Advt.

Advt.

Tuesday, March 22, 2016

अंजली. . . .


-महावीर सांगलीकर 


‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं  नाव सुचवा’
‘का चेंज करायचं आहे?’
‘मला नाही आवडत माझं नाव...’
‘आपलं नाव न आवडणाऱ्या व्यक्ति फारशा असत नाहीत. यू आर वन ऑफ सच अ रेअर केसेस... बाय द वे, काय नाव आहे तुझं?
‘अंजली!’
‘अंजली....? हे नाव तुला आवडत नाही? कमाल आहे! इतकं चांगलं नाव मिळायला नशीब लागतं... किती म्युझिकल आहे हे नाव! डोळे झाकून ऐकावं असं! तुला ते का आवडत नाही हे तू सांगू शकशील का?’
‘नाही आवडत.... का ते सांगता येत नाही मला’
‘ठीक आहे. मी सुचवीन तुला दुसरं एखादं नाव. पण ते तुझ्या अंजली या नावाएवढं चांगलं असणार नाही. तुझी जन्मतारीख सांगशील का?’
‘8 एप्रिल 1986’
‘ओह... म्हणजे जन्मांक 8, भाग्यांक 9. .  ग्रेट!'
'ग्रेट नाही सर. हे अंक ग्रेट नाहीत. मी वाचलंय'
'हे बघ अंजली, कोणतेही अंक वाईट नाहीत. प्रत्येक अंकात खूप कांही चांगलं असत. तुला मिळालेले हे दोन अंक तुला महान बनवू शकतात.  तुझं अंजली हे नाव या अंकांची निगेटिव्ह बाजू कमी करते'.
'हे मला माहीत नव्हतं'
'तुला तुझ्या अंजली या नावाचा अर्थ माहीत आहे का?’
‘नाही....’
‘हे बघ, अंजली म्हणजे ओंजळ. तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट दोन्ही हातानी मनापासून वहाता, अर्पण करता तेंव्हा अंजली हा शब्द वापरला जातो. देवाला फुले वहाताना ती ओंजळीतून वाहिली जातात. भावांजली, कुसुमांजली, पुष्पांजली वगैरे शब्द तुला माहीत आहेतच. युरोपिअन भाषांमध्ये अंजलीचा अर्थ आहे दूत. हे नाव अॅंजेल या नावापासून बनलं आहे. अॅंजेल म्हणजे देवदूत. हे देवदूत कांही भाग्यवान माणसांच्या जीवनात प्रवेश करतात आणि त्यांचं भलं करतात. म्हणजे एक प्रकारे तू देवदूत आहेस. तू ज्याच्याही आयुष्यात शिरकाव करशील तो खूप भाग्यवान असेल. तुझ्यामुळं त्याचं भलं होईल’

हे ऐकल्यावर अंजलीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले.

‘तुझ्या या नावाचं महात्म्य एवढ्यापुरतंच नाही. न्यूमरॉलॉजीनुसार सांगायचं म्हणजे अंजली हे नाव तुझ्यासाठी फारच चांगलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुझे हे नाव ‘ए’ या इंग्रजी अक्षराने सुरू होते. ए फॉर अंजली. हे अक्षर तुला नेहमी इतरांच्यापेक्षा  आघाडीवर ठेवते. इट गिव्ह्ज यू लीडरशिप क्वालिटीज. तुझ्या नावात सहा अक्षरे आहेत, त्यापैकी तीन स्वर आहेत. अक्षरांची सहा ही संख्या तुला एक जबाबदार व्यक्ति बनवते. तुझ्या या नावाची अंकातली किंमत 2 आहे. हा अंक तुला व्यवहारकुशल आणि बोलका बनवतो. हा अंक तुझ्या जन्मांकाचा मित्र नंबर आहे. त्यामुळे या नावाचा तुला जास्तच फायदा होणार आहे. तुझ्या नावातील स्वरांची अंकातली किंमत 11 आहे. हा एक मास्टर नंबर आहे. हा मास्टर नंबर तुला स्पिरिच्युअल बनवतो’
‘ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय तर मग मी माझं हेच नाव कायम ठेवते’
‘मी म्हणतोय म्हणून नको....  तुझं नाव तुला मनापासून आवडायला हवं’
‘ते मला आता आवडायला लागलंय...’
‘छान’
‘सर, आणखी एक विचारायचं होतं’
‘विचार की...’
‘गौरी हे नाव कसं वाटतंय तुम्हाला?’
‘चांगलं आहे की... गौरी हे पार्वतीचं एक नाव आहे. पण तू हे का विचारलंस?’
‘मला हे नाव खूप आवडतं.... माझ्यासाठी कसं राहील?’
‘चांगलं आहे.... आवडतं तर घेऊन टाक... पण या नावाचं स्पेलिंग Gauri असं कर, Gouri असं नको. तुझ्या जन्मांकाला Gauri हेच स्पेलिंग फायदेशीर ठरेल’
‘पण सर मग अंजली या नावाचं काय करू?’
‘व्यवहारात अंजली वापर. ते बदलायच्या भानगडीत पडू नको. अगदी लग्न झाल्यावर सुद्धा. पण तुझं निक नेम म्हणून गौरी वापर. तुझे आई-वडील, भाऊ-बहीण, काका-मामा, जवळच्या मैत्रिणी तुला गौरी या नावानेच हाक मारू देत’.
‘ओ.के. सर...... सर, आणखी एक विचारायचं होतं’
‘विचार ना....’
‘सर, तुमच्या ओळखीची कुणी अंजली नावाची मुलगी आहे का?’
‘हो, आहे ना...’
‘ती कशी दिसते?’
‘ती खूप सुंदर आहे. दिसायला आणि मनाने पण. तुझ्यासारखीच’
‘कोण आहे ती?’
‘माझी मुलगी..... मी तिला लाडाने गौरी अशी हाक मारतो’

हेही वाचा:
अंजलीना ब्यांडची कथा
व्हर्च्युअल डॉटर
सलोनी राठोड
गौरी आणि फेस रीडर

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा