Advt.

Advt.

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

मी कथा कशी लिहितो?

(लेखक मधुकर जाधव यांनी घेतलेली मुलाखत)

मधुकर जाधव: तुमच्या मराठी कथांचा महाकथा हा ब्लॉग फारच लोकप्रिय झाला आहे. तुमच्या ब्लॉगचे पेज व्ह्यूज लवकरच दोन लाखांचा टप्पा ओलांडणार आहे, त्याबद्दल आत्ताच तुमचे अभिनंदन.  पूर्वी तुम्ही वैचारिक विषयांवर लेख लिहित होता. इतिहास आणि समाज या विषयांवरही तुम्ही लिखाण केले आहे. तुमचे अनेक विचार आणि लेख विवादास्पद ठरले. पण या प्रकारचे लिखाण तुम्ही बंद केलेले आहे. अचानक कथालेखनाकडे कसे काय वळलात?

महावीर सांगलीकर: खरं म्हणजे कथा लेखनाचे अंग माझ्यात पूर्वीपासूनच होतं. कोणे एके काळी मी इंग्रजी आणि हिंदी कथाही लिहिल्या होत्या. पण जीवनात घडलेल्या कांही गोष्टींमुळे मी बंडखोर, विद्रोही विचारांकडे वळलो. त्यामुळे कथालेखनात मला इंटरेस्ट राहिला नाही. पण सुमारे दीड वर्षांपूर्वी मी जाणीवपूर्वक त्या फेजमधनं बाहेर पडायचं ठरवलं. कथांचा एक ब्लॉग सुरू केला. कांही कथा लिहिल्या आणि त्यांना वाचकांकडून भरघोस प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे इतर विषय पूर्ण सोडून देऊन मी कथा लेखनावर जोर दिला.

म.जा.: तुमच्या लिखाणात असा बदल केल्याने तुम्हाला त्याचा कांही फायदा अथवा तोटा झाला का?
म.सा.: तोटा कांहीच झाला नाही. उलट फायदाच फायदा झाला. एकतर मी विद्रोही म्हणून ओळखला जायचो, पण आता एक कथालेखक म्हणून ओळखला जातो. मी विद्रोही विचारांचा असताना फारसा लोकप्रिय नव्हतो, पण आता एक कथालेखक म्हणून लोकप्रिय झालो आहे. मी विद्रोही असताना माझी बहुतांश मित्रमंडळी ही विद्रोही विचारांची, जातीयवादी, सारासार विचार करण्याची कुवत नसणारी, समाजात तेढ निर्माण करणारी होती. विद्रोही लिखाण बंद करण्यामुळे माझा एक मोठा फायदा असा झाला की मी या निगेटिव्ह प्रवृत्तीच्या मित्रांपासून आपोआप दूर झालो.

म.जा.: आता आपण मुख्य विषयाकडे वळू. माझा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला कथा कशी सुचते?
म.सा.: एखादी कथा लिहिण्यासाठी आपल्याला त्या कथेची थिम सुचावी लागते. मला सुचणाऱ्या थिम्स मुख्य करून माझ्या स्वत:च्या आयुष्यात घडणाऱ्या तसेच  अवतीभोवती घडणाऱ्या घटनांतून सुचत असतात.  तसेच कांही थिम्स या काल्पनिक असतात. काल्पनिक थिम्सच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यातल्या अनेक थिम्स या मला स्वप्नात सुचत असतात! 
  थिम सुचल्यावर त्यावर कथा लिहिणे हे माझ्यासाठी सोपे असते. सुरवातीला ती थिम माझ्या डोक्यात घोळत रहाते. मग प्रत्यक्ष लिहायला बसल्यावर कथेतील बारीक सारीक तपशील, संवाद सुचत जातात. कल्पनाविस्तार होत जातो. कथा लिहिताना मी तिच्यात इतका गुंगून गेलेला असतो की मला तिचे व्हिज्युअलायझेशन होते. सुमारे दोन-अडीच हजार शब्दांपर्यंतची कथा एका बैठकीत लिहून होते. नंतर एक-दोन दिवसाची गॅप देवून मी ती कथा पुन्हा वाचतो. तोपर्यंत आणखी कांही मुद्दे सुचलेले असतात. कथेचे पुनर्लेखन होते. अशा रीतीने ती कथा पूर्ण होते. मग मी ती माझ्या महाकथा या ब्लॉगवर प्रकाशित करतो.

म.जा.: तुमच्या कथा ‘पात्रप्रधान’ असतात. तुमच्या कथांमधल्या पात्रांची आणि त्यांच्या नावांची निवड तुम्ही कशी करता?
म.सा.: पात्रांची नावे ठेवताना मी खूप काळजी घेतो. म्हणजे मला ती सहजच सुचतात, पण ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असावे लागते. उदाहरणार्थ, माझ्या कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स या कथेच्या पहिल्या भागात 7 पात्रे आहेत. ही सात पात्रे वेगवेगळ्या प्रदेशातली आणि वेगवेगळ्या समाजाची आहेत. त्यांचे धर्मही वेगवेगळे आहेत. हे एक मिलिटरी स्पाय मिशन आहे. त्याचे प्रमुख हरयाणामधले आहेत. मी त्यांचे नाव कर्नल चौधरी ठेवले. कथेतला कॅप्टन उत्तर राजस्थानमधला आहे. त्याच्यासाठी मला कॅप्टन विजय प्रताप सिंग हे नाव सुचले. कथेत पाच सुपरनॅचरल गर्ल्स आहेत. त्यांच्या प्रदेशानुसार आणि समाजानुसार मला सुचलेली नावे: महाराष्ट्रातली शिवानी सावंत, उत्तर प्रदेशची सलमा सिद्धिकी, कर्नाटकची रीटा डिसोझा, तमिळनाडूची राजुल जिनेन्द्रन आणि नेपाळची तारा गुरुंग. या पाच मुलींना मी वेगवेगळी गूढ शक्ति दिली आहे. कोणत्या मुलीला कोणती शक्ती द्यायची हे ठरवताना मी त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीचा विचार केलेला आहे.

म.जा.: कथेचं नाव तुम्हाला आधीच सुचतं की ते तुम्ही कथा पूर्ण झाल्यावर ठेवता?
म.सा.: कथेचं नाव मला बहुतेक वेळा थिम सुचल्यावर लगेच सुचतं, पण कांहीवेळा मी ते कथा लिहून झाली की बदलतो. कथेचं नाव आकर्षक आणि मनाची पकड घेईल असंच ठेवतो, कारण वाचकाची पहिली नजर कथेच्या नावाकडेच जात असते. कथेच्या नावातून कथेचा विषय स्पष्ट होईल याची काळजी घेतो. बऱ्याचदा माझ्या कथेचं नाव इंग्रजीमध्ये असतं.

म.जा.: तुमच्या कथांमध्ये जो तपशील असतो, त्यात वेगवेगळ्या विषयांची रेलचेल असते. शिवाय तो तपशील देण्याची तुमची शैलीही वेगळ्या प्रकारची आहे....
म.सा.: कथेत जो तपशील भरलेला असतो, त्यामागे विज्ञान, इतिहास, धर्म, गूढ गोष्टी, समाज अशा अनेक विषयांचे कित्येक वर्षे खपून मिळवलेले ज्ञान, ते अप टू डेट ठेवण्याची क्षमता, मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे ज्ञान, भाषेवरील प्रभुत्व, कथेतील प्रत्येक पात्र होऊन जगण्याचे कसब अशा अनेक गोष्टी असतात. तुम्हाला जर चांगले कथालेखन करायचे असेल तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे.
माझ्याकडे माझ्या वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात, त्यावरून माझ्या कथा त्यांना खिळवून ठेवतात असे दिसते. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या कथा वाचत असताना वाचकाला व्हिज्युअलायझेशन होते. कथा आपल्यापुढे घडत आहे असे त्याला वाटते. पुढे काय होणार याची त्याला उत्सुकता लागते. त्यामुळे तो एका बैठकीतच ती कथा वाचून काढतो. त्याच बरोबर माझी भाषाशैली. मी पाल्हाळ लावत नाही. मी नेमक्या आणि थोडक्या शब्दात लिहितो. कथा रेंगाळणार नाही, ती पुढे सरकत राहील याची काळजी घेतो. ही शैली वाचकाला खिळवून ठेवते.
   भाषेच्या तथाकथित शुद्धतेला मी अजिबात किंमत देत नाही. कृत्रिम संस्कृत प्रचुर वाक्ये टाळतो. लोक जसे बोलतात अगदी तसेच मी लिहितो. कथेतील संवादात मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजीचा मी मुक्तपणे वापर करतो. यामुळे माझ्या कथा जिवंत अनुभव देतात.

म.जा.: तुम्ही लिहिलेली तुमची सर्वात आवडती कथा कोणती?
म.सा.: हा प्रश्न मला अनेक वाचक  विचारतात. या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच आहे. तसेच माझ्या आवडीपेक्षा वाचकांची आवड मला महत्वाची वाटते. त्यांची सर्वात आवडती कथा कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स ही आहे. त्या खालोखाल सलोनी राठोड ही कथा वाचक प्रिय आहे.
माझं सर्वात आवडतं पात्र कोणतं असाही एक प्रश्न असतो. याचंही उत्तर देणे अवघड आहे, कारण माझ्या कथेतली सर्वच पात्रे माझी आवडती आहेत. तरीही कांही पात्रे मला विशेष महत्वाची वाटतात. त्यांचा इथे उल्लेख करावासा वाटतो: सलोनी (सलोनी राठोड), अंजेलिना (ब्यांड बाजा), शिवानी (शिवानी द ग्रेट), सीता (आधुनिक रामायण), दिशा (दिशाची गोष्ट), अस्मिता (व्हर्च्युअल गर्ल), हनुमंत राव, रावन्ना, (आधुनिक रामायण), गौरी (गौरी आणि फेस रीडर/ गौरीचं लग्न).

म.जा.: तुमचे वाचक साधारणपणे कोणत्या स्तरातील आहेत?
म.सा.: वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याकडे येतात त्यावरून माझ्या कथा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय वाचकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. त्यातही महिलांची संख्या जास्त दिसते. याचे कारण  माझ्या कथांचे विषय महिलांना जास्त भावतात असे मला वाटते.

म.जा.: तुमच्या कथा फक्त ऑनलाईनचा आहेत, अजून त्या पुस्तक रूपात आलेल्या नाहीत. त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचा तुमचा विचार आहे का?
म.सा.: माझ्या कथा ब्लॉगवरच का? असा प्रश्न अनेक वाचक विचारतात. याचे उत्तर  असे की त्या ब्लॉगवर असल्याने इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांना सहजपणे आणि मोफत उपलब्ध होतात. मला जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचता येते. याचा अर्थ मला त्या पुस्तक रूपात आणायच्या नाहीत असा नाही. कांही प्रकाशक माझ्या संपर्कात आहेत, आणि लवकरच माझा एक कथासंग्रह प्रकाशित होणार आहे.

म.जा.: नवोदित कथालेखकांना तुमचा काय सल्ला आहे?
म.सा.: नवोदित लेखकांनी स्वत:ची अशी वेगळी लेखन शैली विकसित करायला पाहिजे. सध्याच्या काळात पाल्हाळीक आणि मोठ्या कथा वाचायला लोकांना वेळ नाही, त्यामुळे कथा आटोपदार आणि वेगवान पाहिजेत. भाषा हे साध्य नसून साधन आहे, हे लक्षात ठेऊन कथेत येणाऱ्या भाषेच्या बाबतीत लवचिक राहिले पाहिजे. समाजात हिंदी आणि इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे तुम्ही कथेतील संवादात या दोन भाषांना योग्य तिथे आणि योग्य तेवढे स्थान दिले पाहिजे.
मुख्य म्हणजे तुमच्या कथा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर वाचकांना एखादा संदेश देण्यासाठी, त्यांना वेगळ्या विश्वात नेण्यासाठी आणि त्यांना हिताच्या गोष्टी सांगण्यासाठी असल्या पाहिजेत. कथांमधल्या  पात्रांची मानसिकता, मानवी संबधातील गुंतागुंत अशा गोष्टी व्यवस्थित रंगवल्या पाहिजेत, त्यात भडकपणा नाही पाहिजे. अनेक लेखक पात्रांना ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये रंगवतात. हे टाळले पाहिजे.

म.जा.: तुम्ही दिलेली माहिती नवोदित लेखकांना आणि वाचकांनाही उपयोगी पडेल. धन्यवाद.
म.सा.: धन्यवाद!


हेही वाचा:
मस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी
वाचक 
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा