Advt.

Advt.

Sunday, May 4, 2014

अनबिलिव्हेबल दिशामी सायबर कॅफेतून बाहेर पडलो आणि सलीम भेटला. म्हणाला, ‘तुलाच शोधत होतो. तू 16 डिसेंबर बघितलास का? खूप चांगला आहे म्हणे. मी आज रात्रीचा शो बघणार आहे. येणार का?’

या सिनेमाबद्दल मी बरेच कांही ऐकले होते, वाचले होते. तो बघायचाच होता, पण सलीमला लगेच होकार देण्याऐवजी मी म्हणालो, ‘आज रात्री...? जरा अवघडच आहे. मला एक महत्वाचं काम आहे. ते लवकर झालं तर  मी येण्याचा प्रयत्न करेन’.
‘काय ते नक्की सांग, म्हणजे मी तिकिट काढून ठेवतो’
‘ओ.के., नक्की येतो. काढ तिकिट. पण मी माझं काम आटोपून मग डायरेक्ट थिएटरवर येतो. बरोबर सव्वा नऊ वाजता’.
‘चालेल, मी वाट बघतो’ असे म्हणून सलीम निघून गेला.

मग दिवसभर मी माझी इतर कामं केली आणि संध्याकाळी सात वाजता टेलिफोन बूथवर गेलो. दिशाला फोन लावला.
‘हाय दिशा, हाऊ आर यू?’
‘कशी असणार? ठीक आहे’ तिचा आवाज थोडासा उदास वाटत होता.
‘अजून डोकं दुखतय वाटतं तुझं?”
‘महावीरजी, आज दुपारी आणि परवा मी तुमच्यावर उगीचच रागावले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इट. सम टाईम्स आय बिकम व्हेरी अॅग्रेसिव्ह एंड डॉमिनंट’
‘तो तुझा दोष नाही, तुझे नंबर्सच तसे आहेत’
‘परत न्यूमरॉलॉजी?’
‘होय. तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा नंबर ठरतो. प्रत्येक नंबरचे कांही बेसिक गुणदोष असतात. ते तुम्हाला कायमचे चिकटून बसतात. कधी कधी हे गुणदोष उफाळून येतात. त्याला आपण कांही करू शकत नाही’
‘तुमचा बर्थ नंबर 4 आहे. हा बर्थ नंबर असणारे लोक तापट असतात असे मी वाचले होते. पण तुम्ही कधी माझ्यावर रागावला नाहीत, रागवत नाही, हे कसे काय?’
‘मी खरेच तापट आहे, अगदी निष्ठूरही आहे. पण मी नेहमीच जिनिअस, टॅलेंटेड लोकांचा आदर करतो. अशा लोकांवर मी कधीच रागवत नाही. माझा सगळा राग लो आय.क्यू. असणा-या, कॉमन सेन्स न वापरणा-या लोकांवर निघत असतो’
‘असं होय? मला वाटलं मी तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही माझ्यावर रागवत नाही’
‘ते कारण आहेच, पण केवळ एखादी व्यक्ति  आवडते म्हणून तिच्यावर रागवायचं नाही असे कुठं असतं? पण  मी तुझ्याकडं एक केस स्टडी म्हणून बघतोय, डॉक्टरने पेशंटकडे बघावे तसे... डॉक्टर पेशंटवर रागवत नसतात’
‘हो क्का...?’

मग तिनं वेगळाच विषय काढला. अचानक ती म्हणाली, ‘तुम्ही 16 डिसेंबर पाहिला का?’. तिच्या या प्रश्नामुळं मला आश्चर्य वाटलं. तिनं हा प्रश्न नेमका आजच का विचारावा? केवळ योगायोग? पण मी ते न दाखवता म्हणालो, ‘नाही पाहिला, आज रात्री बघणार आहे’.
‘जरूर बघा, तुम्हाला आवडेल. फॉर युवर इन्फोर्मेशन, 16 डिसेंबर 22 मार्चला रिलीज झाला होता..’
'आश्चर्य आहे... नक्कीच त्यात  माझ्यासाठी बौद्धिक खाद्य असणार' मी म्हणालो.

परत विषय बदलत ती म्हणाली, ’तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती’
‘कोणती?’
‘पुढच्या आठवड्यात मी इंग्लंडला चालले आहे’
‘कॉंन्ग्रॅट्स.. परत कधी येणार?’
‘मी दोन वर्षे थांबणार आहे तिथं’
‘किती..?’ मी दचकून विचारलं
‘दोन वर्षे’
ते ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात.
‘हॅलो, आर यु देअर..? तिकडून आवाज आला.
‘यस...’, मी क्षीण आवाजात कसेबसे म्हणालो.
‘तिथे मी खूप बिझी असणार आहे. आपल्याला फोनवर बोलता येणार नाही सध्यासारखे. नेटवर चॅटिंग पण करता येणार नाही’
मी कांही बोललो नाही.
‘ऐकताय ना?’
‘हं..’
‘मला तुमची नेहमी आठवण येईल. मी अधेमधे इमेल पाठवत जाईन तुम्हाला. बट प्लीज डोंट डिस्टर्ब मी बाय सेन्डिंग टू मेनी इमेल्स...’
‘आय विल ट्राय टू कंट्रोल मायसेल्फ’
‘आणि दोन वर्षांनी परत आल्यावर भेटूच आपण प्रत्यक्ष. अर्थातच तुमचा मला न भेटण्याचा विचार तोपर्यंत बदलला असला तर’
मी पटकन म्हणालो, ‘माझा तुला न भेटण्याचा विचार आत्ताच बदललाय दिशा. आय वांट टू मीट यू. उद्या येतो मी मुंबईला....’
‘उद्या मी मुंबईत नाही, बाहेरगावी चाललेय’
‘मग परवा...?’
‘परवा चालेल. या, मी वाट पहाते. आणि उद्या दुपारी बारा वाजता मला कॉल करा. मी मुंबईत नसले तरी सेलफोन माझ्या बरोबरच असेल. बोलू थोडा वेळ...’
‘ओके, करेन फोन मी’
‘महावीरजी, नऊ वाजून गेलेत. तुम्हाला सिनेमाला जायचं आहे ना?’
‘सिनेमा कॅन्सल... मला तुझ्याशी आणखी बोलायचं आहे...’
‘नको आता. मला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे’
‘ओके, विश यू अ हॅप्पी जर्नी... टेक केअर, बाय’

त्या रात्री मी सिनेमाला गेलोच नाही.

दिशाला आयुष्यात कधीच भेटायचे नाही म्हणणारा मी दिशाच्या भेटीच्या कल्पनेने आनंदून गेलो.
आपण प्रत्यक्षात कांहीही म्हणत असलो तरी वेळ आली की आपल्या सुप्त मनात दडलेली आपली खरी इच्छा व्यक्त होते याची मला प्रचिती आली होती.

दुस-या दिवशी मी कांही कामानिमित्त पुणे शहरात गेलो होतो. माझी कामं आटोपून बरोबर बारा वाजता एका कॉईन बॉक्स वरून दिशाला फोन लावला.
‘हॅलो दिशा...’
‘महावीरजी तुम्ही कुठं आहात...’ दिशा अगदी लाडानं बोलली ..
‘मी पुण्यात आहे...’ मी तिच्याच टोनमध्ये म्हणालो.
‘पुण्यात कुठं..?’
‘टिळक रोडला’
‘टिळक रोडला कुठं?’
‘तुला साहित्य परिषद माहीत आहे?’
‘ते काय असतं?.... नाही माहीत. पण टिळक रोड माहीत आहे’
‘पण तू हे एवढ्या डिटेलमध्ये का विचारत आहेस?’ मी विचारले.
‘कारण मी पण पुण्यातच आहे’ दिशा म्हणाली.
‘काय..?’ मी जवळ जवळ ओरडलोच. आश्चर्यानं, अविश्वासानं. विचारलं, ‘तू पुण्यात कशी काय? मी येणारच होतो ना उद्या तुझ्याकडं मुंबईला?’
‘नाही रहावलं मला.. आले तुम्हाला भेटायला. म्हटलं, कल करे सो आज कर. कॅन यू टेल मी युवर एक्झॅक्ट लोकेशन?’
‘तू नेमकी कुठं आहेस?’
‘इंटरनॅशनल बुक  सर्व्हिस, डेक्कनवर’
‘एक काम कर, रिक्षात बस. रिक्षावाल्याला सांग टिळक रोडला दुर्वांकुर हॉटेलजवळ सोडायला. मी हॉटेलच्या समोरच्या बाजूला रोडच्या पलीकडे एक सायबर कॅफे आहे, तिथल्या कॉईन बॉक्स वर आहे’’
‘दुर्वांकुर हॉटेल... हे नाव ऐकलेलं आहे मैत्रीणीकडून. खूप चांगलं जेवण मिळतं म्हणे तिथं. मला खूप भूक लागलीय.. आपण लगेच जायचं जेवायला..?’
‘हो, जाऊ... तू आधी रिक्षा पकड... दुर्वांकुरला उतरलीस की हॉटेलच्या गेटजवळ ये. रिक्षात बसल्यावर तुला इथं यायला फारतर 10-12 मिनिटे लागतील’
‘आलेच’ असे म्हणून तिनं रिक्षावाल्याला हाक मारली आणि फोन कट केला. मी दुर्वांकुर हॉटेलच्या गेटवर जाऊन उभा राहिलो. डेक्कनकडून येणा-या प्रत्येक रिक्षावर लक्ष ठेवू लागलो. पण बराच वेळ झाला तरी दिशा कांही आली नाही. मी पुन्हा रोडच्या पलीकडं कॉईन बॉक्सवर गेलो. दिशाला फोन लावला.
‘आले-आले... अलका चौकात ट्रॅफिक जाम झालेय. तुम्ही कॉईन बॉक्सच्या तिथंच थांबा.. धावपळ करू नका. मी दुर्वांकुरच्या तिथं आले की दिसेनच तुम्हाला. मग या तुम्ही हॉटेलकडे’ असं म्हणून तिनं फोन कट केला. मग मी तिथंच थांबलो. पण बराच वेळ झाला तरी दिशा आली नाही, म्हणून मी कॉईन बॉक्सच्या तिथं जाऊन तिला परत फोन लावला. फोन स्वीच ऑफ होता. आणखी दोनवेळा ट्राय केले, पण तिचा फोन बंद. मला टेन्शन आलं. दिसला कांही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? पटकन एक रिक्षा थांबवली, तिच्यात बसलो आणि अलका चौकाच्या दिशेने रिक्षा न्यायला सांगितली. चौकापर्यंत जाऊन परत आलो. दिशा कुठंच दिसली नाही.
कॉईन बॉक्सवरून तिला परत फोन लावला.
‘अहो, कुठे आहात तुम्ही..? मी कधीची इथं येऊन उभी राहिली आहे’
मी हॉटेलच्या दिशेनं बघितलं, पण ती तर मला दिसली नाही.
‘अहो, इकडं, इकडं.. मी अबोली कलरचा पंजाबी ड्रेस घातला आहे बघा’
मी पुन्हा बघितलं, अशा ड्रेसमध्ये तिथं कोणीच दिसत नव्हतं. जाम वैतागलो. एवढ्यात दिशा म्हणाली, ‘अहो, एवढं कसं दिसत नाही तुम्हाला... बावळट कुठले... तुम्ही थांबा तिथंच, मीच येते तिकडं’ असं म्हणून तिनं फोन कट केला.
मी वाट पहात राहिलो, पण दिशा कांही आली नाही.

हा काय प्रकार आहे? दिवास्वप्न? की भुताटकी?

दिशा येत नाही याची खात्री होताच मी सायबर कॅफेत शिरलो. एका कॉम्प्यूटर समोर बसलो. दिशा मेसेंजरमध्ये नसणार हे माहीत असूनही मेसेंजरमध्ये लॉग इन झालो. बघतो तर ती बया तिथं हजर होतीच. आश्चर्य... आपल्या इथं मोबाईलवर इंटरनेटची सोय अजून तरी झालेली नाही.. मग हे कसं शक्य आहे?

मला तिचा थोडा राग आला होता. पण हे प्रकरण मी शांतपणे उलगडायचं ठरवलं... उगीच परत आणि तिचं डोके सटकायाला नको..
‘हाय दिशा... आर यु देअर?’
‘यस...’
‘तू पुण्यात आहेस ना?’
‘पुण्यात?  मी कशाला पुण्यात असेन?’
‘मग कुठं आहेस?’
‘मुंबईत...घरी...’
‘तू बाहेरगावी जाणार होतीस ना?’
‘हो, पण जाणं कॅन्सल केलं’
‘आज तू हे काय नाटक केलंस?’
‘नाटक? कसलं नाटक?’
‘पुण्याला येवून मला भेटायचं नाटक..’
‘मी कशाला पुण्याला येईन आज? तुम्ही उद्या येणारच आहात ना मुंबईला? तुम्हाला कांहीतरी भास झाला असेल..’
आता हिला काय म्हणायचं...
‘बरं, आपलं फोनवर बोलणं तरी झालं होतं का आज.. थोड्या वेळा पूर्वी?’
'आज कुठं आपलं बोलणं झालंय?'
'किती खोटं बोलतेस तू....'
‘महावीरजी, तुम्हाला एवढं कसं कळत नाही? आज तारीख किती आहे?’
‘तूच सांग किती आहे ... तुझ्या नादात मला तारखा पण लक्षात रहात नाहीत आजकाल...’
‘अहो आज एक एप्रिल आहे. मी तुम्हाला एप्रिल फूल केलं... यु मार्चिअन...’
‘इट इज अनबिलिव्हेबल..... असलं एप्रिल फूल?’
‘यस, असलं एप्रिल फूल. फक्त मीच करू शकते’
‘पण हे सगळं तुला एवढं परफेक्ट कस काय जमलं?’
‘दॅट इज अ सिक्रेट... पण तुम्हाला म्हणून सांगते.. मी बरीच पूर्वतयारी केली होती. काल रात्री मी तुम्हाला इंग्लंडला जात असल्याची थाप मारली. तो या मिशन एप्रिल फुलचाच भाग होता. मी इंग्लंडला जाणार आहे हे तुम्हाला खरं वाटले तिथंच मी अर्धी लढाई जिंकली होती,  कारण मला न भेटण्याच्या वल्गना करणारे तुम्ही मला भेटायला लगेच तयार झाला’
‘बरोबर’, मी म्हणालो, ‘तू जर इंग्लंडला जाणार असल्याचं मला सांगितलं नसतंस तर मी तुला भेटायला  तयार झालोच नसतो.’
‘पुढच्या घटना तुम्हाला माहीतच आहेत. आज फोनवर मी अशा पद्धतीनं बोलले की तुम्हाला वाटले मी खरंच पुण्यात आहे. प्रत्यक्षात मी मुंबईत माझ्या घरी बसूनच या सगळ्या गोष्टी बोलत होते’.
‘तू नकाशाचा वापर केलेला दिसतोय..’
‘होय, तुम्ही तुमचं लोकेशन सांगितल्यावर नकाशात बघून मी माझं लोकेशन लगेच ठरवलं. त्यांना जोडणा-या रस्त्यावर एक नजर फिरवली... इंटरनॅशनल बुक सर्व्हिस ...लकडी पूल.... अलका चौक..... टिळक रोड..... दुर्वांकुर हॉटेल’
‘आलं लक्षात. मग तू रिक्षावाल्याला हाक मारण्याचं नाटक केलेस, मला खरंच वाटावं तू रिक्षा पकडत आहेस म्हणून. नंतर फोन कट केलास. थोड्या वेळानं माझा फोन आल्यावर अलका चौकात ट्रॅफिक जाम असल्याची थाप मारलीस, पटण्यासारखी. नंतर फोन स्वीच ऑफ केलास, मी फोन केला तर तो लागू नये आणि मला टेन्शन यावं म्हणून. ग्रेट प्लॅनिंग’
‘वेल, पण या प्लॅनिंगमध्ये बरेच लूप होल्स होते. ते तुमच्या लक्षात कसं आले नाहीत?’
‘त्यावेळी लक्षात आले नाहीत, कारण मी एका वेगळ्याच धुंदीत होतो. तुला भेटण्याची ओढ लागली होती. पण आता दोन गोष्टी  लक्षात आल्या आहेत’
‘सांगा पाहू...’
‘एक म्हणजे तू मला भेटायला पुणे शहरात कशाला येशील? तू डायरेक्ट चिंचवडलाच आली असतीस’
‘बरोबर, पुढं?’
‘तू डेक्कन ते दुर्वांकुर खरंच रिक्षात बसून आली असतीस तर मला फोनवर रिक्षाचा, रोडवरच्या ट्रॅफिकचा जरातरी आवाज आला असता’.
‘आणखी कांही लक्षात येतंय का?’
‘नाही’
‘अहो महावीरजी, मी खरंच पुण्यात असते तर फोनच्या पल्स रेटमध्ये फरक पडला असता’
‘बरोबर... पण माझ्याच पल्स रेटमध्ये फरक पडला होता त्यामुळे फोनचा पल्स रेट माझ्या लक्षात नाही आला’
‘हा हा हा .... बरं उद्या येणार ना मुंबईला?’
‘आता ते विसर... मला परत एप्रिल फूल नाही व्हायचं’
‘अहो एप्रिल फूल फक्त एक एप्रिललाच करतात. उद्या दोन एप्रिल आहे’
‘असेल. पण आय एम नो मोअर इंटरेस्टेड इन मीटिंग यू’
‘खरं की काय.. बघूच आपण...’
'ते बघायचं विसर आता. त्यापेक्षा तुझ्या बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी कर जरा'

पुढे चालू:

 या दीर्घ कथेचे आधीचे भाग:No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा