Advt.

Advt.

Sunday, November 6, 2016

आठवणी: माझं आजोळ अंकलखोप

-महावीर सांगलीकर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी अंकलखोप हे गाव आहे. हे गाव इतर गावांच्या मानानं खूपच पुढारलेलं, सुशिक्षितांचं आणि सुबत्ता असणारं. सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणारं. गावात मुख्य करून मराठा, जैन, धनगर आणि लिंगायत समाजाची घरं. या गावात अंकलेश्वर आणि खोपेश्वर अशी दोन जुनी मंदिरं होती. त्यावरून या गावाला अंकलखोप असं नाव पडलं. हे गाव म्हणजे माझं आजोळ. माझा जन्मही इथंच झाला आणि बालपणही या गावातच गेलं.


माझे आजोबा म्हणजे एक ग्रेटच व्यक्ती होती. त्यांचं नाव बाबुराव कुंभोजकर. हे कुंभोजकर घराणं  अंकलखोपमधलं एक प्रतिष्ठीत घराणं. आजोबा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  आणि कांही काळ डेप्युटी (शिक्षणाधीकारी) होते. ते अंकलखोपचे पोस्ट मास्तर ही होते. शिवाय ते एक प्रगत शेतकरी होते.

आजोबा कुणाच्या अध्यात-मध्यात नसत. त्यांना कुणाशी भांडताना किंवा कुणाला नावं ठेवताना मी कधीच बघितलं नाही. ते जास्त करून स्वत:तच मग्न असत. आपण भले आणि आपलं काम भलं अशी त्यांची वृत्ती होती. त्यांचं मुख्य काम म्हणजे चिंतन-मनन करणं, विचार करणं हेच असावं. त्यांनी शारीरिक कष्टाची कामं केलेली मला आठवत नाही. पण बौद्धिक कामं करण्यात, दुसऱ्याकडून कामं करवून घेण्यात, कामावर देखरेख ठेवण्यात ते पटाईत होते.

विशेष म्हणजे पोस्ट ऑफीस आजोबांच्या घरीच होते. त्याहून विशेष म्हणजे माझा जन्म त्या पोस्टातच, म्हणजे ज्या खोलीत पुढं पोस्ट ऑफीस झालं, तिथंच झाला होता. पुढं आजोबा पोस्टात काम करत असताना मी बऱ्याचदा तिथंच असे. त्या काळात संक्रांतीच्या वेळी अनेक लोक आपल्या नातेवाईक वगैरेंना पोस्टानं तिळगुळ पाठवत. एका छोट्या कार्डला तिळगुळाची छोटी पिशवी जोडलेली असे.  एकदा संक्रांतीच्या वेळी अशा कार्ड्सचा मोठाच्या मोठा ढीग लागलेला मी पाहिला होता.  (पुढे तरुणपणी पोस्टाशी माझा जास्तच संबंध आला. मला पोस्टाची तिकिटे जमवण्याचा आणि पत्रमैत्रीचा छंद जडला. या छंदातून मला जगभर मित्र-मैत्रिणी मिळाल्या. नंतर मी मेल ऑर्डर बिझनेसही सुरू केला होता).

आजोबा आणि आजी या दोघांचा माझ्यावर खूपच जीव. माझे वडील महाराष्ट्र सरकारच्या शेतकी खात्यात  शेती अधिकारी होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे मला अंकलखोप इथल्या शाळेतच घालायचं ठरलं. शाळेचा पहिला दिवस मला अजून आठवतो. मला शाळेत जायला भीती वाटत होती म्हणून मी रडून धिंगाणा घातला. आमच्या घराशेजारी अनिल शिरगावकर आणि महादेव चव्हाण हे माझे दोन मित्र रहात असत. त्यांनी शाळेत माझ्या अगोदरच प्रवेश घेतला होता. आजीनं त्यांना मला जबरदस्तीनं शाळेत न्यायला लावलं. त्या दोघांनी मला अक्षरश: उचलून शाळेत नेलं. वर्गात गेल्यावर मात्र मी शांत झालो. शाळेची भीती मोडली. मला शिकण्याची अभ्यासाची गोडी लागली.

अंकलखोपमध्ये एक सार्वजनिक वाचनालय होतं. माझे आजोबा शाळा सुटल्यावर रोज दुपारी मला वाचनालयात घेऊन जायचे. तिथं पुण्या-मुंबईचे पेपरही यायचे. मला आठवतं, तिथं लोकसत्ता यायचा. नवशक्ति हा पेपरही यायचा. तिथं हे दोन्ही पेपर एक दिवस उशीरा यायचे. पेपर  वाचायची सवय मला लहानपणापासूनच लागली, ती आजोबांच्या मुळंच.. (पण मी लेखक झाल्यावर वाचनाची आवड कमी झाली).

अंकलखोपच्या शेजारी साधारण 3 किलोमीटर अंतरावर भिलवडी हे गाव आहे. तिथं आठवडा बाजार भरत असे. आजोबा मला दरवेळी तिथं घेऊन जात. आम्ही दोघं चालत जात असू. आजोबा बाजारात खूप चौकशी करून, घासाघीस करून खरेदी करायचे. धान्यं, फळं, भाजीपाला वगैरे. मग आम्ही चालत परत येत असू. चालायची ती लहानपणी लागलेली सवय मला आजही आहे. आजही माझं रोज साधारण चार-पाच किलोमीटर चालणं सहज होत असतं.

आजोबांच्या बाबतीत मी ऐकलेली एक गोष्ट म्हणजे ते एकेकाळी आमच्या समडोळी या गावात शिक्षक होते. हे गाव अंकलखोप पासून सरळ रेषेत साधारण 20 किलो मीटर आहे. आजोबा रोज अंकलखोप वरून समडोळीला चालत जात आणि शाळा सुटल्यावर परत अंकलखोपला चालत जात. म्हणजे रोज चाळीस किलो मीटर चालणं!

अंकलखोपवरून भिलवडीला जाताना वाटेत एक चिंचेच मोठं बन आहे. या बनात म्हसोबाचं छोटं देऊळ आहे. एक आख्यायिका अशी आहे की एकदा अफजलखानाच्या सैन्याचा तळ या बनात पडला होता. खानानं ते देऊळ पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याच्या सैन्यातल्या लोकांना हगवण लागली, ती थांबेना. खानाने म्हसोबा पुढं लोटांगण घातलं तेंव्हा कुठं हगवण थांबली. खानाचे वंशज आजही इथल्या यात्रेच्या वेळी म्हसोबाला येऊन जातात म्हणे.

सुट्टी असताना कधी कधी आजोबा मला सांगलीला किंवा वसगड्याला घेऊन जायचे. वसगडं हे आजीचं माहेर. आमचा हा प्रवास भारीच असायाचा. अंकलखोपहून भिलवडीला चालत जायचं, भिलवडीहून भिलवडी रेल्वे स्टेशनला टांग्यातनं जायचं, तिथं तिकीट काढून आगगाडीच्या एखाद्या डब्यात बसायचं, तिथनं नांद्रे स्टेशनला उतरायचं, मग तिथनं वसगड्याला चालत जायचं. सांगलीला जायचं असेल तर भिलवडी स्टेशनपर्यंत असाच प्रवास, मग तिथनं रेल्वेनं डायरेक्ट सांगलीला जायचं. त्यावेळी सांगली रेल्वे स्टेशन सांगली शहराच्या मध्यभागीच होतं, आता ते गाव सोडून बाहेर गेलंय. असो. आजही माझ्या स्वप्नात हा प्रवास कधेमधे दिसतो. स्टेशनात शिरणारं आगगाडीचं ते काळेकुट्ट इंजिन, त्यातून निघणारा धूर, धडकी बसवणारा प्रचंड आवाज आणि ऐकावीशी वाटणारी ती शिट्टी.

आजोबा मला आंघोळीला नदीवर घेऊन जायचे. मला पोहायला त्यांनीच शिकवलं. शिकवलं म्हणण्यापेक्षा मला नदीच्या मधल्या भागापर्यंत खांद्यावरनं घेऊन गेले आणि पाण्यात सोडून दिलं. मी खूप घाबरलो होतो. गटांगळ्या खाल्ल्या. पण हातपाय हालवल्यामुळं वाचलो आणि शिकलोही.

मला तीन मामा आणि एक मावशी. अनेक चुलत मामा. त्यावेळी मोठे मामा श्रीपाल रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. त्यांची नेहमी बदली होत असे. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा-मामी दोघं अंकलखोपला येत असत. दुसरे दोन्ही मामा शिकत होते. पुढं मधले मामा सुभाष हायस्कूल टीचर झाले तर धाकटे अशोक शेतकरी. सुभाष मामांचं टोपण नाव रावसाहेब होतं,  आम्ही त्यांना रावसू मामा म्हणायचो.  माझी मावशी गोरीपान, घाऱ्या डोळ्याची. आजी सारखीच. मावशीचा माझ्यावर खूप जीव. तिचे मिस्टर, ज्यांना मी काका म्हणत असे, सांगलीत असत. त्यांचं मारुती रोडवर स्टेशनरीचं दुकान होतं. मी आजीबरोबर सांगलीला गेलो की मावशीच्या घरी आणि नंतर दुकानातही जात असू. आजी माझ्यासाठी कांहीतरी वस्तू घेत असे. अनेकरंगी छत्री, खेळण्यातली लाकडी एस. टी. बस, खेळण्यातली कार घेतल्याचं आठवतं.

पुढं मधल्या आणि धाकट्या मामाची लग्ने झाली. तीनही माम्या प्रेमळ समंजस.

अंकलखोपच्या शेजारीच औदुंबर हे दत्ताचं ठिकाण आहे. तिथं दरवर्षी यात्रा भरत असे. मी मित्रांच्या बरोबर किंवा मामाच्या बरोबर यात्रेला हमखास जात असे. यात्रेच्या वेळी औदुंबरमध्ये जाणाऱ्याना साथीच्या रोगावरचं इंजेक्शन दिले जायचं, पण अंकलखोपमधल्या लोकांना इंजेक्शनमधून सूट असे. यात्रेला पुण्या-मुंबईकडचे अनेक गोरेपान लोक यायचे.

आजोबांच्या घरा शेजारीच राजमती बिरनाळे रहायच्या. त्यांना सगळेजण ताई म्हणायचे. त्यांचं किराणा दुकान होतं. आम्ही तिथनं गोळ्या, बिस्किटे, चिरमुरे घेत असू. पण या ताई म्हणजे फार मोठ्या क्रांतीकारक महिला होत्या हे मला त्यावेळी माहीत नव्हत.  स्वातंत्र्याच्या अगोदर नाना पाटलांच्या  क्रांतिकार्यात ताईंचा मोठा सहभाग होता. ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजांची एक रेल्वे लुटली होती. या लुटीमध्ये खजिना आणि शस्त्रे होती. या गोष्टी मला अगदी अलीकडेच कळल्या. शेजारी रहात असूनही माझा त्यांचा विशेष संबंध आला नाही.

गावात धुळाप्पा आण्णा नवले नावाचं एक मोठं व्यक्तिमत्व होतं.  ते महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीत होते. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी इंग्रजांना कर, महसूल देण्याचं नाकारलं. अस्पृश्यतेच्या विरोधात चळवळ सुरू केली. सांगली सहकारी साखर कारखान्याच्या (आता वसंतदादा सहकारी साखर कारखाना) स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. ते बराच काळ आमदारही होते. त्यांचे खास मित्र म्हणजे नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, रामानंद भारती, वसंतदादा पाटील, वि.स. पागे वगैरे. अर्थात या गोष्टी मला अलीकडे कळाल्या.

एकदा आम्ही लहान मुले क्रिकेट खेळत असताना चेंडू शेजारच्या गोठ्याच्या छपरावर गेला. तो काढायला मी छपरावर गेलो. छपर गवताच्या पेंड्या टाकून बनवलं होतं. मी सरळ खाली गोठ्यात एका म्हशीच्या अंगावर. नशीब, तिच्या शिंगावर नाही पडलो. म्हशीवरनं खाली उडी मारली. विशेष म्हणजे एवढं होऊनही म्हशीनं हूं की चूं केलं नाही. ती आपली कडबा खाण्यात रमली होती. मला साधं खरचटलं किंवा लागलंही नव्हतं. पण संध्याकाळी मला ताप आला. आजी मला डॉक्टरकडं घेऊन गेली. त्यानं इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. त्या आधी एकदा आम्ही मुलं खेळत असताना अचानक एक म्हैस धावत आली आणि माझ्या शेजारून निघून गेली. तिचं शिंग माझ्या कानशिलाला घासून गेलं. क्षणभर मला भोवळ आली. पण लगेच मी पुन्हा खेळू लागलो. जणू कांही घडलंच नव्हतं. आजोबांच्या घरीही गोठा आणि म्हशी होत्या. मी एकदा म्हशीची धार काढण्याचा प्रयत्न केला होता, पण मला ते जमलं नाही. मग मी तो नादच सोडून दिला. आयुष्यात म्हशीशी माझा डायरेक्ट संबंध एवढाच आला. दोस्ती पण नाय आणि दुष्मनी पण नाय! तरीपण मला म्हैस या प्राण्याबद्दल नेहमीच प्रेम वाटत आलं आहे. लहानपणापासून म्हशीचं दूध पिल्यामुळं असावं कदाचित.

आजोबांनी एक शेळीही पाळलेली होती हे आठवते.

एकदा गावात एक नाटक आलं होतं. मी ते बघायला गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत कोण होतं आठवत नाही आणि नाटकाचं नावही आठवत नाही. नाटकात राक्षसाचं एक पात्र होतं. त्याला सुळे आणि शिंगं होती. दुसऱ्या दिवशी घरी एक माणूस आला. मध्यमवयीन, काळा रंग, थोडसं टक्कल पडलेलं, केस मागं वळवलेले, पिवळा मनिला घातलेला त्यामुळं त्याचा काळा रंग उठून दिसत होता. आजी मला म्हणाली, तू काल नाटक बघितलस ना, त्यातले हे राक्षस! मला भीती नाही वाटली, पण नवल वाटलं. याला तर शिंगं होती आणि दोन दात बाहेर आले होते, ते कुठं गेले? की विसरून आले? पण मी तसं कांही विचारलं नाही.

गावाबाहेर एक टुरिंग टॉकी आली होती. तिथं मी आणि माझ्या मित्रांनी सिनेमा बघितला होता. संपूर्ण रामायण. हा मी बघितलेला माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा. त्यातले राम-लक्ष्मण-सीता वनात होते एवढाच भाग आठवतोय. त्यावेळी मला प्रश्न पडला होता, रामाच्या वेळी घडलेलं आत्ता कसं काय दिसतंय?

गावात आनंदराव सूर्यवंशी नावाचे शाहीर होते. त्यांना लोक आंदा शाहीर म्हणून ओळखायचे. यांचे पोवाडे वगैरे आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरनं बऱ्याच वेळा ऐकवली जायचे. या केंद्रावरनं अंकलखोपमधल्या लोकांनी गायलेल्या धनगरी ओव्यादेखील ऐकवल्या जायच्या.

गावातच पण नदीच्या कडेला एक जैन मंदिर होतं. हे मंदिर जैन बस्ती म्हणून ओळखलं जायचं. आजी मला अधून मधून तिथं घेऊन जायची. अलीकडे एकदा अंकलखोपला गेलो असताना या मंदिरात गेलो होतो. मंदिरातली महावीरांची मूर्ती चालुक्य काळातली आहे. विशेष म्हणजे चालुक्यांची पहिली राजधानी इथून जवळच असलेल्या कुंडल इथं होती. या कुंडलमधल्या एका जैन मंदिरात देखील अगदी हुबेहूब तशीच मूर्ती आहे. अंकलेश्वर आणि खोपेश्वरांच्या मंदिरात फारसं कुणी जात नसे. पण गावात सिद्धेश्वराचं एक मंदिर होतं. त्याला सिदोबाचं देऊळ म्हणायचे. तिथं बरेच लोक जात असत. मीही जात असे. एकदा मी तिथं गेलो असताना साप चावलेल्या एका मुलीला आणलेलं आठवतं.

पुढं मी तिसरी पास झाल्यावर तासगाव इथं शिकायला गेलो. चौथी-पाचवी  तासगावलाच शिकलो. सहावीला आमच्या समडोळी या गावी होतो. मग सातवी पासून शिकायला चिंचवडला काकांच्याकडं आलो. पण आजोळची ओढ कांही सुटली नाही. दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अंकलखोपला जायचो. सुट्टी तिथंच जायची.

सुट्टीच्या काळात बऱ्याचदा माझी आई व धाकटा भाऊ अनिल अंकलखोपमध्ये असायचे. माझ्यानंतर  अनिल अंकलखोपमध्ये शिकू लागला.

मी आठवीत चिंचवडला असताना भयानक आजारी पडलो होतो. केवळ नशिबानेच वाचलो. तो माझा पुनर्जन्मच होता. त्यावेळी माझे आजी-आजोबा खास मला बघायला अंकलखोपहून चिंचवडला आले होते. आगगाडीतून, एवढ्या दूरवर.

पावसाळ्यात कृष्णा नदीला मोठा पूर येत असे. त्यावेळी अंकलखोपचे कांही धाडसी युवक औदुंबरला जात, कृष्णा नदीत उडी घेत आणि पोहत पोहत अंकलखोपला येत. त्या युवकांच्यामध्ये माझे भरमू नावाचे एक चुलत मामा देखील असत. अशाच एका महापुराच्या वेळी ते नदीत तयार झालेल्या भोवऱ्यात अडकले आणि गायब झाले. नंतर सापडलेच नाहीत. त्यावेळी मी सावळवाडी या गावात होतो. नदीने या गावाला वेढा दिला होता.

पुढं 1980 साली वय झाल्यानं, आजारपणामुळं आजोबा वारले. त्या काळात मी महिनाभर त्यांच्याकडेच राहिलो होतो.  त्या नंतरही मी नेहमीप्रमाणे अंकलखोपला जात असे.

1995 मध्ये आजी आजारी पडली. आपण आता जास्त दिवस जगत नाही हे पक्कं झाल्यावर तिनं मला निरोप पाठवून बोलावून घेतलं. ते दिवाळीचे दिवस होते. सगळा गोतावळा जमला होता. भाऊबीज साजरी झाली, त्यानंतर  दुसऱ्याच दिवशी आजीनं देह सोडला.

त्यानंतर माझं अंकलखोपला जाणं कमी झालं. आता तर ते जवळ-जवळ बंदच झालंय.हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा