Advt.

Advt.

Monday, November 17, 2014

शिवानी आणि मोटीव्हेटर


-महावीर सांगलीकर


(शिवानी द ग्रेट या कथेचा तिसरा भाग. या संपूर्ण कथेतील सर्व तपशील आणि घटना सत्य आहेत. कथेच्या नायिकेचे नावच तेवढे बदललेले आहे ).

शिवानी आणि न्यूमरॉलॉजीस्टची भेट झाल्यावर त्यांच्यात पुढचे दोन आठवडे फारसा कांही संवाद राहिला नाही. त्याला तिची रोज आठवण होई, पण त्याने तिला फोन करण्याचे टाळले. बरोबर पंधरा दिवसांनी तिचाच त्याला फोन आला. रात्री दहाच्या सुमाराला. फोनवर ती रडायला लागली.
त्यानं तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.
‘शिवानी, रडू नकोस... काय झालं ते सांग आधी... मग सावकाश रड’
ती आणखीनच रडायला लागली.
त्यानं तिला दटावलं, ‘शिवानी, आता रडायचं थांबतेस का? रडणं शोभतं का तुला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’
ती थोडी शांत झाली.
त्या दिवशी 17 तारीख होती. त्याच्या पटकन लक्षात आले, आपल्याला पाहिजे होतं ते घडलं आहे.
‘काय झालं सांग बघू आता..’
ती परत रडत म्हणाली, ‘माझा जॉब गेला हो.... मला नोकरीवरनं काढून टाकलं त्यांनी’
असं कांहीतरी घडणार, तेही शक्यतो 17 किंवा 18 तारखेला, हे त्याला आधीच माहीत होतं. तसं घडावं अशी त्याची तीव्र इच्छाही होती. त्याला मनात आनंद झाला. पण तो न दाखवता तो तिला म्हणाला,
‘मग आता काय करणार मॅडम? रडून कांही फायदा होणार आहे का?’
‘नाही’, ती ब-यापैकी रिलॅक्स होत म्हणाली, ‘पण आता मी काय करू.... दुसरा जॉब मला लगेच नाही मिळणार’
‘तुला सगळं लगेच कशाला पाहिजे असतं? जरा सुट्टी घे. दिवाळीला गावी जा. एन्जॉय कर. मग आल्यावर जॉब शोध. मिळेल तुला दुसरा जॉब लवकरच, करायचा असेल तर.... जाणार ना मग गावी?
‘जाईन म्हणते..’
‘म्हणतेस कशाला नुसती? जाच तू. आईला भेट. चार दिवस रहा तिथं. भांडणं करू नकोस कुणाशी. मीही चाललोय गावी दिवाळीला. तुला आत्ताच दिवाळीच्या शुभेच्छा देतो. विश यू अ हॅप्पी दिवाली अॅण्ड अ प्रॉस्परस न्यू इयर. झोप आता शांतपणे’
‘हो’
‘हॅव स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. बाय...’

दुस-या दिवशी दिवाळीसाठी तो गावी निघून गेला. गावी असताना त्याला शिवानीचा फोन आला. ती म्हणाली, ‘माझ्या आईला तुमच्याशी बोलायचं आहे’.

तिनं तिच्या आईला त्याच्याबद्दल बरंच कांही सांगितलं असावं. तिची आई त्याच्याशी आपुलकीने बोलत होती. तो तिच्या आईशी जणू आपल्याच आईशी बोलावा तसं बोलला. शिवानीची काळजी करू नकोस, तिचं सगळं चांगलंच होणार आहे, तिच्या लग्नाची घाई करू नकोस, तिला चांगला आणि श्रीमंत नवरा मिळणार आहे असं बरंच कांही. शेवटी म्हणाला, ‘आई, तू पुण्याला आलीस की मला कळव. मला तुला भेटायचं आहे’

दिवाळी झाल्यावर परत पुण्याला येत असताना त्याला आठवलं, शिवानी देखील तिच्या गावावरून आजच पुण्याला येणार होती. पण आज सगळीकडे मोठा पाऊस पडत होता, त्यामुळं ती कदाचित येणारही नसेल. त्यानं तिला गाडीतनंच फोन केला.
‘शिवानी, संध्याकाळपर्यंत मी पुण्यात पोहचतोय. भेटणार का?’
‘अहो मी अजून गावीच आहे. पाऊस खूप पडतोय... बाहेर पडता येत नाही, म्हणून आज येऊ शकत नाही. उद्या येणार आहे. उद्या भेटू..’
‘नक्की?’
‘नक्की’
‘कुठं?’
‘कुठं?’
‘तू म्हणशील तिथं..’
‘आपण संभाजी पार्कमध्ये भेटू’ ती पटकन म्हणाली.
‘किती वाजता?’
‘सात वाजता...?’
‘चालेल, पण मग आपल्याला बोलायला तासभरच मिळेल. आठ वाजता ते पार्क बंद होते’
‘मग साडेसहाला भेटू’
‘ठीक आहे. वेळेवर ये म्हणजे झालं’
‘हो, येईन’

दुस-या दिवशी तो बरोबर साडेसहा वाजता संभाजी पार्कच्या गेटवर आला. शिवानी अजून आली नव्हती. पाच मिनिटं वाट बघून त्यानं तिला फोन केला. ती अजून घरून निघाली नव्हती. वेळ न पाळणा-यांचा त्याला भयंकर राग येई. त्याला शिवानीचाही राग आला, पण राग आवरून तो गोड आवाजात म्हणाला, ‘शिवानी, का वाट पाहायला लावतेस मला? बी पंक्च्युअल, अल्वेज..’
‘निघालेच...’

मग थोड्याच वेळात ती आली. त्यानं हसून तिचं स्वागत केले. आज ती एकदम वेगळीच दिसत होती. पहिल्यांदा भेटली तेंव्हा ती जीन्समध्ये होती, आत्ता पंजाबी ड्रेसमध्ये... त्यामुळेच जास्त वेगळेपणा जाणवत असावा.

दोघेही पार्कमध्ये गेले आणि बसण्यासाठी निवांत जागा शोधू लागले. तशी जागा कुठे मिळाली नाही, मग ते मोकळ्या जागेत हिरवळीवर बसले. खाली बसताच त्याच्या सवयीप्रमाणे त्याने गवताच्या एका झाडाला हात घातला, आणि ते उपटले. दुस-या क्षणीच त्याला स्वत:चाच राग आला. तो शिवानीला म्हणाला, ‘मला ही चुकीची खोड जडली आहे. एक जीव नष्ट करण्याची खोड. झाड तोडण्याचे पाप... इथून पुढं नाही होणार अस. खरं म्हणजे मी हिरवळीवर बसायलाच नाही पाहिजे’

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मुद्याला हात घातला.
‘तुझ्या जॉबचे काय आता?’
‘गावी जायच्या आधी एके ठिकाणी अॅप्लाय केले होतं. बहुतेक इंटरव्ह्यूसाठी बोलवतील लवकरच’
‘मला सांग, तुला पगार किती मिळणार आहे तिथं? आणि आत्ता इथं किती मिळत होता?’
‘इथं मला महिन्याला दहा हजार रुपये मिळत होते. आता मला कमीत कमी पंधरा हजार पाहिजेत’
‘बस्स?’, त्यानं विचारले, ‘फक्त पंधरा हजार रुपये?’
‘मला सर्व्हाइव्ह व्हायचं आहे हो... अॅक्च्युअली मला आठ-दहा हजार मिळाले तरी चालतील... माझा महिन्याचा खर्च भागायला पाहिजे’

तिच्या या बोलण्याचा त्याला भयंकर राग आला. तो नाराज होत म्हणाला, ‘तू फक्त सर्व्हाइव्ह होण्यासाठी आली आहेस का पुण्यात? इतकी शिकली आहेस, पण महिन्याला आठ-दहा हजार कमावणे हेच तुझं स्वप्न आहे का? लाज वाटायला पाहिजे तुला तुझ्या स्वप्नांची. म्हणे रिच नवरा पाहिजे तुला. लग्नाच्या बाजारात रिच नवरा मिळायला नुसतं सुंदर असून चालत नाही. तुम्ही स्वत: रिच असावं लागतं. तुमचं स्वत:च आर्थिक अस्तित्व असावं लागतं... नाहीतर मग भरमसाठ हुंडा देण्याची तयारी असावी लागते’
तिनं मुसमुसायला सुरवात केली. त्यानं तिला पुन्हा दटावलं. ती गप्प झाली.
‘शिवानी, अगं, फारसं न शिकलेले साधे सिक्युरिटी गार्डस् आणि डिलिव्हरी बॉयज महिन्याला आठ-दहा हजार कमावतात. त्यांना डोक्याचा कांही वापर देखील करावा लागत नाही. तू एवढी डोकेबाज, एवढी शिकलेली, आणि कसली लो स्वप्नं बघतेस तू? लो एम ठेवणे हा जसा गुन्हा आहे तसेच लो स्वप्नं बघणे हा देखील गुन्हाच आहे. हे जग तुम्ही किती पैसे मिळवता याच्यावर तुमची किंमत करतं. अगदी तुमच्या घरचे लोक देखील तुम्ही किती पैसा कमावता याला महत्व देतात. तुला अनुभव असेलच’
तिनं ‘हो’ अशी मान हलवली. 
‘तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे सांगू?’
‘काय?’
‘तू स्वत:ला ओळखलं नाहीस अजून. आधी ठरव, जीवनात तुला काय करायचं आहे ते. कसेतरी दिवस काढत रिच नवरा भेटायची वाट बघत बसायचं आहे, की स्वत:च्या उपजत शक्तींना फुलवत महान बनायचं आहे? एक काम कर, तू आता नोकरीच्या फंदात पडू नकोस. बस्स झाली ती गुलामगिरी.  दुस-यांसाठी दिवसभर राबायचं, बोलणी खायची, नाही-नाही ते सहन करायचं... रोज रडारड करायची ... यासाठी झाला आहे का जन्म तुझा?’
ती कांही बोलली नाही.
‘तुझा जॉब गेला हा तुझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. आठ-दहा हजारांची नोकरी करण्याची गरज नाही तुला आता. बी युअर ओन बॉस.... स्वत:चा व्यवसाय सुरू कर. लोकांना नोक-या दे. पुढच्या वर्षी तुझं स्वत:च ऑफीस पाहिजे बघ... तेही डेक्कनवर नाहीतर तर कॅम्पात एम.जी रोड वर’
‘मला नाही जमणार.. कसं शक्य आहे मला हे सगळं करणं?’
‘हे तू करू शकतेस. तू स्वत:ला ओळख. असं हातपाय गाळायचं कारण नाही’ 
‘आणि मला तो नवीन जॉब मिळाला तर?’
‘ते तू ठरव, काय करायचं त्याचं ते. चलूया आता? आणि तुझ्या जेवणाचं काय?’ त्यानं विचारलं.
‘रूमवर जाऊन बनवणार आणि जेवणार’ 
तो कांही बोलला नाही. नेमके आज त्याच्या खिशात फारसे पैसे नव्हते. नाहीतर त्यानं तिला जेवण दिलं असतं. बघू पुन्हा कधीतरी, तो मनात म्हणाला. हिच्यापासनं आपली सुटका नाहीच लवकर, आणि हिला सारखं सारखं भेटायाची वेळ येणारच आहे आपल्यावर आता. मग एकदा काय, अनेकदा जेवण देऊ तिला. तिला पाहिजे तिथं.
‘चहा घेणार?’ त्यानं विचारलं.
‘हो घेऊया..’
ते दोघे जवळच्या एका हॉटेलमध्ये गेले आणि तिथं त्यांनी चहा घेतला. चहा घेता घेता तो परत परत तिला मोटीव्हेट करत होता, तिला जागवत होता.
थोड्या वेळानं ती दोघं आपापल्या वाटेनं निघून गेले. जाताना तो म्हणाला, ‘काय काय होतंय ते सांग मला फोन करून. डिप्रेस होऊ नकोस. रडू नकोस नेहमी सारखी. मी आहेच तुझ्या बरोबर. तुझ्या मागे नव्हे, पुढेच. तुझ्या रस्त्यात येणारे अडथळे दूर करायला. तू थांबलीस तर मी तुला पुढे ओढून नेईन. तुला अर्ध्यावर सोडून निघून जाणार नाही. इथून पुढे तुला कसलेही प्रॉब्लेम होणार नाहीत. तू  डेंजर झोनच्या बाहेर आलेली आहेस, हे मला स्पष्ट दिसतंय. शिवाय मी कुठंही असलो, तुझ्यापासून कितीही दूर असलो तरी तुझ्या आसपासच आहे... अदृश्य रुपात. पण याचा अर्थ तू कशीही वागू शकतेस असा नव्हे. गाडी नीट चालवत जा, सिग्नल तोडू नकोस. स्वत:साठी नाही, निदान दुस-यांना इजा होऊ नये म्हणून तरी. तू विचारपूर्वक वागली नाहीस तर देवच काय, मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही..’

+++

शिवानी जिथं काम करायची तिथल्या बॉसनं राहिलेली काम पुरी करण्यासाठी तिला 30 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर तो तिला उरलेला पगार आणि एक्सपिरिअन्स सर्टिफिकेट देणार होता. पण नंतर तो या दोन्ही गोष्टी द्यायची टाळाटाळ करू लागला.
शिवानीनं न्यूमरॉलॉजीस्टला फोन केला, ‘उद्या तुम्ही सिटीत याल का?’
‘आप बुलाये और हम ना आये, असं कधी होईल का? बोला काय हुकूम आहे?’
‘तुम्ही माझ्याबरोबर आमच्या ऑफीसमध्ये यायचं आहे’
‘येऊ की. पण काय काम आहे?’
तिनं काय झालंय ते त्याला सांगितलं.
दुस-या दिवशी 11 वाजता दोघं ऑफिसला पोहोचले. ऑफीसमध्ये शिवानीचा एक सहकारी एका खुर्चीवर दात कोरत आरामशीर बसला होता. त्याच्याकडे  बघितलं तर मळमळायला व्हावं असं त्याचं थोबाड होतं. एक्स्ट्रीमली निगेटिव्ह पर्सन. हाच तो शिवानीला टॉर्चर करणारा माणूस, त्यानं ओळखलं. त्याला भयंकर राग आला त्या माणसाचा. पण आजचं काम वेगळ आणि महत्वाचं होतं. शिवाय या माणसाकडं बघून घ्यायची गरजही नाही, हा आपल्याच मरणानं मरेल, हे त्याला जाणवलं. 
शिवानीचा बॉस अजून आला नव्हता. थोडा वेळ वाट बघून मग दोघं ऑफीसच्या बाहेर आले.
तिनं बॉसला फोन लावला, ‘हॅलो, मी शिवानी बोलतेय’
‘........    ’
‘माझे काका तुम्हाला भेटायला आलेत. त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी’ शिवानी फोनवर म्हणाली.
‘.........    ’ 
‘ठीक आहे’ असे म्हणून तिनं फोन कट केला.

बॉस काय म्हणाला ते त्याला ऐकू आले नव्हते. त्यानं विचारलं, ‘काय झालं?’
‘तुझ्या काकाशी बोलायला मी बाध्य नाही, असं म्हणाला तो’
‘ओह... पक्का पुणेरी दिसतोय, भाषेवरून.. बाध्य नाही वगैरे..’
‘होय.. पुण्याचा भामटा आहे’
‘बोलण्याचा टोन कसा होता त्याचा? काका आले आहेत म्हंटल्यावर?’
‘जरा डाऊन झाला होता..’
‘ओके, तू काळजी करू नकोस आता. तुझं काम होऊन जाईल. नाही झालं तर त्याला आपण लेबर कोर्टात खेचू. नाही तर पोलीस चौकी आहेच जवळ. त्याच्या विरोधात ख-या-खोट्या तक्रारी दाखल करायच्या. कायदा काय, तुम्हा बायकांच्याच बाजूने आहे. मग तो नाही, त्याचा बापही वठणीवर येईल. ते काय म्हणतात ते... आपण त्याला बाध्य करू’

तो तिला असं बोलून धीर देत होता पण ती भयानक टेन्शनमध्ये दिसत होती.
‘शिवानी, तू का एवढे टेन्शन घेतेस? आता तू तुझ्या बॉसला टेन्शन द्यायचं आणि ते मस्त एन्जॉय करायचं... नाऊ गिव्ह मी अ स्माईल..’
पण तिचा चेहरा कांही फुलला नाही, तो फुगलेलाच राहिला.
मग विषय बदलत तो म्हणाला, ‘काय गं, मी तुझा काका आहे असं तू त्याला का सांगितलंस?’
‘चुकून सांगितलं..’
‘चुकून? ओके, देन हू एम आय फॉर यू?or’
‘मामा... इथून पुढे मी तुम्हाला मामाच म्हणत जाईन. चालेल ना?’
‘मला कांहीही चालेल. पण जस्ट अ क्युरिऑसिटी.... मामाच का?’
‘कारण मामा फार जवळचा असतो.... आईकडचा. आणि मला माझ्या बापाकडचं कोणीच आवडत नाही. म्हणून काका नकोच’
‘इट्स लॉजीकल... इतक्या पोरींना मी मोटीव्हेट केलं, पण मला मामा बनवणारी तू पहिलीच पोरगी निघालीस. तू चलाख आहेस. ओके, मामा तर मामा. आता बघच तू मी माझ्या या भाचीला कुठल्या कुठं नेऊन ठेवतो ते..’

मग तो तिथनं परतला आणि शिवानी ऑफीसमध्ये गेली. बॉस येण्याची वाट बघत बसायला. जाता जाता त्यानं तिला सूचना केली, ’जरा गोडीत बोल त्याच्याशी. चेह-यावर राग आणि टेन्शन दिसू देऊ नकोस. तू टेन्शन मध्ये असलीस तर कडकलक्ष्मीसारखी दिसतेस. जर गोडीत काम झालं नाही तरच आपल्याला पुढचे पाउल उचलायचे आहे हे लक्षात ठेव. पण पुढचं पाउल उचलण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. बघूया काय होतंय ते’
तिनं कांही न बोलता त्याच्या कडं तिचे आधीच टपोरे असलेले डोळे मोठे करून पाहिलं.
संध्याकाळी त्याला तिचा फोन आला, ‘मामा, आपण जिंकलो... त्यानं माझा पगार दिला आणि एक्सपिरिअन्स सर्टिफिकेट पण दिलं... जास्त कटकट न करता...’
‘छान... अब बॉस को मारो गोली.... ते आलेले पैसे बॅन्केत टाक. तुझ्या खर्चाला आळा घाल. जपून वापर पैसे. अजून पाच-सहा आठवडे अग्निपरीक्षा आहे तुझी... त्या परीक्षेत तू अव्वल मार्कांनी पास होणार आहेस. मग सगळं कांही ठीक होईल. काळजी करू नकोस’
‘मामा, आणखी एक गुड न्यूज..’
‘काय? कुणी प्रपोज केलं की काय?’
‘नाही हो... उद्या माझा इंटरव्ह्यू आहे..’
‘जा इंटरव्ह्यूला. पण मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठव कोणतेही पाउल उचलताना. यू आर बॉर्न टू बिकम युअर ओन बॉस, नॉट टू बिकम अ स्लेव, हे लक्षात ठेव’
‘हो माझ्या लक्षात आहे’ 
‘इंटरव्ह्यू नीट दे.. तू सिलेक्ट होशील असं बघ. पण पगाराची अपेक्षा जरा वाढवून सांग’
तिनं इंटरव्ह्यू व्यवस्थित दिला. शेवटी इंटरव्ह्यू घेणा-यांनी तिला विचारलं, ‘पगाराची काय अपेक्षा आहे?’
या प्रश्नाचं सरळ उत्तर देण्याऐवजी तिनं उलटा प्रश्न केला, ‘तुम्ही किती देऊ शकता, जास्तीत जास्त?’
या अनपेक्षित प्रश्नानं इंटरव्ह्यू घेणारे चकित झाले. एकमेकांच्या कानात कांहीतरी कुजबुजले. मग एक जण म्हणाला, ‘तुम्हाला आम्ही वीस हजार देऊ महिन्याला. उद्यापासून येऊ शकता तुम्ही कामावर’
‘सॉरी सर,’ शिवानी म्हणाली, ‘महिन्याला चाळीस हजारांची ऑफर आहे मला दुसरीकडनं. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकता काय?’
ते लोक परत एकमेकांच्या कानात कुजबुजले.
मग एक जण म्हणाला, ‘आम्ही कळवू तुम्हाला नंतर... तुम्ही जाऊ शकता आता’
ती तिथनं उठली आणि दरवाजाच्या दिशेनं निघाली. त्यावेळी तिच्या कानावर पडलेली हळू आवाजातली वाक्यं म्हणजे ‘ही पोरगी ओव्हरस्मार्ट दिसतेय... कांही पण अपेक्षा ठेवतीय’ आणि ‘लेकिन इस लडकी में दम है... सिलेक्ट करते है तो कंपनी को आगे लेकर जायेगी’

आज तिचा नवा जन्म झाला होता. हे सगळं न्यूमरॉलॉजीस्टला अपेक्षितच होतं. आता पुढे कोणती पाउले उचलायची यावर त्याला विचार करायची अजिबात गरज नव्हती. आपण शिवानीला बूस्ट केलंय. आता ती सुसाट वेगाने प्रगती करेल. आपल्याला तिच्यासाठी फारसं कांही करावं लागणार नाही हे त्याला पक्कं माहीत होतं. ही कांही त्याची पहिलीच केस नव्हती. 


(पुढे चालू)


हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा