Advt.

Advt.

सोमवार, २८ मार्च, २०१६

ब्लड रिलेशन्स


-महावीर सांगलीकर 


आज दुपारपासून रूपालीला कसंतरीच होत होतं. अंगात उत्साह नाही, थोडासा ताप आलेला, डोकं आणि अंग दुखत होतं. मीनल, तिची रूममेट म्हणाली, चल, डॉक्टरकडं जाऊया. पण तिनं ते ऐकलं नाही. असल्या किरकोळ गोष्टीसाठी डॉक्टरकडं जायची काय गरज आहे? होईन आपोआपच बरी, जरा विश्रांती घेतली की! रुपाली म्हणाली.

मग रुपालीनं मस्तपैकी झोप काढली. त्या झोपेत तिला एक विचित्र स्वप्न पडलं. आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत... आपल्या बेडजवळ दोन नर्स आणि चार-पाच डॉक्टर्स उभे आहेत. ते डॉक्टर्स कसली तरी चर्चा करत आहेत. अधूनमधून तिच्याकडं बघत आहेत.

तिला अचानक जाग आली. आता तिला जरा बरं वाटत होतं, ताप उतरला होता आणि अंगदुखी, डोकेदुखी बंद झाली होती. पण ते स्वप्न.... असलं विचित्र स्वप्न तिला पहिल्यांदाच पडलं होतं. असलं स्वप्न पडणं कांही चांगलं नाही, तिला वाटलं.

मीनलनं तिच्या कपाळाला, गळ्याला हात लावून पाहिला. विचारलं, आता कसं वाटतंय?
‘मी ठीक आहे आता... पण मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं’ असं म्हणत रुपालीनं  तिला पडलेलं स्वप्न सांगितलं. म्हणाली, कांहीतरी विचित्र घडणार आहे माझ्या बाबतीत. मला भिती वाटतेय.
‘तसं कांही नसतं. तू झोपायच्या आधी मी तुला डॉक्टरकडं जाऊया म्हणाले होते ना? म्हणून तुला तसलं स्वप्न पडलं असेल. विसरून जा ते.’

मग त्या दोघी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. नेहमीचं साधं जेवण. चपाती, भाजी, भात आणि वरण. जेवण झाल्यावर दोघी थोडावेळ बाहेर फिरून आल्या.

रुपाली ते स्वप्न विसरून गेली, पण रात्री झोपल्यावर रूपालीला आणखी एक स्वप्न पडलं. ती तिच्या कामासाठी तिच्या टू व्हीलरवरनं वेगानं चाललीय आणि एका भरधाव कारनं तिला पाठीमागनं जोरात धडक दिली. ती दूर फेकली गेली. लोक गोळा झाले. कांही जणांनी तिला उचललं आणि ज्या कारनं तिला उडवलं होतं तिच्यातच ठेवलं. कार सुसाट वेगानं निघाली. थोड्याच वेळात एका हॉस्पिटलजवळ पोहोचली.

या स्वप्नानं रुपाली दचकून उठली. ही गोष्ट आत्ताच मीनलला  सांगायला नको, उगीच कशाला तिची झोपमोड करायची असा तिनं विचार केला.

दुपारी झोपले होते तेंव्हा ते स्वप्न, आता हे स्वप्नं..... परत आणखी एखादं विचित्र स्वप्न पडायचं आता झोपले तर,  असा विचार करत तिनं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण तिचं पुस्तक वाचण्याकडं कांही लक्ष लागलं नाही.  तिच्या डोळ्यापुढं त्या दोन्ही स्वप्नातली दृश्यं तरंगत होती. या दोन्ही स्वप्नांचा एकमेकांशी संबंध आहे हे नक्की.

हळूहळू तिला पुन्हा झोप येऊ लागली. अजून एखादं स्वप्न बघण्यासाठी? पण नाही, तिला परत कांही स्वप्न पडलं नाही. किंवा पडलं असलं तरी तिच्या कांही ते लक्षात राहिलं नाही.

मग एक आठवडा झाला असेल. तिची ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरली. अगदी जशीच्या तशी. ती तिच्या टू व्हीलरवरनं चालली असताना तिला एका कारनं उडवलं, ती दूर फेकली गेली, लोकांनी तिला त्याच कारमध्ये ठेवलं. ती कार हॉस्पिटलजवळ आली. तिला तिथं भरती करण्यात आलं. ती बेशुद्ध होती आणि जागी झाली त्यावेळी तिच्याजवळ दोन नर्स आणि चार डॉक्टर्स उभे होते.

+++

सुजितला पहाटे पहाटे एक स्वप्न पडलं. एक मुलगी स्कूटर वरून चाललीय... एका भरधाव कारनं तिला उडवलं. ती दूर फेकली गेली. लोकांनी तिला त्याच कारमधनं हॉस्पिटलला पाठवलं. ती आय.सी.यू मध्ये आहे. तो तिथं पोहोचला, तिची चौकशी करायला. खरं म्हणजे त्या मुलीशी किंवा त्या अपघाताशी त्याचा कांहीच संबंध नव्हता. तरीदेखील तो हॉस्पिटलमध्ये गेला. तो तिला रक्त देतोय असंही त्याला त्या  स्वप्नात दिसलं.

त्याला जाग आली. हे असलं वेगळं स्वप्न त्याला आयुष्यात पहिल्यांदाच पडलं होतं. प्रत्यक्षात त्यानं कधी कुणाला रक्त दिलं नव्हतं. पण एकदा रक्त घेतलं होतं, तो आजारी असताना.

विचार करता करता तो चमकला. आपलं रक्त कुठं कुणाला चालतंय? की ती मुलगी पण .... ओह नो!
नंतर तो ते स्वप्न विसरून गेला.

कांही दिवस झाले, सुजित त्याच्या कामासाठी  मुंबईला गेला होता. मुंबईच्या त्या भागात तो पहिल्यांदाच गेला होता. वाटेत त्याला एक हॉस्पिटल दिसलं. ते हॉस्पिटल त्याला आधी कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं. मग त्याच्या लक्षात आलं, अरे, हे तर परवा आपण स्वप्नात बघितलं होतं तेच हॉस्पिटल आहे! तो तसाच पुढे जाणार होता, पण त्याला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी आठवल्या. एका मुलीचा अॅक्सिडेंट झाला होता त्या स्वप्नात. त्याच्या मनात आलं, एक चक्कर हॉस्पिटलमध्ये टाकून यावी.

तो आय.सी.यू. 3 जवळ पोहोचला.  तो डायरेक्ट तिथंच का पोहोचला ते त्यालाही कळलं नाही. त्यांनं आय.सी.यू. च्या काचेतनं आत बघितलं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तिथल्या बेडवर एक तरुण मुलगी झोपलेल्या अवस्थेत होती. ही तीच मुलगी होती, जी त्याला स्वप्नात दिसली होती. त्यानं लगेच एका नर्सला गाठलं आणि विचारलं, ‘ती मुलगी कोण आहे?’ नर्सनं सांगितलं, ‘रुपाली कदम .... तुम्हाला कोण पाहिजे?’

कदम? हे तर आपलंच आडनाव आहे. सुजितला आश्चर्य वाटलं.

एक तरुण रुपालीची चौकशी करतोय हे बघून एक तरुणी त्याच्याकडं आली. ही तरुणी म्हणजे रुपालीची रूम मेट मीनल होती. तिनं विचारलं, तुम्ही रूपालीला बघायला आलात का?
‘हो...’ तो म्हणाला, ‘आता तब्येत कशी आहे तिची?’
‘सिरिअस आहे. तिचा रक्तगट दुर्मिळ आहे. डॉक्टरांनी मिळवलं होतं थोडं रक्त त्या गटाचं... पण अजून पाहिजे ... कधी मिळतंय काय माहीत’
‘कोणता रक्तगट? ओ निगेटिव्ह?’
‘नाही.. कांहीतरी वेगळाच आहे.... बॉम्बे ब्लड ग्रुप असा कांहीतरी....’

त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याचा ब्लड ग्रुप ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च होता. अतिशय दुर्मिळ. म्हणजे लाखो लोकांच्यात एखाद्याचा असतो हा ग्रुप. त्यानं विचारलं, डॉक्टर कुठं आहेत? माझा ब्लड ग्रुप तोच आहे!
मीनलला वाटलं आपण स्वप्नात तरी नाही? डॉक्टर म्हणाले होते, ते रक्त लगेच मिळणं आता देवाच्याच हातात आहे, आणि आपण कधीपासून प्रार्थना करतोय देवाची, ते रक्त मिळू दे म्हणून!

थोड्याच वेळात रूपालीला सुजितचं  रक्त देण्यात आलं.

नंतर सुजित डॉक्टरांना म्हणाला, परत लागलं रक्त तर सांगा मला. डॉक्टर म्हणाले, ‘आता लगेच परत तुमचं  रक्त घेता येणार नाही, आणि हिला आणखीन रक्त द्यायची गरजही नाही. तरी पण गरज भासली तर तुम्हाला कळवू’

+++

रुपाली लवकरच बरी झाली. तिला डिस्चार्ज करायच्या आधी डॉक्टरांनी तिला सांगितलं, तुझा रक्तगट जगातला एक रेअर रक्तगट आहे. त्याला एच एच असं नाव आहे. तो रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप या नावानंही ओळखला जातो. या रक्तगटाच्याबद्दल त्यांनी तिला बरच कांही सांगितलं. मग म्हणाले, तुझं नशीब एवढं थोर की हाच रक्तगट असणारा एक तरुण अचानक इथं आला आणि तुला रक्त देऊन गेला.

तिला प्रश्न पडला, अचानक असा आपल्या मदतीला येणारा तो तरुण कोण होता? त्याचं आपलं बोलणंच झालं नाही. त्याला आपण बघितलं देखील नाही, कारण तो आला त्यावेळी आपण गुंगीत होतो.

पण आता आपण त्याचे आभार मानायला पाहिजेत.

घरी आल्यावर तिनं मीनलला विचारलं, कोण होता गं तो?
‘सुजित कदम त्याचं नाव. मी त्याचा फोन नंबर घेतला आहे’
रुपालीनं सुजितला फोन लावला.
‘हॅलो, आपण सुजित कदम बोलताय ना?’
‘हो, बोलतोय. आपण कोण?’
‘मी रुपाली कदम ... तुम्ही मला रक्त दिलं होतं.... ’
‘अरे नमस्कार.. आता तब्बेत कशी आहे तुमची?’
‘चांगली आहे... तुमच्यामुळं मी वाचले. मला तुम्हाला भेटायचं आहे... या रविवारी वेळ आहे का तुम्हाला?’
‘हो आहे... पण मी पुण्यात असतो... तुम्ही मुंबईला. जमेल का तुम्हाला पुण्याला यायला? ठणठणीत असाल तरच या. नाहीतर मी पुढच्या आठवड्यात येणार आहे मुंबईला, तेंव्हा भेटेन तुम्हाला’
‘मी एकदम ठणठणीत आहे. मी रविवारी येईन पुण्याला. मला तुमचा पत्ता एसेमेस करा प्लीज’
थोड्याच वेळात तिला सुजित कदमचा पत्ता मिळाला.
रविवारी रुपाली मीनलला घेऊन पुण्याला सुजितच्या घरी गेली. सुजितनं त्या दोघींचं स्वागत केलं.
बोलता बोलता रुपालीनं विचारलं, ‘तुम्हाला कसं कळलं की माझा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप आहे ते?’
सुजितनं त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, अॅक्सिडेंट व्हायच्या आधी मला पण असलंच स्वप्न पडलं होतं. ते ऐकून सुजितलाही आश्चर्य वाटलं.

मग रुपाली म्हणाली, ‘मला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यावर मी बॉम्बे ब्लड ग्रुपबद्दल बरीच माहिती मिळवली नेटवरनं. डॉक्टरांनीही बरंच कांही सांगितलं होत... हा रक्तगट एखाद्या जोडप्यात नवरा-बायको दोघांचाही असेल तर मुलांना देखील तोच रक्तगट मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. आपल्या दोघांचंही आडनाव कदम आहे. याचा अर्थ तुमच्या ध्यानात आला असेल. आता फक्त कन्फर्म करायचं बाकी रहातंय. मे आय नो यूवर फुल नेम?’
‘सुजित शहाजी कदम’

तिचा अंदाज खरा ठरला होता.
‘सुजित, तू माझा भाऊ आहेस.... मोठा भाऊ’
‘म्हणजे तू दीपा आहेस?’ सुजितनं आश्चर्यानं विचारलं
‘होय’
‘पण मग तुझं नाव रुपाली कसं काय?’
‘होय.... दीपा, पिंकी, रुपाली.. हे बघ, तू सात वर्षांचा होतास त्यावेळी मी तीन वर्षांची होते. आपण सगळे मुंबईत रहात होतो. एकदा आपल्या आई बाबांचं मोठं भांडण झालं बाबा तुला घेऊन निघून गेले. आईनं पण मुंबई सोडलं आणि ती मला घेऊन बडोद्याला गेली.  मला शाळेत घालताना आईनं माझं नाव दीपा ऐवजी रुपाली लिहिलं. आई-बाबांनी परत एकमेकांचे तोंड बघितले नाही. पण मला समजू लागलं तेंव्हापासून मी बाबांना आणि तुला शोधायचा प्रयत्न केला. आईला बाबांशी कांही देणं घेणं नव्हतं, पण तिला तुझी सारखी आठवण यायची. आजही येते.. तिनं तर तुला शोधण्यासाठी काय काय केलं..’
‘आई कुठं असते?’
‘ती बडोद्यालाच असते. मला मुंबईत चांगला जॉब मिळाला म्हणून मी मुंबईत असते... बाबा कुठे आहेत? त्यांना माझी, आईची आठवण येते की नाही?’
‘आम्ही इथं पुण्यात आल्यावर वर्षाभरातच बाबांनी मला एका अनाथाश्रमात सोडलं आणि ते गायब झाले. त्यांची माझी भेट पुन्हा कधीच झाली नाही... मी नंतरच्या काळात तुला आणि आईला शोधायचा खूप प्रयत्न केला. मुंबईत आपण जिथं रहायचो तिथं ही जाऊन आलो. पण तिथं दुसरंच कुणीतरी रहात होतं... आता तू भेटलीस म्हणजे आईही भेटेल. मला तिचा फोन नंबर दे’
‘देते... पण थांब, आधी मीच तिला फोन लावते....’
रुपालीनं लगेच आईला फोन लावला. म्हणाली, ‘आई, तू ज्याला इतकी वर्षं शोधत होतीस तो सापडला’
‘कोण? सुजित?’  तिकडून आवाज आला.
‘हो.. आपला सुजित’


हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा