Advt.

Advt.

Wednesday, May 21, 2014

मायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब

 -महावीर सांगलीकर


भारतात जे महान इंग्रज अधिकारी होवून गेले, ज्यांना भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल खूप आपुलकी वाटत होती, त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे  मायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब.

मायकेलचा जन्म इंग्लंडमधील लिसेस्टर या शहरात झाला होता. त्याला  लहानपणापासूनच वेगवेगळी वाद्ये वाजवण्याची आवड होती. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी नशीब काढण्यासाठी तो आपला थोरला भाऊ जॉर्ज याच्याबरोबर भारतात आला.  मायकेलला इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी मिळाली. जॉर्ज बॉन्डलाही कोठेतरी नोकरी मिळाली, पण भारतातील उकाड्याने हैराण होवून तो कांही महिन्यातच  इंग्लंडला परत निघून गेला. (पुढे त्याच्या चौथ्या पिढीत जगप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बॉन्ड जन्माला आला.)

लवकरच मायकेल बॉन्ड  हे इस्ट इंडिया सैन्यात एका ब्यांड पथकाचे प्रमुख  झाले.  भारतीय सैनिक त्यांना ब्यांडसाब या नावाने ओळखत, पुढे ब्यांड हेच आडनाव त्यांना चिकटले.

ब्यांड साहेबांच्या पथकाने  1857च्या युद्धात मोठाच पराक्रम गाजवला होता. मीरत येथे इंग्रज सैनिकांच्या एका बराकीला बंडखोरांनी घेरले होते आणि हे बंडखोर त्या सैनिकांना पेटवून देण्याच्या तयारीत होते. पण ऐनवेळी ब्यांड साहेब आपल्या पथकासह तेथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या पथकाला वाद्यांचा भयानक आवाज करायचा हुकूम दिला. त्या गगनभेदी आवाजाने बंडखोर सैनिकांना पळता भुई थोडी झाली.  ते चक्क आपल्या कानात बोटे घालून शरण आले. अशा प्रकारे  ब्यांड साहेब आणि त्यांच्या पथकाने  बंदुकीची एकही गोळी न उडवता ती लढाई जिंकली. ब्यांड साहेबांनी ब्यांडच्या मदतीने बंडखोरांचा ब्यांड वाजवला. अशा प्रकारे लढाई जिंकल्याचे जगातील ते एकमेव उदाहरण होते.

या पराक्रमाबद्दल ब्यांड साहेबांना विक्टोरिया क्रॉस हे पराक्रमाचे सर्वोच्च पदक देण्यात येणार होते, पण त्यांनीच ते नाकारले. त्यांचे म्हणणे असे होते की ही अंतर्गत लढाई आहे, आणि त्यासाठी असे पदक घेणे योग्य नाही. त्या ऐवजी त्यांच्या पथकातील सैनिकांना पगारवाढ, नवी वाद्ये आणि नवेकोरे कपडे देण्यात यावेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकारने करावा, त्यांच्यातील हुशार मुलांना उच्च शिक्षणासाठी विलायतेला पाठवण्यात यावे अशा मागण्या ब्यांड साहेबांनी केल्या. त्या लगेच मंजूर करण्यात आल्या. सैनिक खुश झाले. त्यांनी पगारवाढ, नवी वाद्ये व नवे कपडे आनंदाने स्वीकारले, पण अपवाद वगळता एकाही सैनिकाने आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची तयारी दाखवली नाही. आपली मुलेही सैनिकच होणार आहेत, मग शिक्षण घेण्याची काय गरज आहे असे त्या सैनिकांना वाटले असावे. असो.

पण हे सैनिक प्रामणिक होते. बंडखोरांनी कांही काळापूर्वी त्यांनाही फितवण्याचा प्रयत्न केला होता. 'तुम्ही जे ढोल बडवता त्याला गाईचे कातडे लावलेले असते, असे  ढोल बडवणे गोमांस खाण्यासारखेच पाप आहे' असे कुजबूज मोहिमेतून त्यांना सांगण्यात आले होते. पण बंडखोरांच्या दुर्दैवाने हे सगळे सैनिक हिंदू असले तरी गोमांसभक्षक होते. त्यामुळे ते या कुजबूज मिहीमेला बळी पडले नाहीत. तसेच त्यांना ढोलाचे आवाज ऐकायची सवय असल्यामुळे ब-याच जणांना ही कुजबूज ऐकूच आली नाही.

1857चे बंड शमल्यावर पुणेकरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ब्यांड साहेबांना पुण्याला पाठवण्यात आले. या मोहीमेवर त्यांनाच पाठवण्याचे कारण म्हणजे त्यांना मराठी भाषा बोलता, लिहिता व वाचताही येत होती. पुण्यात येताच ते मराठी लोकांनाही वाचायला शिकले.

पुण्यात सगळेजण  थंड पडले होते त्यामुळे  हवापालटासाठी मायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब कोकणात महिनाभराच्या सुट्टीवर आले. दिवसभर डोंगर द-या पालथ्या घालणे, वेळ मिळेल तेंव्हा निरनिराळी वाद्ये वाजवणे यात त्यांची सुट्टी गेली. ते पुण्याला परत निघण्याच्या तयारीतच होते एवढ्यात त्यांना खबर मिळाली की एक बाई सती जाणार आहे.  सती जाण्याचा हा भयानक प्रकार त्यांना ऐकून माहीतच होता, शिवाय ते वाराणसी येथे असताना त्यांनी सतीचा प्रकार हाणून पाडला होता. इथेही ब्यांड साहेबांनी सती हा प्रकार होवूच दिला नाही.ते आपला ढोल घेवून स्मशानात गेले आणि तो जोरजोरात वाजवू लागले. त्यांच्या ढोलाच्या आवाजापुढे स्मशानभूमीत वाजणारे ढोल आवाजच करेनात. चितेला अग्नी न देताच मंडळी पळण्याच्या तयारीत होती. पण ब्यांड साहेबांनी एकाची मानगूट पकडून त्याला जबरदस्तीने अग्नी द्यायला लावला.

अशा रीतीने ती तरुण बाई वाचली, पण त्या तरुणीला सासरच्या आणि माहेरच्या कोणीच स्वीकारले नाही. तेव्हा  त्या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ब्यांड साहेबांनी तिला तेथूनही वाचवले. ती तरुणी सुंदर तर होतीच, आणि ब्यांड साहेबांना मनातून आवडलीही होती. त्यामुळे ब्यांड साहेब तिला घेवून पुण्याला आले आणि तेथील एका चर्चमध्ये जावून तिच्याशी लग्नही केले.

वर्षाभरातच  या जोडप्याला एक मुलगा झाला.

ब्यांड साहेबांनी आपल्या धार्मिक चालीरीतींमध्ये ढवळाढवळ केली, शिवाय आपल्या समाजातील एका विधवेशी लग्न केले, आणि त्यापेक्षाही भयानक म्हणजे ती ख्रिस्ती झाली याचा भयानक राग येवून कांही लोकांनी त्यांचा खून करण्याचा कट आखला. पण साहेबांना याचा सुगावा लागला. आपल्याला सुगावा लागला आहे याचा त्यांना सुगावा लागू न देता ब्यांड साहेबांनी आपल्या खूनाचा प्रयत्न होवू दिला पण अर्थातच ते बचावले. मग त्या लोकांना जेरबंद करून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपावरून खटला भरण्यात आला. कोर्टात सगळ्या आरोपींनी आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा प्रकार केला, असे बाणेदारपणे सांगितले.

असे हे ब्यांड साहेब. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी आणि शिक्षण प्रचारासाठी खूपच काम केले. ते भाषणबाजी करण्यापेक्षा अंमलबजावणी करण्यावर लक्ष देत. स्वत: एका विधवा स्त्रीशी लग्न करून त्यांनी ते दाखवून दिलेच होते.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा