Advt.

Advt.

Monday, November 16, 2015

सिंगल मदर (भाग 2)

-महावीर सांगलीकर 


सुनिल हिप्नॉटिस्टकडून परत आला. रात्री त्याला एक स्वप्न पडलं. त्याला हिप्नॉटिस्टकडं झोपेत जे दिसलं होतं तेच त्या स्वप्नात पुन्हा दिसलं.

दुसऱ्या दिवसापासून त्याच्या व्यवसायाला सुरवात झाली.  नवीन व्यवसाय अथवा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी त्यानं एक कन्सल्टनसी सुरू केली. तो जोमानं कामाला लागला. त्याचं बिझनेस कार्ड आणि लेटर हेड छापायला गेलं. सुनिलनं पुण्यातल्या सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये छोट्या जाहिराती दिल्या. त्याला अनेक फोन यायला लागले. त्याच्या एका मित्रानं त्याला त्याची एक वेबसाईट तयार करून दिली.

आपला जम बसायला कांही काळ जावा लागणार हे त्याला माहीत होतं.

एके दिवशी दुपारी तो एका हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता, तेवढ्यात त्याच्या समोर एक तरुणी येऊन बसली.  ती त्याच्याकडे ओळखीच्या नजरेनं बघत होती. हिला आपण कुठंतरी पाहिलंय याची त्याला जाणीव झाली, पण नेमकं कुठं ते आठवेना. त्यानं आपल्याला ओळखलं नाही हे त्या तरुणीनं पटकन ताडलं. ती हसत म्हणाली, ‘सुनिल, विसरलास का मला?’
त्यानं आपल्या डोक्याला ताण दिला.
‘कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय... पण मला नेमकं आठवत नाही.....’ तो गोंधळलेल्या चेहऱ्यानं म्हणाला.
‘मी सुनिता... कोल्हापूर... आठवलं का?’
आता त्याला पटकन आठवलं... अरे ही तर आपल्या वर्गात होती दहावीपर्यंत, कोल्हापुरात हायस्कूलला असताना. त्याचा चेहरा आनंदानं खुलला.
‘अरे सुनिता तू! किती वर्षांनी भेटते आहेस! तू इथं पुण्यात कशी काय?’
‘तुझ्याबद्दल हाच प्रश्न मला पण पडलाय. तू इथं पुण्यात कसा काय?’
‘एक बिझनेस सुरू केलाय मी इथं येऊन’ त्यानं उत्तर दिलं.
‘मी पण इथं पुण्यात जॉब करतेय..’
‘बरं, आधी मला सांग, तू काय घेणार?
‘मला कांहीच नको. आत्ताच कॉफी घेतली. परत चालले होते तर तू दिसलास, म्हणून थांबले’
‘नाही, कांहीतरी घेतलंच पाहिजे. काय खाणार बोल?’
‘ठीक आहे तू म्हणतोस तर’ असे म्हणत तिनं मेनू कार्ड हातात घेतलं. ते वाचता वाचता ती त्याला म्हणाली, ‘तू काय घेणार?’
‘तुझ्यासाठी जे सांगशील तेच माझ्यासाठी पण सांग’ सुनिल म्हणाला.

तिनं वेटरला बोलावून दोन प्लेट मसाला डोशांची ऑर्डर दिली.

‘कसला जॉब करतेस?’ सुनिलनं विचारलं.
‘मी एका शाळेत शिक्षिका आहे. प्रायमरी टीचर. बरीच वर्षे झाली, पण अजून परमनंट झालेली नाही. कधी होते काय माहीत!’
‘तू रहातेस कुठं?’
‘मी माझ्या एका मैत्रिणी बरोबर रहाते. शेअरिंग बेसिस वर. पण मला तिच्याकडं जास्त दिवस नाही राहायचं. लांब पडतं जायला यायला. मी या एरियात जागा शोधतेय भाड्यानं’

सुनिलचे डोळे चमकले. ही आपल्याकडे आली रहायला तर? त्यानं तिला सरळ विचारायचं ठरवलं.
‘सुनिता, तू माझ्याकडं येतेस का रहायला? मी नुकताच एक फ्लॅट भाड्यानं घेतलाय याच एरियात’
‘असं तरुण स्त्री-पुरुषांनी एकत्र रहाणं चुकीचं वाटतंय मला. लोक काय म्हणतील? सॉरी, मला नाही जमणार’
‘त्यात काय चुकीचं आहे? जमाना बदललाय आता. लोक काय म्हणतील याचा विचार कशाला करतेस? लोक एकटं रहाणाऱ्या तरुणींच्याबद्दल तरी कुठं चांगलं बोलतात? आणि हे पूणं आहे...  पुण्यात कुणी तसलं कांही जास्त बोलत नसतात लोक. बघ, विचार करून सांग. ’
थोडा वेळ विचार करून सुनिता म्हणाली, ‘मी आले असते रे तुझ्याकडं रहायला. पण माझी एक अडचण आहे’
‘काय अडचण आहे तुला?’
‘मला एक लहान मुलगी आहे, एक वर्षाची’
हे  ऐकून सुनिलला आपण बहुधा स्वप्नात आहोत असं वाटलं. हिला मुलगी आहे म्हणजे हिचं लग्न झालंय.... पण मैत्रिणीबरोबर रहातेय म्हणजे हिचा डायव्हर्स झालेला दिसतोय. सिंगल मदर! व्हाट अ मिरॅकल! आपल्याला जे पाहिजे ते चालून आलंय. सॅलूट टू द हिप्नॉटिस्ट!

खात्री करून घेण्यासाठी त्यानं विचारलं, ‘तुझं लग्न कधी झालं? आणि तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तर दिसत नाही!’
‘लग्न केल्यावर गळ्यात मंगळसूत्र घालायलाच पाहिजे असं कुठं आहे?’
‘बरं, तुझे मिस्टर काय करतात?’
‘माहीत नाही’
तिच्या या चमत्कारीक उत्तरावरनं सुनिलची पक्की खात्री झाली की हिचा डायव्हर्स झालाय. त्या विषयावर जास्त कांही बोलायला नको म्हणून तो मूळ विषयाकडं परत येत म्हणाला, ‘सुनिता, तू तुझ्या मुलीसह माझ्याकडं रहायला ये. भाडं पण नको देऊस.....’
ती यावर कांही बोलली नाही.

‘तुझ्या मुलीचं नाव काय आहे?’ सुनिलनं विचारलं.
‘अजून नाव ठेवलं नाही मी तिचं. पण मी तिला स्वीटी म्हणून बोलावते’
‘स्वीटी... छान नाव आहे. सुनिता, माझ्याकडं आल्यावर तुला माझं एक छोटसं काम करावं लागेल’
‘कसलं काम?’
सुनिलनं त्याची सगळी कहाणी ऐकवली.
‘अच्छा! म्हणजे यासाठी तुझा हा खटाटोप चाललाय होय? ठीक आहे, मी येईन तुझ्याकडं रहायला. पण  आपण जोशी मॅडमना दाखवण्यापुरतेच नवरा बायको असणार आहोत. प्रत्यक्षात आपले तसे कांही संबध नाहीत हे तू नेहमी लक्षात ठेवायचं आणि माझ्यावर कसलाही अधिकार गाजवायचा नाही. आपण वर्गमित्र आहोत आणि तू माझ्याशी मित्र म्हणूनच वागायचं... उगीच नवरेगिरी करायची नाही’
‘मान्य’
‘दुसरं म्हणजे मला तुझ्याकडं फुकट रहायचं नाही. पण मला जास्त भाडं देता येणं शक्य नाही. मी महिन्याला जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये देऊ शकेन’
‘ओके, नो प्रॉब्लेम’
‘तुझ्या फ्लॅटमध्ये किती बेडरूम्स आहेत?’
‘एकच. 1 BHK फ्लॅट आहे तो’
‘मी आणि माझी मुलगी बेडरूममध्ये झोपू. तू हॉलमध्ये झोपायचं.’
‘हो, तसंच करू... तू म्हणशील तर मी किचनमध्ये किंवा गॅलरीत पण झोपेन’
‘नो जोक्स... ठीक आहे, मी दोन आठवड्यानी येईन तुझ्याकडे रहायला’
‘मी तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या. आता तू पण माझी एक अट मान्य कर’
‘काय आहे अट?’
‘येताना गळ्यात मंगळसूत्र घालून ये. नकली का होईना’

+++

सुनिल घरी परतला तो विचारांच्या तंद्रीतच. ही सुनिता भलतीच चलाख आहे. असूद्या. आपलं काम झालंय हे महत्वाचं. बाकी आपल्याला कुठं इंटरेस्ट आहे तिच्यात? दिसायला बरी आहे, पण एवढी कांही खास नाही. पण हुशार आणि व्यवहारकुशल आहे हे मात्र नक्की. पुढं मागं आपल्याला तिचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करून घेता येईल. बाकी आपल्याला इतर कोणत्याच गोष्टीत रस नाही तिच्या बाबतीत. अंतर ठेवायचं आणि गुंतून जायचं नाही. हे पथ्य आपण नेहमीच पाळायचं.

दरम्यान सुनिलला लेक्चर्स द्यायची आमंत्रणे यायला लागली. एका संस्थेनं त्याला आपल्या सभासदांना बिझनेस ट्रेनिंग द्यायचं एक मोठं काम दिलं. आणखीही कांही मोठी कामं मिळाली.

दोन आठवड्यानी सुनिता तिच्या मुलीसह सुनिलकडं रहायला आली. सुनिता आल्यावर थोड्याच वेळात सुनिलला एक फोन आला. त्याचं एक बिल पास झालं होतं आणि त्याचा 15 हजारांचा चेक तयार होता. तो घेऊन जाण्यासाठी एका संस्थेनं त्याला फोन केला होता. त्यानं थॅंक यू म्हणत तो फोन कट केला, तेवढ्यात त्याला त्याच्या बॅंकेकडून एक टेक्स्ट मेसेज आला. त्याच्या एका कामाचे 10 हजार रुपये त्याच्या बॅंक अकाउंटमध्ये जमा झाले होते. पंचवीस हजार रुपये! एकाच दिवशी!

आजचा दिवस किती चांगला! सुनिता इथं रहायला आली आणि पैसेही आले भरपूर. हा सुनिताचा पायगुण दिसतोय.

दुसऱ्या दिवशी सुनिलनं सुनिता आणि स्वीटीची ओळख जोशी मॅडमशी करून दिली. जोशी मॅडम सुनिताला म्हणाल्या, ‘छान जोडी शोभून दिसते हो तुमची. मेड फॉर इच ऑदर... पण तू मंगळसूत्र नाही घातलंस गळ्यात? आजकालच्या पोरी ना....’ मग स्वीटीकडं बघत त्या म्हणाल्या, ‘कुणासारखी दिसते ही स्वीटी? जरा वेगळीच दिसते ना?’
‘ही तिच्या आजीसारखी म्हणजे माझ्या मम्मीसारखी दिसते’, सुनिता पटकन आणि हसत म्हणाली.

सुनिल दिवसभर बाहेरच असायचा. सुनिता रोज सकाळी शाळेवर जायची, दुपारी परत यायची. ती तिच्या मुलीला तेवढा वेळ जवळच्या एका पाळणाघरात ठेवत असे. त्यांच्या जेवणाचा प्रॉब्लेमच होत असे. सुनिल जवळच्या मेसमधनं रात्रीच्या जेवणाचे दोन डबे मागवत असे.

‘रोज रोज मेसचं खाऊन कंटाळा आलाय’ एकदा सुनिल सुनिताला म्हणाला, ‘चल आज आपण बाहेर जेवायला जाऊ’
‘नको,’ सुनिता म्हणाली, अजून कांही दिवस आपण मेसचा डबाच खाऊ. तोपर्यंत तू गॅसची सोय कर. मी रोज संध्याकाळी दोघांचे जेवण बनवत जाईन’.
सुनिलनं दुसऱ्याच दिवशी आपल्या एका मित्राकडून गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळवली. तो सुनिताला म्हणाला, ‘सामान काय काय आणायचं ते सांग, मी घेऊन येतो’
‘आपण दोघेही जाऊ चला सामान आणायला’
‘आणि स्वीटी?’
‘स्वीटीला पण नेऊ’

ते तिघेही जवळच्या एका मॉलमध्ये गेले.
‘तू सांभाळ स्वीटीला, तोपर्यंत मी खरेदी करते’ असं म्हणत सुनितानं स्वीटीला सुनिलकडं दिलं.
सुनितानं खरेदीला तब्बल दीड तास लावला. स्त्रिया शॉपिंगला खूप वेळ लावतात हे त्याला ऐकून आणि वाचून माहीत होतं, पण आज त्यानं ते प्रत्यक्ष अनुभवलं होतं. तरी बरं, स्वीटीला सांभाळण्यात वेळ मजेत गेला.

अशा प्रकारे सुनिल आणि सुनिताचा बिनलग्नाचा आणि नाटकी संसार सुरू झाला.
सुनिलच्या व्यवसायाला बरकत आलीच होती, तर लवकरच सुनिता तिच्या शाळेत परमनंट झाली.

एकदा जोशी मॅडम सुनिलला म्हणाल्या, ‘पुढच्या आठवड्यात आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवलीय. तू आणि सुनितानं पूजेला बसायचंय’.
सुनिल जोशी मॅडमना ‘बरं’ म्हणाला. नंतर त्यानं सुनिताला सांगितलं तर ती त्याच्यावर रागावून म्हणाली, ‘मला न विचारता तू त्यांना हो का म्हणालास? मी नाही पूजेला बसणार तुझ्याबरोबर. आधीच मला हे असलं कर्मकांड आवडत नाही, त्यात हे जोडीनं बसायचं म्हणजे...’
‘अगं मी नाही म्हणालो असतो तर ते बरं दिसलं नसतं.... आणि एखादेवेळी जोशी मॅडमना संशय पण आला असता. आता आपण इतकं नाटक केलंय तर अजून एक छोटं नाटक करायला काय हरकत आहे?’
‘बाकीची नाटकं ठीक आहेत, पण देवाच्या पुढं नाटक नको’
‘मग आता जोशी मॅडमना काय सांगायचं?’
‘मी सांगते काय सांगायचं ते’
नंतर सुनितानं जोशी मॅडमना काय सांगितले कुणास ठाऊक, पण हे पूजेचं नाटक टळलं. बिल्डिंगमधल्या दुसऱ्याच एका तरुण जोडप्यानं ती पूजा केली.

एके दिवशी सुनिल त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता, पण मध्येच त्याला कांही कारण नसताना अस्वस्थ वाटू लागलं. कामं अर्धवट टाकून तो लगेच घरी आला. सुनितानं दार उघडलं तेंव्हा तिचा चेहरा गंभीर आणि उदास वाटत होता.
‘काय झालं सुनिता?’ त्यानं विचारलं.
‘स्वीटीला ताप आलाय’
सुनिल धावतच बेडरूमकडे गेला. स्वीटी बेडवर झोपली होती. सुनिलनं तिच्या कपाळाला आणि गळ्याला हात लावून बघितला. मग तो म्हणाला, ‘हिला लगेच डॉक्टरकडं न्यायला पाहिजे. तू मला लगेच फोन का केला नाहीस?’
‘करणार होते, एवढ्यात तू आलास’

ते दोघं स्वीटीला जवळच्या शहा डॉक्टरांच्याकडं घेऊन गेले. डॉक्टरांनी स्वीटीला चेक केलं, एक इंजेक्शन आणि कांही गोळ्याही दिल्या आणि तिचं रक्त तपासायला हवं असंही सांगितलं. त्यांनी तिच्या रक्ताचा नमुना घेतला आणि तो तपासण्यासाठी पाठवलाही. ते म्हणाले, ‘तासाभरानं रिपोर्ट येईल, तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन या, नाहीतर थांबा इथेच कुठेतरी’.

ब्लड रिपोर्टमध्ये स्वीटीला डेंग्यू झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

स्वीटीची कंडीशन क्रिटीकल होती. तिला आय सी यू मध्ये ठेवण्यात आलं होतं. तिला रक्त देण्याची गरज होती. त्यावेळी पुण्यात डेंग्यूची साथ पसरली होती आणि रक्ताचं शॉर्टेज होतं. त्यात स्वीटीचा रक्तगट ओ निगेटिव्ह. सुनिलला आठवलं, त्याच्या एका मित्राचा रक्तगटही ओ निगेटिव्ह आहे. त्यानं त्याला लगेच फोन लावला तर तो त्याच्या महत्वाच्या कामासाठी सांगलीला चालला होता आणि त्याच्या बसनं पुणे सोडलं होतं. पण सुनिलची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला रक्ताची गरज आहे हे ऐकल्यावर त्याने लगेच बस थांबवायला लावली. तो बसमधून उतरला आणि रिक्षाने तडक हॉस्पिटलमध्ये आला.

वेळेवर रक्त मिळाल्यानं स्वीटी तिच्या क्रिटीकल कंडीशनमधून बाहेर आली.

स्वीटीच्या या आजारपणात सुनिल आणि सुनिता हे दोघेही प्रचंड मानसिक तणावाखाली होते. सुनिलनं केलेल्या धडपडीमुळंच स्वीटी मरता मरता वाचली होती. सुनिताला सुनिलबद्दल  आता जवळीक वाटू लागली. सुनिल स्वीटीचा आणि आपला चांगला सांभाळ करू शकतो, त्यानं ते सिद्धच करून दाखवलं आहे असा विचार तिनं केला. मग त्याच्याशी आपण लग्न करायला काय हरकत आहे? त्यालाही तसंच वाटत असावं, पण तो स्वत:हून तसं बोलणार नाही कारण आपण त्याला कांही अटी घातल्या होत्या.

मग एके दिवशी मूड पाहून ती सुनिलला म्हणाली, ‘सुनिल, हे नवरा-बायको असण्याचं नाटक बास झालं आता’
‘म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे?’
‘म्हणजे आपण लग्न करायला काय हरकत आहे?’
‘सॉरी सुनिता.... ते शक्य नाही’ सुनिल गंभीर होत म्हणाला.
सुनिताचा चेहरा पडला. ती म्हणाली, ‘मला वाटलं होतं, मी विचारल्यावर तू लगेच तयार होशील लग्नाला... मी आवडत नाही का तुला?’
‘तसं नाही सुनिता. पूर्वी तू मला फारशी आवडत नव्हतीस, पण आता आवडायला लागली आहेस. मला तुझ्याशी लग्न करायला आवडलं असतं. पण प्रॅक्टिकली ते शक्य नाही. कारण तुझं आधीच लग्न झालेलं आहे. तुला एक मुलगीही आहे. या गोष्टी आमच्या घरचे लोक मान्य करणार नाहीत. मी तुझ्याशी लग्न केलं तर मला माझ्या घराचे दरवाजे बंद होतील. तुझं आधीचं लग्न झालेलं नसतं तर मी तुझ्याशी नक्कीच लग्न केलं असतं’
‘ठीक आहे, जशी तुझी मर्जी’, असं म्हणत सुनिता बेडरूममध्ये निघून गेली.
तिनं सुनिलशी बोलणं कमी केलं. कामापुरतं बोलत असे. चिडचिड करत असे.

सुनिताच्या वागण्यात झालेल्या बदलामुळं सुनिल अंतर्मुख झाला. या प्रश्नावर गंभीरपणे विचार करू लागला. ‘एक मन म्हणतंय की सुनिताशी लग्न करावं. दुसरं मन म्हणतंय नको. कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे...’ एके रात्री असा विचार तो झोपी गेला, आणि त्याच्या स्वप्नात तो हिप्नॉटिस्ट आला. म्हणाला,
‘सुनिल, तू सुनिताशी लग्न करून टाक. तुझ्या घरचे लोक तिला स्वीकारतील की नाही याचा तू विचार करू नकोस. तू तिचा स्वीकार कर. त्यात तुझा फायदा आहे. तिचाही फायदा आहे, आणि मुख्य म्हणजे स्वीटीचा फायदा आहे. तिला एक चांगला बाप मिळेल... तू तिला मरणाच्या दारातून परत आणलं आहेस. तिला दुसरा जन्म दिला आहेस.... तेंव्हा गो अहेड... नाटक बंद, आता तू तिचा खरोखरीचा बाप हो’.

सुनिलला जाग आली. हिप्नॉटिस्टनं स्वप्नात दिलेला सल्ला त्याला पटला. पण मग तो सल्ला मानायचा  तर आई-बाबा काय म्हणतील? ते या लग्नाला परवानगी देणारच नाहीत. त्यांना न विचारता सुनिताशी परस्पर लग्न केलं तर आई-आबा नक्कीच आपल्याशी संबध तोडतील. सगळच अवघड आहे.
काय करायचं या विचारानं त्याची झोप उडाली.

पुढे चालू..

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा