Advt.

Advt.

Saturday, April 5, 2014

दिशाची पुन्हा एन्ट्री-महावीर सांगलीकर

2002चा जानेवारी महिना उजाडला. गेली तीन वर्षे मी इंटरनेटचा भरपूर वापर करीत आलो होतो. माझ्या अनेक वेबसाईट्स होत्या. त्यातील इतिहास आणि इंडॉलॉजी या विषयावरील वेबसाईट्स फारच लोकप्रिय झाल्या होत्या. इंटरनेट जगतात आणि त्याबाहेराही  मी एक प्रसिद्ध व्यक्ति झालो होतो.

एके दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे एका सायबर क्याफेमध्ये जावून मी माझ्या इमेल अकाउंटमध्ये लॉग इन झालो. ब-याच नवीन इमेल आल्या होत्या. त्या पाठवणा-यांच्या नावांवरून मी एक नजर टाकली. त्यातील एका नावावर मी थबकलो. ती दिशा कोठारीची इमेल होती. ही तीच दिशा आहे का, की त्याच नावाची दुसरी कोणी? असा विचार मनात आला. मी त्या इमेलवर क्लिक केले. इमेल ओपन झाली. त्यात केवळ एक वाक्य होते...  Do you remember me? अरे, म्हणजे ही तीच आहे. मी लगेच त्या इमेलचे उत्तर दिले: What do you think? Is it possible for me to forget you?

मग मी इतर इमेल्स वाचू लागलो. तेवढ्यात दिशाची आणखी एक इमेल आली: Thank God, you still remember me. … After 10 years.  How are you?  What about your magazine? 

या इमेलचे उत्तर मी लगेच दिले. कांही मिनिटातच तिची आणखी एक इमेल आली. तिने मला मेसेंजरवर यायला सांगितले. मी मेसेंजरमध्ये लॉग इन केले, तिला add केले. मग आम्ही एकमेकांशी च्याटिंग करू लागलो. एखादा जुना मित्र खूप वर्षांनी भेटल्यावर जो आनंद होतो तो दोघांनाही झाला होता. गप्पाच गप्पा.... त्या कांही संपेनात. तेवढ्यात लाईट गेली.

दुस-या दिवशी दुपारी मी पुन्हा सायबर क्याफेत गेलो. मेसेंजरमध्ये लॉगin इन केले, तर दिशा ऑंनलाईनच होती. मी तिच्यासाठी मेसेज टाईप करत होतो, तेवढ्यात तिचाच मेसेज आला...

‘का हो, काल तुम्ही मध्येच च्याटिंग बंद का केले?’
‘अगं, काल इथली लाईटच गेली....’
‘मला वाटले तुम्ही कंटाळला माझ्याशी बोलायला... वाटले आनंद झाला असेल  तुम्हाला लाईट गेल्यामुळे ’
‘तुला खरंच वाटतं का मला आनंद झाला असेल असे?’
‘तुमचे कांही सांगता येत नाही’

दिशा थोडी रागात दिसत होती. काय करावे बरे? थोडा वेळ आपण कांहीच बोलायचे नाही. बघू तिची काय प्रतिक्रिया होते ती.

‘Hallo… Hallo… Are you there? Hallo… I am sorry….. मला वाटतेय मी जरा जास्तच बोलले, मला माफ करा’

मी कांहीच उत्तर दिले नाही.

‘Hey… I am really very sorry’

मग मी मनात म्हणालो, आता जास्त ताणायला नको...
‘हाय दिशा, माझा एक मित्र इथे आल्यामुळे मी आत्ता थोडा वेळ तुझ्याशी च्याटिंग केले नाही, सॉंरी. पण तू माफी का मागत आहेस?’

‘कांही नाही, मला वाटले तुम्ही रागावलात की काय....’

मी तिला म्हणालो, ‘दिशा, आता आपण उद्या परत बोलू, मला जरा महत्वाच्या कामासाठी सिटीत जायचे आहे’

‘तुम्ही खरे बोलताय ना? खरेच काम असेल तर जा... पण उद्या नक्की बोलायचे. आणि थोडे लवकर
नेटवर या......’

मग मी मेसेंजरमधून लॉग आउट झालो आणि माझी इतर कामे करत बसलो.

पुढच्या दिवशी दिशा परत हजर. ती म्हणाली, ‘काल तुम्ही मेसेंजर मधून लॉग आउट करून नेटवर पुढचे तीन तास बसला होता ना?’

कमाल आहे.. दिशाने हे कसे काय ओळखले असावे बरे? हां, आता लक्षात आले, तिला खोटे सांगून आपण मेसेंजर मधून बाहेर पडलो, त्यानंतर एक लेख लिहिला आणि तो आपल्या वेबसाईटवर अपलोड केला. तिने तो लेख आणि त्याच्यासोबतची वेळ पाहिली असावी. पण हे असेच असावे का? खात्री करून घेण्यासाठी मी म्हणालो,

‘हे तुला कसे काय कळले?’
‘ओळखा पाहू?’
मी मला जे लक्षात आले होते ते सांगितले.
‘बरे झाले तुम्ही मला ही आयडीया सांगितलीत. पण मी या पद्धतीने नाहीच ओळखले. मी आपलं सहज खडा टाकून बघितला.... आता इथून पुढे तरी माझ्याशी खोटे बोलत जाऊ नका. लगेच पकडले जाल’

दिशाचे हे बॉसिंग मला जरा जास्तच वाटत होते, पण ते  हवेहवेसे देखील वाटत होते.

‘तुमचा एखादा फोटो आहे का? मला मेल करा’ तिने पुढचा आदेश दिला.
‘तू फिमेल आहेस, तुला मेल कशाला करायचे?’ मी उत्तरलो...
‘पुअर ह्युमर’, ती म्हणाली, ‘तुम्ही तुमचा फोटो मला लगेच पाठवा’
‘पाठवेन, पण जरा प्लीज वगैरे म्हण की... हुकूम कशाला सोडतेस? आणि आधी मला हे सांग माझा फोटो तुला पाहिजे कशाला?’
‘तुम्ही कसे दिसता ते बघायचे आहे मला’
‘ठीक आहे, पण आत्ता या क्षणाला माझ्याकडे माझा फोटो नाही, मी तो तुला उद्या पाठवीन’
‘ओके, पण नक्की पाठवा....  please....…’
‘पाठवतो, पण मला सांग, तू कशी दिसतेस? राणी मुखर्जी सारखी? ऐश्वर्या राय सारखी? की दुस-या कोणत्या हिरोइनीसारखी?’  
‘अहो पडद्यावरच्या त्या मेकअप सुंदरीची माझ्याशी कशाला तुलना करता? आणि तुलनाच करायची असेल तर कोणती हिरोईन माझ्यासारखी दिसते असे विचारा ना? थांबा, मी तुम्हाला माझा फोटोच पाठवते. बघा आणि तुम्हीच सांगा मी कशी दिसते ती’

पुढच्याच मिनिटाला तिची एक इमेल आली. सोबत तिने एक फोटो जोडला होता. मी तो ओपन केला आणि त्या फोटोकडे पहातच राहिलो. गुबगुबीत, हसरा आणि निरागस चेहरा, मोठे-मोठे डोळे, सरळ नाक, बॉब कट.....

‘मिळाला का फोटो?’
‘मिळाला...’
‘मग काय म्हणणे आहे?’
‘नक्की तुझाच फोटो आहे ना?’
‘मी कशाला दुस-या कोणाचा फोटो पाठवू?’
‘छान आहे फोटो....’
‘फोटो छान असेल हो, पण फोटोतल्या व्यक्तीचे काय? ती कशी वाटते?’
‘ती तर पहिल्यापासूनच छान वाटते......’ 
‘मग विचार काय आहे?’
‘माझा कांहीच विचार नाही, पण तुझा विचार कळला. उद्या माझा फोटो बघितल्यावर तुझा विचार नक्कीच बदलेल अशी माझी खात्री आहे’
‘पाठवा तर खरे. मी नाही बदलणार माझे विचार’
‘दिशा, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? तू कशी दिसतेस हे पाहण्याची माझीही इच्छा होती. पण मी तुला तुझा फोटो पाठव असे म्हणालो नाही, तर तू तो स्वत:हून पाठवलास. हे कसे काय घडले?’
‘कसे ????’
‘मी एक छोटीशी ट्रिक वापरली. मी फक्त एवढेच म्हणालो, तू कशी दिसतेस? राणी मुखर्जी सारखी? ऐश्वर्या राय सारखी? की दुस-या कोणत्या हिरोइनीसारखी? केवळ असे म्हणाल्याने तू तुझा फोटो स्वत:हून पाठवून दिलास. हे सांगण्याचे कारण म्हणजे आपण बॉसिंग न करताही, हुकूम न सोडताही आणि अगदी विनंती न करताही समोरच्या व्यक्तीला आपल्याला हवे तसे वागायला लावू शकतो’
‘ग्रेट! तुमच्याकडून बरेच कांही शिकायला मिळते’
‘तुला आणखी एक गोष्ट सांगायचे होती...’
‘काय?’
‘तू मला हुकूम सोडतेस, ते मला कधीकधी आवडते. ... का कुणास ठाऊक’

दुस-या दिवशी मी तिला माझा फोटो पाठवून दिला. तिचे उत्तर आले, ‘यु आर अ टिपिकल मराठी मॅन. ओके फॉर मी.... मला तुमचा सेल फोन नंबर सांगा....’
‘सॉरी, माझ्याकडे सेलफोन नाही.....’
‘ठीक आहे, मी माझा नंबर देते, त्यावर तुम्ही मला फोन करा....’
‘यु आर अगेन गिव्हिंग ऑर्डर्स...... जमला तर करेन...’
‘जमला तर वगैरे कांही नाही. करायचाच. आज संध्याकाळी सात वाजता. नाही केलात तर मग बघा..’
‘ए... मला धमकी देवू नकोस हं.. काय करशील मी नाही फोन केला तर?’
‘मग मी उद्या नेटवर तुमच्याशी च्याटिंगच नाही करणार...’
‘नको करूस.... तेवढाच तुझा वेळ वाचेल..’
‘आज संध्याकाळी सात वाजता....तुम्ही फोन करणारच..’ असे म्हणून ती लॉग आउट झाली.

संध्याकाळचे 6.50 झाले होते. मी एका टेलेफोन बूथजवळ गेलो. बरोबर सात वाजता मी दिशाला फोन लावला. फोन लगेच उचलला गेला.
‘इज इट दिशा?’
‘यस मिस्टर महावीर’
‘कैसी हो?’
‘आय एम  फाईन, व्हाट अबाउट यु?’
‘आय एम  अल्वेज फाईन’
‘मला वाटले होते तुम्ही फोन करणार नाही’
‘खरेच करणार नव्हतो. पण मला काय झालेय ते कळत नाही. तुला फोन करायचा नाही हे पक्के ठरवूनही माझी पावले टेलेफोन बूथकडे वळली’
‘याचा अर्थ तुम्ही माझ्या प्रेमात पडला असा होतो...’
‘आणि तू?’
‘तुम्हाला काय वाटते? हा सगळा माझा टाईम पास चालला आहे?’
‘मला तर हा सगळा भास वाटतो. किंवा एक स्वप्न. प्रत्यक्षात न येवू शकणारे’
‘यु आर अ पेसिमिस्ट ... एक निराशावादी’
‘नो, आय एम नॉट. आय एम जस्ट अ प्र्याक्टीकल पर्सन. जमिनीवर पाय ठेवून जगणारा’
‘मला वाटते आपण या विषयावर उद्या बोलू’
‘ओके, पण तुला नाही वाटत  हे सगळे वेळ वाया घालवायचे उद्योग आहेत?’
‘अजिबात नाही..’
‘मला काळजी वाटते... पुढे काय होईल याची. माझ्यामुळे तुला नसता मनस्ताप व्हायला नको’
‘तुम्ही त्याची चिंता करू नका. मी सांगेन तसे वागलात तर भलेच होईल आपल्या दोघांचे...’
‘मी नाही समजलो..’
‘समजेल. आपण परत बोलणारच आहोत’
‘ठीक आहे. ठेऊ आता?’
‘मिस्टर महावीर, तुम्ही माझ्यापासून दूर पळायचा प्रयत्न करत आहात असे सारखे वाटते’
‘होय... मलाही ते जाणवतेय...’
‘ठीक आहे... पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही’
‘इज इट अ च्यालेंज?’
‘यस. मी मनात आणले तर तुम्ही पुढचे किमान तीन तास माझ्याशी बोलत रहाल. पण आज नको’ 

मग विषय बदलत ती म्हणाली,
‘पुण्यात विविध भारती मुंबई ऐकू येते का?’
‘मी कधी ऐकले नाही, पण येत असावे’
‘येत्या शुक्रवारी  दुपारी 3 वाजता ऐका...’
‘कांही विशेष कार्यक्रम आहे का?’
‘इट इज अ सिक्रेट. ऐका तर खरे’
‘बरं, ऐकेन. ठेऊ फोन आता?’
‘नको’
‘एकदा तरी हो म्हणायला शिक की’
‘बरं ठीक आहे. तेवढं शुक्रवारच्या कार्यक्रमाचं लक्षात असू द्या. परत आठवण करेनच. आणि उद्या भेटूच नेटवर....’

-पुढे चालू:


या दीर्घकथेचा पहिला भाग:  माझी पत्रमैत्रीण

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा