशन ट्रेस करून पकडलं तिला लोणावळ्याजवळ... जरा जास्तच हुशार होती..फोन स्वीच ऑफ ठेवला होता बराच वेळ, आणि आडवाटेनं तिची गाडी पळवत होती..’
‘माफिया गॅंगमधली होती की काय ती बया?’
‘माफिया नाही रे... बड्या घरची... बाप उद्योगपती आहे. सुटणार बहुतेक... मी कितीही भक्कम केस तयार केली तरी...’

ही घटना ऐकून मी जरा धास्तावलोच. म्हणालो, ‘अलीकडच्या बायका परफेक्ट गुन्हे करायला लागल्यात की का?’
‘अरे काय सांगायचे एकेक किस्से तुला.... डोकं चक्रावून जातं... एकेका किस्स्यावर एकेक कादंबरी लिहू शकशील तू... साले ते पुरुष गुन्हेगार बिनडोकच असतात अस वाटायला लागलाय मला आता. नीट प्लॅनिंग करताच येत नाही त्यांना बहुतेकदा. मग दोन फटके दिले की गुन्हा कबूल करतात. पण या बाया जबरदस्त प्लॅनिंग करतात. पकडल्या गेल्या तर मनाचा थांगपत्ताच लागू देत नाहीत. कितीही फटके द्या... हजारो वर्षे नव-यांचा मार खाऊन खाऊन त्यांच्या जिन्समध्ये निगरगट्टपणा आलेला असावा’
‘मग पुरुष बायकांना बिनडोक का समजतात’
‘आपला इगो कुरवाळण्यासाठी, दुसरं काय... बर ते जाऊंदे, तू काय म्हणत होतास दुपारी फोनवर?’

मग मी त्याला दिशापुराण ऐकवलं. तिनं माझ्यावर पोलीस केस केली असल्याचं सांगितलं.
त्यावर दिनकर म्हणाला, ‘तुला माहिती आहे कायदे बायकांच्या बाजूने आहेत. तू चांगलाच अडकलेला दिसतोस.....’
मग विचार करत म्हणाला, ‘थांब, मी शेख साहेबांना फोन लावतो. माझी चांगली ओळख आहे त्यांच्याशी’

मग दिनकरनं लॅंडलाईनवरून शेख साहेबांना फोन लावला. त्या दोघांचं माझ्या संदर्भात थोडं बोलणं झालं. बोलता बोलता अचानक दिनकरचा चेहरा पडला. तो शेख साहेबांना म्हणाला, ‘एक मिनिट, मी तुम्हाला मोबाईल वरून फोन लावतो’ मग त्यानं फोन ठेवला आणि खिशातला मोबाईल काढून त्यावरची बटणे दाबतच तो घराच्या बाहेर गेला. मी ओळखलं, हे कांहीतरी जास्तच सिरिअस दिसतंय. काय बोलणं होतंय ते मला कळू नये म्हणून तर दिनकर घराबाहेर जावून बोलत आहे.

थोड्या वेळानं दिनकर आत आला. म्हणाला, ‘तुझ्यावर काय केसेस केल्या आहेत त्या बाईनं,  ते माहीत आहे का तुला?’
‘हॅरॅसमेंट... टॉर्चरिंग.....’ मी म्हणालो
‘त्या केसेस तर आहेतच, पण फसवणूक, ब्लॅंक फोन कॉल्स, ब्लॅक मेलिंग अशा केसेस पण आहेत तुझ्यावर...’
माझा चेहरा सर्रकन उतरला.
‘मग आता?’ मी कसंबसं म्हणालो..
‘मग काय....? अवघड आहे रे तुझं... मी मला जे जमेल ते करेन तुझ्यासाठी, पण आधी तू एखादा चांगला वकील गाठ’

त्या रात्री दिनकरच्या घरी मी जेवलो खरा, पण ते स्वादिष्ट जेवण मला कांही भावले नाही त्यावेळी.

दिनकरचा सल्ला मानून मी दुस-या दिवशी एक ओळखीचा वकील गाठला. तो तरूण होता आणि हुशारही होता. त्यानं माझी केस ऐकून घेतली आणि म्हणाला, ‘कशाला काळजी करता? आपणच तिच्यावरच केसेस ठोकू. नाक दाबले की तोंड उघडते. सध्या तुम्ही मुंबई पोलिसांना जाऊन भेटा. तोपर्यंत मी तिच्यावर केस ठोकण्याची तयारी करतो. केस इथनं पुण्यातंच करू... बसू दे हेलपाटे घालत पुण्याला’
‘पण मला तिथं अटक-बिटक झाली तर?’
‘कांही काळजी करू नका, आम्ही सोडवू तुम्हाला दोन दिवसात’
‘दोन दिवसात? मी गुरुवारी पोलिसांना भेटणार आहे. शुक्रवारच्या आत सोडवले नाही तर सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रहावं लागंल मला...’ 
‘अहो माझ्यावर विश्वास ठेवा... आणि समजा रहावेच लागले चार दिवस पोलीस कोठडीत, तर तिथल्या अनुभवावर एखादी कथा-कादंबरी लिहिता येईल तुम्हाला... आयतीच संधी मिळाली असं समजायचं. नाहीतरी तिथं आरोपी सोडून बाकीच्यांना प्रवेश नसतो. हाहाहा .... जस्ट किडिंग... पण खरंच असं झालं तर मराठी साहित्यात क्रांती होईल... त्या पाणचट पुणेरी कादंब-या वाचून मराठी वाचक कंटाळले आहेत आता...’
'अहो मी पण पुणेकर लेखक आहे आता..' मी म्हणालो
'तुम्ही कसले पुणेकर, तुम्ही तर सांगलीकर. फार तर चिंचवडकर म्हणता येईल तुम्हाला. तुमची भाषा अस्सल मराठी आहे राव'

हा वकील जरा जास्तच आगाव आहे असे मला वाटले. पण त्यानं परत एकदा सांगितलं, ‘तुम्ही काळजी करू नका राव, मी सोडवतो तुम्हाला लगेच, जर अटक झाली तर’ 

वकिलाचा निरोप घेवून मी सरळ माझ्या काकांच्याकडे गेलो. दिशा प्रकरण आमच्या घरी माहीतच नव्हते. ते सांगायची गरज पण नव्हती. पण आता प्रसंगच असा आला होता की घरी कोणाला तरी सांगणं गरजेचं होते. मी काका आणि काकूला हे  प्रकरण सांगितलं. त्यांनी डोक्याला हात लावला. कांही सल्ले दिले. त्यावेळी माझ्या पाकिटात दिशाचा फोटो होता. मी तो काकूला दाखवला.
‘छान आहे की मुलगी’ काकूने आपले मत दिले.

नंतर मी सायबर कॅफेत गेलो, ग्रुप्समध्ये एक पोस्ट टाकली:
त्या मुंबई गर्लने माझ्या विरोधात मुंबई पोलीसात तक्रार नोंदवली आहे. गुरुवारी सकाळी मी मुंबईला जात आहे. मुंबई पोलिसांना भेटायला. हे प्रकरण गंभीर आहे. यात मला तर त्रास होणारच आहे, पण त्या मुलीलाही त्रास होऊ शकतो. मला माझी काळजी नाही, पण त्या मुलीची मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, एक काम करा, तिच्या भल्यासाठी प्रार्थना करा. माझ्यासाठी नाही केली तरी चालेल
–महावीर’   

त्याकाळी इंटरनेटवर माझी शिकागोच्या फादर जेकब यांच्याशी ओळख झाली होती. ते आमच्या अनेक ग्रुप्सचे सभासद होते. त्यांना हे मुंबई गर्ल प्रकरण माहीत होतंच, पण त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. वरची पोस्ट वाचून दुस-या दिवशी त्यांची मला इमेल आली:

महावीर, काल तुझी पोस्ट वाचल्यावर मी लगेच मनोमन तुझ्यासाठी आणि तुझ्या मैत्रिणीसाठी खास प्रार्थना केली. तुम्हा दोघानाही कांही त्रास होणार नाही. देव तुमचं भलं करो...’

तसं बघितलं मी देव वगैरे कांही मानत नाही. पण प्रार्थनेतली शक्ति, मोठ्यांचे आशीर्वाद यावर माझा नक्कीच विश्वास आहे. फादर जेकब यांच्या आशीर्वादानं माझ्या डोक्यावरचं ओझं थोडं कमी झालं.

चला उद्या सकाळी मुंबईला जायचंय. एकट्यानंच.... प्रगती एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलेलंच आहे.

रात्री दिशाला फोन लावला.
‘येणार आहात ना उद्या मुंबईला?’ तिनं विचारलं.
‘होय, तेच सांगायला मी फोन केलाय... सकाळी निघतोय इथनं. पण मी काय सांगितलं  होतं ते लक्षात आहे ना? तू शक्यतो येवू नकोस तिथं...’
‘पोलीस म्हणाले की मी तिथं यायला पाहिजे.... ‘
‘...... ठीक आहे, मग मी असताना येवू नकोस....’
‘तुम्ही आल्यावरच ते मला फोन करून बोलावून घेणार आहेत... दोघांना पण कांही प्रश्न विचारणार आहेत’
‘छे.... अवघड आहे.... .. ठीक आहे, पण माझ्याकडे बघू नकोस तिथं आल्यावर....’
‘पोलीस म्हणाले, आधी तू त्याला ओळखले पाहिजेस... ओळख परेड का काय असते ते घेणार आहेत... त्यामुळं मला तुमच्याकडं  बघावंच लागेल....’
तिच्या या बोलण्यानं मला पुन्हा टेन्शन आलं.... म्हणालो, ‘दिशा मला तुझी काळजी वाटतेय. माझी पण वाटतेय. मी एकटाच येतोय मुंबईला. माझ्याबरोबर मदतीला कोणीच नाही. मुंबईत ओळखीचं कुणी नाही. उद्या मला अटक झाली तर माझं कसं होणार?’
‘तुम्ही काळजी करू नका..... . मैं हूं ना....मी तुम्हाला कांही होऊ देणार नाही'
‘पण गेल्या वेळी तूच तर म्हणालीस की तू कांही मदत करू शकणार नाहीस म्हणून...’
‘म्हणजे केसच्या बाबतीत मी कांही मदत करू शकत नाही सध्या, पण तुम्हाला अटक झाली तर मी लगेच सोडवीन तुम्हाला. मी स्वत: जामीनदार होईन...’
‘फारच प्रेम दिसतंय माझ्यावर तुझं.... अजूनही....’
तिने लगेच फोन कट केला.

सकाळी मी पुणे स्टेशनवर गेलो. प्रगती एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागलेलीच होती. प्लॅटफॉर्म नंबर 1, बोगी नंबर चार, सीट नंबर 22.... कोणी बरोबर नसले तरी हे आकडे माझ्या सोबत आहेत. हायसं वाटले.

माझ्या समोर एक जोडपं बसलं होतं. त्यांना सोडायला आलेले एक गृहस्थही त्यांच्या शेजारी बसले होते. ते गुजराथीत बोलत होते, चेष्टा मस्करी करत होते. मग त्या गृहस्थाने अचानक  आपला चेहरा गंभीर केला आणि मला सांगू लागला, ‘हे आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले होते, बरेच दिवस राहिले. जायचं नावच घेईनात. मग मी त्यांचं रिझर्वेशन केलं, जबरदस्तीने स्टेशनवर घेऊन आलो. आता गाडी हलल्याशिवाय मी उतरणार नाही...’ मग ते तिघेही हसायाला लागले. मी जरी काळजीत असलो तरी मला इनोद सुचला... ‘अहो पण हे मधेच उतरून दुस-या गाडीने परत आले तर काय करणार?’
‘म्हणून तर तुम्हाला सांगतोय.... यांना मध्ये कुठे उतरू देवू नका’ तो गृहस्थ हसत हसत मला म्हणाला.

गाडी सुटायची वेळ झाली. तो गृहस्थ त्या जोडप्याचा निरोप घेऊन निघून गेला.
त्या जोडप्याशी गप्पा मारत मस्त प्रवास झाला.
दुपारी 12 वाजता व्ही.टी.ला पोहचलो. मग तेथून कुलाब्याच्या पोलीस मुख्यालयाकडे चालत-चालत निघालो..

पुढे चालू:

या दीर्घ कथेचे आधीचे भाग:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा