Advt.

Advt.

Friday, May 23, 2014

शिक्षा

 -महावीर सांगलीकर


दिशाच्या तावडीतून माझी सुटका झाली असे वाटले खरे, पण त्यादिवशी संध्याकाळ पासून माझे डोके प्रचंड दुखायला लागले. अंगही दुखायला लागले आणि किंचित तापही आला. किरकोळ उपचार करून संध्याकाळीच झोपी गेलो. दुस-या दिवशीही डोके दुखायचे कांही थांबेना. ओळखीच्या एका वयस्कर डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले आणि सांगितले, ‘कांही नाही झाले जा.. झोप काढ मस्तपैकी..’

मग मी अक्षरश: दिवसभर झोप काढली... रात्री कांही झोप येईना. दिशाशी संबध तोडले हे ठीक केले, पण त्याच्यासाठी आपण जो घाणेरडा प्रकार केला त्याचे मला वाईट वाटू लागले. माझे मन मला खाऊ लागले. पण आता झाले ते झाले... उद्यापासून आपण आपल्या कामाला लागले पाहिजे...

दुस-या दिवशी मी सायबर क्याफेत गेलो. आधी इमेल चेक कराव्यात असे ठरवले. हॉटमेलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाकला. कांही सेकंदातच स्क्रीनवर राँग पासवर्ड अशी अक्षरे दिसली. आज पासवर्ड कसा काय चुकला? पुन्हा प्रयत्न केला... पुन्हा राँग पासवर्ड.. मी हादरलो. नक्कीच आपले इमेल अकाउंट हॅक झालंय... दिशा... दिशाचेच काम असणार हे. आता काय करायचे.... पासवर्ड रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी क्वेश्चन्सची उत्तरे देखील चुकीची होती... स्मार्ट गर्ल... तिने आपले याहूचे अकाउंटदेखील हॅक केले असणार... मी तिकडेही युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघितला... स्क्रीनवर मेसेज... तुमच्या अकाउंटमध्ये मुंबई येथून लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. ते तुम्हीच होता का? मी नाही असे उत्तर दिले. कांही प्रश्न विचारले गेले. त्यांची मी बरोबर उत्तरे दिली. मग मला माझ्या अकाउंटमध्ये शिरकाव करता आला. इमेल लिस्टवर एक नजर टाकली. सगळे कांही ठीक ठाक होते. पासवर्ड बदलून टाकला, सिक्युरिटी क्वेश्चन्सही बदलून टाकले.
पण हॉटमेलचे काय? तिथेतर आपल्या फार महत्वाच्या इमेल्स आहेत. आपल्या वेबसाईट्सचे पासवर्ड आहेत... अरे बापरे.... मी लगेच माझ्या एका वेबसाईटवर  गेलो... ती वेबसाईट हॅक झाली होती. तेथे पुढील ओळी होत्या..

हॅलो मिस्टर सांगलीकर
यह तो सिर्फ एक शुरुआत है
आगे आगे देखो होता है क्या....

मी लगेच माझी दुसरी वेबसाईट चेक केली. तेथे लिहिले होते:
अभी बहोत कुछ होना बाकी है..

हा माझ्यासाठी एक जबरदस्त झटका होता. या दोन्ही वेबसाईटसवर मिळून 500 पेक्षा जास्त लेख, शेकडो फोटो होते. इंडॉलॉजी, प्राचीन इतिहास, सिंधू संस्कृती, जैनिज्म, प्राकृत भाषा, संस्कृत भाषा, प्राचीन साहित्य....  त्यातले अनेक लेख मी जगभरच्या विद्वानांकडून खास त्या वेबसाईट्ससाठी लिहवून घेतले होते. त्या बनवायला मला 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्यावरचा मजकूर मी इतर कुठे सेव्ह करून ठेवला नव्हता. या वेबसाईटस एवढ्या महत्वाच्या होत्या की त्यांच्या निर्मितीसाठी दिल्लीच्या एका प्रसिद्ध रिसर्च इंस्टिट्यूटने एका इतिहास परिषदेत माझा सुवर्णपदक देवून गौरव केला होता. गेले सगळे काम मातीमध्ये.

त्या काळात मी वेगवेगळ्या याहू ग्रुप्सचा सभासद होतो. त्यातील इतिहासाशी संबधीत आणि इतर कांही ग्रुप्समध्ये मी वेबसाईटस हॅक झाल्याची पोस्ट टाकली. माझे हॉटमेल अकाउंट हॅक झाल्याचेही सांगितले. मी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवत असल्याचेही लिहिले. ही बातमी दिशापर्यंत पोहोचणार याची मला खात्री होती. नाहीतरी तिचा वॉच असणारच आहे आपल्या हालचालीवर. पण तरीही मी तिला एक मेल पाठवली.

दिशा, तू जे कांही करत आहेस ते चांगले नाही. इट इज अ क्राईम. सूड घेणे तुला शोभत नाही. लर्न टू फरगेट अंड फरगिव्ह. लर्न टू इग्नोअर. बाकी जास्त कांही सांगत नाही. लवकर बरी हो.

या मेलचे उत्तर येण्याचा प्रश्नच नव्हता. 

आणखी दोन दिवस गेले. मी सभासद असलेल्या अनेक ग्रुप्समध्ये एक पोस्ट झळकली...

महावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल ....

त्या पोस्टमध्ये मी मुंबईच्या एका निरपराध मुलीला ब्लॅकमेल केले असा आरोप होता. ही पोस्ट कोणा राजीव शहा नावाच्या व्यक्तीने पाठवली होती. राजीव शहा म्हणजे दिशाच असणार याचा मला अंदाज आला. त्या पोस्ट मध्ये माझ्याबद्दल बरीच खरी आणि खोटी माहिती दिली गेली होती. अर्थातच या पोस्टमुळे खळबळ उडाली. नाहीतरी मी माझ्या वेगळ्या विचारांमुळे ग्रुप्समध्ये तसा बदनामच होतो. माझ्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत पडले. कांही लोकांनी माझी बाजू घेतली. माझे स्पष्टीकरण आल्याशिवाय या पोस्टवर मत व्यक्त करणे चुकीचे आहे असे कांहीचे म्हणणे पडले. मी हे सगळे वीतराग भावाने बघत होतो. आपण आपली बाजू मांडावी की नाही याचा विचार करत होतो. शेवटी आपण लगेच उत्तर द्यायचे नाही असे ठरवले. बघुया काय डिस्कशन होते ते...

कांही मित्रांनी मला खाजगी इमेल पाठवून ‘हे खरे आहे काय? अशी विचारणा केली. माझी बाजू मांडण्याचा सल्ला दिला. तुझी कांही चूक नसेल तर आम्ही तुझ्या बाजूने उभे राहू असे आश्वासन दिले. मी त्याना प्लीज वेट एंड सी असे उत्तर दिले.

ग्रुप्समध्ये इतर सगळ्या चर्चा बाजूला पडून या विषयावरच चर्चा व्हायला लागल्या.

आणखी एक आठवड्याने ग्रुप्समध्ये आणखी एक पोस्ट झळकली. दिशा मुंबई गर्ल या नावाने अवतरली होती.... तिने टाकलेली पोस्ट अशी होती ...


मिस्टर सांगलीकर हॅरॅसड मी

‘दोन दिवसांपूर्वी या ग्रुपमध्ये महावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल .... अशी एक बातमी आली आहे. त्यात उल्लेख केलेली ती दुर्दैवी, निरपराध मुलगी मीच आहे. सांगलीकर यांनी माझ्याशी प्रेमाचे नाटक केले... मग मला ब्लॅकमेल केले... सॉरी, मी माझे नाव उघड करू शकत नाही, पण मिस्टर सांगलीकर यांचे खरे स्वरूप काय आहे हे तुम्हा सर्वांना कळावे म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे. कदाचित ते इथे माझे नाव उघड करतील, पण मी ती रिस्क घेवूनच लिहीत आहे......

गेली दोन वर्षे मी अक्षरश: नरकात जगत आहे. सांगलीकर हे माझे दहा वर्षापूर्वीचे चांगले  पत्रमित्र होते... माझे दु:ख कोणातरी विश्वासू व्यक्तीला सांगावे म्हणून मी सांगलीकरांना इंटरनेटवरून शोधून काढले आणि त्यांना इमेल पाठवली. मग सुरवातीला ते माझ्याशी फारच सभ्य वागले, पण नंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवायला सुरवात केली. ही व्यक्ति धोकादायक आहे असे लक्षात आल्यावर मी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. त्या आधी मी त्यांना माझ्या सगळ्या इमेल्स आणि माझे त्यांच्याकडे असलेले फोटो डिलीट करून टाकण्याची विनंती केली. पण त्यांनी आधी माझ्या कॉम्प्यूटरमधले त्यांचे फोटो डिलीट करावेत, त्यांच्या इमेल्स डिलीट करावयात असे सांगितले. त्यांनी माझ्या कॉम्प्युटरमध्ये ट्रोजन व्हायरस घुसवलाय हे नक्की...

मी सुंदर नाही, बुद्धिमान नाही, श्रीमंतही नाही, तरीही सांगलीकर यांनी माझ्यावर प्रेम का करावे बरे? माझ्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांनी का धरली? माझे कांही त्यांच्यावर प्रेम नव्हते, मी त्यांना तसे अनेकदा सांगितले देखील. एकदा तर मी त्यांना म्हणाले, जगातील सगळे पुरुष जरी मेले, आणि तुम्ही एकटे उरलात, तरी सुद्धा मी तुमच्याशी लग्न करणार नाही. पण ते माझा पिच्छा सोडेनात. त्यांना कांही करून माझी भेट घेण्याची इच्छा होती. त्यांनी मुंबईला येवून माझ्या घराभोवती चकराही मारल्या...

त्यांनी स्वत:बद्दल कधीच कांही सांगितले नाही.... मला माझ्याबद्दल कांहीच विचारले नाही.  दिवसभर नुसते चॅटिंग ......  ते मला रोज रात्री फोन करायचे.. दोन दोन तास बोलायचे. ते अजूनही मला रोज फोन करून त्रास देतात..

हे सगळं मी का लिहित आहे? तर मी सांगलीकर यांच्यापासून सगळ्यांना सावध करण्यासाठी  लिहित आहे. न जाणो उद्या माझ्यासारखी आणखी एखादी निरपराध मुलगी सांगलीकरांच्या उद्योगांना बळी पडायची..

प्लीज हेल्प मी टू गेट रीड ऑफ धिस मॅन... प्लीज हेल्प मी टू डिलीट माय फोटो फ्रॉम हिज कॉम्प्यूटर... प्लीज फॉरवर्ड धिस मेल टू ऑल युवर फ्रेंड्स...

मिस्टर सांगलीकर यांनाही मदत करा... त्यांना मानसोपचाराची गरज आहे... –मुंबई गर्ल’

ओव्हरस्मार्ट गर्ल.... एवढा खोटारडे पणा?

तिच्या या पोस्टचे आपण लगेच उत्तर द्यावे का? नकोच... थांबू आणखी दोन दिवस... बघू ग्रुप्समध्ये आणखी काय गोंधळ होतोय ते... त्या आधी आपण दिशाशीच फोनवर बोलून घ्यावे... जाब विचारावा... बोलेल का ती? प्रयत्न करायला काय हरकत आहे.....

संध्याकाळी बरोबर सात वाजता मी तिला फोन लावला.
‘बोलिये मिस्टर सांगलीकर..’
‘हाऊ आर यु दिशा?
‘आधी तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात?’
‘जशी तू तसा मी... तू आनंदात असशील तर मीही आनंदात आहे असे समज’
‘तुम्ही मला परत फोन का केलात?’
‘तू तशी परिस्थिती निर्माण केलीस म्हणून.. तुला बोलायचे नसेल तर मी फोन ठेवतो’ मी जरा नाराजीच्या स्वरात म्हणालो
‘वेट... तुम्हाला काय सांगायचे आहे ते सांगा’
‘दिशा, हे तू काय चालवले आहेस? तुला याच्यातनं काय आनंद मिळतो?’
‘हे मी आनंद मिळवण्यासाठी नाही करत. तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याची ही शिक्षा आहे’
‘शिक्षा? असली कसली शिक्षा.... आणि एका गुन्ह्याबद्दल कितीदा शिक्षा करणार आहेस तू?’
‘जोपर्यंत माझे समाधान होत नाही तोपर्यंत...’
‘ओके... कर तुला काय करायचे आहे ते. आता मी ग्रुप्समध्ये कन्फेशन देणार आहे. दोन दिवसात मी माझी बाजू मांडेन.  डोन्ट वरी, आय विल नॉट रिव्हील युअर आयडेंटीटी’
‘हे तुम्ही मला का सांगत आहात... आय डोन्ट केअर इफ यू  रिव्हील माय आयडेंटीटी’
‘मला माहीत आहे, तू कोण आहेस हे माझ्याकडून जाहीर व्हावं अशी तुझी इच्छा आहे. म्हणजे मग तू मला कायदेशीररीत्या अडकवू शकशील. किंवा मग मी तुझ्यावर अपार प्रेम करतोय हे सगळ्यांना कळावं असं तुला वाटते...’
मी असे म्हंटल्यावर दिशा मुसमुसून रडायला लागली.. मग तिच्या रडण्याचा आवाज वाढत गेला... तिने अक्षरश: भोकाड पसरून रडायला सुरवात केली...
‘यु हॅव डिस्ट्रॉयड मी... बाय युवर स्ट्रेंज लव्ह’ दिशा रडत रडतच म्हणाली. मग जोरात ओरडली, ‘आय विल किल यू... देअर इज नो मर्सी फॉर यू’
‘दिशा, शांत हो.... आय एम सॉरी फॉर माय हार्श बिहॅविअर ’
हळू हळू तिचे रडणे थांबले.
‘दिशा, आठवते तुला चॅटिंग करताना मी खोटं बोललो की लगेच तू मला पकडायचीस? आज
मी तुझं खोटं बोलणं पकडलंय’
‘मी कुठं खोटं बोलले?’
‘ग्रुप्समध्ये तू लिहिलं आहेस की तू सुंदर नाहीस, हुशार नाहीस, श्रीमंत नाहीस.. तू श्रीमंत आहेस की नाहीस याच्याशी मला कांहीच देणे घेणे नाही. पण तू सुंदर आहेस. हुशार आहेस. तू स्वत:ला कमी समजू नकोस. निदान याबाबतीत तरी’
‘थॅंक यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स’
‘ओके, टेक केअर, बाय’
‘प्लीज वेट...’
मग दिशा तासभर माझ्याशी बोलत राहिली.

दुस-या दिवशी मी सायबर कॅफेत जावून ग्रुप्समध्ये काय चाललंय ते बघू लागलो. त्या
मुंबई गर्लची एक नवीन पोस्ट दिसली....

हाऊ धिस म्यान डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी?
काल संध्याकाळी मिस्टर सांगलीकर यांनी मला फोन कॉल केला. त्यांचा आवाज ऐकून मी लगेच फोन कट केला. पण त्यांनी मला पुन्हा फोन केला. हाऊ धिस मॅन डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी? सेव्ह मी फ्रॉम धिस डेंजरस मॅन ... प्लीज.... प्लीज सेव्ह मी...’

तिच्या या पोस्टवर बरेच डिस्कशन चालू होते. मी उत्तर द्यावे म्हणून माझ्यावर दबाव वाढत होता. मग मी एक छोटीशी पोस्ट टाकली...

आय एम गोइंग टू कन्फेस...
हे मुंबई गर्ल... यस्टरडे आय टोल्ड यु दॅट आय एम गोइंग टू कन्फेस... कान्ट यु वेट?
फ्रेंड्स, मी माझी बाजू उद्या मांडत आहे. तोपर्यंत तुम्ही या प्रकरणावर आपली मते बनवू नका. प्लीज...


मग मी सायबरकॅफेतून बाहेर आलो. दिशाला परत फोन करणे म्हणजे मूर्खपणाच होता. बहुतेक तिचे मानसिक संतुलन बिघडलंय.

चूक आपलीच आहे... तिला आपल्याकडून आणखी त्रास व्हायला नको. असं मस्त कन्फेशन लेटर लिहू की आपली बाजूही मांडली जाईल आणि दिशाचेही समाधान होईल.


पुढे चालू:

 या कथेचे आधीचे भाग:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा