Advt.

Advt.

Wednesday, October 19, 2016

दिनकरचं लग्न

-महावीर सांगलीकर 


दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला.

तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्रेमपाशात ओढलं. पुढं कॉलेजला तिनं कॉमर्सला अॅडमिशन घेतलं, तर त्यानं आर्टसला. तरीदेखील त्यांच्या प्रेमात अडसर आला नाही. दोघांच्या भेटीगाठी, फिरणं, सिनेमाला जाणं चालूच राहिलं.

बी.कॉम झाल्यावर जाई एका बॅंकेत चिकटली. दिनकर बी.ए. झाला. गडगंज घरातला असल्यानं त्याला नोकरी करायची तशी गरज नव्हती. पण त्याला शाळेत असल्यापासनं  वाटायचं की आपण पोलीस इन्स्पेक्टर व्हावं. त्या दिशेनं त्यानं आपले प्रयत्न सुरू केले. पण त्याच्या प्रयत्नांना लगेच यश कांही मिळालं नाही.

त्या काळात स्पर्धापरीक्षा वगैरे भानगडी नव्हत्या.

पोरानं पोलीस इन्स्पेक्टर व्हावं अशी आबांचीही इच्छा होतीच. त्यांनी आपला वशिला वापरून पोराला पोलीस इन्स्पेक्टर व्हायला मदत केली. त्यावेळी आबांचे खास दोस्तच राज्याचे गृहमंत्री होते. त्यामुळं त्यांना फारसा प्रयत्न करायलाच लागला नाही. मंत्री महोदयांनी लगेच ऑर्डर काढायला लावली. आबा पहिल्यापासनंच फुकट काम करवून घ्यायच्या विरोधात होते.  त्यांनी विचारलं, बोल किती पैसे द्यायचं तुला? मंत्री महोदय म्हणाले, ‘आरं तू दोस्त हायस माझा...’

‘दोस्त हायेस म्हणून काय झालं? एकतर मी कुणाचं काय फुकट घेत नाय हे माहीत हाय तुला. तुला पण  वाटायला लागत असतीलचं की पैसे. पाच लाख बास झालं का?’
‘दे काय तुला द्यायचं ते’.
‘बराय. तुझ्या घरी ठेवतो. गावाकडं आलास की घेऊन जा’

दिनकर कदम लवकरच कामावर रुजू झाला. त्याचं पोस्टिंग पुणे ग्रामीण विभागात झालं. थोड्याच दिवसात त्यानं आपला दरारा निर्माण केला. त्याची प्रतिमा तरुण तडफदार, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, पीडितांना न्याय मिळवून देणारा, गरजूंना मदत करणारा, आपल्या कामात राजकारण्यांची ढवळाढवळ खपवून न घेणारा अशी झाली. पण या दिनकरची फिलॉसॉफी इतरांच्यापेक्षा वेगळीच होती. तो पैसेही बरेच गोळा करत असे. कुठं पैसे घ्यायचं आणि कुठं घ्यायचं नाहीत याचे त्याचे स्वत:चे नियम होते. गुन्हेगार कोण आहे ते माहीत आहे, पण पुरावे नाहीत आणि केस कोर्टात टिकणार नाही हे लक्षात आलं की तो त्या गुन्हेगाराकडनं भरपूर पैसे उकळत असे.  पण भक्कम पुरावे असतील तर तो त्या गुन्हेगाराच्या विरोधात कोर्ट केस दाखल करत असे.  अशी केस की तो गुन्हेगार सुटलाच नाही पाहिजे.

वरकमाईचे तो तीन हिस्से करत असे. एक हिस्सा त्याच्या स्वत:च्या खर्चासाठी, दुसरा खबऱ्यांना देण्यासाठी आणि तिसरा गरजूंना मदत करण्यासाठी. असो. आपला हा विषय नाही. त्याचं लग्न आणि ते झाल्यावर मिडियात झालेली चर्चा हाच या कथेचा विषय आहे.

एकदा तो गावी गेला असताना आबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर दिनकर म्हणाला, ‘आबा, मला जाईबरोबर लग्न करायचं आहे. आबा म्हणाले, ‘’म्या ऐकलंय जाईबद्दल. काय करतीया म्हणं ती?’
‘ती बॅंकेत क्लार्क आहे’
‘आणि बाप काय करतो तिचा?’
‘ते पोस्टात होते. रिटायर झालेत’
‘हे बघ, त्या जाईबरोबर लग्न करून तुला काय मिळणार हाय? तिचा बाप काय देणार हाय व्हय?’
दिनकर कांही बोलला नाही.
आबा म्हणाले, ‘आमदार बापूसाहेब पाटील माहीत हायतच तुला. त्यांची पोरगी लग्नाची हाय. एकुलती एक. तिला भाऊ नाय आणि बहिण पण नाय. चांगली शिकलीया. तिच्याबरुबरच लग्न करायचंय तुला. तिच्या बापाचं सगळं तुलाच मिळणार हाय पुढं. उद्या जाऊया पोरगी बघायला’
आता आबांच्या पुढं नाही म्हणणं दिनकरला शक्यच नव्हतं. शिवाय तो आबांच्यासारखाच एकदमच प्रॅक्टिकल विचार करणारा होता. भंकस आदर्शवादापासून दूर असलेला. आपल्या झटपट प्रगतीसासाठी बापूसाहेबांची मुलगी निमित्त बनणार असेल तर हा चान्स कशाला सोडायचा?

हे आमदार बापूसाहेब पाटील म्हणजे मोठंच प्रस्थ होतं. मोठी बागायत शेती, जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा आणि पुढंमागं मंत्री होण्याची शक्यता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की दिनकरसारख्या एखाद्या सामान्य इन्स्पेक्टरला बापूसाहेब आपला जावई का करून घेतील? तर त्याचं उत्तर असं आहे की आबांचं घराणं तोडीस तोड होतं, त्यांच्या सारखंच गडगंज. दिनकर सध्या काय काम करतोय याच्याशी त्यांना कांहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांची इतरही कांही गणितं असावीत. असो.

आबा, आईसाहेब, दिनकरचे दोन काका, दोन काक्या, मामा, मामी, आत्या, मावशी, दोन बहिणी आणि त्यांच्या सोबत अर्थातच दिनकर हे सगळे बापूसाहेब पाटलांच्या गावी त्यांची मुलगी बघायला गेले. दिनकरला माहीत होतच की हे बघणं म्हणजे जस्ट एक फॉर्मलिटी होती. त्याला त्या मुलीशीच लग्न करायला लागणार होतं. त्याला ती पसंत पडली नाहीतरी. त्यामुळं ती मुलगी पसंत आहे असंच त्याला म्हणावं लागणार होतं. मुलगी जाईएवढी नसली तरी बऱ्यापैकी दिसणारी आणि धडधाकट असली म्हणजे झालं.

त्या मुलीला बघताच दिनकर अवाक झाला. असलं सौंदर्य, बोलण्या-चालण्यातला आत्मविश्वास आणि नम्रता त्यानं आधी कधी बघितलं नव्हतं. जाई तिच्यापुढ कांहीच नव्हती. दिनकरला ती मुलगी बघताक्षणीच पसंत पडली. तो आईच्या कानात तसं सांगणार तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचं वाक्य आठवलं, ‘पसंत पडली तर आधी तिची जन्मतारीख मला कळव  एस.एम. एस. करून आणि मी हो म्हणालो तरच पुढचं बोल’. त्यानं लगेच तिला विचारलं, ‘तुझा बर्थ डे कधी असतो?’ ती म्हणाली, ’10 जानेवारी’. हे ऐकून त्याला नवल वाटलं. एवढ्यात त्याची आई म्हणाली, ‘अगंबाई! दिनकरचा वाढदिवस पण 10 जानेवारीलाच असतो. बरं झालं, दोन-दोन वाढदिवस करायला नकोत. एकाच केकमध्ये दोघांचा वाढदिवस होईल’. सगळे जोरात हसले.

एवढ्यात दिनकरनं एस.एम. एस. करून मित्राला तिची जन्मतारीख तारीख कळवली. त्याला लगेच उत्तर आलं, Perfect Match. Don’t miss this chance. Go ahead.  अर्थात पोरगी मिसमॅच आहे असं त्या मित्रानं सांगितलं असतं तरी त्याला ती पसंत करावीच लागणार होती. पण मित्राच्या एस.एम. एस. नं त्याला हायसं वाटलं.

मुलगी पसंत असल्याचं दिनकरनं  आईसाहेबांच्या कानात सांगितलं. त्या पोरीनं दिनकरनं  त्याच्या आईच्या कानात काय सांगितलं असावं ते लगेच ओळखलं आणि ती बऱ्यापैकी लाजत आत निघून गेली.
‘मग... पसंत पडली ना पोरगी?’ आबासाहेबांनी दिनकरच्या आईला विचारलं.
‘अहो मला काय विचारता? तुमच्या पोराला विचारा की!’ आईसाहेब म्हणाल्या.
‘त्याला काय विचारायचं? त्याचं तोंडच सांगताय की!’

देण्या-घेण्याची, व्यवहाराची बोलणी झाली. लग्नाचा सगळा खर्च बापूसाहेबच करणार होते. दोन-तीन महिन्यानंतरचा मुहूर्त बघून लग्न करायचं ठरलं.

मग तो दिवस उजाडला. धूमधडाक्यात लग्न लागलं. लग्नाला खुद्द मुख्यमंत्री, अनेक मंत्री, आमदार-खासदार आणि वेगेवेगळ्या क्षेत्रातले मोठमोठे लोक आले होते. लग्नाला अख्खा गाव तर लोटलाच होता, पण तालुक्यातले आणि जिल्ह्यातले, जिल्ह्याबाहेरचे हजारो लोक आले होते.

या लग्नाची चर्चा मिडियात होऊ लागली. मिडीयाचा मुख्य रोख लग्नात जो खर्च झाला त्यावर होता. या लग्नासाठी दोन कोटी रुपये खर्च झाले असावेत असा एक अंदाज होता. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना असा खर्च करणं म्हणजे.... मेडियानं मुख्यमंत्री या लग्नाला हजर राहिले म्हणून त्यांच्यावरही ताशेरे ओढले. विधानसभेतही हा विषय गाजला.

मुंबईच्या एका मराठी न्यूज चॅनलकडनं बापूसाहेबांना फोन आला, ‘पाटील साहेब, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नावर जो खर्च केला, त्यावर आम्ही आमच्या चॅनलवर एक लाईव्ह चर्चा ठेवली आहे. चर्चेत तुम्ही पण भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही उद्या मुंबईला येऊ शकता का?’
‘मी मुंबईतच आहे’
‘वा.. वा... छान.. उद्या रात्री साडेनऊला चर्चा आहे. पण तुम्ही आठ वाजताच या. आधी आपण जरा खाजगी चर्चा करू..’

दुसऱ्या दिवशी बरोबर आठ वाजता बापूसाहेब त्या टी.व्ही. चॅनलच्या स्टुडीओत पोहचले. अॅंकरनं त्यांचं स्वागत केलं. तो त्यांना एका प्रशस्त केबिन मध्ये घेऊन गेला. तिथं चर्चेत भाग घ्यायला आलेले चार दुसरे कलाकार हजर होतेच. बापूसाहेब त्या सगळ्यांना चांगलेच ओळखत होते. खरं म्हणायचं तर ओळखून होते. सगळ्यांच्या गप्पा टप्पा झाल्या, चहापाणी झाले. बोलता बोलता बापूसाहेब अॅंकरला म्हणाले, ‘हे बघा, तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारू शकता. पण माझी एक अट आहे.. मी बोलत असताना फक्त मीच बोलेन, इतर कुणीमध्ये बोलायचं नाही. मंजूर?’

आता ही अट मंजूर झाली हे सांगायला नकोच. मग बापूसाहेब म्हणाले, ‘मी बरेच दिवस वाट बघत होतो, तुमच्याशी चर्चा करायला मिळावी म्हणून. आज लई मजा येईल. आपल्या सगळ्यांना आणि आपल्यापेक्षा प्रेक्षकांना’

(पुढे चालू...)

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा