Advt.

Advt.

Wednesday, June 4, 2014

अंजलीना ब्यांडची कथा

 -महावीर सांगलीकर 


फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता.  भारताचा प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास हा त्याचा अभ्यासाचा विषय होता. तरुणपणी शिक्षणासाठी  तो कलकत्ता येथे होता.. कलकत्त्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये तो नेहमी जात असे.  तेथे जर्मनीवरून एक तरुणी भारतीय धर्मांच्या इतिहासाचा  अभ्यास करण्यासाठी आली होती.  तिची विल्यमबरोबर चांगलीच गट्टी जमली. पुढे विल्यमला पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विल्यमने त्या जर्मन तरुणीस पुण्याला बोलावून घेतले. तिलाही पुण्यातच नोकरी मिळाली.

लवकरच त्या दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलीचे नाव अंजली असे भारतीय  पद्धतीचे ठेवण्यात आले. सर्व काही ठीक चालले असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड आणि जर्मनीचे संबंध बिघडल्यामुळे विल्यम आणि त्याच्या बायकोचे संबंधही  बिघडले. एके दिवशी तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मुलीला घेवून ती जर्मनीला निघून गेली. मुलगा मात्र इथे पुण्यातच राहिला. त्याचे नाव जेम्स. जेम्स ब्यांड. तो तो नव्हे. आपणाला माहीत आहे त्या दुस-याचे  नाव जेम्स बॉन्ड  होते. हा जेम्स ब्यांड होता. उच्चारातील फरक आपल्या ध्यानात आलाच असेल. शिवाय जेम्स बॉन्ड हा 007 होता. जेम्स ब्यांड मात्र आपल्या नावापुढे कधीच आकडे लावत नसे. असो.

तर अशा या जेम्स ब्यांडची आई त्याला आणि त्याच्या बापाला सोडून जर्मनीला निघून गेली तेंव्हा तो अवघा 16 वर्षांचा होता. ते त्याचे Matriculationचे वर्ष असल्याने विल्यमने पुण्यातीलच एका शिक्षिकेशी लग्न केले. आपल्या नव्या आईच्या कडक शिकवणीमुळे जेम्स ब्यांड चांगल्या मार्काने पास झाला. त्यानंतर त्याला विल्यमने इंग्लंड मधील रॉयल मिलिटरी अकादमीत पाठवले. लवकरच तो सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला. त्याची युद्धावर जाण्याची इच्छा होती, पण तो सैन्यात दाखल व्हायला आणि युद्ध संपायला एकच गाठ पडली.

तिकडे जर्मनीत त्याची बहिण अंजली ब्यांड इंगजी हा स्पेशल विषय घेवून पदवीधर झाली. मग तिने अनेक छोटेछोटे कोर्सेस केले. ती शिवणकामही शिकली. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्याने ती टाईपरायटर चालवायला शिकली. ती टायपिंग इतक्या वेगाने करत असे की भारीभक्कम टाईपरायटर देखील कांही दिवसातच खिळखिळे होत असत. मग तिने नोकरी शोधायला सुरवात केली. तिला एका मोठ्या कंपनीत छोटी नोकरी मिळाली. पण तिचे मन कांही तिथे रमेना. ती अनेक नोक-या बदलत राहिली. पण तिला मनाजोगती नोकरी कांही मिळेना. तेंव्हा ती स्यांग ली  नावाच्या एका चीनी न्यूमरॉलॉजिस्टकडे सल्ला घ्यायला गेली. त्यासाठी तिला चीनला जावे लागले नाही, कारण स्यांग ली हा जर्मनीला नेहमी भेट देत असे. चक्क हिटलर देखील त्याच्याकडून सल्ला घेत असे. असो. स्यांग लीने  तिच्या नावात दोष असल्याचे सांगून नाव किंवा स्पेलिंग बदलायला सांगितले. त्याच्या सल्ल्यानुसार तिने आपले नाव  अंजलीना असे करून घेतले.

आणि काय आश्चर्य... कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी तिला नोकरी मिळाली. तिला तशी नोकरी मिळावी म्हणून जर्मनीवर युद्धाचे ढग जमू लागले. वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरभरती सुरू झाली. एके दिवशी अंजलीनाने  एका जर्मन पेप्रात वाचले की जर्मन सरकारच्या मुख्यालयात स्टेनो-टायपिस्टांची भरती चालू आहे. तिने लगेच एक अर्ज अक्षरश: खरडला. (आजही हा अर्ज जर्मन सरकारच्या अर्काइव्हज मध्ये पहायला मिळतो. त्याच्यावर जोरात खरडल्याच्या खुणा आहेत.  कधी गेलात तर पाहून घ्या. असो). कांही दिवसातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले. ती वेळेआधी पाच मिनिटे जागेवर पोहचली. तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. ती सुंदर होती, पण . तिच्यापेक्षा खूपच सुंदर तरुणी रांगेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यामुळे इथे कांही आपला निभाव लागणार नाही याची तिला  पक्की खात्री झाली. ती परत फिरणारच होती, तेवढ्यात चक्क तिच्या नावाचा पुकारा झाला. दोन गार्ड तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला स्यालूट  ठोकला. ते तिला अदबीने घेवून इंटरव्ह्यू  कक्षाकडे गेले. तिथल्या वॉचमननेही तिला स्यालूट ठोकला आणि तिच्यासाठी अदबीने कक्षाचे दार उघडले. तिला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीने का वागत आहेत. त्या विचारातच ती कक्षात शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही. तिथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी तीन तरुण बाया बसल्या होत्या आणि त्या तिघीही अंजलीनाच्या हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यातली मधल्या खुर्चीवर बसलेली बया तर हिची खास मैत्रीण होती. कोण असावी बरे ती? ती तर चक्क इव्हा ब्राऊन होती. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन. ही आपला इंटरव्ह्यू घेणार?

त्या तिघी उठून उभ्या राहिल्या आणि धावतच तिच्याकडे आल्या. सगळ्यांनी तिला  आळीपाळीने मिठ्या मारल्या. मग त्या तिघी आपापल्या खुर्चीत जाऊन बसल्या. मैत्रिणीच्या भूमिकेतून बॉसच्या भूमिकेत शिरल्या. अंजलीनाला समोरच्या खुर्चीत बसण्याची ऑर्डर देण्यात आली. इव्हाने फाईलमधून अंजलीनाचा अर्ज बाहेर काढला. म्हणाली, 'तुझा जन्म इंडियात झाला आहे. इंडिया इंग्लंडच्या ताब्यात असल्याने इंग्लंडप्रमाणे जर्मनीचा शत्रू आहे. मग तुला आम्ही कशी काय नोकरी देणार?'

हे ऐकून अंजलीनाचा चेहरा पडला. इव्हा म्हणाली, 'पण आम्ही तुझी पूर्ण चौकशी केली आहे. तुझी आई तुझ्या बापाशी भांडून भारतातून तुझ्यासह इकडे निघून आली. भांडणाचे कारणही तुझ्या आईचे देशप्रेम हेच होते. तुलाही ते असणारच याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुला आम्ही नोकरी देत आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. टायपिंग जरा स्लो करत जा. आणि पेनने लिहितांना खरडत जावू नकोस. नीप आणि कागद दोन्ही खराब होतात. हा अर्ज बघ तुझा, किती ठिकाणी चक्क फाटला आहे. एक तारखेपासून रुजू हो. चल जा आता.'

'धन्यवाद' ती  म्हणाली, 'पण मला एका प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल'
'काय?'
'माझ्या आई-बाबांचे भांडण झाले, आणि ते का झाले, हे तुम्हाला कसे कळले? माझी आई तर ते कुणालाही सांगत नाही. आख्ख्या जर्मनीत तर ही गोष्ट फक्त माज्या आईलाच आणि मलाच माहीत आहे असे मी आत्तापर्यंत समजत होते'
' ही माहिती मिळवणे कांही अवघड नाही. तुझे बाबा पुण्यात ज्या कॉलेजमध्ये शिकवतात, तिथे एक जर्मन विद्यार्थिनी भारतीय धर्मांचा अभ्यास करत आहे. तिने मिळवली ही माहिती आमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या बाबांच्याकडून. आणि तुझा भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी आहे हेही आम्हाला माहीत आहे.'

हे ऐकून अंजलीना गारच झाली. आता गरमागरम चहा किंवा कॉफी घेतलीच पाहिजे असे तिला वाटू लागले.


(माझ्या आगामी 'ब्यांड बाजा' या पुस्तकातील एका प्रकरणातील तुकडा ) 

हेही वाचा:

Email Form

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

मोस्ट पॉप्युलर कथा