Advt.

Advt.

Wednesday, November 30, 2016

लव्ह जिहाद


-महावीर सांगलीकर
‘हनमंता, तुला माहित आहे का, त्या लोकांनी लव्ह जिहाद सुरू केला आहे आपल्या लोकांच्या विरोधात’
‘म्हणजे काय?’ हनमंतानं न कळून विचारलं.
‘म्हणजे त्यांची पोरं आपल्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यांना पळवतात आणि त्यांच्याशी लग्न लावतात. त्यांचा धर्म बदलतात. ’
‘पण आपल्या पोरी त्यांच्या जाळ्यात अडकतातच कशा?’ हनमंतानं विचारलं.
त्याला उत्तर मिळालं नाही.
मग त्यानंच विचारलं, ‘बरं ठीक आहे... ते लोक चुकीची गोष्ट करत आहेत. पण मग आपण काय करायला पाहिजे?’
‘माझ्याकडं एक आयडिया आहे’
‘काय?’
‘आपण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा’
‘म्हणजे?’
‘म्हणजे आपण पण त्यांच्या पोरींना आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी लग्न करायचं. जशाला तसं उत्तर द्यायलाच पाहिजे.’
हनमंताला ही गोष्ट कांही फारशी पटली नाही. तो म्हणाला, ‘पण आपल्यात कोण तयार होणार असल्या गोष्टी करायला?’
‘दुसरं कुणी तयार होऊ दे न होऊ दे, आपणच सुरवात करुया. एकदा का आपण लव्ह जिहाद सुरू केला की आपल्या बाकीच्या तरुणांना पण प्रेरणा मिळेल’
‘ठीक आहे, पण आधी आपण गुरुजींना  विचारलं पाहिजे. त्यांनी परवानगी दिली की आपण हे सगळं करायला हरकत नाही’
‘अरे नको. गुरुजींच्याकडे आपण आपलं काम फत्ते झालं की मगच जायचं. सरप्राईझ द्यायचं त्यांना. ते खूष होतील. त्यांची परवानगी घेत बसलो तर ती एक तर मिळणार नाही, आणि मिळालीच तर पुढं  आपलं काम फत्ते झालं नाही तर ते नाराज होतील. त्यापेक्षा आपण हे सगळं परस्पर करुया. यशस्वी झालो तर गुरुजींची शाबासकी आणि काम नाही झालं तर त्यांना कांहीच कळणार नाही’
‘ठीक आहे. करुया. आधी कुणी करायचं?’
‘आपण तिघांनी एकदमच सुरवात करुया. पण तू आमच्यापेक्षा थोडा मोठा आहेस. म्हणून पहिलं पाऊल टाकायचा मान तुला’
मान मिळाल्यानं हनमंता भलताच खूष झाला. त्या खुशीतच तो म्हणाला, ‘पण त्यांची पोरगी कशी शोधायची?’
‘कशी म्हणजे? आपण रोज दर्ग्याकडे फिरायला जाऊ. मिळेल एखादी. आणि आपल्या कॉलेजमध्ये पण आहेत की भरपूर त्यांच्या मुली. तुला बघ कोण आवडते ती’
क्षणभर विचार करून हनमंता म्हणाला, अरे ती आपल्या कॉलेजमधली आयेशा कशी राहील? माझी तिच्याशी मैत्री पण आहे चांगली. आता तिलाच जाळ्यात ओढतो माझ्या’
‘अरे वा! खूप छान!’
दुसऱ्या दिवसापासनं हनमंता कामाला लागला. कॉलेज सुटल्यावर आयेशा लायब्ररीत गेली. हनमंता तिच्यावर वॉच ठेऊनच होता. पाच मिनिटांनी तोही लायब्ररीत गेला. तिथं ती एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसली होती.
‘हाय आयेशा!’
‘बोल हनमंता’
‘अगं मला हनमंता म्हणत जाऊ नकोस. मला आवडत नाही ते’
‘ओ.के. ... पण मग काय म्हणायचं तुला’
‘तूच ठरव’ तो डोळे मिचकावत म्हणाला.
‘हनु...?’ ती विचार करत म्हणाली, ‘पण तू माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म करू नको.. नाहीतर मला ‘आये’ वगैरे म्हणशील’ ती पण आपले टपोरे, काजळ घातलेले डोळे मिचकावत म्हणाली.
तो खदा-खदा हसला.
‘बरं बोल... काय म्हणतोस?’ तिनं विचारलं
‘कांही नाही.... बोलावसं वाटलं तुझ्याशी’
‘मग बोल ना...’
आत्ता लगेच डायरेक्ट प्रेमाचं बोलणं बरोबर ठरणार नव्हतं. त्यामुळं तो म्हणाला, ‘आत्ता नको... मी नंतर बोलेन तुझ्याशी’
‘बरं, बोल नंतर... मला पण आत्ता जरा नोट्स काढायच्या आहेत’ असं म्हणत ती पुस्तक वाचू लागली.
तो म्हणाला.. ‘आता तू वाचत बस, मी जातो. रात्री मी तुला एक मेसेज पाठवीन whats app वर. तो वाचून रिप्लाय दे प्लीज..’
‘ओ.के., देईन’

रात्री तिला काय मेसेज पाठवायचा याचा तो विचार करत होता. खूप डोकं खाजवल्यावर त्याला एक मेसेज सुचला.
‘एक सुंदर परी मिली लायब्ररी में
लगा कि उसे पढता रहूं’

थोड्या वेळानं तिचं उत्तर आलं,
‘यह किताब नहीं सबके लिये
कि कोई भी आये
और पढकर चला जाये’
तिचा मेसेज वाचून त्याचं धाडस वाढलं. त्यानं उत्तर दिलं,
‘पढकर चले नहीं जायेंगे हम
यह किताब चाहते है हम सदा के लिये’
तिचं बराच वेळ झाला उत्तर आलं नाही. ती ऑनलाईन तर दिसत होती. त्याला वाटलं तिला राग आला असावा. त्यानं आणखी शायरी करण्याऐवजी तिला मेसेज पाठवला, ‘गुड नाईट आयेशा, सी यू अगेन’ पण तिचं कांही उत्तर आलं नाही. तो थोडा खट्टू झाला आणि त्या विचारातच झोपी गेला.
सकाळी सकाळी त्यानं व्हाट्स अॅप ओपन केलं तर आयेशाचा मेसेज होता. तिनं त्याला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला होता. सोबत गुलाबाच्या फुलांची इमेज देखील.
त्या दिवशी तो कॉलेजमध्ये जरा नटून-थटूनच गेला. आयेशा पण नटून-थटूनच आली होती. दोघांची नजरानजर झाली, तेंव्हा आयेशाची नजरच सांगत होती की ती त्याच्या प्रेमात पडली होती.
आपण टाकलेल्या जाळ्यात आयेशा एवढ्या लवकर अडकली याचं हनमंताला आश्चर्य वाटलं होतं. कदाचित आपण लॉ ऑफ अॅट्रॅक्शनची पुस्तकं वाचतो त्याचाच हा परिणाम असावा.

+++++

पुढं त्या दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. कॉलेजला दांड्या मारायचा प्रकार सुरू झाला. हॉटेलमध्ये जाऊन कॉफी पिणं हे रोजचंच झालं. येणारा प्रत्येक नवीन सिनेमा दोघं अगदी मल्टीप्लेक्सला जाऊन बघू लागले.
मग एके दिवशी त्यानं तिला विचारलं, ‘आयेशा, तू माझ्याशी लग्न करशील का?’
‘हनु, तू कधी एकदा मला हा प्रश्न विचारतोस असं मला झालं होतं. अजून दोन दिवस वाट बघून मीच तुला विचारणार होते. माझी तयारी आहे, पण....’
हनुच्या छातीत धस्स झालं. त्यानं जरा घाबरतच विचारलं, ‘पण काय?’
‘तू हिंदू, मी मुस्लीम.... माझे आई वडील आपल्या परवानगी देतील का? आणि तुझे आईवडील मला स्वीकारतील का? समाज काय म्हणेल?’ तिनं एकामागून एक शंका उपस्थित केल्या.
त्याचा चेहरा पडला.
मग तो विचार करत म्हणाला, ‘समाज गेला खड्ड्यात. तू तुझ्या आई-वडिलांना विचार. मी माझ्या आई-वडिलांना विचारतो. परवानगी मिळाली तर ठीक आहे. नाहीतर....’
‘नाहीतर काय?’
‘नाहीतर मग इतर प्रेमी जे करतात तेच आपण पण करायचं’
‘म्हणजे पळून जाऊन लग्न करायचं? नको रे बाबा’
‘दुसरा ऑप्शनच नाही.... तू विचार तुझ्या घरी. मी पण माझ्या घरी विचारतो. बघूया काय म्हणतात ते. मी गावी जाऊन येतो. तू पण गावी जाऊन ये. आल्यावर भेटू’
गावी जाऊन आयेशानं तिच्या घरी सांगितलं तेंव्हा तिच्या अम्मीनं घर डोक्यावर घेतलं. अब्बू समंजस होते. ते तिला समजाऊन सांगत म्हणाले, ‘देखो बेटा, जो तुम सोच रही हो, वह निहायत ही गलत बात है. सोचो, तुमने अगर यह कदम उठाया, तो लोग क्या कहेंगे? दंगे फसाद हो जायेंगे बेटा. यह शादी नही हो सकती’.
आयेशा म्हणाली, ‘लेकीन अब्बू, आपने भी लव्ह मरेज की थी’
‘हमारी बात अलग थी. लेकिन एकही बिरादरी के होकर भी हमें भाग कर शादी करनी पडी. हमने जो सहा है, मैं नहीं चाहता की तुम्हें भी सहना पडे. तुम्हें अपनी बिरादरी का कोई लडका मिला नहीं प्यार करने के लिये? वैसे भी यह प्यार-ब्यार कुछ ही दिनों का खेल होता है. जादा दिन टिकता नहीं.... और भाग कर शादी करने की बिल्कुल भी मत सोचना. कोई भी कदम उठाने से पहले मां-बाप और अपनी छोटी बहन के बारे में सोचो’.
तिकडं हनुमंता पण आपल्या गावी गेला. आधी त्याच्या आईला सांगितलं तेंव्हा ती डोक्याला हात लाऊन बसली. वडिलांना कळालं तेंव्हा त्यांनी त्याला लाता-बुक्क्यानं हाणलं. त्याला दम दिला, ‘परत असलं काय बोललास तर तंगडी तोडून टाकीन’.
अनुभवी पालकांनी मुलांना समजाऊन किंवा दम देऊन कितीही सांगितलं  तरी मुलं शेवटी त्याना जे करायचं तेच करतात. हनुमंता आणि आयेशानं शेवटी परस्पर लग्न केलंच. ते दोघे पुण्यातच एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. त्या दोघांनाही वाटलं होतं, थोडे दिवस त्रास होईल पण नंतर सगळं सुरळीत होईल. दोघही सज्ञान असल्यानं कायदेशीर अडचणी येणार नाहीत, कोणी पोलीस केसही करणार नाहीत.
पण चारच दिवसात हनमंताला कळलं की गावाकडं एक भयानक गोष्ट घडली आहे. तो ज्या जातीशी संबंधित होता तिची जात पंचायत भरली होती. पंचांनी त्याला, त्याच्या आई वडिलांना, भावाला आणि बहिणीला, म्हणजे आख्ख्या कुटुंबाला जातीबाहेर काढलं होतं. त्याच्या जातीच्या कुणीही त्या कुटुंबाशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, कुणीही त्या घरातल्या कोणत्याही कार्यक्रमाला, अगदी मयतीला ही जायचं नाही, त्यांना जातीतल्या कुणीही कसल्याही कार्य क्रमाला बोलवायचं नाही असं फर्मान पंचांनी काढलं होतं.
हनमंताला या गोष्टीचा फारच राग आला. अशी जात पंचायत वगैरे भरेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याला जातीबाहेर काढल्याचं त्याला दु:ख नव्हतं, पण आपल्या आई-वडिलांच, भाव बहिणीचं आयुष्य उध्वस्त होईल याची त्याला जाणीव झाली. आता कांहीतरी करणं गरजेचं होतं. त्यानं त्याला  लव्ह जिहादला भरीस घालणाऱ्या त्या दोन मित्रांना फोन लावला, पण त्यांनी फोन उचलला नाही. बऱ्याच वेळा ट्राय करून देखील त्यांनी फोन उचलला नाही, नंतर ते फोन स्वीच ऑफ झाले. हनमंताला कळून चुकलं की ते आपला फोन उचलणार नाहीत, म्हणून तो सरळ त्यांच्या घरी गेला. दोघंही घरी नव्हते, म्हणजे त्याला ते घरी नाहीत असं सांगण्यात आलं. तो समजून चुकला, आपल्याला लव्ह जिहाद करायला सांगणारे ते दोघं लुच्चे निघाले. ‘हरामखोर साले....’ त्याच्या तोंडून शिवी निघाली.
मग तो गुरुजींच्या घरी गेला. जे काय घडलं ते त्यानं गुरुजींना सविस्तर सांगितलं. गुरुजी म्हणाले, ‘मी कांही करू शकत नाही तुझ्यासाठी. आपली संघटनाही तुझ्यासाठी कांही करू शकत नाही. तू जो प्रकार करून ठेवला आहेस, तो करायच्या आधी तू मला विचारलं होतंस का? आता तुझं तूच निस्तर. चल, मला आता एका बैठकीला जायचं आहे. परत माझ्याकडं यायची गरज नाही’ असं म्हणत ते उठले. त्यांनी हणमंताला पाणीही विचारलं नाही.
हनमंता भडकला. तो ओरडला, ‘गुरुजी, आजपर्यंत मी तुम्हाला मान देत होतो. पण आता तुम्ही माझ्यासाठी ना गुरू आहात, ना गुरुजी आहात आणि ना वडिलधारे आहात. मी तुम्हा लोकांना असा धडा शिकवणार आहे की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.. निघतो आता, पण लक्षात ठेवा, लवकरच तुम्हाला माझ्याकडं यावं लागेल’

++++

हणमंतानं झटपट कांही निर्णय घेतले. आयेशाला न विचारताच.
हणमंता गुरुजींच्या सानिध्यात बराच काळ राहिला होता. गुरुजींच्या, संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या, पत्रकार परिषदेच्या वेळी हणमंता हजर असायचा. गुरुजी त्याला बऱ्याचदा प्रेस नोट डिक्टेट करत, त्याला वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या ऑफीसमध्ये प्रेस नोट्स द्यायला पाठवत. त्यामुळं मिडियाशी, पत्रकारांशी  त्याचा चांगलाच संबंध आला होता. त्यानं मिडियाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं. त्याच्याकडं पत्रकारांचे फोन नंबर्स होतेच.
त्यानं एकेकाला फोन लावायला सुरवात केली.
‘नमस्कार, मी हनमंत पवार बोलतोय’
‘हां, बोला बोला’
‘तुम्हाला एक खास न्यूज द्यायची आहे... एकदम खळबळजनक’
‘द्या की’
‘फोनवर नाही. पत्रकार परिषदेत’
‘कधी?’
‘संध्याकाळी पाच वाजता या, पत्रकार भवनला. चुकवू नका... न्यूज जात पंचायतीबद्दल आहे, लव्ह जिहाद बद्दल आहे आणि गुरुजींच्याबद्दल देखील आहे.'
त्यानं जवळपास 25 पत्रकारांना फोन लावले होते. न्यूज चॅनेल्सवाल्यांनाही कळवले होते. त्यांच्या लक्षात आलेच होते, कांहीतरी गंभीर मामला आहे. त्यामुळं अपवाद वगळता बहुतेक सगळेजण पत्रकार परिषदेला हजर राहिले होते. तीन मराठी न्यूज चॅनेलवाले आणि दोन नॅशनल न्यूज चॅनेलवाले देखील आले होते.
पत्रकार परिषदेत हणमंतानं सांगितलं, ‘मी एका मुस्लिम तरुणीशी लग्न केलं. हे लग्न करण्याचं कारण म्हणजे प्रेम नसून लव्ह जिहाद होता. हा लव्ह जिहाद मी खुद्द गुरुजींच्या सांगण्यावरनं केला. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की नंतर कांही अडचण आल्या तर ते आणि त्यांची संघटना माझ्या पाठीशी भक्कम पणे उभे रहातील. माझं व्यवस्थित व्हावं म्हणून त्यांनी मला एका बँकेत नोकरी द्यायचं आमिष दाखवलं होतं. लग्न झाल्यावर जात पंचायतीनं मला, माझ्या आई-वडिलांना, कुटुंबाला, जातीबाहेर काढलं. मी गुरुजींच्याकडं गेलो पण त्यांनी मला त्यांच्या घरातही घेतलं नाही..’
सगळे पत्रकार अवाक झाले होते.

हनमंता पुढं बोलू लागला, ‘हे सगळं मला सहन होत नाही. माझ्या कुटुंबाचं, माझं आणि माझ्या बायकोचं  हित लक्षात घेऊन आमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला आहे. मी धर्मांतर करणार आहे...’
सगळे पुन्हा अवाक.
एका पत्रकारानं विचारलं, ‘म्हणजे तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार आहात काय?’
‘नाही’, तो म्हणाला, ‘मी इस्लाम स्वीकारणार आहे’
ही गोष्ट मिडियासाठी फारच धक्कादायक होती. टी.व्ही.वर रात्रीच्या बातम्यांमध्ये ही बातमी  झळकली. दुसऱ्या दिवशी ती बहुतेक सगळ्या पेपर्समध्ये पहिल्या पानावर आली. दुपार पर्यंत ती एक नॅशनल न्यूज बनली होती.
हे प्रकरण मिडियात  येण्याचा एक मोठा फायदा असा झाला की जात पंचायतीच्या पंचांना अटक झाली.
गुरुजी हादरले होते. हणमंता अशी केली खेळेल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नव्हतं.
त्यांनी हणमंताला फोन लावला. पण त्यानं तो उचलला नाही.
मग गुरुजी स्वत: आपल्या दोन कार्यकर्त्यांना त्याच्या खोलीवर गेले. हणमंता त्यांना आत या असंही म्हणाला नाही. दारात उभं राहूनच तो म्हणाला, ‘बोला गुरुजी, कसं काय येणं केलंत माझ्याकडं?’
‘हणमंता, तू अतिशय चुकीचे पाउल उचलले आहेस’
‘नाईलाज होता. हे पाऊल उचलायला तुम्हीच मला भाग पाडलंत, बरोबर ना?’
गुरुजी थोडावेळ स्तब्ध झाले. मग म्हणाले, ‘पत्रकार परिषदेत तू माझ्यावर खोटे आरोप केलेस. हे कांही तू ठीक केलं नाहीस’
‘गुरुजी, हे तुम्ही बोलता? तुम्हीच तर मला तुमच्या वागण्या-बोलण्यातनं खोटं कसं बोलावं, प्रोपागांडा कसा करावा हे शिकवलंत.... मी फक्त तुमचं अनुकरण केलंय... बरं निघा आता. मला एका मौलवीकडं जायचं आहे...... पुढची चर्चा करायला..’ असं म्हणत त्यानं खाडकन दार लाऊन घेतलं.

++++

हणमंतानं धर्मांतराचा निर्णय घेतलाय हे आयेशाला बातम्यातनं माहीत झालं होतं, पण तो स्वत: तिला तसं कांहीच बोलला नव्हता. तिनंही त्याच्याजवळ तो विषय काढला नव्हता. शेवटी त्यानं तिला सांगितलं, ’तुला माहीत झालचं असेल सगळं. ..... मी तुझी माफी मागतो. खरं म्हणजे सुरवातीला माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, तर तो एक लव्ह जिहाद होता.... मी प्रेमाचं नाटक केलं आणि तू फसलीस..’
आयेशा हसायला लागली.... ‘’हा हा हा हा.... तुला काय वाटतं, तू लव्ह जिहाद केलास? अरे हनु.... लव्ह जिहाद तू नव्हे तर मी केला आहे’
हणमंता तिच्याकडं डोळे फाडून आश्चर्यानं बघायला लागला.
‘असं काय बघतोस?’ ती म्हणाली, ‘तुझा प्लॅन आम्हाला आधीच कळाला होता. मग मीही तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. आपलं लग्न झाल्यावर काय काय होऊ शकतं याचा आम्हाला अंदाज होताच. अंदाज खरा ठरला. हनु, तुझं स्वागत आहे आमच्या धर्मामध्ये...’

हणमंता डोकं धरून मटकन खाली बसला. मग त्यानं आयेशाला विचारलं, ‘तुझ्या या प्लॅनमध्ये अजून कोण-कोण होतं?’
‘आपल्या वर्गातला सादिक... त्यानं तुमचं बोलणं ऐकलं होतं. मला येऊन सांगितलं.... संघटना काय तुमच्याच असतात? आमच्याही असतात ना? मी आणि सादिक लव्ह जिहाद घडवून आणणाऱ्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याना भेटलो. मग आम्ही सगळ्यांनी तुमचा डाव तुमच्यावरच उलटवायाचा ठरवलं! हाहाहाहा!’
पण तिच्या हसण्यात विजयाचे भाव नव्हते तर प्रचंड उद्वेग होता.
मग आयेशा रडायला लागली. नंतर शांत होऊन म्हणाली, ‘हे सगळंच चुकीचं घडलंय. चूक माझी पण आणि तुझी पण. आपण दोघं बुद्धी गहाण ठेऊन, दुसऱ्यांचं सांगणं ऐकून कांहीतरी महान काम करतोय असं समजत काय करून बसलो हे? आपला वापर झालाय. झालं एवढं बस झालं. इथून पुढं आपल्या घरात तुझाही धर्म नको आणि माझाही धर्म नको. मला माझ्या धर्मात, धर्माच्या नावावर चालणाऱ्या कलहात आता कसलाही रस राहिला नाही. तुलाही आता तुझ्या धर्माचं प्रेम राहिलं नाही. तू इस्लाम स्वीकारायची गरज नाही. त्यापेक्षा आपण दोघं इथून पुढं माणूस म्हणून जगूया ना!’
हणमंता डोळ्यात टचकन पाणी आलं. तो म्हणाला, ‘आयेशा, किती समंजस आहेस तू...’
 हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा