-महावीर सांगलीकर
एका धाब्यावर मस्तराम या सिनेमाचं पोस्टर बघितलं. ते बघताच ‘असले फालतू सिनेमे का काढतात’ असा विचार मनात आला. पण माझ्या एका सिनेमावितरक मित्राच्या आग्रहावरून त्याच्याबरोबर हा सिनेमा बघायला गेलो आणि तो बघताना माझं या सिनेमाबद्दलचं मत बदललं.
ही एका लेखकाची कथा आहे. मुन्शी प्रेमचंद यांना आपला आदर्श मानून त्यांच्यासारखाच एक महान लेखक बनण्याचं स्वप्न बाळगणारा राजाराम हा एक लेखक. एका बँकेत त्याला चांगली नोकरी. घरी सुंदर बायको. बँकेत कामापेक्षा लिखाणातच वेळ घालावाणारा. त्यामुळे मॅनेजराशी भांडण होते आणि तो नोकरीचा राजीनामा देतो. त्याच्या उच्च साहित्यिक मुल्ये असणाऱ्या कादंबऱ्या छापायला कोणताच प्रकाशक तयार होत नाही. एक प्रकाशक त्याला अश्लील कथा लिहिण्याची मागणी करतो. नोकरी नसल्यानं आणि पैशांची गरज असल्यानं राजाराम तशी एक कथा त्या प्रकाशकाला लिहून देतो. त्या कथेवर वाचकांच्या उड्या पडतात. मग काय, प्रकाशक ‘मस्तराम’ नावाचं मासिकच सुरू करतो. राजाराम दरमहा अशा कथा लिहायला लागतो. त्याला अशा लिखाणातून भरपूर पैसे मिळू लागतात.
इकडं घरी बायकोला आपला नवरा लेखक झाला आहे हे माहीत असतं, पण तिनं त्याचं लिखाण वाचलेलंच नसतं. ती त्याच्या पुस्तकाची मागणी करते तेंव्हा लेखकाची पंचाईत होते. तो टाळाटाळ करत राहतो त्यामुळं तिला शंका येते. ती नवऱ्याच्या महेश या मित्रास हा काय प्रकार आहे याचा शोध घेण्याची विनंती करते. महेशाला मस्तरामधील अश्लिल कथा राजारामच लिहित असतो याचा शोध लागतो.
महेशला मस्तरामचा नवा अंक मिळतो. त्यात राजारामची नवी कथा असते. ती वाचून महेश जाम भडकलेला असतो, कारण ती कथा राजारामाची बायको आणि महेश यांच्यातील काल्पनिक अनैतिक संबंधावर असते. राजारामला मूल झालेले असते. त्याच्या घरी त्याची पार्टी चालू असते. महेश मस्तरामचा नवा अंक घेवून राजारामाच्या घरी येतो. महेश तो अंक राजारामाच्या बायकोला तसेच इतरांना दाखवतो आणि राजारामची छी-तू होते.
साधारण अशी कथा असणारा-या हा सिनेमा कलात्मक ढंगाने जातो. सिनेमात परिचित चेहरे नाहीत. आंबटशौकीनांनी हा सिनेमा बघू नये, कारण त्यांच्या डोळ्यांना आणि मनाला सुख देणारे यात फारसे कांही नाही. नवोदित आणि भावी लेखकांनी, प्रकाशकांनी मात्र हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.
हेही वाचा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा