Advt.

Advt.

Tuesday, August 4, 2015

गूढकथा: व्हर्च्युअल डॉटर

-महावीर सांगलीकर 
दुपारची वेळ. सुमारे दोन वाजले होते. रजनी मॅडम घरी एकट्याच होत्या. दारावरची बेल वाजली. आत्ता यावेळी कोण आले असेल बरं? असा विचार करत त्या दाराजवळ गेल्या. त्यांनी आयबॉलमधनं बाहेर पाहिलं. बाहेर एक तरुण, रुबाबदार, अनोळखी मुलगी उभी होती.

रजनी मॅडमनी दार उघडले. ती मुलगी पटकन आत आली. तिच्या हातात एक पर्स होती. तिचा ड्रेस जीन्स आणि टी. शर्ट असा होता. मॅडमनी कांही विचारायच्या आतच ती मुलगी त्या प्रशस्त फ्ल्याटमधल्या एका बेडरूमकडे गेली.  दोनच मिनिटात परत बाहेर आली. तिनं फ्रीज उघडला. त्यातनं पाण्याची एक बाटली बाहेर काढली आणि घोटभर पाणी पिऊन ती परत ठेवली. मग फ्रिजच्या एका कप्प्यातले चॉकलेटचं एक पाकीट बाहेर काढलं आणि आपल्या पर्समध्ये ठेवलं. मग म्हणाली, ‘आई, मी परत येते थोड्या वेळात... आणि तू अशी काय बघतेस माझ्याकडे? एखादं भूत बघितल्या सारखं?’

ती दार उघडून बाहेर गेली आणि दार लोटून घेतलं.

रजनी मॅडम सुन्न झाल्या होत्या. ही कोण मुलगी होती? तिनं आपल्याला आई का म्हणावं? ती आपल्या घरात एवढ्या सहजपणे कशी काय वावरत होती?

मॅडमनी लगेच साहेबांना फोन लावला.
‘अहो, तुम्ही लगेच घरी या’
‘कशाला? ऑफीसमध्ये मला काम आहे’   
‘काम राहू दे बाजूला. तुम्ही ताबडतोब घरी या’
मॅडमचा आवाज थोडा घाबरल्यासारखा येत होता. कांहीतरी सिरिअस झालेलं दिसतंय. साहेबांनी विचारलं, ‘काय प्रॉब्लेम आहे?’
मॅडमनी काय झालं ते सांगितलं. ‘ती मुलगी थोड्या वेळात परत येणार आहे. तुम्ही या लवकर’

साहेबांचं ऑफीस जवळच होतं. ते लगेच घरी जायला निघाले. थोड्याच वेळात घरी पोहोचले. त्यावेळी तीन वाजले होते. मॅडमनी त्यांना काय काय झाले ते सविस्तर सांगितले.
‘तू तिला ‘तू कोण’ वगैरे कांही विचारलं नाहीस?’
‘नाही! माझी वाचाच बसली होती. ती मुलगी जणू कांही आपली मुलगी असल्यासारखी वागत होती. मला आई असं पण म्हणाली’
‘आपण आता एक काम करू... तुझ्या सांगण्यावरणं ती भल्या घराची मुलगी वाटतेय. तू आता तिच्याशी जणू कांही ती आपली मुलगीच आहे असंच वाग. नाहीतरी आपल्याला मुलगी नाहीच आहे. तिला तिचं नाव वगैरे विचारू नकोस. ते काढता येईल. नाव कळलं की तिला नावानेच हाक मार’

पाटील साहेबांना एकच मुलगा होता. तो जर्मनीत असे. इथं घरी हे दोघंच. आपल्याला एखादी मुलगी असती तर बरं झालं असतं असं त्या दोघांना नेहमी वाटत असे.

एवढ्यात बेल वाजली. ‘आली वाटतं’ असं म्हणत मॅडम दार उघडायला जाऊ लागल्या. एवढ्यात पाटील साहेब म्हणाले, ‘थांब, मी दार उघडतो’.
त्यांनी दार उघडले. बाहेर ती मुलगी उभी होती. पाटील साहेबांना बघून ती थोड्याश्या आश्चर्याने म्हणाली, ‘बाबा, आज तुम्ही इतक्या लवकर घरी?’
‘हो, आज कांही विशेष काम नव्हतं, म्हणून आलो लवकर घरी’ त्यांनी थाप मारली.

आत येताच तिनं आपली पर्स आणि मोबाईल फोन  तिथल्या एका टेबलावर ठेवला. ‘आई, मी फ्रेश होऊन येते’ असं म्हणत ती बाथरूमच्या दिशेने गेली. तिने बाथरूमचा दरवाजा लावून घेतल्याचा आवाज आला.
पाटील साहेब पटकन उठले आणि त्यांनी तिचा मोबाईल फोन हातात घेतला. *1# दाबून त्या फोनचा नंबर मिळवला. मग तिला आलेले एसएमएस  तपासले. त्यातील कांही एसएमएस  वरनं  तिचं नाव अस्मिता आहे हे त्यांना कळलं.  ते नाव बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी फोन होता त्या जागेवर ठेवला आणि ते सोफ्यावर येऊन बसले.

साहेब मॅडमना म्हणाले, ‘त्या मुलीचं नाव अस्मिता आहे’. ते ऐकताच मॅडमना आश्चर्याचा धक्का बसला.  ‘आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव आपण अस्मिता ठेऊ’ असं मॅडम पूर्वीनेहमी म्हणायच्या.
साहेबांनी आपल्या मोबाईल फोनवर गूगल सर्च उघडले आणि त्यात अस्मिताचा फोन नंबर टाईप केला. सर्च रिझल्ट्सच्या दोन तीन वेबसाईट बघून पाटील साहेब विचारात पडले. त्यात मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलीचे पूर्ण नाव अस्मिता पाटील होते. ती क्राईम ब्रांचमध्ये सब इन्स्पेक्टर होती. 
ही मुलगी आपल्या इथं कशासाठी आली आहे? तेही आपली मुलगी बनून?

तेवढ्यात अस्मिता बाहेर आली. ‘आई, मला कांहीतरी खायला कर लवकर. मला लगेच जायचंय.... नाहीतर मीच करते पटकन’ असं म्हणत ती स्वयपाक घरात गेली. आई पण तिच्या मागं मागं आत गेली. अस्मिता म्हणाली, मी तिघांसाठी उपमा तयार करते. आईने तिला पटापट कांदा चिरून दिला. तोपर्यंत अस्मिताने रवा भाजून घेतला. आई तिची प्रत्येक हालचाल टिपत होती. अस्मिता रोजच या स्वयपाक घरात वावरत असावी अशा सहजतेने काम करत होती.  

अस्मिता उपमा खाऊन, कॉफी पिऊन निघाली परत बाहेर. जाण्याआधी तिनं आपला स्मार्ट फोन हातात घेतला आणि म्हणाली, ‘आई, बाबा, मला तुम्हा दोघांबरोबर सेल्फी घ्यायचीय.... सेल्फी वुईथ फादर ऍण्ड मदर’
मग तिनं आई-बाबांच्या बरोबर कांही सेल्फी फोटो काढले. जाताना म्हणाली, ‘आई मी संध्याकाळी सात वाजता येईन’

ती गेल्यावर पाटील साहेबांनी आपल्या एका परिचिताला फोन लावला. तो पोलीस खात्यात होता.
‘बोला पाटील साहेब! आज लई दिवसांनी आमची आठवण आली?’
‘तुमच्या इथं अस्मिता पाटील नावाची कोणी सब इन्स्पेक्टर आहे का?’
‘काय साहेब, तुम्ही माझी चेष्टा करताय का? अहो तुमची मुलगीच आहे ना ती कमिशनर ऑफिसला?’
पाटील साहेब थोडावेळ सुन्न झाले. तेवढ्यात त्यांना व्हाट्स ऍपवर एक मेसेज आला. तो अस्मिताचा होता. थोड्या वेळापूर्वी काढलेले सेल्फी तिनं पाठवले होते.
पाटील साहेब रजनी मॅडमना ते फोटो दाखवत म्हणाले, ‘काय गोड आहे ही मुलगी! तू तरुण असताना अगदी अशीच दिसायचीस’ पण रजनी मॅडम हे ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या.

थोड्या वेळाने पाटील साहेबांनी त्यांचा लॅपटॉप चालू केला. आपले फेसबुक अकाउंट ओपन केलं. त्यात  ‘अस्मिता पाटील’ सर्च केले.
आश्चर्य! ती त्यांच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये होती. त्यांनी तिचे प्रोफाईल चेक केले. तिच्या प्रोफाईलवर दिलेल्या माहितीत तिचे नातेवाईक होते:
वडील: सुदेश पाटील
आई: रजनी पाटील
भाऊ: रणजीत पाटील
कझिन: संग्राम सावंत

प्रोफाईलवर ही नावे त्या त्या लोकांनी ऍप्रोव केल्याशिवाय येत नाहीत. फेसबुकवर आपण तिला मुलगी म्हणून ऍप्रोव केल्याचं आठवत नाही. मग माझे नाव तिच्या प्रोफाईल वर तिचे वडील म्हणून कसं आलं? पाटील साहेबांना प्रश्न पडला. ते मॅडमना म्हणाले, ‘फेसबुकवर ती माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये आहे. आजवर माझ्या लक्षात कसं आलं नाही? ती तुझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये पण असणार. तुझ्या लक्षात नाही आलं?’
‘नाही... मी कुठे जास्त जाते फेसबुकवर?’ 

साहेबांनी त्यांच्या भाच्याला फोन लावला. 
‘अरे संग्राम, तुझ्या फेसबुक फ्रेंड्समध्ये अस्मिता पाटील म्हणून एक मुलगी आहे.. कोण आहे ती?’
‘मामा! तुम्ही असं का विचारताय? ती ताई आहे......अस्मिता ताई.... ’

आता मात्र पाटील साहेबांचे डोके गरगरू लागले. आपण रणजीतला फोन लावला तर तोही असंच कांहीतरी म्हणेल. त्याला नकोच फोन करायला.
एवढ्यात रणजीतचाच फोन आला. त्यानं विचारलं, ‘बाबा, अस्मिता आलीय का घरी? माझं एक काम आहे तिच्याकडं’
पाटील साहेबांना हे काय चाललंय ते कळेना. सात वाजता ती मुलगी घरी आल्यावर आपण तिलाच विचारू असा विचार साहेबांनी केला.

पण संध्याकाळी सात वाजता येते म्हणालेली अस्मिता रात्री दहा वाजता परत घरी आली. तिच्या हातात एक पर्स आणि एक पुस्तक होते. दमलेली दिसत होती. पाटील साहेबांनी तिला विचारलं, ‘काय झालं बेटा?’
‘बाबा, आज खूपच धावपळ झाली माझी. एका चोराला पाठलाग करून पकडलं. मला खूप थकवा आला आहे. मी झोपते आता. आपण सकाळी बोलू’ असं म्हणून ती बेडरूमकडं गेली.
+++

दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता अस्मिताला उठवायला पाटील मॅडम गेल्या तर ती तिथं नव्हती. त्यांना वाटलं, एखादेवेळेस ती बाथरूममध्ये असावी, पण ती तिथंही नव्हती.  मॅडमनी साहेबांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘टोयलेटमध्ये असेल’
पण अस्मिता तिथंही नव्हती.
ती न सांगता कुठे गेली?

पाटील साहेबांना आता वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. त्यांच्याकडे अस्मिताचा फोन नंबर होताच. त्यांनी तिला फोन लावला. तिकडून आवाज आला, ‘धिस नंबर डझ नॉट एक्झिस्ट’.
त्यांनी आपला लॅपटॉप सुरू केला. आपलं फेसबुक अकाउंट उघडले. कालची ती अस्मिता पाटील त्यांना कुठं दिसली नाही. त्यांनी संग्राम आणि रणजीत यांचे फेसबुक प्रोफाईल्स तपासले. तिथंही ती दिसली नाही.
हा काय प्रकार आहे?
त्यांनी लगेच संग्रामाला फोन लावला. ‘अरे, काल मी तुला अस्मिता पाटीलबद्दल विचारलं होतं..’
‘अस्मिता पाटील? कोण अस्मिता पाटील? आणि काल कुठे आपलं बोलणं झालंय?’

पाटील साहेबांनी फोन कट केला. मग पोलीस खात्यातल्या त्या परिचिताला फोन लावला.
‘बोला पाटील साहेब. आज लई दिवसांनी आमची आठवण आली?’ तिकडून आवाज आला.
‘कालच तर मी तुम्हाला फोन केला होता..’
‘काल? नाही..... काल कुठं तुम्ही मला फोन केला होता?’
‘बरं ठीक आहे, मला एक माहिती पाहिजे होती...कमिशनर ऑफिसला किंवा तुमच्या खात्यात अस्मिता पाटील नावाची कोणी सब इन्स्पेक्टर आहे का?’
‘नाही.... असं कुणी माझ्या माहितीत तरी नाही’
पाटील साहेबांनी फोन कट केला.

मग पाटील साहेबांनी पेन ड्राईव्ह घेतला आणि  ते तडक त्यांच्या सोसायटीच्या गेटवर गेले. वॉचमनला विचारलं, ‘काल दुपारी दोन वेळा आणि रात्री दहा वाजता एक मुलगी आमच्याकडे आली होती. आज पहाटे किंवा सकाळी लवकर ती परत गेली. तिला येताना आणि जाताना पाहिले का?
‘नाही... तुम्ही सांगितलेल्या वेळी अशी कोणी अनोळखी मुलगी मी बघितली नाही’
‘ठीक आहे, पण मला काल दुपारी दीड वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं आहे’

त्यांनी ते फुटेज आपल्या पेन ड्राईव्हमध्ये  डाऊनलोड करून घेतलं. मग घरी येऊन आपल्या लॅपटॉपवर ते फुटेज आरामात चेक करू लागले.  काल दुपारी दीड वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंतचे, साडेतीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंतचे,  रात्री साडेनऊ वाजल्यापासून साडे दहापर्यंतचे फुटेज त्यांनी पिंजून काढले. पण त्यात त्यांना कोठेही अस्मिता येत असताना किंवा जात असताना दिसली नाही. बाकीच्या फुटेजमध्ये पण अस्मिता दिसणार नाही याची त्यांना खात्री झाली, तरीही त्यांनी रात्री साडेदहापासून सकाळी आठ वाजेपर्यंतचे फुटेज फास्ट फॉरवर्ड करून बघितले. तिथंही अस्मिता दिसलीच नाही.
त्यांना काल अस्मिताने काढलेल्या सेल्फी आठवल्या. त्यांनी लगेच व्हाट्स ऍपवर ओपन केले. तिने पाठवलेले सेल्फी गायब होते!

‘भास! केवळ भास...’ पाटील साहेबांनी निष्कर्ष काढला. पण त्यांना शंका होती, एकच भास एकाच वेळी दोघांना कसा काय झाला?’

दुपारी पाटील साहेब ऑफिसला गेले. ते ऑफिसमध्ये पोहचतात न पोहचतात तो पर्यंत त्यांना मॅडमचा फोन आला, ‘अहो, तुम्ही ताबोडतोब घरी या’. आवाज घाबरलेला.
‘आता काय झाले? ती परत आलीय का?’
‘नाही! पण मला भीती वाटतेय. एक विचित्र गोष्ट घडलीय..’
‘काय झालं?’
तुम्ही घरी या, सांगते’

पाटील साहेब थोड्याच वेळात घरी आले. मॅडमचा भेदरलेला चेहरा पाहून म्हणाले, ‘काय झालं?’
‘काल दुपारी तिनं फ्रीजमधलं एक चॉकलेट घेतलं होतं. मगाशी माझ्या लक्षात आलं, फ्रीजमध्ये एक चॉकलेट कमी आहे ते. ती मुलगी म्हणजे भास असेल तर मग चॉकलेट कमी कसं होईल?’

पाटील साहेब विचारात पडले... मग म्हणाले, ते चॉकलेट तूच खाल्लं असशील. पण तुला भास झाला असेल की ते तिनं खाल्लं’
‘नाही, तिनं खाल्लं नाही, ते तिनं तिच्या पर्समध्ये ठेवलं होतं’
‘तो पण एक भास असेल’
‘नाही! तिची ती पर्स बेडरूममध्ये आहे... चला दाखवते’

मॅडम बेडरूमच्या दिशेने गेल्या. त्यांच्या मागोमाग पाटील साहेबही गेले. तिथं कोपऱ्यातल्या कपाटावर एक पर्स होती. तीच पर्स, जी काल पाटील साहेबांनी स्वत: बघितली होती, अस्मिताच्या हातात. त्यांनी ती पर्स घेतली आणि उघडून पाहिली. आतमध्ये चॉकलेटचं फोडलेलं रिकामं पाकीट होतं!

पाटील साहेबांना कपाटावर एक पुस्तकही दिसलं. त्यांनी ते हातात घेतलं. पुस्तकाचं टायटल होतं, ‘Some Experiments with Virtual Realities’हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा