Advt.

Advt.

Friday, June 20, 2014

वाचक

-महावीर सांगलीकरमाझ्या एका तरुण मित्राला विद्रोही  पुस्तके वाचायची सवय लागली होती. त्यामुळे अलीकडे तो Angry Youngh Man वगैरे दिसत होता. तो अधूनमधून शिव्याही देत असे.

मी त्याला सल्ला दिला, “तू जातीयवादी पुस्तके, खोटा इतिहास सांगणारी पुस्तके, खोटा इतिहास खोडण्यासाठी नवा खोटा इतिहास सांगणारी पुस्तके, अतिरेकी विचार शिकवणारी पुस्तके वाचू नकोस. घरात ठेवू नकोस. त्या ऐवजी विज्ञान, दर्जेदार देशी-विदेशी साहित्य, यशस्वी लोकांची चरित्रे/ आत्मचरित्रे घरात ठेव, वाच. मग बघ तुझ्यामध्ये कसा सकारात्मक बदल घडतो ते.”

त्याने माझा सल्ला खरेच ऐकला व त्याच्या घरातली 60पेक्षा जास्त बहुजनवादी, ब्राम्हणवादी, ब्राम्हणविरोधी, भाषावादी, प्रांतवादी अशा सदरात मोडणारी विषारी पुस्तके माझ्याकडे आणून टाकली. ‘पंचावन्न कोटींचे बळी’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘देशद्रोही ब्राम्हण’, ‘पुणे करार’, देशाचे वाटोळे करणारा हिंदू धर्म’ ‘गर्व से कहो’ ‘यह आजादी झूठी है’ वगैरे वगैरे.....

मी कपाळाला हात लावला. म्हणालो, तुझ्याकडे ठेवू नको म्हणजे मला दे असे मी म्हणालो नाही.

तो म्हणाला, “ मग ही दुस-या कोणाला तरी देवून टाकूया”

“नको”, मी म्हणालो, “ही पुस्तके देवून दुस-याचे वाटोळे कशाला करायचे?”

“मग रद्दीत घालूया?” त्याने विचारले.

“रद्दीत घातली तरी ही पुस्तके जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांकडे पोहोचणार, मग तेथून अनेक निगेटिव्ह लोक ती खरेदी करणार. म्हणजे निगेटिव्ह लोकांना आणखी निगेटिव्ह बनवण्यास आपला हातभार लागणार”

“मग होळी करायची का?”

“पुस्तके फाडणे किंवा जाळणे हे आपल्याला अजिबात पटत नाही. त्यापेक्षा आपण एक काम करू, रद्दीच घालू, पण वेगळ्या प्रकारे” असे म्हणून मी त्याला एक वेगळी कल्पना सांगितली. त्याला ती लगेच पटली.

मग आम्ही दोघांनी त्या सगळ्या पुस्तकांचे कव्हर्स काढले. पाने सुट्टी केली आणि ती एकमेकात मिक्स करून टाकली. मग कव्हर्सचा वेगळा गठ्ठा बांधला, आणि सुट्ट्या केलेल्या पानांचा वेगळा. उगीच रिस्क नको म्हणून पाने आणि कव्हर्स रद्दीच्या वेगवेगळ्या दुकानात विकून टाकले. आलेले पैसे एका अंध वयस्क बाईला देवून टाकले.

या घटनेला ६ महिने महिने होवून गेले.

परवा मी माझ्या त्या मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या पुस्तकाच्या कपाटामध्ये बर्ट्रांड रसेल, थॉमस पेन, टॉल्स्टॉय, मॅक्झिम गॉर्की, पावलो कोएलो, ओशो, रवींद्र नाथ टागोर, प्रेमचंद अशा लेखकांची पुस्तके दिसली. डेल कार्नेजी, स्वेट मार्डन, नेपोलिअन हिल अशा अनेक लेखकांची वाचकाला दिशा देणारी सदाबहार इंग्रजी पुस्तके, ए.पी.जे. अब्दुल कलाम, सुधा मूर्ती यांची मूळ इंग्रजीमधील पुस्तकेही दिसली.

त्याच्या कपाटात मराठी पुस्तके फारशी दिसली नाहीत. मी खोचकपणे विचारले, “अरे तू मराठी ना? मग मराठी पुस्तके जास्त वाचत नाहीस, असे का?” तो काय उत्तर देतो ते मला बघायचे होते.

“काय असते त्या मराठी पुस्तकात वाचण्यासारखे?” तो म्हणाला, “एक तर द्वेष पसरवायाची कामे करतात, नाहीतर अन्यायाची रडगाणी गातात. अनेक मराठी लेखकांचे जग म्हणजे डबकेच असते. जी कांही ब-यापैकी पुस्तके असतात, ती इंग्रजी पुस्तकांची उचलेगिरी असते. आणि इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचायचे तर तेथेही लबाड्याच. किमती तरी किती भयानक.. जास्त पैसे देवून तसली पुस्तके वाचण्यापेक्षा वाजवी किमतीतील मूळ इंग्रजी पुस्तके वाचणे चांगले”

“तुझे एक ठीक आहे, तुला इंग्रजी येते. ज्यांना येत नाही त्यांनी काय करायचे?”

“त्यांनी इंग्रजी शिकून घ्यायचे” तो हसत म्हणाला. 

“बराच फरक पडलेला दिसतोय” मी त्याला म्हणालो.

“होय”, तो म्हणाला, “माझी डोकेदुखी आता कमी झाली आहे. महत्वाचे म्हणजे मी आता विचार करायला शिकलोय” 


No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा