Advt.

Advt.

Sunday, June 22, 2014

कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स

-महावीर सांगलीकर


राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेका खुर्चीवर बसल्या होत्या.

थोड्या वेळानं त्या रूममध्ये दोन व्यक्ति आल्या. त्यातली एक व्यक्ती मध्यमवयीन तर दुसरी तरुण होती. ती मध्यमवयीन व्यक्ती म्हणजे कर्नल चौधरी होते. त्या पाचही मुली कर्नल चौधरी यांना ओळखत होत्या. त्यांना बघताच त्या मुली चटकन उभ्या राहिल्या आणि त्यांनी सॅल्यूट ठोकला. कर्नल चौधरींनी त्या मुलींना आपापल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. त्यांच्या सोबत आलेल्या तरुणालाही त्यांनी एका खुर्चीवर बसायला सांगितलं. मग ते स्वत: टेबलाच्या एका कडेला असलेल्या खुर्चीवर जावून बसले.

‘गर्ल्स’, कर्नल चौधरी म्हणाले, ‘लेट मी इंट्रोड्यूस धिस यंग गाय.. कॅप्टन विजय प्रताप सिंग.  हा आपल्या सिक्रेट मिशनचा प्रमुख असणार आहे. ही इज फ्रॉम मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिस. खास आपल्या  मोहिमेसाठी मी त्याला तिथून इकडं  ट्रान्स्फर करून घेतलं आहे’

मग कर्नल चौधरी कॅप्टन विजयकडं बघत म्हणाले, ‘या पाचही मुलींच्याकडं विचित्र आणि गूढ अशा सुपरनॅचरल पॉवर्स आहेत. त्या पॉवर्सबद्दलची माहिती या मुली आता तुला सांगतीलच. तुला जे मिशन पूर्ण करायचं आहे त्यात त्यांच्या पॉवर्सचा कसा आणि कुठं उपयोग करून घ्यायचा आहे हे तू ठरवायचं आहेस’.

मग ते त्या मुलींकडं बघत म्हणाले, ‘गर्ल्स, नाऊ इंट्रोड्यूस युवरसेल्फ... नाव, गाव आणि तुम्हाला येतंय ते सगळं कांही...’

कर्नल चौधरींच्या शेजारी बसलेली मुलगी उभी राहिली.

‘आय एम शिवानी... शिवानी सावंत फ्रॉम कोल्हापूर, महाराष्ट्र. गेली दोन वर्षे रॉमध्ये काम करत आहे. मी वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीचा आवाज काढू शकते. अगदी माणसाला ऐकू येणा-या फ्रीक्वेन्सीच्या बाहेरील फ्रीक्वेन्सीचा आवाज देखील. जे आवाज इतरांना ऐकू येत नाहीत ते मला ऐकू येतात. पलीकडच्या खोलीत बसलेले लोक काय बोलत आहेत हे मी इथं बसूनच स्पष्ट ऐकू शकते. रस्त्याच्या पलीकडे उभी असलेली दोन माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे देखील मला स्पष्ट ऐकू येते. मी एकाच वेळी अनेक संभाषणं ऐकू शकते. शिवाय वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि पक्षांच्या भाषा मला कळतात. त्यांनी काढलेले जे आवाज इतरांना ऐकू येत नाहीत ते मला ऐकू येतात. त्याच प्रकारचे आवाज मीही काढू शकते. आणखी महत्वाचं म्हणजे माझ्या जिभेच्या शेंड्यावर काळा डाग आहे. मी जर वाईट कांही बोलले, एखाद्याला शाप दिले तर ते खरं होते. आपल्या मोहिमेत या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग होऊ शकतो हे सांगायची गरज नाही. मला सगळ्या प्रकारची शस्त्रे चालवता येतात, पण शस्त्रांचा उपयोग करण्याची वेळ माझ्यावर सहसा येत नाही’.

हे ऐकून कॅप्टन विजयनं आश्चर्याने डोळे विस्फारले.

‘शिवानीची ही ताकत मी अनुभवली आहे,’ कर्नल चौधरी कॅप्टन विजयला म्हणाले, ‘इन फॅक्ट तिच्या या ताकतीचा आम्ही गेली दोन वर्षे छोट्या प्रमाणावर उपयोग करून घेत आहोत’. मग शिवानीकडे बघत ते म्हणाले ‘शिवानी, टेक युवर सीट’

मग त्यांनी पुढच्या मुलीला इशारा केला. ती उभी राहिली आणि बोलू लागली.

‘आय एम सलमा सिद्दिकी फ्रॉम लखनौ. मी फेस रीडर आहे. मला हिप्नोटिझम येते. मी समोरच्या व्यक्तीच्या मनात शिरू शकते. मग त्याची मेमरी पूर्णपणे किंवा मेमरीचा हवा तो भाग माझ्या मेंदूत डाऊनलोड करून घेवू शकते. मग त्या व्यक्तीची विशिष्ट मेमरी किंवा पूर्ण मेमरी नष्ट करू शकते किंवा करप्ट करू शकते.  इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीची मेमरी पूर्ण ब्लॅंक करून मी तिथं दुस-याच कोणाची तरी मेमरी भरू शकते, त्यामुळं ती व्यक्ती ती रहात नाही, तर दुसरीच कोणीतरी बनते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी बंद कपाटातील कागदपत्रांमधला मजकूर वाचू शकते. शिवाय एका सैनिकाला जे जे यायला पाहिजे ते ते सगळे कांही मला येते. गेल्या एक वर्षापासून मी शिवानीबरोबर काम करत आहे’.

सलमाचं बोलणं ऐकून कॅप्टन विजयला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.

तेवढ्यात तिसरी मुलगी उभी राहिली.

‘आय एम राजुल जिनेंद्रन फ्रॉम चेन्नई. मी न्यूमरॉलॉजीस्ट आणि  मॅथेमॅटिशिअन आहे.मी कितीही मोठे आकडे लक्षात ठेवू शकते. कितीही मोठी गणिते एका क्षणात सोडवू शकते. सांकेतिक भाषेत लिहिलेल्या गोष्टी किंवा रेडीओ संदेश यांचा क्षणात उलगडा करू शकते. एखादी इमारत बाहेरून बघूनच तिची आतली रचना कशी असेल हे मी सांगू शकते. आपण पृथ्वीच्या पाठीवर कोठेही असलो तरी आपले नेमके लोकेशन काय आहे ते मी सांगू शकते. आपण समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहोत हेही सांगू शकते. हे सगळं कोणतं ही उपकरण न वापरता मला जमतं.  या बरोबरच माझ्याकडे इंटिट्यूव्ह पॉवर आहे. पुढे येऊ घातलेले धोके मला आधीच कळतात. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत पुढं काय घडणार आहे आणि मागं काय घडलेय हे मी परफेक्ट सांगू शकते. ’.

‘इंटरेस्टिंग’, कॅप्टन विजय म्हणाला.

राजुल आपल्या खुर्चीवर बसल्यावर चौथी मुलगी उभी राहिली.

‘मैं तारा गुरुंग, काठमांडू, नेपाल से...... मी कोणत्याही उपकरनाशिवाय संदेशाची देवान-घेवाण करू शकते. म्हणजे मी इथं बसून डोळे झाकले आणि जो संदेश पाठवायचा तो मनात उच्चारला की तो शेकडो, हजारो किलोमीटर दूर जाऊ शकतो.  मला पुढे घडू शकणा-या कांही गोष्टी, धोके आधीच कळतात. मला गूढ स्वप्नांचा अर्थ लावता येतो. तसेच मी स्पिरिच्यूअल हीलर आहे, जखमी आणि आजारी व्यक्तीला कोणत्याही औषधाशिवाय बरे करू शकते’. 

तारानं आपली माहिती सांगितल्यावर आता शेवटची मुलगी उभी राहिली.

‘आय एम रीटा डिसोझा फ्रॉम मेंगलोर. मी जादूगार आहे. मी क्षणात गायब होवू शकते, दुसऱ्यांना  गायब करू शकते. मी काडेपेटीतल्या काडीपासून ते आख्खी रेल्वे देखील गायब करू शकते. गरज पडल्यास मी ब्लॅक मॅजिकचा वापर देखील करू शकते’. 

कॅप्टन विजयनं असला प्रकार फक्त फॅन्टसीमध्येच  वाचला होता. त्यानं आत्तापर्यंत जे कांही ऐअक्ल्म त्यावर त्याचा अजून पूर्ण विश्वास बसला नव्हता. तेवढ्यात कर्नल चौधरी म्हणाले,

‘गर्ल्स, तुम्ही सगळ्यांनी आता विजयला तुमच्या अदभूत ताकतीची चुणूक दाखवायला हरकत नाही. पण इथं नको. तुम्ही सगळे हा बेस सोडून बाहेर फिरायला जा’.

मग ते विजयकडं वळून म्हणाले, ‘तुझ्यासाठी कांही खास सूचना. नीट लक्षात ठेव. शिवानीला कधी दुखवू नकोस. ती तुझ्यावर उचकेल असे कांही बोलू नकोस, वागू नकोस. ती तुला कांही वेडंवाकडं बोलली तर तुझं मोठं नुकसान होईल हे लक्षात ठेव. दुसरं म्हणजे सलमाच्या नजरेला नजर देवून कधी बोलत जाऊ नकोस. ती तुझ्या मनात शिरली तर तुझं कांही खरं नाही. तिच्याशी बोलताना शक्यतो तिच्याकडं न बघता बोल. आणि रीटापासून जरा दूरच रहात जा, नाहीतर ती तुला घेवून गायब व्हायची' मग ते त्याच्या कानात म्हणाले, 'Don't get involved in anybody of them. Your sole goal should be the successful completion of the mission. It is an order' 
'येस सर!' कॅप्टन विजय सॅल्यूट ठोकत म्हणाला.
'तुम्ही सगळे आता जाऊ शकता. उद्या दुपारी शार्प 3 वाजता आपल्याला पुन्हा इथेच भेटायचे आहे’.

कर्नल चौधरी त्या रुमच्या बाहेर पडले. थोड्या वेळात त्या पाच मुली आणि कॅप्टन विजय एका जीप मधून बेस पासून दूर एका टेकडीजवळ आले. जीप  टेकडीच्या पायथ्याशी थांबली. जीपमधून कॅप्टन विजय, शिवानी, सलमा, राजुल, तारा खाली उतरल्या, पण रीटा कांही बाहेर आली नाही. कॅप्टन विजयनं जीपमध्ये डोकावून बघितलं, तर आत रीटा कांही दिसली नाही. त्याच्या लगेच लक्षात आलं की रीटानं आपला जादूचा प्रयोग केलेला दिसतोय. कुठं लपली असावी बरं ही असा विचार करत तो जोरात ओरडला,
‘रीटा, मला माहीत आहे तू गायब झाली आहेस. तू आता प्रकट हो’.
तेवढ्यात टेकडीच्या माथ्यावरून आवाज आला’ ‘सर, आय एम हिअर’
कॅप्टन विजयने आश्चर्यानं त्या आवाजाच्या दिशेनं बघितलं. तिथं रीटा दिसत होती.
कॅप्टन विजयनं  आपले दोन्ही हात आपल्या तोंडाजवळ आणले आणि रीटाला जोरात हाक मारली, ‘रीटा तू खाली ये’
रीटा क्षणात टेकडीच्या माथ्यावरून गायब झाली. सगळेजण ती आता कशी प्रकट होते याचा विचार करत  होते, तेवढ्यात त्यांना पाठीमागून रिटाचा आवाज आला, ‘सर, मी तुमच्या मागे आहे..’ 

‘रीटा, यू आर अ ग्रेट मॅजिशिअन...’ कॅप्टन विजय म्हणाला.

तेवढ्यात राजुल म्हणाली, ‘सर उद्या तुम्ही 28 वर्षाचे होताय ना?’
तिचा प्रश्न ऐकून कॅप्टन विजयला आश्चर्य वाटलं.
तो म्हणाला, ‘हे तुला कसं काय माहीत?’
‘अशा गोष्टी ओळखणं माझ्यासाठी खूप सोपं आहे’ राजुल म्हणाली.
‘म्हणजे सर उद्या तुमचा बर्थ डे आहे?’ तारानं विचारलं. 
‘होय’ कॅप्टन विजयनं उत्तर दिलं.
‘सर मला तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारायचा आहे..’ राजुल म्हणाली.
‘विचार...’
‘इथे नको, जरा बाजूला चला..’
‘नको, काय विचारायचे ते सगळ्यांच्या समोर विचार’
‘ओके, गेल्या वर्षी तुम्ही मरता मरता वाचलात ना? अशाच एका मिशनमध्ये?’
‘तू माझ्याबद्दल बरेच कांही सांगू शकतेस. मानले तुझ्या न्यूमरॉलॉजीच्या ज्ञानाला’
‘सर, पुढच्या सहा महिन्यांच्या आत तुमचे लग्न होणार आहे’  
‘खरंच? कुणाशी?’
‘आमच्यापैकीच एकीशी’
‘अरे बापरे... अजिबात नको... हाहाहा....’
‘होणारच... ते तुम्ही टाळू शकत नाही. कोणाशी होणार ते मला माहीत आहे, पण मी ते आत्ताच उघड करणार नाही. राज को राज रहने दो....’

एवढ्यात कॅप्टन विजयचं लक्ष शिवानीकडं गेलं.  तिचे  कान एखाद्या प्राण्याच्या कानासारखे टवकारले गेले होते. टी आकाशाकडं बघत   म्हणाली, ‘थांबा, सगळे शांत व्हा... आकाशात गरुड पक्षी येत आहे... ’  सगळे जण आकाशाकडं बघायला लागले, पण त्यांना तिथं कांहीच दिसलं नाही.  पण कांही सेकंदातच आकाशात एक गरूड घिरट्या घालू लागला. नंतर तो अचानक जमीनीच्या दिशेनं झेपावला आणि परत उडाला. त्यानं त्याच्या पायात एक मोठा साप पकडला होता. पण त्या सापानं आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि तो जमिनीवर कोसळला. सगळेजण तिकडे धावले. तो साप जखमी झाला होता, मेल्यासारखा पडला होता पण जिवंत होता. तारा त्या सापाच्या शरीरावरून आपला हात फिरवू लागली. डोळे झाकून ती कांहीतरी पुटपुटू लागली. कांही क्षणातच तो साप अचानक झोपेतून उठावं तसा जागा झाला आणि वेगानं सळसळत दूर निघून गेला.

सगळेजण जीपकडं परत येऊ लागले इतक्यात कॅप्टन विजयच्या मोबाईल फोनची रिंग वाजली. त्यानं खिशातून फोन बाहेर काढला. एक टेक्स्ट मेसेज आला होता. तो मेसेज ओपन करून तो वाचायला सुरवात करणार तेवढ्यात सलमा म्हणाली, ‘सर, तुम्हाला आत्ता आलेला मेसेज कर्नल चौधरींचा आहे. वाचून दाखवू का मी तो न बघताच?’
‘सांग बघू काय आहे त्या मेसेज मध्ये?’ कॅप्टन विजयने विचारलं.
‘उद्या दुपारच्या ऐवजी पहाटेच आपलं मिशन सुरू होणार आहे. बी रेडी... असा तो मेसेज आहे’ सलमा म्हणाली.
कॅप्टन विजयला आश्चर्य वाटलं. कारण सलमानं जे वाक्य उच्चारलं तेच त्या टेक्स्ट मेसेजमध्ये जसंच्या तसं होतं.
‘कमाल आहे सलमा तुझी’, तो सलमाकडं न बघताच म्हणाला.

मग सगळेजण जीपमध्ये आपापल्या जागेवर बसले. जीप बेसच्या दिशेनं पळू लागली.
शिवानी म्हणाली, 'सर, चौधरी सर तुम्हाला बाजूला नेऊन तुमच्या कानात काय म्हणाले?
'कांही नाही, त्यांनी मला मिशनबद्दल एक सूचना दिली'
'कसली सूचना?'
'ती सूचना फक्त माझ्यासाठीच होती. सिक्रेट. तुम्हाला सांगू शकत नाही'
'सर, आमच्या पैकी किमान तीन जणींना चौधरी सर तुमच्या कानात काय म्हणाले हे माहीत आहे...'
'काय म्हणाले?'
'Don't get involved in anybody of them. Your sole goal should be the successful completion of the mission. It is an order' शिवानी, सलमा आणि राजूल एका सूरात म्हणाल्या.
कॅप्टन विजयला याचा अंदाज आधीच आला होता. तो म्हणाला, 'अवघड आहे माझं. मी कोणतीच गोष्ट तुमाचापासून लपवून ठेऊ शकत नाही'

मग रीटानं विचारलं, ‘सर, आम्हा सर्वांच्याकडं जशा गूढ पॉवर्स आहेत तशा तुमच्याकडंही कांही पॉवर्स असतील ना?’
‘नाही, माझ्याकडं अशी एकही गूढ पॉवर नाही’, कॅप्टन विजय म्हणाला, ‘पण अशा पॉवर्स असणा-या पाच सुंदर तरुणी माझ्याकडंआहेत....’

-पुढे चालू

हेही वाचा:
गर्ल्स होस्टेल
सलोनी राठोड
शिवानी द ग्रेट
पत्रमैत्रीण
मायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब

4 comments:

 1. yacha pudhil bhag post karaycha ahe ki .................................

  ReplyDelete
 2. But next part u have not posted from long?
  Why?
  Please reply

  ReplyDelete
 3. Plz don't post again this stupid things

  ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा