Advt.

Advt.

Wednesday, August 19, 2015

लेझी गर्ल-महावीर सांगलीकर 


ही माझ्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. अगदी अलीकडची. त्याच्या संपर्कात अचानक एक तरुणी आली. सोनल तिचं नाव. ती सावळी आणि सुंदर तरुणी होती. इंग्लिश मेडीयममध्ये शिकलेली. वय वर्षे 30. अजूनही अविवाहित. एका मोठ्या शहरात एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून रहायची. ती मुलगी वकील होती. एका लिगल फर्ममध्ये नोकरी करायची. तिचे आई-वडील दूर  तिकडे गावी रहात. तिचं रहाणीमान उंची होतं. मिळणाऱ्या पगारात तिचा खर्च कांही भागायचा नाही, म्हणून तिला तिचे वडील महिन्याला ठराविक रक्कम पाठवत असत. 
  
 सोनल ज्या लॉ फर्ममध्ये काम करायची, तिथं तिला त्रास देणारे अनेक लोक होते. त्यामुळं वैतागून तिनं नोकरी सोडून दिली. तिला वाटलं, लगेच दुसरीकडं जॉब मिळेल. पण तिला पाहिजे तसा जॉब कांही मिळेना. शिवाय तिच्यावर अनेक संकटं कोसळायला लागली. आपलं भविष्य कांही बरोबर नाही असं तिला वाटायला लागलं. ती निराश झाली. निराशेच्या भरात तिनं देवीकडं आर्त स्वरात याचना केली, ‘आई……!!!!!!!!!!! मला यातनं सोडव.....!’
  पुढच्या पंधरा दिवसातच तिच्या आयुष्यात माझ्या मित्राची एन्ट्री झाली. त्याचं नाव महेश. महेशनं तिचं कौन्सिलिंग करून तिला तिच्या सोनेरी भविष्याची स्वप्नं दाखवली. मग तिला म्हणाला, ‘तुला नोकरी करायची गरज नाही. तू तुझी स्वत:ची लिगल फर्म चालू कर. तुला क्लाएंट्स मिळवून द्यायचं काम माझं’ 
  कांही दिवसातच तिची लिगल फर्म चालू झाली. महेशनं तिची ओळख अनेक मोठमोठ्या लोकांशी करून दिली. कांही क्लाएंट्सही मिळवून दिले.  
  एके दिवशी तो तिला म्हणाला, ‘वकील म्हणून तुझं नाव जेवढं फेमस होईल, तेवढा तुझा क्लाएंट बेस वाढेल. वकिलांना जाहिरात करायला बंदी आहे. आपण कांही आयडीयाज लढवू. तुझं एखादं लेक्चर आयोजित करू. कायद्याच्या संदर्भात. त्याला भरपूर श्रोते येतील याची व्यवस्था मी करेन. मग तुझ्या लेक्चरची बातमी सगळ्या पेपरंना देऊ……. फोटोसकट. तुझं नाव सगळीकडं होईल. मग तुला भरपूर क्लाएंट्स मिळायला लागतील’
  ती हो म्हणाली. पण नंतर तिनं उत्साह दाखवला नाही. त्यानं परत परत आठवण करून दिली. पण ती बघू, करू असे म्हणत राहिली. स्वत:हून तर तिनं तो विषय कधीच काढला नाही. 
  मग एके दिवशी तो म्हणाला, ‘बरं ठीक आहे, लेक्चर पुढं कधीतरी घेऊ. सध्या तू कायदेविषयक लेख लिहित जा. आपण ते पेपरना देऊ. ते छापून आले की तुझं नाव वकील म्हणून सगळीकडे पसरेल’. 
  ती हो म्हणाली. तो म्हणाला, ‘चल, आज मी तुझी एक संपादकाशी ओळख करून देतो. ते सांगतील तुला कोणत्या टॉपीकवर लिहायचं ते’. ती म्हणाली, ‘आज नको, पुढच्या आठवड्यात जाऊ’. 
  पुढच्या आठवड्यात त्यानं तिला आठवण करून दिली, तर ती म्हणाली, ‘आत्ता नको, पुढच्या आठवड्यात जाऊ’. पण पुढचा आठवडा कांही उजाडेना.
  तिच्या अंगात उत्साहच नसे. ती रोज दुपारी दोन-तीन तास झोपत असे. तो म्हणाला, ‘हा तुझा ऐन उमेदीचा काळ आहे. दिवसा झोपा काढू नकोस. मी आज तुझ्यासोबत आहे, नंतर असेनच असे नाही. माझा जास्तीत जास्त फायदा करून घे’
  ती हो म्हणाली. पण तिनं दिवसा झोपायचं कांही बंद केले नाही. 
  एकदा त्यानं तिला विचारलं, ‘तू सांगलीकरांची ‘शिवानी द ग्रेट’ ही कथा वाचली आहेस का?’
  ‘नाही’
  ‘शिवानीची कथा तुझ्या सारख्याच एका मुलीची कथा आहे. तिनं बघ कसं आपल्या कामाबाबत सिरिअस होऊन यश मिळवलं... स्वत:चं ऑफीस घेतलं... तू पण तिच्या सारखंच यश मिळवू शकतेस. पण आधी तुला आळस झटकावा लागेल’

  तो तिच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या आयडीयाज शोधत असे. तिला सांगत असे. ती हो, करुया म्हणत असे. पण पुढं ती कांहीच उत्साह दाखवत नसे. तिच्या कामाच्या बाबतीत ती अजिबात सिरिअस नव्हती. क्लाएंट्सच्या केसेस ती नीट वाचतही नसे. तिच्या आवडी-निवडी वेगळ्याच होत्या. एस्टॅब्लिश होण्यासाठी तिनं महेशचा कांहीच फायदा करून घेतला नाही. 
  महेशच्या लक्षात आलं की ही इथं या शहरात एकटीच आहे. हिला मित्र नाहीत. हिचं फारसं कुणाशी पटत नाही. नेहमी तणावाखाली असते. आई-वडिलांशी पण तिचे संबंध दुरावलेले. हिच्या कांही मानसिक गरजा आहेत. आपण हिचे पालक बनुया. एक बाप आपल्या मुलीचे जे लाड करतो ते करुया. तिच्या जीवनात आनंद भरुया. एकदा ती आनंदी  रहायला लागली की आपोआपच आपल्या कामाच्या बाबतीत सिरिअस होईल. 

  तो तिला बोलतं करू लागला. तिची दुखं ऐकून घेऊ लागला. कुणापुढं आपलं मन मोकळं करायला तिला आत्तापर्यंत संधीच मिळाली नव्हती. ती त्याच्यापुढं आपलं मन मोकळं करू लागली. तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक भयानक घटना तिनं त्याला सांगितल्या. त्या ऐकून त्याला फार वाईट वाटलं.
  एकदा तो म्हणाला, ‘चल, आज आपण एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवायला जाऊ’. ती हो म्हणाली. त्या दिवशी ते जेवायला गेले.
  मग त्यांचं हॉटेलमध्ये जेवायला जाणं हे नेहमीचेच झाले.
  एके दिवशी ती म्हणाली, ‘आमीर खानचा पी.के. सिनेमा चांगला आहे म्हणे’
  ‘तुला बघायचा आहे का?’ त्यानं विचारलं.
  ती हो म्हणाली. त्या दोघांनी तो सिनेमा बघितला.
  मग त्यांचं सिनेमाला जाणं हे नेहमीचच झालं. सिनेमा बघत असताना तिला होणारा आनंद, तिचं सिनेमा बघण्यात कमालीचे दंग होणे, तिच्या कॉमेंट्स यामुळे त्याला खूप बरं वाटत असे. चला, तेवढा वेळ तरी ही मुलगी डिप्रेशनमधनं बाहेर येत असते.
  एके दिवशी त्यानं तिला जाएंट व्हीलमध्ये बसवलं. आयुष्यात पहिल्यांदाच ती जाएंट व्हीलमध्ये बसली होती. तिनं ते थ्रील मस्तपैकी एन्जॉय केलं. एखाद्या अल्लड बालिकेसारखं.
  एकदा तिला कुणीतरी तिच्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले. तिनं ते महेशला सांगितलं. महेशला इतका राग आला की त्यानं आपली सगळी कामं बाजूला ठेऊन त्या तरुणाचा छडा लावून  त्याला अद्दल घडवली. नंतर हाच प्रकार आणखी तिन वेळा झाला. त्याहीवेळी महेशनं त्या-त्या लोकांना धडा शिकवला. पुढं एकदा तिला फेसबुकवर कांही तरुणांनी त्रास दिला. तिनं त्यांच्याविरोधात पोलीसात तक्रार केली. तिला कमिशनर ऑफिसला, लोकल पोलीस स्टेशनाला हेलपाटे घालायला लागले. हे सगळं तिला एकटीला करणं अवघड होतं. महेश होता म्हणून तिला ते शक्य झालं.
  त्यानं तिला नेहमीच साथ दिली. तिला अनेक संकटातनं सोडवलं.
  आता ती आनंदी रहायला लागली. पण कामाच्या बाबतीत ती अजूनही सिरिअस होईना. त्याच्या रेफरन्सने बरेच लोक तिला त्यांच्या लीगल कामासाठी फोन करत, पण अनेकदा ती फोनच घेत नसे आणि नंतरही त्यांना स्वत:हून फोन करत नसे.  
  ती आता महेशला गृहीत धरून वागू लागली. त्याचा उपयोग आपला सोबती, आपला रक्षक म्हणून करून घेऊ लागली. ती त्याला तिच्या पर्सनल कामासाठी बोलवायची. पण वेळ कधीच पाळायची नाही. त्याला ठरलेल्या ठिकाणी तासभर तरी वाट बघायला लावायची. तो फार वैतागायचा. तिला वाटायचं, हा कुठं आपल्याला सोडून जाणार आहे? आपण बोलवू त्यावेळी तो हजर रहातो.
  मे महिना आला. कोर्टाला महिनाभर सुट्टी असणार होती. महेश तिला म्हणाला, या सुट्टीचा चांगला उपयोग करून घे. लेख लिही. ते आपल्याला प्रसिद्ध करता येतील. लेक्चरही ठेऊ. त्याची तयारी कर. ती उत्साह न दाखवता हो म्हणाली. पण पुढं कांहीच नाही.
  महेश आता वैतागू लागला. या मुलीचं कसं व्हायचं? हिला खरच कांही करायचं आहे का स्वत:च्या भल्यासाठी? आपण हिच्यासाठी अजून किती दिवस द्यायचे?
  मग तो दिवस आला. तिला कांही खरेदी करायची होती. त्यासाठी तिनं त्याला बोलावलं होतं. पण तिनं तिचं आवरून त्याला ठरल्याठिकाणी भेटायला यायला नेहमीपेक्षाही जास्त वेळ लावला. तो भयंकर चिडला होता, पण त्यानं स्वत:ला कंट्रोल केलं. मग ते दोघं मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले. खरेदी झाल्यावर ती त्याच्याशी ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा तऱ्हेनं वागली. आपल्या वागण्यातनं तिनं त्याचा इन्सल्ट केला. हे त्याच्या सहन होण्यापलीकडचं होतं. त्यांचं डोकं सणकलं. दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात दोघेही आपापल्या वाटेला निघून गेले.
  तिचे शब्द त्याच्या डोक्यात घन घालू लागले... ‘मला वकिली करायची नाही... मला कांहीच करायचं नाही... मला या शहरात रहायचं नाही...’
  त्यानं तिच्या आईला फोन करून भांडणं झाल्याचं सांगितलं. ‘तुमच्या पोरीला सुधरवणं आता मला शक्य नाही. देवालाही शक्य नाही’
  आईनं तिला फोन केला.
  ‘आई...!’ तिनं हंबरडा फोडला, ‘तो मला सारखं माझ्याबरोबर सिनेमाला चल असं फोर्स करतो. आणि म्हणतो, मला तुझ्याशी लग्न करायचंय.. आज पण तो तसच म्हणत होता’
  आईनं महेशला फोन केला. त्याला जाब विचारला.
  तो म्हणाला, ‘तुमची पोरगी कशी आहे हे माहीत आहे ना तुम्हाला? ती खोटं बोलतीय. खात्री करून घ्यायची असेल तर आपण भेटूया तिघं. समोरासमोर चर्चा करूया’
  आईनं फोन ठेवून दिला.
  ‘तो मला सारखं माझ्याबरोबर सिनेमाला चल असं फोर्स करतो..... आणि म्हणतो, मला तुझ्याशी लग्न करायचंय’ हे तिचे त्याच्यावरले आरोप भयानकच होते. सिनेमा तिलाच पहायचा असे आणि तीच ठरवत असे कोणता सिनेमा बघायचा आणि कधी बघायचा ते. त्यांची ओळख झाल्यावर तो म्हणाला होता, ‘आपल्या वयात खूप अंतर आहे. ते नसतं तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं. पुढच्या जन्मी जरा लवकर जन्म घे, माझ्यानंतर. तेंव्हा बघू.. पण आता माझ्या मनात तुझ्याबद्दल तशी कांही भावना नाही आहे. You are just a friend of mine... rather my daughter.... तुझ्याबद्दल माझ्या मनात गैरभाव येऊ नयेत म्हणून आजपासून मी तुला माझी मुलगी मानत आहे’
  तिला दोष देण्यातही कांही अर्थ नाही. लहानपणापासून तिचा माइंड सेट निगेटिव्ह बनला होता. ती स्वत:ला शापित समजत असे. आपल्याला चांगलं भविष्य नाही हे तिनं मनोमन पक्कं करून घेतलं होतं. तिच्या झालेल्या अशा चुकीच्या माइंडसेटमुळं  तिनं महेशचा फायदा आपल्या चांगल्या भविष्यासाठी करून घेण्यापेक्षा टाईमपाससाठी करून घेतला. तिनं तिच्या आईला त्याच्याबद्दल जे खोटंनाटं सांगितलं त्याबद्दलही तिला दोष देण्यात अर्थ नाही. बहुतेक मुली आपला बचाव करण्यासाठी, आपल्या चुका लपवण्यासाठी हेच टेक्निक वापरतात. त्यात ही मुलगी तर वकील.
  पण पुढं ती फोनवर त्याला म्हणाली, ‘दोष तुझाही नाही आणि माझाही नाही. हा काळच आपल्या दोघांसाठी खराब आहे. तरीपण माझं चुकलंच... मी तुला गृहीत धरायला नको होतं. आता आपण पुन्हा नवी सुरवात करू. मी आता सिरिअसपणे वागेन. आपण दोघंही एकमेकांचा फायदा करून घेऊ. वकील म्हणून एस्टॅब्लिश होणं हेच माझं आता एकमेव ध्येय असेल’
  तो आनंदाने तयार झाला. म्हणाला, ‘मीही तुला कोणत्याच बाबतीत फोर्स करणार नाही. तुला फोर्स करणं हे तुझ्या भल्यासाठी असलं तरी ते चुकीचंच आहे. तू तुझ्या गतीनं काम कर. खरं म्हणजे मीच चुकलो. मी विसरलो होतो, तू तू आहेस आणि मी मी आहे. आपण दोन स्वतंत्र व्यक्ति आहोत. मी तुला टाईम आणि स्पेस द्यायला पाहिजे होती. तू मला माफ कर.’
  ‘तू पण मला माफ कर’ ती म्हणाली.
  पण पुढं काय झालं तिलाच ठाऊक, तिनं त्याला मेसेज पाठवला, ‘तुझा माझा संबंध संपला. मला आता तुझ्याशी कांही देणंघेणं नाही’. तिनं त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. त्याचा फोन ब्लॉक केला.
  तिला समजावण्यासाठी त्यानं तिला एक इमेल पाठवली. तुझ्यासाठी काय काय केलं ते आठव म्हणाला. तिचं उत्तर आलं, ‘माझ्यासाठी तू कांहीच केलं नाहीस. मला तुझ्याकडून एकही क्लाएंट मिळाला नाही, सगळे क्लाएंट्स मी माझ्या बळावर मिळवले. मला कुणा मोटीव्हेटरची गरज नव्हती आणि नाही. मी माझ्या बळावर सगळं कांही करू शकते. .....तू माझे आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलास.... माझा मालक असल्यासारखा वागलास... माझे सगळे आर्थिक सोर्सेस तू बंद करून टाकलेस.... आणि तुझी नजर कांही माझ्यापासून लपून राहिली नाही... तुझे छुपे हेतू मी कधीच ओळखले होते.. तू माझा बाप म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीस .... Now get lost from my life’
  तिचे हे भयानक आणि तद्दन खोटे आरोप ऐकून तो हादरला. एखादी मुलगी एवढं खोटं कसं काय बोलू शकते? एवढी कृतघ्नता? 
  त्यानं लिहिलं, ‘It is enough..... तू जे आरोप करत आहेस ते तुझ्या कृतघ्नतेचा कळस आहे..... माझे जर छुपे हेतू असते तर मी तुझ्या आईला आपले भांडण झाल्याचे मुळीच कळवलं नसतं.... आणि एकवेळ असं मानले की माझी नजर वाईट होती आणि माझे छुपे हेतू होते, ते तुला आधीपासून माहित होतं, तर तू इतके दिवस ते सहन कसं केलस? की ते तू एन्जॉय करत होतीस? भांडण झाल्यावर तुला उपरती झाली? आता मला कळलं... तुलाच माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असावी. नाहीतरी तुझं लग्न  होतच नव्हतं. पण आपलं लग्न शक्य नव्हतं म्हणून तू मला मनोमन तुझा पती मानलं असावंस... निदान प्रियकर तरी मानलं असावेस.. ‘मी अजून व्हर्जिन आहे’ असं तू मला दोन-तिन वेळा म्हणालीस... काय हेतू होता तुझा ते सांगण्यामागे? मी तुला त्यासाठी झापलंही होतं.... तरीच मी तुला ‘बेटी’ असं म्हंटलं की तुला ते आवडायचं नाही. सारंच भयानक आहे हे. छुपे हेतू तुझेच होते, माझे नाही. मी तुला बापाचे प्रेम दिलं, पण तू माझी मुलगी होण्याच्या लायकीची निघाली नाहीस. मला लाज वाटते तुझी. जाऊंद्या, तू तुझ्या बायालॉजिकल आईबापाचे जिथं उपकार मानत नाहीस, तिथं माझे उपकार काय मानणार?’ 
  ‘मी मूर्ख होते, म्हणून मला आजपर्यंत माझ्या आईवडीलांची किंमत कळली नव्हती, पण मला आता कळून चुकलं आहे, आपले आई-वडील हेच आपले खरे हितचिंतक असतात’  तिचं उत्तर. 
  ‘छान... मी तुला हेच सांगत होतो त्यावेळी तुला पटत नव्हते. आठवतं ना तुला तू काय म्हणायचीस? आपली आई ही फक्त आपण तिच्या गर्भात असतानाच आपली असते....नंतर ती देखील आपली नसते. आपलं कुणीच नसतं... एनी वेज, पण मला आनंद वाटला तुला आई-बापाचं महत्व कळलं हे ऐकून..’
  तिनं त्याचा फोन ब्लॉक केला होता म्हणून त्यानं दुसऱ्या फोनवरनं तिला फोन केला. त्याचा आवाज ऐकताच तिनं तो कट केला. मग त्यानं आणखी वेगळ्या फोनवरनं तिला फोन केले. त्याचा आवाज ऐकताच ती फोन कट करत असे. 
  एके दिवशी अचानक त्याला तिच्या आईचा फोन आला, ‘माझ्या पोरीला सारखा फोन का करतोस? परत जर तिला फोन केलास, मेसेज पाठवलास तर मी तिथं येऊन तुझी मुंडी मुरगाळीन... पोलीसात तुझ्याविरोधात तक्रार करीन’
  मग तोही भडकला. आवाज चढवून म्हणाला, ‘काय करायचं आहे ते करा... लवकरात लवकर करा. मी पण बघतो काय करायचं ते’ त्याचं हे बोलनं ऐकून आईला धक्काच बसला. ती हुंदके देऊ लागली.
  तो शांत होऊन म्हणाला, ‘आई, रडू नका. मी रागाच्या भरात तसं बोललो. मला माफ करा. पण या सगळ्या प्रकरणात मला खूप मानसिक त्रास झाला आहे. तुमच्या मुलीला मी किती मोठी संधी दिली होती, एस्टॅब्लिश होण्याची. मी तिला अगदी विनवण्या देखील केल्या, पण तिला माझा फायदा करून घेता आला नाही. तिनं माझा अपेक्षाभंग केला. तुम्ही नुसते हुंदकेच दिले, मी रोज आक्सोबोक्शी रडत आहे... अपेक्षाभंगाने आणि तिनं केलेल्या घाणेरड्या आरोपाने... तरीपण आई, झाल्या प्रकाराने ती आता शहाणी झाली असेल असं मला वाटतं. त्यामुळं मी माझं कर्तव्य म्हणून अजूनही तिला मदत करायला आहे. पण मी आता तिला भेटणार नाही. अजूनही माझ्या रेफरन्सने तिला खूप क्लाएंट्स मिळू शकतात’
  ‘नको... तू कशाला तिची एवढी काळजी करतोस? तिचं कांही तुझ्याशी रक्ताचं नातं नाही’
‘आई, गेल्या जन्मी तिनं माझ्यावर कांहीतरी उपकार केलेले असतील. त्या ओझ्यातनं मुक्तं होण्यासाठी मी तिच्यासाठी एवढा धडपडलो असेन’
  ‘राहू दे आता. माझी पोरगी आळशी आणि भांडखोर आहे. तिला तिच्या कामात रस नाही. इकडं आली तरी सारखं माझ्याशी भांडतच असते. घरी कामात मदत करत नाही.. नुसतं मोबाईलवर सेल्फी काढत असते नाहीतर कुत्र्या-मांजरांचे व्हिडीओ बघत असते..  इथल्या क्लाएंट्सशी पण नीट वागत नाही. त्यांचे फोन घेत नाही. तू क्लाएंट्स पाठवलेस तरी ती ते घेणार नाही. तू तिची काळजी करायचं सोडून दे. तिचं लग्न झालं की ती सुधारेल आपोआप. तिला तुझ्याविषयी तिटकारा वाटतोय आता. परवा तू तिची कांही पुस्तकं पार्सलनं परत पाठवलीस, पण तिनं ते पार्सल उघडून पण बघितलं नाही, सरळ कचराकुंडीत फेकून दिलं’
  ‘असं?... एवढाच जर तिला माझ्याविषयी तिटकारा असता तर तिनं माझ्यामुळं मिळालेला सगळ्यात मोठा रेग्युलर क्लाएंट सोडून दिला असता. पण तो तिनं सोडलेला नाही. सोडूही नये. कारण तिथंच तिचं उज्वल भविष्य  लपलेलं आहे. आज ना उद्या तिला कळेलच. तिनं मला बाप मानलं नसलं तरी मी तिला मुलगी मानलं आहे. तिनं माझ्यावर घाणेरडे आरोप करून देखील माझ्या मनात तिच्याबद्दल कसलीही कटू भावना नाही. तिला त्रास होईल किंवा तिचं नुकसान होईल अशी कोणतीही स्टेप मी घेणार नाही. तुम्ही माझ्या बाजूने निश्चिंत रहा.’ 
   मग एके दिवशी त्यानं खरंच तिची काळजी करायचं सोडून दिलं. त्यानं स्वत:ला समजावलं, शेवटी ती आणि तिचं नशीब. तिनं दाखवलेली कृतघ्नता ही तिची मजबूरी होती हे त्याला कळून चुकलं. कुणाच्या तरी प्रेशरखाली तिला हे नाईलाजानं करावं लागलेलं दिसतंय. तिचं भलं व्हावं, इथून पुढं तरी तिनं आपल्या कामाच्या बाबतीत सिरिअस व्हावं अशी प्रार्थना केली. त्याच्या हातून ज्या कांही चुका झाल्या होत्या त्याबद्दल मनोमन तिची माफी मागितली. मग त्यानं या प्रकरणावर पडदा टाकला. 

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा