Advt.

Advt.

गुरुवार, १० एप्रिल, २०१४

दिशाच्या वागण्यामागील रहस्य


 (मागील प्रकरणावरून पुढे चालू)

‘मला तुम्हाला वाढदिवसाची गिफ्ट द्यायची होती...’
‘आता काल एवढी जाहीर गिफ्ट दिलीस की... रेडीओवर माझ्यासाठी विशेष प्रोग्रॅम सादर करून’
‘हो पण आणखी एक गिफ्ट द्यायची आहे... डोळे झाका बघू...’
‘डोळे का झाकायचे?’
‘झाका म्हणते ना...Its an order.. आणि थोड्या वेळाने परत उघडा’
‘जशी तुझी आज्ञा’ असे म्हणून मी डोळे झाकले आणि कांही क्षणांनी उघडले. समोर बघतो तर दिशाने माझा व्हर्चुअल किस घेतला होता.... किसची स्माईली पाठवून....

‘दिशा, मला एक सांग आज तू कांहीतरी गोड पदार्थ खाल्ला होता का?’
‘नाही, मला गोड आवडते, पण आज मी कांही गोड खाल्ले नाही. पण हे तुम्ही का विचारले?’
‘तुझ्या ओठांची चव न्याचरल आहे आहे की एखादा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे ती तशी वाटते त्याचा विचार करत होतो’
‘तुम्ही म्हणजे भारीच आहात... पण मी तुमच्या गालाची पप्पी घेतली होती, ओठांची नाही... मग माझ्या ओठांची चव तुम्हाला कळेलच कशी?’
‘तू खोटं बोलतेस. गालाची पप्पी घायची असती तर तू मला डोळे झाकायला नसतेस सांगितले...’
‘मैं पकडी गई... यु आर राईट’
‘मग आता काय तू डोळे झाकणार का’
‘कशासाठी’
‘मी पण तुला गिफ्ट द्यावी म्हणतो....’
‘माझा वाढदिवस खूप लांब आहे... तेंव्हा बघू.... ही ही ही ...’
‘म्हणजे एक डिसेंबरपर्यंत मला वाट पहावी लागणार... पण तुझे जन्मसाल कोणते?’
‘मी ते नाही सांगणार आताच...’
‘1 डिसेंबर 1971, हीच ना तुझी पूर्ण जन्मतारीख?’
‘साल कसे काय ओळखलेत तुम्ही?’
‘बाय न्यूमरॉलॉजीकल कॅलक्यूलेशन्स....’
‘मग काय म्हणते तुमचे कॅलक्यूलेशन?’
‘न्यूमरॉलॉजीकली आपण एकेमेकांसाठी एकदम परफेक्ट आहोत. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे...’
‘काय?’
‘आज तुझे वय 31 वर्षे आहे... मी तुझ्यापेक्षा चक्क 13 वर्षांनी मोठा आहे....’
‘सो व्हाट?  ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत आहे... म्हणून तर मी तुम्हाला अहो-जाहो करते.. पहिल्यापासून...  युवर एज इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी....’ 
‘बट युवर एज इज अ बिग प्रॉब्लेम फॉर मी... या विषयावर मी ठाम आहे.. मित्र म्हणून आपण ठीक आहोत... बाकीचे सगळे विचार तू डोक्यातून काढून टाक......’
‘मला शक्य नाही ते...’
‘बी प्र्याकटीकल’
‘नॉट पॉसिबल फॉर मी ... कारण हे जे कांही चालले आहे ते आजचे नाही आहे. गेले अनेक जन्म हाच प्रकार चालला आहे. मी तुमचा पाठलाग करते आहे, पण तुम्ही मला हुलकावणी देत आहात. निदान या जन्मात तरी आपण एकत्र येऊ... नाहीतर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल... सारखेसारखे जन्म घेऊन कंटाळले आहे हो मी....तुम्ही सोडवा मला या भरकटण्यातून ...’  
‘दिशा... धिस इज अ शॉकिंग थिंग…..  तू हे काय बोलत आहेस? तुझ्यासारखी सुशिक्षित, जिनिअस मुलगी असल्या गोष्टींवर विश्वास कशी काय ठेवते?’
‘तुमचा नसेल पुनर्जन्मावर विश्वास, कारण तुम्हाला तुमचे मागचे जन्म आठवत नाहीत.... पण मला सगळे स्पष्ट आठवते. तुम्ही कोण होता, मी कोण होते...’
‘थांब..थांब.. तुझ्या समाधानासाठी हे सगळे खरं आहे असे मी क्षणभर मानतो... पण आपल्या एकत्र येण्याने तुझी यातून सुटका होईल हे कसे काय?’
‘ही गोष्ट तर मला पहिल्या जन्मापासून ठाऊक आहे. ज्या जीवांची ताटातूट होते ते परत भेटेपर्यंत तडफडत रहातात.... जन्म घेत रहातात. ते जेंव्हा परत एकत्र येतात तेंव्हाच त्यांना मुक्ती मिळते’ 
‘आपल्या एकत्र येण्याने तुझी सुटका होणार असेल तर ते चांगलेच आहे. पण हे एकत्र येणे म्हणजे नेमके काय?’
‘म्हणजे आपले लग्न झाले पाहिजे... संसार झाला पाहिजे..’
‘हे बघ दिशा, या जन्मात परीस्थिती मला अनुकूल नाही. तू मला आवडत असलीस तरी, आपले विचार जुळत असले तरी, जगात कुणाचेही नसेल तेवढे प्रेम आपले एकमेकांवर असले तरी, मी तुला न्याय देवू शकत नाही. त्यामुळे तू म्हणतेस ते मला शक्य नाही. त्यापेक्षा आपण असे केले तर?....
‘काय?’
‘आपण पुढच्या जन्मातच एकत्र येऊ. म्हणजे पुनर्जन्म असेल तर पुढच्या जन्मात आपली भेट होईलच. त्यावेळी तू म्हणशील तसे करू. तू म्हणशील ती पूर्व, दिशा..’
‘दर जन्मात तुम्ही असेच कांहीतरी म्हणत असता. तुम्हाला मी मुक्त व्हावे असे वाटत नाही का?’
‘ठीक आहे, मी तुला आत्ताच वचन देतो... पुढच्या जन्मात तू म्हणशील तसे होईल....... पण मला सांग, तुला खरंच हे सगळं खरं आहे असं वाटतं?
‘हे खरंच आहे’
 ‘दिशा मला आता तुझी भीती वाटायला लागली आहे. तू माझ्या अवतीभोवती फिरत असतेस असेही वाटतेय. म्हणूनच तुला माझ्याबद्दल इतकी माहिती असावी’
‘तसे कांही नाही आहे. ट्रस्ट मी’

‘मला सांग, गेल्या जन्मात काय झाले?’
‘गेल्या जन्मात तुम्ही सैन्यात होता... दुस-या महायुद्धाच्या वेळी... राजपुताना रायफल्स मध्ये. घरच्यांनी आपले लग्नही ठरवले होते.... परस्पर. आपण एकमेकांना पाहिलेही नव्हते. लग्नाचा दिवस आला. तुम्ही गावी येणार होता. पण अचानक तुमची सुट्टी क्यान्सल झाली. तुमच्या रेजिमेंटला आफ्रिकेत पाठवले इंग्रजांनी.... घरच्यांनी माझे लग्न तुमच्या तलवारीशी लावून दिले. मी तुमची वाट पहात राहिले, पण तुम्ही तिकडेच शहीद झालात...’
‘दिशा, मला ही गोष्ट शंकास्पद वाटते.. त्या काळात स्त्रिया, त्यातही राजपूत समाजातल्या, फारशा  शिकलेल्या नसत. तूही  शिकलेली नसणार. मग तुला इतक्या बारीक सारीक गोष्टी कशा काय माहीत? आफ्रिका, दुसरे महायुद्ध, राजपुताना रायफल्स, रेजिमेंट वगैरे....’
‘मी शिकलेली होते.. मला लिहिता-वाचता येत होते... तुम्ही मला आफ्रिकेतून पत्रेही पाठवत होता. मी देखील तुम्हाला पत्रे पाठवत असे. तुमच्या शेवटच्या पत्रात तुम्ही लिहिले होते, मी जर परत आलो नाही तर पुढच्या जन्मात आपण नक्की भेटू.... ’
‘त्यावेळी नाव काय होते माझे?’
‘जोरावर सिंह राठोड’
‘आणि तुझे?’
‘लाजवंती बाई...'

माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती न अडखळता आणि झटपट देत होती, त्यात काल्पनिक किंवा खोटे असे कांही वाटत नव्हते. तरीही खात्री करून घेण्यासाठी तिला मी आणखी कांही झटपट प्रश्न विचारले... खोटं बोलत असेल तर कुठे ना कुठे पकडली जाईल या आशेने..

‘लाजवंती बाई, मला सांगा जोरावर सिंह राठोड यांचे गाव कोणते होते?’
‘जैसेलमेर..राजस्थान’
‘आणि तुझे?
‘बाडमेर..राजस्थान... तुम्ही खात्री करून घेण्यासाठी इतके प्रश्न विचारात आहात ना? पण तुम्ही आणखी कितीही प्रश्न विचारलेत तरी मी त्यांची उत्तरे देवू शकते. झटपट. कारण गेल्या जन्मातले मला सर्व कांही आठवते. तुम्ही पाठवलेल्या पत्रांमधला मजकूरसुद्धा मला आठवतो. ..... त्यावेळची एक गोष्ट मला आठवते. मला एक विचित्र स्वप्न पडले. आपण दोघे हातात हात घालून चाललो होतो. तुम्ही अचानक माझा हात सोडून दिलात. हे स्वप्न पडल्यावर दहा दिवसांनी सरकारकडून कळवण्यात आले की तुम्ही शहीद झाला आहात. मला ज्या रात्री स्वप्न पडले त्यादिवशीच तुम्ही शहीद झाला होता ’
'याचा अर्थ तुला  इंट्यूशन होत असे..'
'होय. आताही मला पुढे होणा-या अनेक घटना आगाऊ कळतात'

‘मला सांग, दरवेळी आपला जन्म एकाच भागात होत असतो काय?’
‘होय, कारण तुम्ही जन्म घेतला की कांही काळाने मी तुम्ही जिथे असता त्याच्या आसपास कुठेतरी जन्म घेते’

दिशा माझ्या मागे का लागली आहे याचे उत्तर आता मला मिळाले होते... तिला जे आधीचे जन्म आठवतात,  तो तिचा भ्रम असावा एखाद्यावेळेस, पण मग ती इतक्या आत्मविश्वासाने, बारीक सारीक तपशील झटपट देत कशी काय बोलते? शिवाय तिने नेमके मलाच कसे शोधून काढले? 22 हा गूढ गोष्टींशी संबंधीत अंक दोघांच्याही जन्मतारखेच्या रीडिंगमध्ये कसा काय येतो? कदाचित ती म्हणते ते खरेही असेल. केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पुनर्जन्माची थेअरी नाकारणे योग्य नाही. याबाबतीत आपले धोरण सध्यातरी ‘असूही शकेल, नसूही शकेल, कांही सांगता येत नाही’ असे ठेवले पाहिजे.

‘ओके, चलतो मी आता.....’
‘रात्री फोन करणार ना?’
‘नाही’
‘नाही म्हणजे नक्कीच हो.. बरोबर ना?’
‘नाही... आज खरेच नाही. पण मी तुला उद्या नेटवर नक्की भेटेन..’

पण रात्री मी तिला फोन केलाच.
‘जोरावर सिंह स्पीकिंग...इज इट लाजवंती देअर?’
‘सध्या तुम्ही महावीर आहात आणि मी तुमची दिशा आहे ..’
‘मला हे सगळे आता इंटरेस्टिंग वाटायला लागले आहे. मला तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या जन्मांविषयी जाणून घ्यायचे आहे...’
‘मी सांगेन.... पण आज नाही. उद्या भेटायचेच आहे ना नेटवर?’
‘चालेल..’

मग आम्ही इतर विषयांवर खूप गप्पा मारल्या... दोन तास झाले... तीन तास झाले...टेलेफोन  बूथवाला दुकान बंद करू लागला. नाईलाजाने मी फोन बंद केला..

मी टेलेफोन बूथवाल्याला पैसे देताना तो म्हणाला, ‘काय सांगलीकर साहेब, लग्न ठरले का?’
‘नाही.......पण असे का विचारले’
‘एवढा वेळ टेलेफोनवर बोलणारे म्हणजे लग्न ठरलेले लोकच असतात.... काय बोलतात एवढे कुणास ठाऊक...’
मी त्याच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, ‘आणि लग्न झाल्यावर प्रत्यक्षात देखील बोलायचे बंद होतात’

-पुढे चालू:




या दीर्घकथेचे आधीचे भाग:
माझी पत्रमैत्रीण 
दिशाची पुन्हा एन्ट्री
दिशा विविध भारतीवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा