Advt.

Advt.

Friday, June 6, 2014

गौरीचं लग्न

-महावीर सांगलीकर


गौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग:

दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली.
‘हे बघ गौरी, तुला एक महत्वाचं काम करायचं आहे...’
‘कोणतं...?’
‘लवकरात लवकर एखाद्या कॉस्मेटीक सर्जनला भेट. तुझ्या डोळ्याखाली जे दोन तीळ आहेत ते काढून टाक. तुझ्या भुवयांच्या आत जे दोन तीळ आहेत ते पण काढून टाक’
‘डोळ्याखालचे तीळ काढायचे ते कळलं, कारण ते चांगले दिसत नाहीत... पण भूवयांमधले का काढायचे? ते तर दिसतच नाहीत...’
‘हे चारी तीळ काढायचे आहेत ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी...’
‘म्हणजे?’
‘म्हणजे हे तीळ ज्या जागी आहेत तिथे ते असणं चांगलं नसतं.... तुझ्या वैवाहिक जीवनात संकटे येऊ शकतात त्यांच्यामुळे....’
‘ओके मी उद्याच गाठते एखादा कॉस्मेटीक सर्जन’

‘मग  आता आनंदी आहेस ना?’
‘हो...’
‘लवकरच तुझं लग्न होईल’
‘होय... मी आजच दोन-तीन मॅट्रिमोनिअल वेबसाइट्सवर माझं नाव नोंदवलं’
‘इंडियअन वेबसाइट्स?’
‘होय....’
‘तिथं कशाला नोंदवलस? जिनिअस मुलींनी अस करायचं नसतं’
‘का?’
‘हे बघ, तू त्या इंडियन लोकांना विसरून जा. तू अमेरिकेत आहेस. बी अॅन अमेरिकन... तुला जन्मानं अमेरिकन असलेल्या एखाद्या तरुणाशी लग्न करायचे आहे’
‘पण अमेरिकन तरुण माझ्याशी का आणि कशाला  लग्न करेल?’
‘तुझं लग्न एखाद्या अमेरिकन तरुणाशीच होणार आहे. हे माझं वाक्य लिहून ठेव’
‘पण मी त्याला कुठं शोधणार?’
‘शोधू नको... तोच तुला भेटेल... प्रपोज करेल.... त्यावेळी तुझं मन काय म्हणेल याकडंच लक्ष दे. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नको. आई-बाबा काय म्हणतील हे देखील बघू नकोस’
‘पण हे मला चुकीचं वाटतं....’
‘चुकीचं काय आहे त्यात? तुला कल्पना चावला माहीत आहे... केलंच ना तिनं एका अमेरिकन माणसाशी लग्न? सुनिता विल्यम्सला काय इंडियन नवरा मिळाला नसता काय? पण तिनंही एका अमेरिकन तरुणाशीच लग्न केले ना?’
‘पण मला हे जमेल का?’
‘अवश्य जमणार... नव्हे तसंच होणार आहे’
‘मग मी त्या इंडियअन वेबसाइट्सवरचे माझे प्रोफाईल्स काढून टाकू?’
‘आत्ताच नको.... बघ तर खरं ते इंडियन्स लग्नासाठी तुला काय-काय अटी घालतात ते...’
‘हो, बघु या’
‘बघ, आणि सांग मला नंतर त्यांच्या गमती. मी जातो आता, मला एक फेस रीडिंग करायचं आहे ऑनलाईन’
‘आणखी एखादा सुंदर चेहरा भेटला वाटतं?’
‘नाही, प्रॉब्लेमॅटीक केस आहे. मी आता तुला डायरेक्ट एक आठवड्यानं भेटेन...’

एक आठवड्यानं गौरी नेटवर पुन्हा फेस रीडरला भेटली. इंडियन पोरांचे एकेक किस्से सांगू लागली.

‘एका इंडियन मुलानं मला पसंत केलं होतं. न्यू जर्सीत असतो. पण नंतर तो म्हणाला त्याचे आई-बाबा नको म्हणतात म्हणून’
‘का?’
‘ते लोक कन्नड आहेत आणि मी मराठी आहे म्हणून’
‘छान.... इथं पण सीमावाद आणला का त्यांनी?’
‘हा हा हा’
‘आणखी एका मुलाचं प्रपोजल होतं..... नासात सायंटीस्ट आहे म्हणे. आधी मला पसंत केलं ... नंतर म्हणतो पत्रिका जुळत नाही’
‘हाहाहा... होपलेस गाय... ’
‘एक बहाद्दर तर म्हणाला, तुला इंडियात माझ्या गावी वर्षभर तरी राहावं लागेल, माझ्या आई-बाबांच्या सोबत. मग मी तुला पुन्हा यु.एस.ला घेवून येईन...’
‘मग तू काय म्हणालीस?
‘मी म्हणाले चालेल, पण तुला पण माझ्या गावी आई-बाबांच्याकडं वर्षभर राहावं लागेल... त्यांची सेवा करायला’
‘छान... यु आर व्हेरी स्मार्ट गर्ल ...’
‘थँक्स.... इंडियात रहाणारा एक अतिशहाणा तर जणू कांही माझ्यावर उपकारच करतोय असं दाखवत म्हणाला, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तू मला  अमेरिकेत जॉब लावून द्यायला पाहिजेस आधी’
‘एकपण कोणी शहाणा, चांगला इंडियन मुलगा भेटला नाही?’
‘एक वाटला होता शहाणा. मला पसंतही पडला होता. अमेरिकेतच असतो. पण नंतर मला म्हणतो, हुंडा किती देणार? वर म्हणतो, मला नको आहे, पण आई-बाबा मानत नाहीत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला वगैरे...’
‘कळलं ना तुला आता?  तू आता तुझे सगळे प्रोफाईल्स डिलीट करून टाक. त्या लोकांचा विचारही मनात आणू नकोस. पुढच्या पंधरा दिवसात तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची घटना घडणार आहे’.
‘कसली?’
‘तू फक्त बघत जा...’

त्यानंतर एक आठवडा झाला. पण  गौरीच्या जीवनात कसलीच महत्वाची घटना घडली नाही.  ती रोज दिवस मोजत होती. दहा दिवस झाले... बारा दिवस झाले.... उद्या शनिवार... परवा रविवार.... गौरी काळजीत पडली. एवढ्यात तिच्या ऑफिसमधली तिची एक अमेरिकन मैत्रीण अनिता म्हणाली, ‘उद्या माझ्याबरोबर हॉटेलमध्ये जेवायला येणार का?’ गौरीने लगेच हो म्हंटलं.

दुस-या दिवशी गौरी आणि अनिता एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या. तिथं ते एका टेबलवर जावून बसले. तेवढ्यात एक तरुण त्यांच्यासमोर येवून बसला. त्यांनी त्या दोघींना हाय केले. हा कोण आगंतुक तरुण आहे असा विचार गौरी करत असतानाच अनितानं त्या दोघांची ओळख करून दिली...
‘मीट मिस गौरी, माय फ्रेंड अॅण्ड कलीग..... मीट मिस्टर विल, सी.इ.ओ. ऑफ नॉर्थ-वेस्ट कार्पोरेशन.... ’

मग जेवता-जेवताच विलनं गौरीला एक ऑफर दिली...
‘आर यू इंटरेस्टेड इन वर्किंग विथ अवर बिझनेस हाउस?’
गौरी अनिताच्या तोंडाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघू लागली. अनितानं ‘से यस’ असे खुणेनंच सांगितले. तरीही गौरी म्हणाली. ‘लेट मी थिंक...’
‘यू डोन्ट हॅव टू थिंक... अनिता इज अल्सो जॉईनिंग अस. आय ऑफर यू अॅन अॅट्रॅक्टिव्ह पॅकेज... यु विल गेट व्हाट यू वांट...’

पुढच्याच आठवड्यात गौरीनं आपल्या कंपनीचा राजीनामा दिला आणि ती नॉर्थ वेस्ट कार्पोरेशनमध्ये मोठ्या पदावर रुजू झाली....

तिच्या हुशारीमुळं, तिच्या धडाडीमुळे नॉर्थ वेस्ट कार्पोरेशनला प्रचंड फायदा होवू लागला.  

मग एके दिवशी विलनं गौरीला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का?’

त्यावेळी तिला फेस रीडरचे शब्द आठवले.... ‘तोच तुला भेटेल... प्रपोज करेल.... त्यावेळी तुझं मन काय म्हणेल याकडेच लक्ष दे’

तिनं विलला पटकन हो म्हणून टाकले.  नंतर तिनं फेसरीडरला नेटवर गाठलं. त्याला विलचा फोटो पाठवला. तो फोटो पाहून फेस रीडर म्हणाला, ‘हाच तो.... केवळ तुझ्यासाठीच आहे... परफेक्ट मॅच... गो अहेड ’

गौरीनं इंडियात आपल्या आईबाबांना फोनवर सांगितलं कि ती लग्न करणार आहे. त्या दोघांना प्रचंड धक्का वगैरे बसला. त्यांचा या लग्नाला विरोध होता. पण गौरी आपल्या निर्णयावर ठाम होती. लवकरच गौरीचं विलशी लग्न झालं. इंडियातनं गौरीचे आई-बाबा रागारागानंच लग्नाला आले होते. पण गौरीच्या नव-याचं प्रचंड वैभव बघून त्यांना आपला राग आणि इगो गिळून टाकावा लागला.

गौरीनं आपल्या लग्नाला त्या फेस रीडरला देखील बोलावले होते, पण तो आला नाही. कारण काय कुणास ठाऊक...

आपल्या लग्नाला फेस रीडर आला नाही याचा गौरीला राग आला. नंतर तो फेसबुकवर देखील दिसला नाही. मग गौरीने त्याला एक इमेल पाठवून विचारले, ‘तुमची फी किती पाठवायची?’

गौरीनं पाठवलेल्या इमेलला फेस रीडरकडून त्याच दिवशी उत्तर आले, ‘प्लीज ट्रान्स्फर $ 0.00 टू माय अकाउंट, इमिडिएटली’


पहिला भाग:
गौरी आणि फेस रीडर

हेही वाचा:
 ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह
 दिनकरचं लग्न
सोनालीची डायरी
सुदीपच्या लग्नाचा प्लॅन

1 comment:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा